शुक्रवार, २ मे, २०१४

मुलगी पसंत आहे

पेकाटात लाथ बसल्याबसल्या दारात डाराडूर झोपलेलं कुत्र कॅवकॅव करत कुठल्याकुठं पळ काढतं...घरमालकीन चरवीतलं पाणी दारात, अंगणात शिंपडते तशी धुमसलेली माती निपचित पडून राहते...पाण्यात कालवलेल्या शेणाचा हात फिरवत दारातली जागा सारवली जाते...शेणानं सारवलेली जमीन थोडी सुकल्यावर त्यावर रांगोळीच्या रंगबिरंगी रेषा उमटत जातात...स्वास्तिक-बिस्तिक काढून खाली सुस्वागतमची अक्षरं उमटतात...काढलेल्या रांगोळीवर घाण करू नये म्हणून फिरणाऱ्या कोंबड्यांना दारात उभं राहून खूडssss खूड म्हणत हाकललं जातं...कोंबडीपण आपल्या पिलांना सोबत घेऊन लांब जाऊन कॉक कॉक करत राहते...कधीतरी विणून ठेवलेलं तोरण दाराला लावताना घरमालकीनीची तारांबळ उडते...बाहेर दोरीवळ वाळत घातलेले कपडे काढून, फारच वाईट दिसत असेल तर वेळप्रसंगी दोरीही तोडून घराशेजारचा परिसर स्वच्छ केला जातो...अडगळीतल्या वस्तू दिसू नयेत म्हणून तजवीज केली जाते...सगळं टापटिप करण्याची धावपळ सुरू असते...कारण उपवर लेकीला बघायला पाहुणे येणार असतात ना..!

इकडे घरातही जिथल्यातिथं वस्तू ठेवण्याची घाई उडालेली असते...खाटेवरची गादी किंवा कोचवरचा कपडा व्यवस्थित केला जातो...घरातल्या झाडलोटीला तर प्रमाणच नसतं...थोडा कुठं कागदाचा तुकडा दिसला रे दिसला की केरसुनी हातात घेऊन मुलीच्या आईची झाडलोट सुरू...एक तारीख उलटून गेलेली असते, पण कॅलेंडरचं पान मात्र जुनाच महिना दाखवत असतं...मुलीचा मोठा दादा खिखि करत लगबगीनं पान उलटून कॅलेंडर भिंतीवर लटकवतो...पाहुणे आले की पाणी देण्यासाठीचा तांब्या, ग्लास घासून-पुसून चकाचक केलेला असतो...चहा देण्यासाठीच्या कपबशीकडे मुलीच्या आईचं सारखं लक्ष जात असतं...एखाद्या कपाचा कान मोडलेला असतो...डोक्यावर हात मारत माऊली शेजारच्या काकीकडं जाऊन नवे कोरे डिझायइनचे कप आणते...शेजारची काकी चहा देण्यासाठीचा माळ्यावर पडलेला नक्षीदार ट्रे सुद्धा देते...पोहे भिजत घातलेले असतातच...कोपऱ्यात बसलेली म्हातारी विळीवर कांदा कापून लिंबाचे बारिक तुकडे करून ठेवते...पोह्यांवर पखरण करण्यासाठी किसणीवर ओलं खोबरं किसून झालेलं असतंच...

मुलीच्या बापाच्या मात्र घरात आणि घराबाहेर अशा अगणित येरझाऱ्या चालू असतात...स्थळ आणणारा गावातलाच एखादा किंवा पाव्हणा-रावळा येणाऱ्या पाहुण्यांच्या संपर्कात असतो...शेजारच्या घरातील एखादी सून किंवा मुलीची मैत्रिण मुलीचा मेकअप करण्यासाठी सकाळीच येऊन बसलेली असते...मुलीनं नेसलेली साडी उठून दिसत नसल्यानं लगबगीनं शेजारच्या घरातली सून स्वत:ची आवडीची साडी घरातून घेऊन येते...मुलीचा मेकअप केला जातो...मुलीचा मेकअप करताना टिंगल-टवाळी चालू असतेच...राजकुमार येणार म्हणून राजकुमारी नटून बसलीय म्हणत कुणी मुलीला डिवचत राहतं...मुलगी लाजून चुर्रर्र होत हसून मस्करीला दाद देते...

इतक्यात दारासमोर एकदोन फटफटी किंवा चारचाकी येऊन थांबते...चारपाच जण पांढरेशुभ्र कपडे घालून ऐटीत दरवाजात येऊन थांबतात...मागोमाग इनशर्ट केलेला उपवर मुलगा रुबाबात समोर येऊन उभा राहतो...मुलीचा बाप अन् मध्यस्थी असणारा ग्रहस्थ पाहुणे आल्याची वर्दी घरातल्या बायांना देत पाहुण्यांच्या स्वागताला लगबगीनं हजर होतात...या या म्हणत पाहुण्यांना घरात आणलं जातं...मुलाला मध्यभागी बसवून मुलासोबत आलेले बाकीचे आजूबाजूला शिस्तीत बसतात...पाण्याचा भलामोठा तांब्या आणि त्यावर फूलपात्र उपडं ठेऊन पाहुण्यांना दिलं जातं...पाहुणे रुमालानं घाम पुसतं पाणी पित इकडच्या तिकड्या, शेता-वावराच्या, पाऊस-पाण्याच्या गप्पा करत राहतात...मध्यस्थी असणारा ग्रहस्थ मध्येच गप्पा तोडत मुलीला बोलवायचं का? असं विचारतो...मुलगी बघायला आलेले पाहुणे मान हलवून मुलीला बोलवा असं सुचित करतात...मुलीचा भाऊ आतल्या घरात जाऊन मुलीला घेऊन येतो...कावरी-बावरी झालेली मुलगी थरथरत्या हातात पोह्यांचा ट्रे घेऊन येते...सर्वांना पोह्यांच्या डिश देऊन समोरच्या खुर्चीत बसते...खाली मान घालून पायाच्या अंगठ्यांनी जमिनीवर टोकरत राहते...सारखा घसरत असलेला डोक्यावरचा पदर सावरत असते...साडीची सवय नसल्याने मुलीचं अवघडलेपण लपत नाही...

मुलासोबत आलेले नाव, गाव, शिक्षणासारखे जुजबी प्रश्न विचारतात...घाबरत, अडखळत मुलगी उत्तरं देते...त्यातलेच काहीजण मुलाला प्रश्न विचारण्यासाठी खून करतात...मुलगा पुढच्या आयुष्याबाबतचे प्रश्न विचारतो...नोकरी करायची की घरीच राहायचं?, पुढे शिक्षण घेणार का?, स्वयंपाक येतो का? वगैरे प्रश्न विचारतो...मान वर न करता खाली बघत मुलगी थरथरत्या ओठांनी अडखळत उत्तरं देते...भंबेरी उडालेली मुलगी अडखळेल तेव्हा मोठा दादा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो...प्रश्नोत्तरे चालू असताना माशीच्या घोंघावण्याचाही आवाज स्पष्ट ऐकू यावा येवढी शांतता असते...माशीच्या घोंघावण्याबरोबरच पाहुण्यांचा पोहे खातानाचा चमच्या डिशचाही आवाज अधूनमधून येतच राहतो...आतल्या घरातून बायाबापड्या प्रश्नोत्तराचा तास कान लाऊन ऐकत असतात...एव्हाना प्रश्नोत्तरे संपलेली असतात...मुलाबरोबर आलेला पोक्त बाप्या उठून पिशवीतून पेढ्याचा बॉक्स, साडी वगैरे काढून मुलीच्या ओटीत ठेवतो...मुलगी भरलेली ओटी सांभाळत उभी राहते अन् सर्वांच्या पाया पडण्यासाठी पुढं सरसावते...पाहुण्यांपैकी एकजण ‘सर्वांच्या पाया पडू नको, एकाच ठिकाणी पाया पडून आत जा’ म्हणतो, तसा मुलीला धीर येतो...एका ठिकाणी पाया पडून मुलगी आतल्या खोलीत जाते...पाहुणे निरोपा-निरोपी करण्यासाठी उठतात...मुलाचा निर्णय दोन-तीन दिवसांत कळवतो म्हणतात आणि दाराबाहेर पडतात...आतल्या घरात बसलेल्या बाया लगबगीनं उठून चौकटीतनंच मुलाला पाहतात...म्हातारीही हात टेकवत दारातून मुलाला पाहात राहते...मुलगा अन् पाहुणे निघून गेलेले असतात...

इकडे आतल्या खोलीत श्वासांची वाढलेली गती कमी करण्याचा मुलीचा प्रयत्न चाललेला असतो...मोठ्या परीक्षेचा पेपर देऊन आल्याची भावना मनात दाटलेली असते...परीक्षा संपल्यानं सुटकेचा निश्वास टाकलेला असतो, पण निकालाची धाकधूक मनात वाढत जाते...होकार येतोय की नकार याचा विचार करत भावी संसाराची स्वप्नगाठ बांधण्याचा प्रयत्न चाललेला असतो...पाहुण्यांची निरवानिरव झालेली असते पण मुलीच्या मनातला कोलाहल मात्र वाढता वाढता वाढतच जातो...दारात काढलेली रांगोळी वाऱ्यामुळे एव्हाना विस्कटलेली असते...सूर्य कलू लागल्यावर भिंतीकडेला सावली पडल्यानं सकाळच्या जागेवर येऊन कुत्र्यानं आसरा घेतलेला...माऊलीनं दारावर बांधलेल्या तोरणाची फुलं वाऱ्याच्या झुळुकीने हेलकावत राहतात...

1 टिप्पणी:

  1. तंतोतंत वर्णन ग्रामीण भागात सध्या अशीच असते पाहुण्यांची लगबग आणि यजमानांची धावपळ

    उत्तर द्याहटवा