शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

हे निरंजन कायम तेवत राहील...

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराज कॉलेजचे प्राचार्य आणि ओजस्वी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रा. निरंजन खिचडी यांचे नुकतेच निधन झाले...शिक्षण क्षेत्रात मोलाचं कार्य करत असतानाच आपल्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या निरंजन खिचडी यांचं निधन कोल्हापूरसह राज्यभरातील शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना चुटपूट लावून गेलं...शेवटचा श्वास घेतला त्यादिवशीही प्रा. निरंजन खिचडी यांनी व्याख्यानातून श्रोत्यांना वचनामृताची पर्वणी दिली होती...आपल्या नेमस्त पण आदर्शवादी तत्वांनी प्रा. निरंजन खिचडी हे अनेक तरुणांचे, संस्थाचालकांचे आधारस्तंभ बनून राहिले होते...शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार, सामाजिक चळवळीतही प्रा. निरंजन खिचडी यांचा लिलया वावर होता...त्यांची व्याख्यानं ऐकत लहानाच्या मोठ्या झालेल्या अनेक पिढ्यांना त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कायम जाणवत राहणार...प्रा. निरंजन खिचडी यांना लिहलेलं पत्र...

प्रा. निरंजन खिचडी सर,

कोवळं असतानाच रोपट्याला काठीचा आधार दिला तर झाडाला चांगला आकार मिळतो...कोवळेपणातच काठीचा आधार मिळाला नाही तर झाड आडवं-तिडवं वाढण्याची भीती असते...आम्हाला आमच्या कोवळेपणातच तुम्ही शिकवलेल्या संस्काराच्या काठीचा आधार मिळाला...आपल्या सावलीतच या रोपट्यांचा वटवृक्ष बनलाय...जगण्याच्या या रहाटगाड्यात जुन्या दिवसांची फार टोटल लागत नसली तरी आयुष्याचं चित्र रंगवताना आमचे लटपटणारे हात सावरताना तुमचा व्याख्यानांतून मनाला झालेला स्पर्श अजून स्पष्ट जाणवतोय...हे पत्र लिहित असताना ती पाहा आभाळात ढगांची घुसळण सुरू झालीय...धाय मोकललेल्या आभाळाची लक्तरं गळू पाहतायत...कवेत घेऊ पाहणारा इंद्रधनू आक्रोशानं घामेजलेल्या आभाळावरून घसरू पाहतोय...स्वत:च्या टेंभ्यात मिरवणारा सूर्य आपोआप विझू पाहतोय...आभाळभर मनमुराद फिरणाऱ्या पाखरांनी खोप्यात कोंडून घेतलंय...

रंध्रारंध्रात अगणित भावनांच्या रंगांच्या छटा असलेल्या या भावसृष्टीची ओळख तुम्हीच करून दिलीत...सृष्टीच्या हातात आमचे इवलेसे हात आपणच दिलेत...जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिसणारा रंग आम्ही ओळखायला शिकलोय...तुमच्यामुळेच..!

मळलेल्या आयुष्यवाटांच्या अंकलिपीची कोपरे मुडपलेली मळकट पानं उलटताना ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ सारख्या बडबडगीतांनी ओलीचिंब झालेली आमची कोवळी मनं समस्यांच्या पाढ्यांवर आली की कोरडीठाक होऊन जायची...वाटायचं या आकड्यांच्या चौकटी कशाला दिल्या असतील आयुष्याच्या अंकलिपीत..? जगण्याच्या तळ्याकाठी बसलेल्या लहानग्या मदन आणि सुमनच्या चित्रांनी स्वप्नावलेले आमचे डोळे व्यवहार, संसार, निकाल, परीक्षांचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार पाहून पेंगाळून जायचे...अवचित कधीतरी व्याख्यानातून तुम्ही भेटलात आणि जगण्याचा प्रत्येक आकडा आमचा सखा बनला...प्रत्येक वळणावरून आम्ही लिलया घसरगुंड्या खेळायला शिकलो...छत्तीसचा आकडा कशाला म्हणतात तेच आम्ही विसरून गेलो...गुणाकार किंवा बेरीज केल्यानं आकडे आकड्यात मिसळल्यावर समोर दिसणारं सकारात्मकतेचं नवं क्षितीज तुमच्या व्याख्यानांमधून उभं केलंत सर तुम्ही आमच्यासमोर...वजाबाकी आणि भागाकाराने विरघळून जाणारी नकारात्मकता तुम्ही बोटाला धरून दाखवलीत...

“अवचित क्षणी दरवाजा ठोठावल्याक्षणी आतून मनमुराद निखळ हसण्याचा आवाज आल्याबरोबर यमाचे पाय थरथरत मागे सरकले, हसणाऱ्यांना नको, रडणाऱ्यांना उचलू म्हणत यमानं काढता पाय घेतला...पण मित्रांनो, यम फिरत राहिलाय...अजूनही...रडणाऱ्या माणसांचं घर शोधत…” आपल्या व्याख्यानात बसल्यावर तुम्हाला
ऐकताना सापडलेली आनंदी जगण्याची बाळगुटी संपली नाही हो सर अजून...ती आयुष्यभर पुरेल...

मनाच्या घालमेलीत पेंगुळलेली मनं आणि गलितगात्र गळालेल्या आमच्या पावलांना नवोन्मेषानं चेतना दिलीत आपण...तुम्हाला ऐकताना दोन-दोन तासही तोकडे पडायचे...बोलणारा बोलत राहतो, ऐकणारे ऐकत राहतात या परंपरेला फाटा देत आपली श्रोत्यांशी संवाद साधण्याची हातोटी अजून आठवतेय आम्हाला...जगण्याच्या नवीनतम सूत्रांची गोळी विनोदाच्या मधात मिसळून श्रोत्यांना मधूरतम आनंदाची पर्वणी आपण नेहमीच दिलीत...’इथे पीठ दळून मिळेल’, ‘वर जाण्याचा मार्ग’ सारख्या दुर्लक्षित पाट्यांमधून जगण्याचा आनंद शोधण्याची विनोदबुद्धा आपणच दिलीत...

“एकवेळ घरात देव्हारा नसला तरी चालेल, पण ग्रंथालय मात्र असायलाच हवं” असं सांगताना आपल्या डोळ्यांत,आपल्या आवाजात विज्ञानवादाची दिसलेली चमक अजून आमच्या डोळ्यांसमोर आहे सर...तुम्ही जगाचा निरोप घेतलात यावर अजून विश्वास बसत नाही...आपल्या ओजस्वी वाणीनं, व्यासंगानं अनेकांच्या जीवनात आत्मविश्वासाचे मळे फुलवणारे किनाऱ्याला लागत नसतात...आमच्या हृदयातून तुम्ही कधीच निघून जाऊ शकणार नाहीत, तोवर जोवर आपल्या नात्याला आणि चराचरात वाहणाऱ्या वाऱ्याला आम्ही रंग देऊ शकत नाही...

हे पत्र लिहिताना ते पाहा कॅलेंडर फडफडतंय...घड्याळ्याची टिकटिक तर अविरत चालूच आहे...आकडे घड्याळाचे असोत नाहीतर कॅलेंडरचे...त्यांच्याशी आमची गट्टी जमली ती तुमच्यामुळेच...

पत्र लिहतोय खरं, पण लिहलेले शब्द इतक्यात धूसर होऊ पाहतायत...शब्द नीट दिसेणासे झालेयत...धूसर झालेले डोळे लपकावत घरभर भिरभिरतायत...देव्हाऱ्यावर येऊन थबकतायत...तो पाहा, देव्हारा रिकामा, ओसाड वाटू लागलाय...तुमच्या जाण्यानं पोरक्या झालेल्या देव्हाऱ्यातलं निरंजन मात्र अखंडित तेवत राहिलंय...तुम्ही आमच्या मनामनात चेतवलेल्या संस्काराच्या इंधनावर निरंजन प्रकाश देत राहिलंय...ते कायम तेवत राहिल...आम्ही ते तेवत ठेऊ...कायम..!

अरेच्चा डोळ्यांत अश्रूंचे थवे घोंघावू लागलेयत...या कृतार्थतेच्या आणि कृतज्ञतेच्या अश्रूंना कोणता बरं रंग द्यावा..?

नक्की सांगा...उत्तर मिळाल्याशिवाय तुमचं वजा होणं अशक्य...केवळ अशक्य..!

आपले आज्ञाभिलाषि

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा