शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

शाळा सुटली अन् पाटीही फुटली..!

टण…टण...टण...शाळेची घंटा वाजल्यानंतर लगेचच पांढऱ्या-खाकी कपड्याचे जत्थेचे जथ्थे शाळेच्या अंगणात एका रांगेत उभे राहिले...पाणवठ्यावर पांढऱ्याशुभ्र बगळ्यांनी इथे-तिथे बैठक मारावी तशी विखुरलेली पाढंऱ्या कपड्यातली ही निष्पाप जमात एका क्षनात एका रांगेत उभी राहिली...‘जन गण मन अधिनायक जय हे…’चे सूर कानावर पडू लागले...कुणाचा बोबडा, कुणाचा घोगरा, कुणाचा नाजूक तर कुणाचा कोकिळेसारखा निरागस आवाज एकमेकांत मिसळून एव्हाना एक लयबद्ध आवाज आकाराला आला होता...’नमस्कार, मी अमूक-अमूक, इयत्ता चौथी....आज दिनांक अलाना-फलाना....आजचा सुविचार....नेहमी खरे बोलावे, खोटे बालू नये’ राष्ट्रगीत संपल्या-संपल्या त्यातल्याच एका पोरानं पुढं होऊन सुविचार सांगितला...आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन सावधानच्या अवस्थेत उभा राहिला...परत थोड्याशा मोठ्या पोरानं पुढं येऊन एकसाथ विश्रामची गगनभेदी घोषणा केली...पांढऱ्याशुभ्र मांजरीनं कूस बदलावी तसा या पोरा-पोरींचा जत्था एकसाथ हलला...एक-एक रांग वर्गाच्या दरवाजाकडे सरकू लागली...दोन्ही हात मागे बांधलेल्या पोरा-पोरींच्या रांगा कधी वर्गात शिरल्या समजलेच नाही...शाळेचा व्हरांडा मात्र अजून ‘जन गन मन’चे सूर आळवत असल्याचं भासलं...वर्गातल्या गलक्याचा आवाज व्हरांडा ऐकत बसला होता...जणू चिमुरड्यांच्या बोबड्या बोलांना व्हरांडा होकार देत असल्याचं जाणवलं...

लेंगा किंवा धोतर घातलेले पांढऱ्या कपड्यातले गुरूजी आणि हातात कसलीशी पुस्तकं घेऊन बाई एकेका वर्गात जाऊ लागल्या तसतसा किलबिलाटही विरत गेला...‘उभा एक, आडवे दोन, गाठीचे तीन, गायला पाय चार, हाताची बोटं पाच...’ गुरूजींच्या अधिकारी वाणीमागे पोरंही पाढे गुणगुणू लागले...मध्येच ‘ए गण्या, झोपू नकोस, लेका बाप तिकडं रानात मरमर मरतूय आण तू इथं झोपा काढतूयस व्हयरं...’ असा गुरूजींचा आवाज आला...आणि धप्प अशा आवाजाबरोबरच वर्गातली हलक्या आवाजातली कुजबूजही शांत झाली...मानगुटीला धरून गुरूजी गण्याला घेऊन शाळेच्या पडवीत आले सुद्धा...गण्याला अंगठे धरून उभ केलं अन् पाठीवर अंकलिपी आपटली...’अंकलिपी पडली तर शाळेचा पूर्ण व्हरांडा झाडून घीन...’ असा सज्जड इशारा देऊन गुरूजी अंतर्धान पावले...मेटाकुटीला आलेला गण्या मुकाट अंगठे धरून उभा राहिला...शिक्षा झाल्यानं आधीच भेदरलेल्या गण्याच्या पाठीवरची अंकलिपीही थरथरत राहिली...थरथरणारी अंकलिपी पडून नये म्हणून शिकस्त करत गण्या कमरेत वाकून निमूट उभा होता...वर्गातल्या पोरापोरींसमोर भभ्रा झाल्यानं गण्या काकुळतीला येऊन परिस्थितीसमोर नतमस्तक झाला होता...वर्गातल्या पोरांचा कालवा सुरूच होता...गुरूजींचा पहाडी आवाजही अधून-मधून घुमत होताच...

इतक्यात पुन्हा टण...टण...टण...घंटेचा आवाज झाल्याबरोबर पोरा-पोरींचा लोंढा बाहेर पडला...लघवीसाठी छोटी सुट्टी झाली असावी कदाचित...कुणी-बुणी शाळेच्या व्हरांड्याच्या कडेला तर कुणी-बुणी खुरट्या काँग्रेसच्या झुडुपात विधी उरकून घेत होतं...कुणी अंगठेठेपेची शिक्षा झालेल्या गण्याभोवती गोळा झालेलं...वाकून उभं राहिलेल्या गण्याकडं बघून कुणी खिदळत होतं तर कुणी गण्याची खेचत होतं...कुणी गण्याची पडायला झालेली टोपी उडवत होतं...गुरूजी हातात लाकडी पट्टी घेऊन प्रकटले अन् पोरं कुठच्याकुठं पांगून गेली...गुरूजींनी गण्याच्या पाठीवरची अंकलिपी उचलून पाठीवर जोराचा आवाजी धपाटा मारत ‘चल पळ, परत वर्गात झोपू नकोस’ असं म्हंटल्याबरोबर गण्यानं सुटकेचा निश्वास टाकला...तासाभराच्या वाकण्यानं आलेला शीण घालवत आळोखे-पिळोखे देत गण्यानं धूम ठोकली...

कुणी शाळेशेजारच्या चिंचेवरनं आणलेल्या कच्च्या हिरव्या चिंचा डोळे मिचकावत चाखत होतं, तर कुणी मुलींना पाटीवरच्या पेन्सिलींच्या बदल्यात चिंचा विकत होतं...कुणी व्हरांड्यातल्या फरशीवर कोळशानं घरं आखून लंगडीचा डाव मांडत होतं तर कुणी चिंचोक्यांचा खेळ मांडत होतं तर कुणी लपाछपी खेळत होतं...कुणी दगडांच्या मदतीने झाडावरच्या चिंचा पाडायचा प्रयत्न करत होतं तर कुणी शाळेच्या व्हरांड्यात कुणीतरी आणून उभ्या केलेल्या बैलगाडीवर घसरगुंडी खेळत होतं...कुणी शाळेच्या व्हरांड्यात शेजारच्या आया-बायांनी वाळत घातलेलं सूर्यफूल चोरून खिसे भरण्यात मग्न होतं...कुणी शाळेच्या आवारात बांधलेल्या टाकीतलं थंडगार पाणी मिटक्या मारत गळ्याखाली उतरवत होतं तर कुणी त्या पाण्यावर बसलेल्या माशांना उठवण्याचा कार्यक्रम पार पाडत होतं...पुन्हा टण...टण...टण...लघवीची सुट्टी संपली...

गावभर किंवा वाड्याभर उंडारणाऱ्या कोंबड्या कडुसं पडायच्या वेळी पुन्हा डालग्याभोवती गोळा होतात तशी सगळी पोर-पोरी शाळेत घुसली...’पुन्हा येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’चा सूर शाळेच्या आवारात झिम्मा घालू लागला...कुठल्यातरी वर्गातून परत ‘क ख ग घ’चे सूर तर कुठल्या वर्गातून ‘भारतात विविधतेतही एकतेचं दर्शन होतं...’चा आवाज....’आता बालभारतीचं पुस्तक काढा आणि पयला धडा वाचा’ म्हणत गुरूजी शाळेच्या पडवीत येऊन उगाचच वर्गात वाकून पहात उभे राहतात...कुणी मस्ती किंवा चलबिचल करताना दिसलं की
पडवीतून गुरूजींचा धमकीवजा इशारा जाई...गुरूजींच्या पहाडी आवाजाने वर्ग पुन्हा चिडीचूप...मग बाजूच्या वर्गातून हळूच बाई पडवीत येऊन ‘आमच्या वर्गात ना, पोरं अभ्यासच करायला मागत नाहीत, सारख्या टिवल्या-बावल्या, उताराही नीट काढून आणत नाहीत...’ असा तक्रारीचा सूर लावतात...गुरूजीही मग त्यांच्या तक्रारीला होकाराची मान डोलावतात...परत दोन्ही वर्गात कुजबुजीच्या आवाजानं गलका...गुरूजी आणि बाई विचारमंथन थांबवून पुन्हा वर्गात...पुन्हा टाचणी पडेल एवढी शांतता...फक्त अवती-भवतीच्या पक्षांचा किलबिलाट...दिवस वर आल्याने उन्हाच्या झळा बसू लागल्यावर शाळेच्या व्हरांड्यात झोपलेल्या कुत्र्यानं उठून कान झाडल्यावर येणारा फड्फड् आवाज हवेत विरतोय न् विरतोय तोच पुन्हा टण...टण...टण...जेवणाची मोठी सुट्टी झाली...

घंटेचा आवाज थांबल्याबरोबर पोरा-पोरींचा घोळका वेगानं बाहेर पडला...ज्याचं घर जवळ त्यानं घर गाठलं, ज्याचं घर लांब आहे किंवा जो शेजारच्या गावातून आलाय त्यानं शाळेच्या व्हरांड्यातच आपला संसार मांडला...जुन्या धोतराच्या किंवा नऊवारी पातळाच्या चटणीचे डाग पडलेल्या चिरगुटात बांधून आणलेली भाकर सोडून पोटपूजा करू लागला...कुणी वर्गात बसून खाऊ लागला...किलबिल्या डोळ्यांत समाधानाची लकेर उमटू लागली...जेवायला बरोबर बसलेल्यांना जिन्नसाची देवाणघेवाण झाली...एकोप्यानं मुलं जेवायला लागली...मी तुला माझी भाकरी दिली म्हणून गर्व नाही किंवा मी तू दिलेली भाकरी खातोय म्हणून संकोच नाही...भाकरीचा अर्धा घास दुसऱ्याला देत किंवा चपातीचा अर्धा घास दुसऱ्याकडून घेत मानवतेचा अवघा भावसोहळा सुरू होतो...एकमेकांचा ना धर्म माहित, ना जात...’हे विश्वची माझे घर’चं मूर्तीमंत दर्शन घडतं...जेवायला घरी गेलेली पोरं हळूहळू जमायला लागतात...व्हरांड्यात जेवायला बसलेल्यांच्या शिदोरीतला एखादा घास हळूच मिटकावतात...आनंदाला पारावर राहात नाही...

एव्हाना शाळेची घंटा वाजलेली असते...जेवण उरकलेलं असतंच...भाकरीचं चिरगूट गुंडाळून ठिगळाच्या चड्डीच्या खिशात कोंबत हौदाकडे जाऊन पाणी पिण्यासाठी धांदल उडते...भरपेट पाणी पिऊन पोरं शाळेत जाऊन बसतातही...पडवीच्या वर कौलाच्या खोपचीत चिमणा-चिमणीचं एकमेकांच्या चोचीत दाणं भरण सुरूच राहातं...शेजारच्या झाडावर बसलेला कावळाही निमूटपणे पाहात राहतो...पोरं निघून गेल्यानं हौदाच्या पाण्यावर माशांचं घोंघावणं पुन्हा सुरू होतं...हळूच एखादी खारूताई धाडस करत झाडावरून उतरून हौदाशेजारी साचलेल्या पाण्यात डुंबून घेते...शाळेशेजारच्या गोठ्यातून गाईचं वात्सल्यपूर्ण हंबरणं सुरू होतं...रवंथाची लाळ गाळत वासराची धडपड स्पष्ट ऐकू येते...विविध पक्षांचे चिवचिवाटी थवे शाळेच्या वर अथांग पसरलेल्या आभाळात फेर धरू पाहतात...

सूर्य कलू लागलेला असतो...तांबडी चादर पांघरण्याची घाई सूर्य लपवू इच्छित नसतो...पुन्हा वर्गात किलबिलाट सुरू होतो...निरागस किलबिलाटाला दिवसभराच्या थकव्याचा लवलेशही नसतो...गुरूजींचाही आवाज सकाळइतकाच स्पष्ट आणि ताजा असतो...शाळेसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर, शाळेमागच्या पाऊलवाटेवर एव्हाना वर्दळ वाढलेली असते...रानावणातली कामं आटोपून बळीराजा अन् बळीराणीन डोक्यावर ओझी घेऊन घराची वाट धरलेली असते...डोक्यावर ओझं घेतलेल्या आया-बायांनी हातात धरलेल्या कासऱ्याला उगाच हिसका देत, गळ्यातल्या घुंगुराचा खळखळाट करत शेळ्याही घराकडे कूच करत राहतात...बैलगाडीचं ओझं वहात ढवळे-पवळेही मान हलवत दुडक्या चालीनं चालत राहतात...शिवारभर मनसोक्त हिंडणाऱ्या पाखरांनीही घरट्याची वाट धरलेली असते...दुपारच्या रखरखीत उन्हात तापत पडलेली वाट आता जिवंत होऊ पाहात असते...शाळेशेजारून जाणाऱ्या पाऊलवाटेवर वाढलेल्या कोलाहलात शाळेतल्या पोरांचा आवाज मिसळत राहतो...शाळेत उद्याच्या उताऱ्याची तयारी सुरू झालेली असते...’सगळ्यांनी उद्या येताना एक ते शंभरचे पाढे लिहून आणायचे, साताचा पाढा पाठ करून यायचा’ गुरूजींनी आदेश फर्मावलेला असतो...शाळा सुटायची वेळ झाल्याने पोरांची चुळबूळ सुरू झालेली असते...पाटी, अंकलिपी दप्तरात भरायची घडबड उडालेली असते... महाबीज बियान्याच्या मोकळ्या झालेल्या पिशवीत किंवा खत-युरियाच्या मोकळ्या झालेल्या ठिक्यापासून शिवलेल्या दप्तरात खापराची पाटी, अंकलिपी कोंबून मुलांचे कान घंटेकडे लागलेले असतात...इतक्यात वर्गातून ‘आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे || तोषुनी मज द्यावे | पसायदान हे...’चे सूर कानावर पडू लागतात...एका सुरात, एका तालात ज्ञानोबांच्या पसायदानाचे चैतन्यमयी सूर मनाला आल्हाददायक गारवा देतात...मानवतेच्या भावनांचा यथेच्छ आभिषेक होत राहतो...शाळेतल्या इवल्या-इवल्या निरागस पोरांना ज्ञानोबा माऊलीने कवेत घेतलंय, छातीशी कवटाळून माऊली पोरांना कुरवाळतेय असं वाटू लागतं...अवघी सृष्टी पसायदान ऐकण्यात गुंगून गेलेली भासते...पसायदानाचे चिन्मयी सूर स्पष्ट ऐकता यावेत म्हणून जणू झाडांच्या पानांची सळसळही काही काळ विसावते... ‘येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला’ पसायदान संपल्याबरोबर शाळेची घंटा घणघणते...दफ्तराच्या पिशव्या खांद्याला अडकवून पोरांचा लोंढा नवोन्मेषानं बाहेर पडू लागतो...धबधब्याच्या फेसाळणाऱ्या पाण्यालाही लाजवेल असा लोंढा मोठ्या आनंदानं वर्गाच्याबाहेर पडताना दिसत राहतो...डोक्यावरच्या टोप्यांची गुंडाळी करून ठिगळाच्या चड्डीच्या खिशात कोंबत पोरं घराकडे धूम ठोकत होती...बटणं तुटलेल्या पांढऱ्या पैरणीचे झेंडे वाऱ्यानं फडफडवत पोरं पळ काढतात...
आणि...आणि अचानक कुणीतरी माझीच पैरण धरून ओढतंय असा भास झाला...मी धप्पकन भानावर आलो...पाहतो तर माझीच दोन्ही मुलं माझ्या पैरणीच्या शेंड्याला लोंबकळत होती...शाळा सुटल्यानं पोरं बऱ्याच वेळापासून बाहेर आली होती...गळ्यात टाय, चौकडीचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू कलरची हाफचड्डी, शाळेचं नाव लिहलेला बेल्ट, पायात सॉक्स-बूट...गळ्यात शाळेचं आयकार्ड, एका हातात रुमाल, एका हातात टोमॅटो सॉस लावलेला बर्गरचा तुकडा...मुलांकडे बघत सहज समोर पाहिलं...इतका वेळ मनात रुंजी घालत असलेली, भावनांचा ओलावा जपणारी जिल्हा परिषदेची कौलारू शाळा कुठल्याकुठं लुप्त झाली होती...माझ्या मुलांची इंग्राजळलेली, रुक्ष, कोरडीठाक शाळा अन् तिची भलीमोठी इमारत नजरेत भरत होती...गचांडीला धरून मला माझ्याच बालपणात घेऊन जाणारी माझी जिल्हा परिषदेची शाळा समोर नव्हती, माझे गुरूजी, माझ्या बाई, हातावर लाकडी पट्टीचा मार, शाळेसमोरची बैलगाडी, पाण्याचा हौद, चिऊकाऊंचा चिवटिवाट, चिंचेचं झाड, व्हरांड्यात जेवणाच्या सुट्टीत सोडलेल्या चटणी-भाकरीचा दरवळ...काही काही नव्हतं...

मनगटाला शेंबूड पुसत, करगुट्याला लटकवलेली ठिगळाची चड्डी सांभाळत गण्या उद्या पुन्हा शाळेत येईल...शाळेत झोपणार नाही असा निर्धार करत गण्या वर्गात दाखल होईल...पोरं-पोरी उतारा काढून गुरूजींना-बाईंना दाखवण्यासाठी गलका करतील...पुन्हा घंटा वाजत राहतील...

आमच्या आयुष्याची मात्र शाळा सुटली अन् शाळेतली शिक्षा तेवढी उरली...आता परिस्थितीसमोर आयुष्यभर अंगठे धरून उभं राहायचं एवढंच आपल्या हातात...निष्पाप, निरागस अल्लडपणाची किनार असलेल्या शिस्तीची शाळाही सुटली अन् आनंदाचे डोई आनंद तरंगवणारी खापराची पाटीही फुटली...