शनिवार, ३१ मे, २०१४

आजी मिळेल का ?

सूर्यदेवानं डोंगराआडून डोकावलेलं असतं...गुलमोहराचा ताटवा फुलावा तसा तांबूस रंग उधळत सूर्यदेव रोजच्याप्रमाणे पुन्हा एकवार जन्मलेला असतो...अलवार थंडीत सूर्यदेवाच्या स्वागतासाठी पक्षांचे थवेच्या थवे आभाळभर उंडारत राहतात...घराघारांसमोर पाणी तापवायच्या चुली धुरांडा फेकत पेटू लागतात...चांगलंच फटाटल्यामुळे रातभर निपचित पहुडलेलं गाव जीवंत होऊ पाहतं...घराघरांतून भांड्याकुंड्यांचा आवाज सुरू होतो...पोक्त बाया-बाप्ये उठून कामाला लागलेली असतात...पोरं-टोरं अजून आडवे-तिडवे पाय पसरून झोपेतच असतात...एवढ्यात तोंडावरून उबदार पण खरबडीत हात फिरल्याचा भास झाल्यानं साखरझोपेतलं पोरगं किलबिले डोळे उघडतं...अस्पष्ट दिसणारं दृश्य स्पष्ट दिसण्यासाठी डोळे चोळत, डोळ्यांची उघडझाप करत बघण्याचा प्रयत्न करतं...सुरकुतलेल्या चेहऱ्याची आजी पोराजवळ बसलेली...उठ रं बाबा, सकाळ झाली म्हणत पोराला मांडीवर घेऊन कुरवाळत राहते...पोरगं जागं होतं पण आजीच्या नऊवारी पातळाचा पदर तोंडावर घेत पुन्हा झोपी जायचा प्रयत्न करतं…’उठ रं बाबा, आज निकाल हाय ना साळचा, आंघुळ करून देवाच्या पाया पडून जा साळत’ रापलेल्या हातांनी म्हातारी नातवाला उठवण्याचा प्रयत्न करते...

पोरगं अंग झाडत ताडकन उठून बसतं...तळहातावर माकडछाप काळी पावडर घेऊन अंगणातल्या चुलीपुढं दात घासत बसतं...अंगणाच्या शेजारच्या गोठ्यातून वासराचं धडपडण सुरू राहतं...पोरगं बोटानं दात घासत चुलीतली काटकं उलटीपालटी करत राहतं...पाण्याला आदण आल्याचा आवाज वाढत राहतो...दुडक्या चालीनं म्हातारी काठी टेकवत वाकून चुलीजवळ येते...हाताला चटका बसू नये म्हणून पदरानं चुलीवरचं भगुलं उचलून बादलीत रिकामं करते...बादलीतून पाण्याच्या वाफा बाहेर झेपावत राहतात...पोरगं उठून कपडे काढायला लागतं...म्हातारी रिकाम्या झालेल्या भगुल्यात पुन्हा पाणी भरून ठेवते...फुकणीनं फुंकत चुलीत सरपण कोंबत राहते...एव्हाना पोरगं कपडे उतरवून मोरीत शिरलेलं असतंच...वाफाळलेल्या पाण्याच्या बादलीत म्हातारी इसाणासाठी गार पाणी टाकून पाणी कोमठ करते...तांब्यानं पोराच्या अंगावर भडाभडा ओतत राहते...साबण-बिबण लावून पोराचे हातपाय चोळते...पोराचं अंग पुसून केस कोरडे करते...पोरगं चड्डी-पैरण
घालून तयार होतं...पोराची आई म्हशीची धार काढून तांब्याभर निरसं दूध म्हातारीच्या हातात टेकवते...म्हातारी पोराच्या तोंडाला तांब्या लावते...नको नको म्हणत पोरगं दुधाचा तांब्या फस्त करतं...म्हातारी खडबड्या हातानं पोराच्या हणुवटीवरून ओघळणारं दूध पुसते...बटव्यातून खडीसाखरेचे चारपाच खडे काढून पोराच्या हातावर टेकवते...पोरगं खडीसाखरेचे खडे दाताने फोडत म्हातारीच्या पायाला हात लावतं...आई-बापाच्या-देवाच्या पाया पडून शाळेकडे धूम ठोकतं...

वाकलेली म्हातारी एका हाताने काठी सांभाळत घराच्या अंगणातूनच दिसणाऱ्या देवळाच्या कळसाला हात जोडत पोरगं पास होण्यासाठी याचना करते...अंघोळ वगैरे उरकून म्हातारी उन्हाला बसलेली असते...सुनबाईचा स्वयंपाक जोरात चाललेला असतो...पिकलेले पांढरे केस म्हातारी कंगव्याने विंचरत बसलेली असते...आजूबाजूला फिरणाऱ्या कोंबड्यांना हातातल्या मूठभर दाण्यांचा रतीब घालण्याचं काम सुरूच असतं...सूनबाई म्हातारीला कपबशीतनं चहा आणून देते...कपातला चहा बशीत ओतून म्हातारी फुर्रर्रर्र फुर्रर्रर्र करत चहा संपवते...बसल्या-बसल्याच शेजारच्या तांब्यातल्या पाण्याने कप-बशी धुवून उन्हात ठेवते...सवड मिळाल्यावर सूनबाई कपबशी घेऊन जाते...

इतक्यात रडत-हुंदका आवरत पोरगं घराच्या अंगणात येऊन भिंतीजवळ उभं राहतं...पोराच्या डोळ्यांत पाणी बघून म्हातारी गलबलून जाते...धडपडत, काठी टेकवत म्हातारी पोराकडे धावते...पोराला घट्ट मिठीत घेऊन पोटाशी धरते...पोटाला घट्ट बिलगलेल्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवत पोराला रडण्याचं कारण विचारते...पोरगं आवंढा गिळत काठावर पास झाल्याचं सांगतं...आणि भोकाड पसरतं...म्हातारी कशीबशी खाली बसते...तिथल्यातिथं पोराला मांडीवर घेते...’जावदे, यंदा काठावर झालास ना, फुडच्या वर्षी चांगला अभ्यास कर, चांगला पास हो’ म्हणत बटव्यात जपून ठेवलेल्या लेमनच्या गोळ्या पोराच्या हातावर ठेवते...पोराचं दु:ख कुठल्याकुठं गायब होतं...म्हातारीनं दिलेला आत्मविश्वास त्याला आयुष्यभर पुरेल असं वाटतं....

पोराला दूध-भाताचं जेवण चारून म्हातारी कशीबशी चटणी-भाकर घशाखाली उतरवते...तोपर्यंत पोरगं म्हातारीनं अंथरलेल्या पोत्यावर झोपी गेलेलं असतं...म्हातारी अंगणात शेणानं सारवत बसते...संध्याकाळ होते...पोरगं डोळ्यांची उघडझाप करत जागं होतं...दिवस बऱ्यापैकी कललेला असतो...म्हातारीनं अंगण सारवल्यानं शेणाचा दरवळ नाकात घुमत असतोच...उठलेलं पोरगं बघून म्हातारी लगबगीनं घरात जाते...डब्यात जपून ठेवलेला चिवडा तामानात आणून पोराला देते...घराच्या कोपऱ्यातल्या उतरंडीत ठेवलेल्या गाडग्यातून उकडलेल्या पसाभर शेंगा पोराला सोलून देत राहते...थरथरणाऱ्या हातांनी तोंडापर्यंत आलेले शेंगदाणे पोरगं मटकावत राहतं...अर्धा तांब्या घशाखाली उतरवून पोरगं खेळायला बाहेर पडतं...तिन्ही सांज ऐन रंगात आलेली असते...धूसर प्रकाश गहिरा होत जातो...आभाळातली पाखरं घरट्याकडे परतू लागलेली असतात...पोरगं घरात येऊन म्हातारीनं चारलेलं जेवण उरकतं...ढेकर देत अंगणात म्हातारीनं टाकलेल्या वाकळवर झोकून देतं...म्हातारीही जेवण-बिवण उरकून अंगणात पोराच्या उशाशी येऊन बसते...राजा-राणी-प्रधान आणि भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारी गोष्ट ऐकत पोराचा डोळा कधीचाच लागलेला असतो....

पोराच्या जगण्याचा भाग बनलेली, जखमेवर मायेची फुंकर घालणारी, तोंडावरून खडबडीत पण आधाराचा हात फिरवणारी आजी रोजच्या रोज पोराचं पालन-पोषण करत राहते...म्हातारीनं सांगितलेल्या गोष्टी ऐकत पोरगं मोठं होत राहतं...एकेदिवशी चोर-पोलिसाची गोष्ट सांगत पोरगा झोपलाय याची खात्री करत झोपलेली आजी परत उठतच नाही...सकाळी भावकी-गावातली माणसं गोळा होतात...घरच्यांनी, नातेवाईकांनी हंबरडा फोडलेला असतो...दु:खाचा नुसता हलकल्लोळ माजलेला असतो...भिंतीला टेकवलेलं म्हातारीचं कलेवर पोरगं निराकारपणे न्याहाळत राहतं...पोरगं कोपऱ्यात ठेवलेल्या काठीकडं बघत आतल्या आत धुमसत राहतं...म्हातारीला कायम आधार देणारी काठी आज मात्र पोरकी, निराधार झाल्याची जाणीव पोराला होतं राहते...स्वत:चाही मोठा आधार हरपल्याची भावना पोरगं लपवू शकत नाही...घराजवळचा भलामोठा वटवृक्ष कोसळल्याने सावलीत मोठं होऊ पाहणारं रोपटं कधीच कोमेजलेलं असतं...आज मात्र ते पुरतं करपून गेलेलं असतं...

शुक्रवार, २ मे, २०१४

मुलगी पसंत आहे

पेकाटात लाथ बसल्याबसल्या दारात डाराडूर झोपलेलं कुत्र कॅवकॅव करत कुठल्याकुठं पळ काढतं...घरमालकीन चरवीतलं पाणी दारात, अंगणात शिंपडते तशी धुमसलेली माती निपचित पडून राहते...पाण्यात कालवलेल्या शेणाचा हात फिरवत दारातली जागा सारवली जाते...शेणानं सारवलेली जमीन थोडी सुकल्यावर त्यावर रांगोळीच्या रंगबिरंगी रेषा उमटत जातात...स्वास्तिक-बिस्तिक काढून खाली सुस्वागतमची अक्षरं उमटतात...काढलेल्या रांगोळीवर घाण करू नये म्हणून फिरणाऱ्या कोंबड्यांना दारात उभं राहून खूडssss खूड म्हणत हाकललं जातं...कोंबडीपण आपल्या पिलांना सोबत घेऊन लांब जाऊन कॉक कॉक करत राहते...कधीतरी विणून ठेवलेलं तोरण दाराला लावताना घरमालकीनीची तारांबळ उडते...बाहेर दोरीवळ वाळत घातलेले कपडे काढून, फारच वाईट दिसत असेल तर वेळप्रसंगी दोरीही तोडून घराशेजारचा परिसर स्वच्छ केला जातो...अडगळीतल्या वस्तू दिसू नयेत म्हणून तजवीज केली जाते...सगळं टापटिप करण्याची धावपळ सुरू असते...कारण उपवर लेकीला बघायला पाहुणे येणार असतात ना..!

इकडे घरातही जिथल्यातिथं वस्तू ठेवण्याची घाई उडालेली असते...खाटेवरची गादी किंवा कोचवरचा कपडा व्यवस्थित केला जातो...घरातल्या झाडलोटीला तर प्रमाणच नसतं...थोडा कुठं कागदाचा तुकडा दिसला रे दिसला की केरसुनी हातात घेऊन मुलीच्या आईची झाडलोट सुरू...एक तारीख उलटून गेलेली असते, पण कॅलेंडरचं पान मात्र जुनाच महिना दाखवत असतं...मुलीचा मोठा दादा खिखि करत लगबगीनं पान उलटून कॅलेंडर भिंतीवर लटकवतो...पाहुणे आले की पाणी देण्यासाठीचा तांब्या, ग्लास घासून-पुसून चकाचक केलेला असतो...चहा देण्यासाठीच्या कपबशीकडे मुलीच्या आईचं सारखं लक्ष जात असतं...एखाद्या कपाचा कान मोडलेला असतो...डोक्यावर हात मारत माऊली शेजारच्या काकीकडं जाऊन नवे कोरे डिझायइनचे कप आणते...शेजारची काकी चहा देण्यासाठीचा माळ्यावर पडलेला नक्षीदार ट्रे सुद्धा देते...पोहे भिजत घातलेले असतातच...कोपऱ्यात बसलेली म्हातारी विळीवर कांदा कापून लिंबाचे बारिक तुकडे करून ठेवते...पोह्यांवर पखरण करण्यासाठी किसणीवर ओलं खोबरं किसून झालेलं असतंच...

मुलीच्या बापाच्या मात्र घरात आणि घराबाहेर अशा अगणित येरझाऱ्या चालू असतात...स्थळ आणणारा गावातलाच एखादा किंवा पाव्हणा-रावळा येणाऱ्या पाहुण्यांच्या संपर्कात असतो...शेजारच्या घरातील एखादी सून किंवा मुलीची मैत्रिण मुलीचा मेकअप करण्यासाठी सकाळीच येऊन बसलेली असते...मुलीनं नेसलेली साडी उठून दिसत नसल्यानं लगबगीनं शेजारच्या घरातली सून स्वत:ची आवडीची साडी घरातून घेऊन येते...मुलीचा मेकअप केला जातो...मुलीचा मेकअप करताना टिंगल-टवाळी चालू असतेच...राजकुमार येणार म्हणून राजकुमारी नटून बसलीय म्हणत कुणी मुलीला डिवचत राहतं...मुलगी लाजून चुर्रर्र होत हसून मस्करीला दाद देते...

इतक्यात दारासमोर एकदोन फटफटी किंवा चारचाकी येऊन थांबते...चारपाच जण पांढरेशुभ्र कपडे घालून ऐटीत दरवाजात येऊन थांबतात...मागोमाग इनशर्ट केलेला उपवर मुलगा रुबाबात समोर येऊन उभा राहतो...मुलीचा बाप अन् मध्यस्थी असणारा ग्रहस्थ पाहुणे आल्याची वर्दी घरातल्या बायांना देत पाहुण्यांच्या स्वागताला लगबगीनं हजर होतात...या या म्हणत पाहुण्यांना घरात आणलं जातं...मुलाला मध्यभागी बसवून मुलासोबत आलेले बाकीचे आजूबाजूला शिस्तीत बसतात...पाण्याचा भलामोठा तांब्या आणि त्यावर फूलपात्र उपडं ठेऊन पाहुण्यांना दिलं जातं...पाहुणे रुमालानं घाम पुसतं पाणी पित इकडच्या तिकड्या, शेता-वावराच्या, पाऊस-पाण्याच्या गप्पा करत राहतात...मध्यस्थी असणारा ग्रहस्थ मध्येच गप्पा तोडत मुलीला बोलवायचं का? असं विचारतो...मुलगी बघायला आलेले पाहुणे मान हलवून मुलीला बोलवा असं सुचित करतात...मुलीचा भाऊ आतल्या घरात जाऊन मुलीला घेऊन येतो...कावरी-बावरी झालेली मुलगी थरथरत्या हातात पोह्यांचा ट्रे घेऊन येते...सर्वांना पोह्यांच्या डिश देऊन समोरच्या खुर्चीत बसते...खाली मान घालून पायाच्या अंगठ्यांनी जमिनीवर टोकरत राहते...सारखा घसरत असलेला डोक्यावरचा पदर सावरत असते...साडीची सवय नसल्याने मुलीचं अवघडलेपण लपत नाही...

मुलासोबत आलेले नाव, गाव, शिक्षणासारखे जुजबी प्रश्न विचारतात...घाबरत, अडखळत मुलगी उत्तरं देते...त्यातलेच काहीजण मुलाला प्रश्न विचारण्यासाठी खून करतात...मुलगा पुढच्या आयुष्याबाबतचे प्रश्न विचारतो...नोकरी करायची की घरीच राहायचं?, पुढे शिक्षण घेणार का?, स्वयंपाक येतो का? वगैरे प्रश्न विचारतो...मान वर न करता खाली बघत मुलगी थरथरत्या ओठांनी अडखळत उत्तरं देते...भंबेरी उडालेली मुलगी अडखळेल तेव्हा मोठा दादा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो...प्रश्नोत्तरे चालू असताना माशीच्या घोंघावण्याचाही आवाज स्पष्ट ऐकू यावा येवढी शांतता असते...माशीच्या घोंघावण्याबरोबरच पाहुण्यांचा पोहे खातानाचा चमच्या डिशचाही आवाज अधूनमधून येतच राहतो...आतल्या घरातून बायाबापड्या प्रश्नोत्तराचा तास कान लाऊन ऐकत असतात...एव्हाना प्रश्नोत्तरे संपलेली असतात...मुलाबरोबर आलेला पोक्त बाप्या उठून पिशवीतून पेढ्याचा बॉक्स, साडी वगैरे काढून मुलीच्या ओटीत ठेवतो...मुलगी भरलेली ओटी सांभाळत उभी राहते अन् सर्वांच्या पाया पडण्यासाठी पुढं सरसावते...पाहुण्यांपैकी एकजण ‘सर्वांच्या पाया पडू नको, एकाच ठिकाणी पाया पडून आत जा’ म्हणतो, तसा मुलीला धीर येतो...एका ठिकाणी पाया पडून मुलगी आतल्या खोलीत जाते...पाहुणे निरोपा-निरोपी करण्यासाठी उठतात...मुलाचा निर्णय दोन-तीन दिवसांत कळवतो म्हणतात आणि दाराबाहेर पडतात...आतल्या घरात बसलेल्या बाया लगबगीनं उठून चौकटीतनंच मुलाला पाहतात...म्हातारीही हात टेकवत दारातून मुलाला पाहात राहते...मुलगा अन् पाहुणे निघून गेलेले असतात...

इकडे आतल्या खोलीत श्वासांची वाढलेली गती कमी करण्याचा मुलीचा प्रयत्न चाललेला असतो...मोठ्या परीक्षेचा पेपर देऊन आल्याची भावना मनात दाटलेली असते...परीक्षा संपल्यानं सुटकेचा निश्वास टाकलेला असतो, पण निकालाची धाकधूक मनात वाढत जाते...होकार येतोय की नकार याचा विचार करत भावी संसाराची स्वप्नगाठ बांधण्याचा प्रयत्न चाललेला असतो...पाहुण्यांची निरवानिरव झालेली असते पण मुलीच्या मनातला कोलाहल मात्र वाढता वाढता वाढतच जातो...दारात काढलेली रांगोळी वाऱ्यामुळे एव्हाना विस्कटलेली असते...सूर्य कलू लागल्यावर भिंतीकडेला सावली पडल्यानं सकाळच्या जागेवर येऊन कुत्र्यानं आसरा घेतलेला...माऊलीनं दारावर बांधलेल्या तोरणाची फुलं वाऱ्याच्या झुळुकीने हेलकावत राहतात...