मंगळवार, ११ मार्च, २०१४

दिल्या घरी तू सुखी राहा..!

कोणातून झिरपणारी मेंदी हातावर एकेक नक्षी उमटवत जाते...नागमोडी वळणं घेत मेंदीनं विलक्षण आणि आकर्षक देखणं रुप धारण केलेलं असतं...नवरी तारवटलेले डोळे मिचकावत, जांभया देत मेंदी काढायला बसलेली असते...मैत्रिणी, भावकीतल्या मुली, लग्नासाठी दोन-चार दिवस आधीच मुक्काम ठोकलेल्या पाहुण्या, लहान बहिण, वहिनी सगळ्याजणी होणाऱ्या नवऱ्याच्या नावाने नवरीला डिवचत राहतात...कावरी-बावरी होत, लाजून चुर्र होत नवरी मस्करीला दाद देते...नवरीला मेंदी काढायच्या निमित्ताने अनेकजण स्वत:च्या हातावर मेंदी काढण्याची हौस भागवून घेतात...लग्नाच्या आदल्या किंवा दोनएक दिवस आधी रात्री लगीनघरात हमखास दिसणारं हे चित्र...बांधलेल्या बस्त्यातून नवरीच्या साड्या, दागिने मोठ्या कौतुकाने दाखवले-पाहिले जातात...दिवसभर लग्नाच्या पत्रिका वाटून आलेला दादा थकल्यामुळे जागा मिळेल तिथे कधीच झोपी गेलेला असतो...एव्हाना अर्धी रात्र झालेली असते...निजानीज होते...

अख्खं लगीनघर शांत होतं, निपचित पहुडतं...पावण्या-रावळ्यांची लहानगी पोरं जागा मिळेल तिथे गुडूप होऊन जातात...दिवाबत्ती घालवली जाते...काळ्याकुट्टं अंधारात देव्हाऱ्यातली समई तेवढी तेवत राहते...समईच्या रुणझुणू प्रकाशात नवरीचे इवलेसे डोळे घराच्या आड्याकडे लागलेले असतात...ज्या घरात लहानाची मोठी झाले, दुडूदुडू बागडले, बोबडे बोलत दहिभात खाल्ला, भांड्याकुंड्यांचा खेळ मांडला, शाळा-कॉलेजचा अभ्यास केला त्या घरातली आजची शेवटी रात्र म्हणून डोळ्याच्या कडा ओल्या होतात...नवरी अख्खं घर डोळ्यांत साठवू पाहते...सगळे झोपलेत याची खात्री करत नवरी जाग्यावर उठून बसते...घरातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट बारकाव्याने न्याहाळते...या सगळ्या वस्तू पुन्हा दिसणार नाहीत म्हणून हुंदका अनावर होतो...घरातली भांडी, दोरीवर वाळत घातलेले कपडे, कपाटाच्या काचेत ठेवलेल्या शोभेच्या वस्तू, शाळा-कॉलेजची पुस्तकं, लग्नानंतर कदाचित वापरता न येणारे ड्रेस...अख्खं घर पाहात नवरीची नजर पाठमोरी झोपलेल्या आईकडे सरकत जाते...लहानपणी आईच्या कुशीत झोपल्यावर अनुभवलेला उबदार दरवळ सर्रकन नाकाला आल्हाद देतो...आजारी पडल्यावर डोक्यावर मिठाची पट्टी लावताना, केस विंचरताना, वेणी घालताना जाणवलेला मायेचा स्पर्ष झिम्मा घालतो...नवरी न राहवून आईजवळ जाते...वाकून आईच्या चेहऱ्याकडे बघते...माऊलीच्या डोळ्यांतलं पाणी समईच्या प्रकाशत चमकू लागतं...काळजाचा तुकडा उद्या मला सोडून जाणार या भावनेनं माऊलीनं तोंडात पदराचा बोळा घालून हुंदका आवरण्याचा प्रयत्न केलेला असतो...झोपेचं सोंग आणलेल्या आईच्या मनात हलकल्लोळ माजलेला असतो... आईच्या डोळ्यांतलं पाणी बघून नवरीच्या मनाचा बांध फुटतो...भर मध्यरात्री माय-लेकींना हुंदका अनावर होतो...एकमेकींशी न बोलताही भावना दोघींनाही कळलेल्या असतात...आईच्या कुशीत नवरी विसावते...कधी डोळा लागला ते कळतही नाही...झोपलेल्या नवरीच्या चेहऱ्यावरनं माऊलीची नजर हटत नाही...भावनांच्या तांडवात तांबडं फुटतं...सूर्यदेवानं प्रकाशाचा गुलाल उधळलेला असतो...


लाऊडस्पिकरचा आवाज कानावर पडू लागताच लग्नाचं वातावरण फेर धरतं...दारावर केळीच्या खुटांची कमान उभी राहिलेली असतेच...धामधूम सुरू होते...गरजेच्या वस्तूंनी भरलेल्या पेट्या मांडवात नाहीतर हॉलवर नेण्यासाठी धांदल उडते...कुणी सुपारी-साखरपुड्याच्या वस्तू, कुणी मानापानाच्या साड्यांचं गाठोडं, कुणी लग्नात वाजवायच्या फटाक्यांचा बॉक्स, कुणी अक्षतांची थैली तर कुणी नवरीच्या साड्या, मेकअपचं साहित्य घेऊन हॉलवर नाहीतर मांडवात पळतं...इकडं हॉलवर पाहुण्यांची वर्दळ वाढलेली असते...लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागतो तशी गर्दी वाढू लागते...सुपारी-साखरपुड्याचा सोहळा आटोपला जातो...हळदीच्या कार्यक्रमात धम्माल उडालेली असते...नवरा-नवरीला हळद लावल्यानंतर मस्करीचं नातं असलेल्यांना हळद लावण्यासाठी पळापळ होते...हळदीचा कार्यक्रम आटोपलेला असतो...तालेवार घोडा नवरदेवाची वाट पाहात उभा असतो...अंघोळ उरकून, नवी-कोरी कपडे घालून नवरा राजकुमारासारखा ऐटीत घोड्यावर बसतो...बॅण्डबाजा वाजतो...श्रीवंदनाला जाऊन येतो...हल्ली बॅण्डबरोबर वाजणाऱ्या डीजेच्या तालावर तरुणाई थिरकते...लग्नाचा मुहूर्त चुकू नये म्हणून पोक्त बाप्ये नाचणाऱ्यांना ढकलत घेऊन येतात...

 ‘आली लग्नघटिका समीप...शुभमंगल सावधान’चा मंगलमयी सूर तसेच विविध अत्तरं, फुलांचा स्वर्गीय सुगंध आणि रंगीबेरंगी अक्षतांचा पाऊस असं चित्र अख्ख्या हॉलवर दिसू लागतं...सनई, चौघडे वाजू लागतात, वातावरण मांगल्यानं ओसंडून वाहतं, कच्च्या-बच्च्यांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. अबालवृद्धांची उत्साही लगबग आणि करवल्यांची धांदल उडते, वरबाप-वरमाईची लगीनघाई होते...मानापानात दिलेली साडी न आवडल्याने रुसलेल्या कुणालातरी समजावण्याचे प्रयत्न होतात...जेवणाच्या पंगती उठतात...लोकं तृप्तीचा
ढेकर देत आहेर करतात आणि आपापल्या घराकडे निघून जातात...इकडं स्टेजवर नवरा-नवरीचे वेगवेगळ्या पोज असलेले फोटो काढले जातात...नवरा-नवरीच्या मैत्रिणी, बहिणी, नातेवाईक मुली गोळा होतात...नाव घेण्याचे आग्रह केले जातात...पाठ केलेल्या उखाण्यांमधून आठवत असलेले उखाणे घेत नावं घेतली जातात...नवरा-नवरीला भेटून स्नेह्यांची पांगापांग होते...नवऱ्याची आई भावकीतल्या बायकांना मदतीला घेऊन खाटेवर मांडलेल्या भांड्यांची भराभर करते...वऱ्हाडाच्या गाडीत टाकून मोकळी होते...

एवढ्यात वधू-वराला घेऊन जाण्यासाठी असलेली खास सजवलेली गाडी येऊन थांबते...नवरी सगळ्यांच्या पाया पडून, आई-भाऊ-बहिणीच्या गळ्यात पडून डोळे पुसत गाडीकडे एकएक पाऊल टाकत राहते...दहा-बारा पावलं चालल्यावर नवरी काहीतरी विसरल्यासारखं अचानक थबकते...काहीतरी आठवल्यासारखं सर्रकन माघारी वळते...आणि वासरू जसं गाईकडे पळते तशी धावत येते अन् जन्मदात्याला घट्ट मिठी मारते...जन्मदात्याच्या थकलेल्या, रापलेल्या खांद्यावर नवरीचे अश्रू ओघळत राहतात...आपल्या सुखासाठी आयुष्यभर धावपळ करणाऱ्या बापाशी तिला बरंच बोलायचं असतं पण थरथरणाऱ्या ओठांतून शब्द फुटत नाहीत...हमसून धुमसून रडण्यातून नवरी व्यक्त होत राहते...पहिल्या दिवशी शाळेत जाताना धरलेलं बोट, खांद्यावर घेऊन केलेली जत्रेतली सैर, कॉलेजची फी भरण्यासाठी, नवी कपडे घेण्यासाठी केलेली उसनवारी, निकाल लागल्यावर प्रगतीपुस्तक न्याहाळत तोंडावरून फिरलेला खरखरीत हात...सगळं सगळं आठवत राहतं..बापाच्या मनात काहूर माजतं...संकट-समस्यांच्या वादळात जीवाचं रान करून जपलेली पणती जावयाच्या हातात सोपवताना काळीज पिळवटून निघतं...आता सणासुदीला घरासमोर मांगल्याची रांगोळी कोण काढणार?, आजारी पडल्यावर अंग चेपून कोण देणार?, कामावरून रात्री उशिरा आल्यावर प्रेमानं जेवण कोण वाढणार?, कपड्यांना इस्त्री करून कोण देणार? असंख्य प्रश्नांचं काहूर मनात तांडव करत राहतं...पण आपण जपलेली पणती नव्या पाहुण्यांचं घर उजळून टाकणार म्हणून बाप सुखावतो...थरथरत्या हातात लेकीचा हात पकडून गाडीपर्यंत अडखळत्या पावलांनी चालत राहतो...नवरदेवाच्या हातात लेकीचा हात देत कृतार्थ होतो...दादाच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा थांबत नाहीत...


नवरा-नवरी सजवलेल्या गाडीत बसून एव्हाना निघून गेलेले असतात...उडालेल्या धुरळ्यात गाडी दिसेनासी होते...पण पोटच्या पोरीला निरोप देण्यासाठी वर केलेले थरथरते हात वरच राहतात...वरबापाचे तांबरलेले डोळे आणि वरमाईचे व्याकुळलेले डोळे अखंड वाहत राहतात...हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली वेल स्वत:च्या संसारातही बहरत जावी म्हणून प्रार्थना करत माय-बाप घराकडे निघून जातात...मांडवावरचा रंगीबिरंगी पडदा वाऱ्यानं फडफडत राहतो...सांडलेल्या खरखट्यावर भटकी कुत्री तुटून पडलेली असतात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा