बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

पिक्चर खल्लास...धुरळा बाकी..!

आज रात्रौ ठीक साडेनऊ वाजता, म्हणजे थोड्याच वेळात, महान मराठी रंगीत चित्रपट, दे दणादणssss, दे दणादणssss, दे दणादणssss, याल तर हसाल, न याल तर फसाल….सकाळी उठून शेण काढत बसाल...आणि शेजाऱ्याला विचारत बसाल...गावातल्या लाऊडस्पिकरवरून घागऱ्या आवाजातली घोषणा ऐकली की घराघरात नुसती चूळबूळ...जत्रेला आलेले पावणे-रावळे तमाशा-कुस्त्या बघून एव्हाना पांगलेले असतातच...जत्रेला माहेरी आलेली आणि मुक्कामी असलेली सासुरवाशिन पोरा-टोरांना दूध-भात चारून झोपवायच्या तयारीत असते...पिक्चर बघायला तिलाही जायचं असतं ना...पण तेवढ्यात इवलंस पोर आई, मी नाय झोपणाल...मलाबी पिक्चल बगायला यायचंयअसं बोबडं बोलतं...निरागस गालावर चिकटलेला भाताचा शित पदराने पुसत बरं बरं, पण यवढा सगळा भात खा आधी आन् पिक्चर सुरू असताना रडायचं नाय, आन् झोपायचंबी नाय, तरच नेणारम्हणते...आईच्या होकाराने पोरगं मनोमन सुखावतं, तोबरा भरभरून दूध-भात फस्त करतं, अर्धा तांब्या पाणी गटागटा करत नरड्याखाली उतरवतं...हातापायाला चिकटलेला भात पुसत तृप्तीचा ढेकर देतं...पिक्चर बघायला मिळणार म्हणून डोळ्यात समाधानाची लकेर उमटते...

इकडं बाप्ये खाणं-पिणं उरकून डोक्याला मफलर नाहीतर टावेल गुंडाळून पिक्चरला जायच्या तयारीला लागतात...पिक्चर मध्यरात्री कधीतरी संपणार असल्यानं आंथरुणं-पांघरुणं पसरण्यासाठी नुसती धांदल उडते...अंगणात झोपणारे अंगणात वाकळा-गोधड्या उभ्या-उभ्या फेकून देतात...पिक्चर संपल्यावर चूळ भरायला आणि प्यायला पाणी लागणार म्हणून अंगणातल्या भिंतीजवळ पाण्याचा तांब्या ठेवून देतात...तंबाखू-चुण्याच्या डब्या आणि बटवे फुल्ल आहेत की नाही याची चाचपणी होते...पिक्चरला जाण्यापूर्वी गुरा-ढोरांना वैरण टाकण्यासाठी गडबड उडते...परड्यात गायी, म्हशी, बैलांचा धडपडत रवंथ सुरूच असतो...घरात चुलीजवळ चुऱ्याची किंवा पत्त्याची तंबाखू भाजून मशेरी बनवण्याची आयाबायांची घाई उडालेली असते...रात्रभर पुरेल एवढी मशेरी डबीत नाहीतर प्लॅस्टिकच्या पुरचुंडीत घेऊन पिक्चरला जाण्यासाठीची आतुरता लपत नाही...शाळकरी पोरांनी गुरूजींनी दिलेला अभ्यास पूर्ण करून दफ्तरं एव्हाना कोपऱ्यात टाकलेली असतातच...बसायला पोतं नाहीतर ताडपत्रीचा तुकडा घेऊन कुटुंबकबिल्याला घेऊन जत्थेच्या जत्थे पिक्चरच्या पडद्याकडे सरकू लागतात...अख्खं गाव पिक्चर बघायला गोळा होतं...

इकडं गावच्या पुढाऱ्यांची लगबग वाढलेली असते...दोन कळक उभे करून पांढरा पडदा बांधण्यासाठी उमेदीतल्या पोरांची घाई सुरू असते...कुणी लाऊडस्पिकर बांधतंय तर कुणी हॅलो, हॅलोकरत लाऊडस्पिकरचा आवाज चेक करतंय...कुणी शेजारच्या घरातून वायर टाकत लाईटची सोय करतंय तर कुणी लोकांना बसायच्या जागेवर झाडलोट करतंय...तेवढ्यात गलका उडतो...आले आले, साहेब आले...पिक्चर दाखवणारा इसम भर रात्रीतही काळसर गॉगल लाऊन लुना किंवा मोपेडचा धूर फेकत, गाडीचा टरटर...फटफट आवाज
करत पिक्चरस्थळी पोहोचतो...गावचे पुढारी पुढं होऊन त्याच्या गाडीवरच्या मोठमोठ्या पेट्या उतरवण्यास मदत करतात...पिक्चरवाला साहेब आला म्हणून बायका आणि पोरं सावरून बसतात...सर्वात पुढून पिक्चर बघायला मिळावा म्हणून आधीच कुणीबुणी जागा अडवलेल्या असतात...पडद्याच्या दोन्ही बाजूंना भली गर्दी लोटलेली असते...कुणाच्यातरी घरातून लाकडाचा टेबल, पत्र्याची खुर्ची आणून मांडामांड होते...त्यावर पिक्चरवाला साहेब त्याच्या मशनी ठेवतो...लटपटणाऱ्या टेबलाखाली चपट्या दगडाची चिप बसवून टेबलाची बैठक स्थिर केली जाते...चहा-पाणी देऊन पिक्चरवाल्या साहेबाचा पाहुणचार केला जातो...काही चिकित्सक पोरं पिक्चरला जागा अडवायची सोडून साहेबाच्या भोवती गोळा होतात...लक्ष्या बेर्डे, महेश कोठारेला हा सायब ओळखत असणार असा त्यांचा समज असतो...ते कुतुहलाने त्याच्याकडे बघत असतानाच थोराड बाप्ये पोरांना हुसकून लावतात...पोरं चड्ड्या सांभाळत जागेवर जाऊन बसतात...

पिक्चरवाला साहेब मशीन सुरू करतो, अख्खा पडदा व्यापून टाकेल असा शुभ्र चौकोनी तीव्र प्रकाशाचा झोत पडद्यावर पडतो...प्रकाशाचा चौकोनी झोत पडद्यावर चपखल बसवण्यासाठी मशीनची सेटिंग सुरू होते...त्यातच कुणीतरी उठून हात वर करत बोटं नाचवतं, पडद्यावर नाचणाऱ्या बोटांची सावली पडते अन् पोरं खूश होतात...उशिरा आल्यानं बसायची घाई झालेले प्रकाशाच्या मधून जातात अन् त्यांची सावली पडद्यावर स्पष्ट दिसते...कुणीतरी उठून उगाच प्रकाश झोतासमोर डान्स करू पाहतं...पडद्यावर दिसणारी आपलीच नाचतानाची सावली आनंदानं न्याहाळतं...तेवढ्यात लाऊडस्पिकरवरून पुढारी पुकारतात...गावच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीने ठेवलेल्या पिक्चरच्या समारंभासाठी सर्वांनी वेळ काढून उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सगळ्यांचं हार्दिक स्वागत....सगळ्यांनी खाली बसून घ्यावं, शांतपणे पिक्चरचा आनंद घ्यावा...सातारच्या साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी पिक्चर सुरू करावा...ज्योतीबाच्या नावानं चांगभलंssss, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं....घोषणा संपल्यासंपल्या पिक्चरची रीळं फिरायला लागतात...पडद्यावर एकएक प्रसंग सरकत राहतो...

लक्ष्या बेर्डेच्या एन्ट्रीला पोरांना कोण आनंद होतो...लक्ष्याला लहान मुलांकडून टाळ्यांच्या कडकडाटाची तर तरुण पोरांकडून शिट्ट्यांची सलामी मिळते...मान हलवत, हातवारे करत लक्ष्या अख्खा पडदा व्यापत राहतो, पडद्यावर लक्ष्याच्या करामती बघून, त्याचे विनोद बघून, त्याचा नाच बघून पोरा-बाळांसकट बाप्ये-बायांच्या गालावर खुदकन हसू उमलतं...माझ्या उरात होतंय धकधक रं...म्हणत गावरान प्रेमाकिरण पडद्यावर अवतरते अन् बाया डोक्यावरचा पदर तोंडाला लावत लाजू पाहतात...इकडं तरुण पोरांचे हात शिट्ट्या वाजवायला, टावेल उडवायला सरसावलेले असतातच...गाणं संपतं आणि डॅम इटम्हणत सुटाबुटातला गोरागोमटा राजबिंडा महेश कोठारे पडद्यावर उडी घेतो...त्याच्यापाठोपाठ मधाळपणे हसत निवेदिता जोशी कॅब्रेडान्स करू पाहते...अन् पडद्यावर अचानक काळोख पसरतो...एकच धांदल उडते, पिक्चरवाल्या साहेबाची, गावच्या पुढाऱ्यांची धावपळ सुरू होते...पिक्चरची फिरणारी रिळं विसावतात...फ्यूज जळाल्याने गेलेली लाईट परत आणण्यासाठी गावातल्या वायरमनला बोलवलं जातं...पक्कड, स्क्रू ड्रायव्हर घेऊन वायरमन काहीबाही करतो अन्
लाईट येते...पिक्चर पुन्हा सुरू...काळ्याकुट्ट दीपक शिर्केच्या एन्ट्रीला आयाबाया बोटं मोडतात, शिव्यांच्या लाखोल्या वाहतात...पोरंटोरं भीतीनं घाबरून जातात...पण लक्ष्याच्या अफलातून शक्तीनं सर्वांना दिलासा मिळत असतो...विलक्षण शक्ती प्राप्त झाल्याने लक्ष्या दीपक शिर्केला चारीमुंड्या चीत करेल असा विश्वास प्रत्येकाच्या ठायी ठासून असतो...

पिक्चर असा रंगात आलेला असतानाच कुणाचं तरी तान्हुलं बाळ भोकाड पसरतं...बघणाऱ्यांचा रसभंग टाळण्यासाठी रडणाऱ्या पोराला घेऊन माय घराकडे निघून जाते...पिक्चर पुन्हा सुरू...लक्ष्याला विलक्षण शक्ती प्राप्त असतेच पण लाल रंग दिसला की लक्ष्या गर्भगळीत होतो...सायकलवरून चाललेल्या लक्ष्याला लाल रंग दिसतो अन् रस्त्याकडेच्या बोर्डावर लक्ष्या आदळतो...जणू आपलंच कपाळ फुटलं की काय असं समजून लोकांचे हात कपाळाकडे जातात...एवढ्यात कुठल्यातरी कोपऱ्यात गलका उडतो...देवाला सोडलेली जाणी गायही पिक्चर बघायला गर्दीत घुसू पाहते...लोकांची एकच धावपळ...गावचे पुढारी पुढं होऊन गायीला हाकलून लावतात ना लावतात तोच बायकांच्या गर्दीत उंदरानं घुसखोरी केलेली असते...बायकाही पोरं सांभाळत उठून धावू लागतात...उंदीर निघून गेलेला असतो...पुन्हा पिक्चर सुरू...पिक्चर एव्हाना शेवटाकडे कलू लागलेला असतो...शेवटची फायटिंग सुरू झालेली असते...लक्ष्या विलक्षण शक्तीच्या मदतीने व्हिलनची धुलाई करत असतो...लक्ष्याच्या एकाएका फाईटसरशी लोकांची उरं फुगू लागतात...आणि अचानक लाल रंगाचं गाठोडं कुणीतरी फेकतो...लक्ष्या पुन्हा गर्भगळीत...जीवलग दोस्त महेश कोठारे ढिक्शाव करत उडी घेतो अन् लाल गाठोडं शेजारच्या आगीत फेकून देतो...लक्ष्या जोशात, व्हिलन खल्लास...पिक्चर संपल्यानं नाव पडायला सुरूवात झालेली असते...पिक्चर संपल्यानं धुरळा उडतो, लगबगीनं प्रत्येकजण घराकडे निघतो...भजन्या भिकूंचा नातू, पांडुआबांचा पुतण्या सापडला असून त्यांच्या घरातलं कुणी असेल तर त्याला घेऊन जावं...लाऊडस्पिकरवरची घोषणा ऐकल्याबरोबर आबा लगबगीनं रडणाऱ्या पुतण्याचे डोळे पुसत घराची वाट धरतात...मध्यरात्री कधीतरी गाव झोपेच्या चादरीखाली गुडूप होतं...निपचित पहुडतं...

आता लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागलाय...फटफटीला किक मारतंय अन् शहरात जाऊन मल्टिप्लेक्समध्ये पिक्चर बघतंय...एका हातात पॉपकॉर्न किंवा समोसा घेत एसीच्या थंडगार हवेत पिक्चर पाहिले जाऊ लागलेत...डॉल्बी साऊंड आणि डिजीटल  पिक्चर असूनही जत्रेतल्या पडद्यावरच्या पिक्चरची मात्र मजा त्यात नाही...पडद्यावरचा पिक्चर संपल्यावर पांडुआबांच्या पुतण्याबरोबर जणू मजाही हरवली होती...पुतण्या सापडला पण पडद्यावरच्या पिक्चरची हरवलेली मजा काही आता सापडता सापडत नाही...आता ती सापडेल असंही वाटत नाही...जणू पिक्चरमधल्या महेश कोठारेनं आगीत फेकलेलं लाल रंगाचं गाठोडं आपल्या आनंदानं भरलं होतं...गाठोडं तर जळालंच पण त्यातला पडद्यावरच्या पिक्चरचा आनंदही जळून खाक झालाय...आता जुन्या आठवणींची राख तेवढी आपल्या हातात उरलीय...तीही विस्मृतीच्या गर्तेत जाण्यासाठी सटकत चाललीय...

(लेखात तंबाखू आणि तंबाखूच्या मशेरीचा उल्लेख केवळ वातावरण निर्मितीसाठी असून तंबाखू आणि तंबाखूची मशेरी आरोग्यास अपायकारक आहे)


चित्र सौजन्य- दैनिक प्रहार