शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

असा पोलीस, असा बंदोबस्त

लटपटणारे पाय सांभाळत दुडक्या चालीनं कातावलेल्या चेहऱ्याचा माणूस बँकेत प्रवेश करताना डोक्यावरचा पंखा कूरकूरत फिरत राहिला होता...हातातली काठी भिंतीला टेकवत गुडघ्याला हात लावून बाकड्यावर बूड टेकताक्षणी कमरेतून निघालेली कळ मस्तकात गेलेली...चेहऱ्यावरची प्रत्येक पेशी अंगभर फुटणाऱ्या अगणित कळा लपवू शकत नव्हती...तव्यावर तडतडणाऱ्या लाह्यांसारखी प्रत्येक वेदना शिवशिवत राहिली होती...जीव चालल्यासारखा फिरणाऱ्या पंख्याच्या न जाणवणाऱ्या हवेत घटकाभर बसून मळकटलेल्या रुमालानं कपाळावरचा घाम टिपताना हातातला चष्मा अवचित गळून पडला होता...पडलेला चष्मा उचलावा म्हणून वाकावं तर कमरेनं कधीचंच बंड केलेलं...चेहऱ्यावर ठसठशीतपणे दिसणारा याचनेचा भाव बघून मोबाईलवर बोलत एकानं न बघताच चष्मा उचलून हातात टेकवला तेव्हा सुटकेचा निश्वास सुटला...पडलेल्या चष्म्यावर कुणी पाय दिला तर शे-पाचशे रुपयांचा चुना लागण्याच्या भीतीनं टांगणीला लागलेला जीव अखेर भांड्यात पडला...थरथणाऱ्या हाताने डोळ्यावर चष्मा लावून पिशवीतलं बँकेचं पासबूक हातात घेऊन उठताना झालेल्या वेदनांनी तोंडातून निघालेला ‘आई SSSS’ असा चित्कार ऐकून बँकेत जमलेल्या इतरांनी माना वळवल्या...कातावलेला चेहरा पाहून एकानं हातात हात घेऊन काऊंटरवर आणून सोडलं...

हातातलं कोपरे दुमडलेलं पासबूक एव्हाना क्लार्कच्या हातात देऊन झालं होतंच...कॉम्प्युटरच्या उजेडात उजळलेल्या क्लार्कच्या चेहऱ्यावर आशाळभूत नजर एकसारखी लागून राहत होती...’बाबा, अजून पेन्शन जमा न्हाय झाली, दोन-तीन दिवसांनी या...’ क्लार्कच्या तोंडातून पडलेल्या शब्दांनी घायाळ होत हबकलेल्या चेहऱ्यानं पासबूक पिशवीत कोंबत म्हाताऱ्यानं बँकेतून काढता पाय घेतलेला असतोच...मधुमेहाची औषधं, सांधेदुखीचं तेल, नातूला सायकल घेऊन देण्याच्या दिलेलं आश्वासन, घरातलं लाईटबिल, घरपट्टी-पाणीपट्टीच्या हिशेबानं डोक्यात काहूर माजलेलं...डोक्यातल्या विचारांचं थैमान आणि डोळ्यांत दाटलेलं अश्रूंचं तांडव लपवत घरात प्रवेश करताना समोरच्या भिंतीवर लटकलेला जुनाट फोटो पाहून म्हाताऱ्याचा चेहरा कधी नव्हता एवढा फुलला...साचलेली धूळ खाटेवरच्या टावेलनं झटकल्यानं फोटोत स्पष्ट दिसू लागलेल्या प्रतिमा जुन्या दिवसांत घेऊन गेल्या होता...वर्दीतल्या फोटोत स्वत:च्या छातीवर लावलेली बोटभर पाटी निरखून पाहताना म्हातारं खुलून गेलं होतं...खाक्या वर्दीतला रुबाब पाहताना स्वत:च्या नावापुढे लिहलेली ‘पोलीस नाईक’ पदवी पाहून कमरेवर हात देऊन उभं राहिलेल्या म्हाताऱ्याची छाती अभिमानानं फुलून आली...पोलीस सेवेत असतानाचा एकेक प्रसंग डोळ्यांसमोर तरळू लागला...

रस्त्यावर दुतर्फा साचलेल्या गर्दीत उभं राहून गणपती विसर्जनातला बंदोबस्त तर जसाच्या तसा डोळ्यांसमोर हेलकावत राहतोय...गणपतीच्या दहा दिवसांत ड्युटीमुळे डोळ्याला डोळा लागला नव्हता...वेळ मिळेत तेव्हा, जागा मिळेल तिथे घटकाभर विश्रांती घेऊन पुन्हा रस्त्यावर डोळ्यांत तेल घालून उभं राहताना मनातला हुरूप अजून लख्ख आठवतोय...मध्यरात्रीच्या दोन-अडीच वाजता कुठल्याशा कोपऱ्यात उडालेला गलका पाहून धावत सुटलेले पाय अजून दिसतायत...कुणाचंतरी गर्दीत चुकलेलं पोरगं उचलून घेतल्यावर त्याचे डोळे पुसताना भिजलेल्या हाताची ओल सुकलीय यावर विश्वासच बसत नाही...लहानग्या जीवाचा आक्रोश अजून कानात घुमतोय...रडणाऱ्या पोराच्या चेहऱ्यावर दिसणारी भूक पाहून बाजूच्या पानटपरीवरून घेतलेला बिस्कीटचा पुडा अजून आठवतोय...महिना अखेरीमुळे खिशात इनमिन राहिलेली दहा रुपयांची नोट बिस्किटांसाठी मोडताना थोडंसही दु:ख झालं नव्हतं...रडता-रडता खांद्यावर विश्वासाने मान टाकून झोपलेल्या पोराला घेऊन त्याच्या माता-पित्यांना शोधताना केलेली धावपळ अजून पायांना जाणवतेय...गर्दीतून वाट काढत फर्लांगभर पायपीट करून सापडलेल्या आई-बापाकडे पोरगं सोपवताना त्यांना मायेनं दम देतानाचा आवाज घशातून आत्ता-एवढ्यात निघाल्यासारखा वाटतोय...गर्दीत चुकलेला जीवाचा तुकडा ताब्यात घेताना त्याच्या आईच्या पाणावलेल्या डोळ्यांतली कृतज्ञतेची भावना आता, या क्षणालाही डोळ्यांसमोरून जात नाही...

नवरात्रोत्सवात रात्रभर फेसाळणारा तरुणाईचा लोंढा आवरताना केलेली कसरत कालच केल्यासारखी वाटत राहतेय...रात्रभर प्रफुल्लित चेहऱ्यानं दांडियाच्या खेळात रमणारे सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी गस्त घालताना डोळ्यांत दाटलेली झोप कुठच्याकुठं पळून गेलेली असायची...वेगळ्या वाटेनं जाऊन झिंगलेल्या एखाद्याला धपकवत चौकीत आणून, चौकशी करून डोक्यातली उतरल्यावर सोडताना दिलेला चांगलं वागण्याचा सल्ला अजून आठवतोय...झोकांड्या देत रात्रभर पोलिस चौकीत बडबडबडत राहणाऱ्या तळीरामाची कटकट अजून चालू असल्यासारखी वाटतेय...सलग 24 तासांची ड्युटी करूनही पोरांना भेटता यावं म्हणून घरी जाण्यासाठी धावपळ करताना थकवा जाणवतच नसायचा...कामावरून सुटल्यावर खाकी वर्दी घडी घालून ठेवलेली बॅग सांभाळत कधी एकदा घर गाठतोय आणि पोरांना बघतोय असं व्हायचं...आपण घरी पोहोचण्याआधी पोरं शाळेत गेली तर पुन्हा गाठभेट पुढच्या आठवड्यातच...जीर्ण झालेल्या, मरगळ आलेल्या पोलिस वसाहतीच्या जुन्या इमारती डोळ्यांना दिसू लागताच पायांचा वेग नकळत वाढायचा...वसाहतीच्या प्रांगणात साचलेल्या डबक्यांतून, उग्र वास फेकत बारमाही वाहणाऱ्या उघड्या गटारांतून वाट काढत इमारतीच्या पायऱ्या चढताना तर पोटच्या पोरांना पाहण्यासाठी जीव डोळ्यांत आलेला असायचा...धावत-पळत तिसऱ्या मजल्यावरील घराच्या दारात पोहोचल्याबरोबर पोरं शाळेत गेल्याने घरातली शांतता मनात कालवाकालव करत रहायची...खांद्याला अडकवलेली बॅग हताशपणे घरातल्या जुन्या खाटेवर टाकून, अंघोळ करून दोन घास पोटात ढकलताना डोळ्यांवर झोपेची तोरणं लोंबकळलेली असायचीच...जेवायला समोरच बसलेल्या अर्धांगिणीनं आग्रहानं अर्धी चपाती ताटात वाढलेली अजून आठवतेय...हातावर पाणी पडल्याबरोबर तिथल्या तिथं आडवं होऊन कधी डोळा लागायचा त्याची टोटलही लागायची नाही...

पोलीस वसाहतीतल्या घरातील पोपडे उडालेल्या भिंतीवर झुरमुळ्या लावून धाकट्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसाची केलेली तयारी अजून स्पष्ट आठवतेय...चॉकलेट-गोळ्या आणायला दिलेल्या पैशांची बचत करून साचवलेल्या गल्ल्याचा प्लास्टिकचा डबा थोरल्या पोरानं एव्हाना फोडून टाकलेला असतो...जमा झालेल्या चिल्लरची मोजदाद करून गेलेला पोरगा चॉकलेटी रंगाचा केक घेऊन डेरेदाखल झालेला असतोच...रंगीबिरंगी फुलांचा फ्रॉक घालून नटलेल्या इवल्याशा लेकीचा चेहरा खुलून आलेला असतो...एखाद्या परीला लाजवेल असं लेकीचं रुपडं बघताना डोळ्यांना आल्हाद मिळत राहायचा...पोलीस वसाहतीतल्या शेजारपाजारच्या आया-बाया, पोरा-पोरींच्या गलक्याने घर भरून गेलेलं असतं...अखंड चाललेल्या कलकलाटात मोबाइलच्या रिंगचा आवाज मात्र लपत नाही... ‘अमूक ठिकाणी दहशतवादी हल्ला झालाय, लवकर हजर व्हा...’ कानाला लावलेल्या मोबाइलवरून मिळालेली माहिती अंग जाळत सुटते...सकाळी खाटेवर टाकलेली बॅग खांद्याला अडकवून पुन्हा पोलिस स्टेशन गाठताना बर्थ-डे गर्लचा परीसारखा चेहरा डोळ्यांसमोरून हटत नव्हता...केकला लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशाने उजळलेला लेकीचा चेहरा बॅग उचलल्याबरोबर हिरमुसून गेलेला होता...जीवाचा आकांत करून दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना धारातीर्थी कोसळलेल्या पोलीस मित्रांचे चौका-चौकात लागलेले फोटो पाहिल्यावर सॅल्यूट ठोकण्यासाठी अजूनही हात अलगद उचलले जातात...

दारावरची बेल वाजल्याबरोबर इतक्या वेळ फोटो पाहत घुटमळणारं म्हातारं भानावर आलं...वळून बघितल्याबरोबर कसलंसं पत्र हातात घेऊन पोस्टमन दारात उभा...पत्र हातात टेकवून पोस्टमन कधी निघून गेला ते समजलंही नाही...कव्हर फोडून पत्रावरच्या एकेका अक्षरावरून नजर फिरताना काळीज दाटून येत होतं...शौर्यपदकासाठी निवड झाल्याचं सांगणारं पत्र कुठं ठेऊ अन् कुठं नको असं झालं...सकाळी बँकेतून परतताना पेन्शन जमा न झाल्यानं काळवंडलेल्या मनाची जळमटं कुठच्या कुठं गळून पडली...’पोलीस सेवेत असताना वेळेवर न होणाऱ्या पगारासह आयुष्य काढलं...मग आता पेन्शन नाही वेळेवर आली तर काय बिघडलं..?’ मनाची अशी समजूत घालत पत्र छातीशी कवटाळत डोळे मिटून म्हातारं दारात तसंच अधीरपणे उभं होतं...नोकरीसाठी परदेशात गेलेल्या पोराचा, नांदायला गेलेल्या पोरीचा चेहरा मिटलेल्या डोळ्यांतही स्पष्ट दिसत होता...पुरेसा वेळ, पुरेसा पैसा-अडका पदरी न पडताही आयुष्यभर हसऱ्या चेहऱ्यानं कसलीही कुरबूर न करता साथ देणारी, वयपरत्वे थकलेली बायको दारात त्याच हसऱ्या चेहऱ्यानं उभी असलेली स्पष्ट दिसत होती...दिवस कलल्याने घराच्या अंगणात दाटलेला काजळदाट अंधार मात्र मनात खुपत रहात होता...दिवसभर लख्ख प्रकाशाने सृष्टीला अंघोळ घालण्याची ड्युटी बजावणाऱ्या सूर्यदेवानं आत्ता, अशा कातरवेळी का बरं अंधाराचा बंदोबस्त केला असावा..?

अंगणभर कोसळून साऱ्या परिसराला गिळंकृत करणारा अंधार दाटलेला असतानाच, आयुष्याचा सारीपाट डोळ्यांसमोरून सर्रकन हेलकावत राहिलेला होता...सांजवेळी कातावलेला प्रहर उरात घर करत राहिला होता...दारात उभी राहिलेल्या बायकोच्या दर्शनाने म्हाताऱ्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटून गेली होती...ऑन ड्युटी चोवीस तासांच्या तणावाला कितीतरी वर्ष आनंदाची तोरणं बांधणारी, मनावर झालेल्या अकस्मात जखमांवर हळूवार फुंकर घालणारी बायको समोर उभी होती...भाज्या, घरसामानाच्या थैल्या हातात घेऊन बायको अवघडल्याचं लक्षात आल्यासरशी म्हातारं विजेच्या वेगानं पुढं सरकलं...हातातल्या पिशव्या घेत दुडक्या चालीनं स्वैयंपाकघराकडे गेलं...दिवस कलल्याने घरभर थैमान घालू पाहणारा अंधार लक्षात आल्याबरोबर तिनं चाचपडत घरातला बल्ब लावला...

लंगडत, खुरडत जाऊन पेंगू लागलेल्या देव्हाऱ्यातल्या समईत तेल ओतलं...तेलाचा रतीब मिळाल्यावर तेजोमय झालेल्या समईला आणि पिवळाशार उजेड ओकणाऱ्या बल्बला नमस्कार करत म्हातारीनं हात टेकत बैठक मारली...स्वैयंपाकघरातनं दोनचार ग्लास, वाट्या पडल्याचा आवाज झाला होताच...थरथरत्या हातानं म्हाताऱ्यानं पाण्याचा ग्लास बायकोच्या पुढे नेला...पाण्याचा ग्लास हातात घेत म्हातारीनं कपाळाचा घाम पुसला...’तुम्ही आयुष्यभर पोलिसाची नोकरी केली, पण भांडी पाडल्याशिवाय कोणतं काम होईल का तुमच्याच्यानं?’ पाण्याचा घोट घशाखाली उतरवून म्हातारीनं मस्करीच्या स्वरात प्रश्न फेकलेला होताच...’आता वय झालं, चालायचंच...’ म्हणत म्हाताऱ्यानंही भाज्यांच्या पिशव्या जवळ ओढत बैठक मारली...

दिवस कसे सरले याचा हिशेब लावत भाज्यांची निवडानिवड सुरू झाली...कोट-टाय घालून घोड्यावर बसून रुबाबात लग्नाच्या मांडवात प्रवेश करतानाचा राजबिंडा नवरदेव डोळ्यासमोर तरळू लागला होताच...पोरीला पोलीस नवरा बघून दिल्यानं होणाऱ्या कौतुकाचा वर्षाव झेलत मांडवभर धावपळ करणारा बाप तर जसाच्या तसा दिसत होता...लगीनघाई उरकल्यावर सजवलेल्या गाडीत बसून सासरच्या नव्या घराकडे कूच करताना लागलेली हूरहूर स्पष्ट जाणवत होती...अवचितपणाचा कळस करत सारखा घसरणारा डोक्यावरचा पदर सावरत घरात वावरताना दीर-भावजयींनी पोलीसबाई पदवी बहाल केल्यावर लाजल्याचंही अजून स्पष्ट आठवतंय...

हाहा म्हणता लग्नाचे दिवस सरत होते...पोलिसातली नोकरी असल्याने आधीच कमी असणारी सुट्टी संपत आली होतीच...चंबू-गबाळं गोळा करून मुंबईकडे जाताना आपलं गाव, आपली माती सोडताना तुटलेला जीव अजून सांधता येत नाहीय...मुंबईत कुठल्यातरी एसटी स्टँडवर उतरल्यावर चोहोबाजूला दिसणारे लोकांचे जत्थे पाहून घाबरलेलं मन हळूहळू कधी सराईत झालं कळलंही नाही...मुंबईतल्या गर्दीचं तेव्हा वाटणारं अप्रुप नकळतपणे विरघळून गेलं होतं...सुटकेस, बॅगा सावरत चाललेल्या पतीच्या मागं कावरीबावरी होत पोलीस वसाहत गाठली...तीन-चार मजले चढल्यानं लागलेली धाप दाबत घरात प्रवेश केला...मुंबईत पाऊल ठेवताना सुरू झालेला पोलीस वसाहतीतला मुक्काम मुंबई सोडेपर्यंत बदलला नव्हताच...
सकाळी उठून ड्युटीवर जाताना नवऱ्यानं टाकलेला प्रेमाचा कटाक्ष अजून अंगावर रोमांच उभं करतोय...इनमिन दोन खोल्यांचं सरकारी घर दिवसभर खायला उठायचं...सकाळी ड्युटीवर गेलेला नवरा दुसऱ्या दिवशी सकाळीच उगवायचा...घरात नवरा नसताना गावाकडच्या आठवणींनी मन दाटून यायचं...मनाची घालमेल जाणवल्यानं नवऱ्य़ानं उसणवारी करून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणलेली...पोलिस वसाहतीच्या खिडकीतला अँटिना हलवून-हलवून टीव्हीवर चित्रगीत बघितलेलं आठवतंय...अगदीच करमलं नाही तर खाली उतरून एसटीडी बूथवरून गावी फोन करायचा...मिनीटभर गावच्या लोकांशी बोललं की पुन्हा हुरूप यायचा...

सकाळी उठून बंदोबस्ताला जायचं असल्याने आणि सेकंड शिफ्ट करून आल्याने मध्यरात्री कधीतरी नवीकोरी साडी देऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केलेलाही आठवतोय...पहिल्या बाळंतपणाला प्रथेप्रमाणे गावी जाणं झालं...गावी मोठ्या मुक्कामात सुट्टी न मिळाल्याने चार-पाच महिन्यात फक्त एकदाच नवऱ्याचा चेहरा बघायला मिळाला...नवरा कुठल्यातरी निवडणुकांच्या बंदोबस्तावर असताना इकडं संसारवेलीला कन्यारत्नाचा लाभ झाला होताच...इटुकले डोळे मिचकावत जगाकडे बघणाऱ्या पोरीला मांडीवर घेऊन नवऱ्याची वाट बघताना जीव डोळ्यांत उतरायचा...तब्बल महिन्याभरानंतर पोरीला बापाचा चेहरा बघता आला...अल्लडपणे हातात खुळखुळा नाचवत पोरीला खेळवताना नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडताना थांबत नव्हता...पुढं कधीतरी मुंबईत बंदोबस्तावर असताना इकडं गावी जन्मदात्या आईनं शेवटचा श्वास सोडला होता...संपर्काचं साधन नसल्याने सकाळी तिरडीवर मांडलेल्या आईच्या पार्थिवाला दुसऱ्या दिवशी अग्नी मिळाला...अग्नी देताना आजारी आईला शेवटचं पाहता न आल्याचा आक्रोश नवऱ्याच्या डोळ्यांत स्पष्ट जाणवत होता...डोळ्यांतून ओघळणारं पाणी पुसत लपवायचा प्रयत्न करूनही आतला हंबरडा स्पष्ट जाणवत होता...

दहावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास मार्क मिळवलेल्या मुलीच्या खांद्यावर कौतुकाची थाप टाकायला नवरा नव्हताच...तो त्याच्या ड्युटीवर...ड्युटीवर गेलेल्या बापाची वाट बघत हिरमुसून तोंडावर मार्कशीट घेऊन उपाशी झोपलेल्या पोरीला पित्याची शाबासकी मिळाली ती दुसऱ्या दिवशीच...मोठ्या कॉलेजात प्रवेश घेताना पगार न झाल्याने हतबल झालेल्या नवऱ्याच्या मनातली कालवाकालव लपत नव्हतीच...लग्नात मोठ्या हौसेनं बनवलेला सोन्याचा मणीहार सोनाराकडे गहाण ठेवताना नवऱ्याचं तुटलेलं काळीज चेहऱ्यावरून ओघळत राहिलं होतं...

सगळे-सगळे दिवस आठवत आठवत भाजी कधी निवडून झाली ते समजलंच नाही...भानावर आलेल्या म्हातारीची नजर घरभर भिरभिरत राहिली...म्हातारं कुठंच दिसेनासं झालं...एवढ्या रात्री कुठं गेले असतील अशा विचारानं म्हातारीचा जीव खालीवर होऊ पाहात होता...तेवढ्यात लंगडत लंगडत म्हातारं कसल्यातरी पिशव्या हातात घेऊन घरात प्रवेश करतं झालं...म्हातारीजवळ बसून म्हाताऱ्यानं पिशवीतनं भलामोठ्ठा केक बाहेर काढला...

’लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाsss’ म्हणणाऱ्या म्हाताऱ्याचा चेहरा कधी नव्हे तेवढा फुलला होता...केक कापून झाल्याझाल्या चुरगळलेल्या पेपराच्या गुंडाळीतून टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा काढून म्हाताऱ्यानं केसात माळला होताच...पिकलेल्या केसांना फुलारलेल्या मोगऱ्यानं वेगळीच शोभा आणली होती...ती शोभा कुतरओढीच्या आयुष्याच्या नीरवानीरवीची होती...ती शोभा आतल्याआत धुमसणाऱ्या समुद्राच्या लाटांना किनारा मिळाल्याची होती...छातीवर पोलीस नाईक नावाची पाटी लावून फोटोत दिसणाऱ्या नवऱ्याचा रुबाब आता या वयातही म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर तंतोतंत दिसत होता...पांढऱ्याशुभ्र केसांत माळलेल्या गजऱ्याचा सुवास जगायचं राहून गेलेल्या आयुष्याची पोकळी भरून काढत होता...देव्हाऱ्यातली समई स्वकष्टाने तेवत राहिली होती...घरभर प्रकाशाची उधळण करत समाधानाची अंगाई गात होती...

तू मला..मी तुला..गुणगुणू लागलो

‘तुझा हात हातात दे, माझा हात हातात घे...मनाच्या रेशीमगाठी झरझरत अथांग समुद्राकडे एकच दान मागूया, जुळलेल्या रेशीमगाठींना सुटू देऊ नकोस, तुझ्याएवढं अथांग होता नाही आलं तरी चालेल, पण तुझ्याएवढा जिवंतपणा नात्यात कायम राहू दे...’ जगभरातील समुद्रकिनाऱ्यांवर प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात असतील...प्रेमाचा अमृतानुभव साजरा करण्याचा आजचा दिवस आहे ना..!

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

कोण-कुठला सातासमुद्रापार होऊन गेलेल्या संत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आज जगभरातील कानाकोपऱ्यांत होतोय...आभाळाएवढं प्रेम एकमेकांना देण्याची वचन दिली-घेतली जातायत...

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

मेघापर्यंत पोहोचलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जगभरातील तरुणांची मनगटं वेगवेगळ्या बँड्सनी बांधली जातायत...कुणी गुलाबाचं फूल तर कुणी ग्रीटिंग कार्ड्सची देवाणघेवाण करतंय...

इतक्या दिवस नजरेचीच लपाछपी खेळणाऱ्यांच्या नजरेत भीतीमिश्रित धीटपणा आलाय, रात्रभरच्या जागरणानं तरवटलेल्या डोळ्यांत एक अनामिक हूरहूर, तिला आज बोलायचंच...हातात घेतलेल्या फुलांचा अत्तरी दरवळ होकाराची आशा जागवतोय तर फुलासोबतच येणाऱ्या काट्यांची बोच नकार मिळेल अशा
विचारांची वेदना देतोय...काहीही होवो, होकार दिला तर ठिकच, पण नकार आला तर...तर किमान मनातली भावना बोलून दाखवल्याचं समाधान...हे इवलंसं समाधान आयुष्यभर पुरेल...भावनांचा कल्लोळ मनामनात दाटतोय...’चल यार, जो होगा देखा जाएगा’  म्हणत प्रपोज केले जातायत...

सण साजरे करायला निमित्त शोधणाऱ्यांना व्हॅलेंटाईन डेची पर्वणीच...हॉटेलात डेटिंग, जोडून आलेल्या विकेंडमुळे पिकनिकचे प्लॅन, भेटवस्तू देण्यासाठी दुकानांत गर्दी, प्रेमाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी तारांबळ...कित्येक वर्षांपासून साथ देणारी बायको, तिला काय बरं द्यावं?

अगदीच काही नाही जमलं तर एखादं छोटेखानी पत्र तर देऊ...रापलेल्या चेहऱ्यावर आनंदीचा लकेर तर उमटवू...वर्षभरात कामाच्या धबडग्याने एकमेकांना नीट पाहिलंही नाही, उसंतही मिळाली नाही, आज जरा निवांत होऊ, एकमेकांच्या जगात पुन्हा एकदा शिरू...बोलायच्या राहिलेल्या गोष्टी बोलून टाकू...मनाचं आभाळ मोकळं करू...आयुष्यभराचं संचित साठवण्यासाठी रितं करू...

आपण प्रेम करत असलेल्या अन् आपल्यावर प्रेम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज आठवूया, ओसंडून सांडेपर्यंत साठवूया

शब्दांच्या या धुक्यामधे अडकू नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

हे निरंजन कायम तेवत राहील...

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराज कॉलेजचे प्राचार्य आणि ओजस्वी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रा. निरंजन खिचडी यांचे नुकतेच निधन झाले...शिक्षण क्षेत्रात मोलाचं कार्य करत असतानाच आपल्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या निरंजन खिचडी यांचं निधन कोल्हापूरसह राज्यभरातील शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना चुटपूट लावून गेलं...शेवटचा श्वास घेतला त्यादिवशीही प्रा. निरंजन खिचडी यांनी व्याख्यानातून श्रोत्यांना वचनामृताची पर्वणी दिली होती...आपल्या नेमस्त पण आदर्शवादी तत्वांनी प्रा. निरंजन खिचडी हे अनेक तरुणांचे, संस्थाचालकांचे आधारस्तंभ बनून राहिले होते...शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार, सामाजिक चळवळीतही प्रा. निरंजन खिचडी यांचा लिलया वावर होता...त्यांची व्याख्यानं ऐकत लहानाच्या मोठ्या झालेल्या अनेक पिढ्यांना त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कायम जाणवत राहणार...प्रा. निरंजन खिचडी यांना लिहलेलं पत्र...

प्रा. निरंजन खिचडी सर,

कोवळं असतानाच रोपट्याला काठीचा आधार दिला तर झाडाला चांगला आकार मिळतो...कोवळेपणातच काठीचा आधार मिळाला नाही तर झाड आडवं-तिडवं वाढण्याची भीती असते...आम्हाला आमच्या कोवळेपणातच तुम्ही शिकवलेल्या संस्काराच्या काठीचा आधार मिळाला...आपल्या सावलीतच या रोपट्यांचा वटवृक्ष बनलाय...जगण्याच्या या रहाटगाड्यात जुन्या दिवसांची फार टोटल लागत नसली तरी आयुष्याचं चित्र रंगवताना आमचे लटपटणारे हात सावरताना तुमचा व्याख्यानांतून मनाला झालेला स्पर्श अजून स्पष्ट जाणवतोय...हे पत्र लिहित असताना ती पाहा आभाळात ढगांची घुसळण सुरू झालीय...धाय मोकललेल्या आभाळाची लक्तरं गळू पाहतायत...कवेत घेऊ पाहणारा इंद्रधनू आक्रोशानं घामेजलेल्या आभाळावरून घसरू पाहतोय...स्वत:च्या टेंभ्यात मिरवणारा सूर्य आपोआप विझू पाहतोय...आभाळभर मनमुराद फिरणाऱ्या पाखरांनी खोप्यात कोंडून घेतलंय...

रंध्रारंध्रात अगणित भावनांच्या रंगांच्या छटा असलेल्या या भावसृष्टीची ओळख तुम्हीच करून दिलीत...सृष्टीच्या हातात आमचे इवलेसे हात आपणच दिलेत...जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिसणारा रंग आम्ही ओळखायला शिकलोय...तुमच्यामुळेच..!

मळलेल्या आयुष्यवाटांच्या अंकलिपीची कोपरे मुडपलेली मळकट पानं उलटताना ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ सारख्या बडबडगीतांनी ओलीचिंब झालेली आमची कोवळी मनं समस्यांच्या पाढ्यांवर आली की कोरडीठाक होऊन जायची...वाटायचं या आकड्यांच्या चौकटी कशाला दिल्या असतील आयुष्याच्या अंकलिपीत..? जगण्याच्या तळ्याकाठी बसलेल्या लहानग्या मदन आणि सुमनच्या चित्रांनी स्वप्नावलेले आमचे डोळे व्यवहार, संसार, निकाल, परीक्षांचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार पाहून पेंगाळून जायचे...अवचित कधीतरी व्याख्यानातून तुम्ही भेटलात आणि जगण्याचा प्रत्येक आकडा आमचा सखा बनला...प्रत्येक वळणावरून आम्ही लिलया घसरगुंड्या खेळायला शिकलो...छत्तीसचा आकडा कशाला म्हणतात तेच आम्ही विसरून गेलो...गुणाकार किंवा बेरीज केल्यानं आकडे आकड्यात मिसळल्यावर समोर दिसणारं सकारात्मकतेचं नवं क्षितीज तुमच्या व्याख्यानांमधून उभं केलंत सर तुम्ही आमच्यासमोर...वजाबाकी आणि भागाकाराने विरघळून जाणारी नकारात्मकता तुम्ही बोटाला धरून दाखवलीत...

“अवचित क्षणी दरवाजा ठोठावल्याक्षणी आतून मनमुराद निखळ हसण्याचा आवाज आल्याबरोबर यमाचे पाय थरथरत मागे सरकले, हसणाऱ्यांना नको, रडणाऱ्यांना उचलू म्हणत यमानं काढता पाय घेतला...पण मित्रांनो, यम फिरत राहिलाय...अजूनही...रडणाऱ्या माणसांचं घर शोधत…” आपल्या व्याख्यानात बसल्यावर तुम्हाला
ऐकताना सापडलेली आनंदी जगण्याची बाळगुटी संपली नाही हो सर अजून...ती आयुष्यभर पुरेल...

मनाच्या घालमेलीत पेंगुळलेली मनं आणि गलितगात्र गळालेल्या आमच्या पावलांना नवोन्मेषानं चेतना दिलीत आपण...तुम्हाला ऐकताना दोन-दोन तासही तोकडे पडायचे...बोलणारा बोलत राहतो, ऐकणारे ऐकत राहतात या परंपरेला फाटा देत आपली श्रोत्यांशी संवाद साधण्याची हातोटी अजून आठवतेय आम्हाला...जगण्याच्या नवीनतम सूत्रांची गोळी विनोदाच्या मधात मिसळून श्रोत्यांना मधूरतम आनंदाची पर्वणी आपण नेहमीच दिलीत...’इथे पीठ दळून मिळेल’, ‘वर जाण्याचा मार्ग’ सारख्या दुर्लक्षित पाट्यांमधून जगण्याचा आनंद शोधण्याची विनोदबुद्धा आपणच दिलीत...

“एकवेळ घरात देव्हारा नसला तरी चालेल, पण ग्रंथालय मात्र असायलाच हवं” असं सांगताना आपल्या डोळ्यांत,आपल्या आवाजात विज्ञानवादाची दिसलेली चमक अजून आमच्या डोळ्यांसमोर आहे सर...तुम्ही जगाचा निरोप घेतलात यावर अजून विश्वास बसत नाही...आपल्या ओजस्वी वाणीनं, व्यासंगानं अनेकांच्या जीवनात आत्मविश्वासाचे मळे फुलवणारे किनाऱ्याला लागत नसतात...आमच्या हृदयातून तुम्ही कधीच निघून जाऊ शकणार नाहीत, तोवर जोवर आपल्या नात्याला आणि चराचरात वाहणाऱ्या वाऱ्याला आम्ही रंग देऊ शकत नाही...

हे पत्र लिहिताना ते पाहा कॅलेंडर फडफडतंय...घड्याळ्याची टिकटिक तर अविरत चालूच आहे...आकडे घड्याळाचे असोत नाहीतर कॅलेंडरचे...त्यांच्याशी आमची गट्टी जमली ती तुमच्यामुळेच...

पत्र लिहतोय खरं, पण लिहलेले शब्द इतक्यात धूसर होऊ पाहतायत...शब्द नीट दिसेणासे झालेयत...धूसर झालेले डोळे लपकावत घरभर भिरभिरतायत...देव्हाऱ्यावर येऊन थबकतायत...तो पाहा, देव्हारा रिकामा, ओसाड वाटू लागलाय...तुमच्या जाण्यानं पोरक्या झालेल्या देव्हाऱ्यातलं निरंजन मात्र अखंडित तेवत राहिलंय...तुम्ही आमच्या मनामनात चेतवलेल्या संस्काराच्या इंधनावर निरंजन प्रकाश देत राहिलंय...ते कायम तेवत राहिल...आम्ही ते तेवत ठेऊ...कायम..!

अरेच्चा डोळ्यांत अश्रूंचे थवे घोंघावू लागलेयत...या कृतार्थतेच्या आणि कृतज्ञतेच्या अश्रूंना कोणता बरं रंग द्यावा..?

नक्की सांगा...उत्तर मिळाल्याशिवाय तुमचं वजा होणं अशक्य...केवळ अशक्य..!

आपले आज्ञाभिलाषि