गुरुवार, २७ मार्च, २०१४

इथे घडतील उद्याचे विवेकानंद..!

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...एका सुरात, एका लयीत पोरांचं गाणं सुरू असतं...स्थळ- जिल्हा परिषदेची शाळा, वेळ- रात्री 8.30 वाजताची...तुम्ही म्हणाल रात्री साडेआठ वाजता जिल्हा परिषदेची कुठली शाळा सुरू असते ? खरंय तुमचं, नसते शाळा सुरू इतक्या रात्री, पण अंबवडे गावची शाळा मात्र रोज रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते...सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पोरं, शिक्षक त्याच उत्साहानं शाळेत थांबलेली असतात...

आमची गय इलीय म्हणून आलो न्हाय काल शाळेत किंवा आमची आय गावाला जाणार हाय म्हणून उंद्या यणार न्हाय शाळेत...असं सांगत शाळेला दांडी मारणारी पोरं आता सकाळी उठली की केसांचा कोंबडा पाडत शाळेत जायची तयारी करू लागलीत...कधी एकदा शाळेत जातोय असं प्रत्येकाला वाटू लागलंय...आधी शाळेत जाताना तोंड मुरडणाऱ्या पोरांना आता सुट्टीचा कंटाळा येऊ लागलाय...घर खायला उठू लागलंय...सणासुदीला पण शाळेत जायला पाहिजे असं वाटू लागलंय...ही किमया केलीय सचिन क्षीरसागर सरांनी...शाळेत आल्याबरोबर क्षीरसागर सरांचा चेहरा बघितला की पोरं हरकून जातात...आनंदून जातात...चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटते...सर हा विषय आदराचा किंवा भीती वाटण्याचा...पण क्षीरसागर सर या पोरांचा सखा बनून गेलेत...इवल्या-इवल्या पोरांच्या यशस्वी आयुष्यासाठी वाटाड्या बनलेत...बोटाला धरून चालण्याच्या वयातली पोरं गणित, सामान्य ज्ञान, विज्ञानासारख्या विविध क्षेत्रांबद्दल लिलया बोलू लागलीत...अंकलिपीची घोकंपट्टी करणारी पोरं तबला, पखवाजातून लयदार ठेका तयार करू लागलीत...भोवरे, गोट्या खेळणारी इवलीशी बोटं पेटीवरून फिरू लागलीत...पोरांच्या निरागस आवाजातून सप्तसूर आळवले जाऊ लागलेत...क्षीरसागर सरांनी पोरांना वाचन, लेखन, वर्क्तृत्व, कविता, मैदानी खेळ, विज्ञान, संगीताची गोडी लावलीय...स्कॉलरशीपसारख्या विविध परीक्षांत पोरं चमकू लागलीत...

क्षीरसागर सर मूळचे वाठार स्टेशनवळच्या विखळे गावचे...शिक्षक बनल्यावर पहिल्यांदा जावळीच्या कुडाळच्या शाळेत नोकरी केली...ग्रामीण भागातल्या पोरांचं आकलन पाटी-पेन्सिल-अंकलिपीच्या वर्तुळाबाहेर जात नसल्याची आणि शहरातल्या पोरांसारखी गावच्या पोरांना ज्ञानार्जन-मनोरंजनाची साधनं सहज उपलब्ध होत नसल्याची सल मनात होतीच...या खेड्यातल्या पोरांना या वर्तुळाबाहेर
काढायला हवं...त्यांना आधुनिक जगाच्या क्षितिजाची ओळख करून द्यायला हवी...पण असं नुसतं म्हणून चालणार नाही आपणच काहीतरी करायला हवं...सरांनी चंग बांधला...शिक्षणाच्या आधुनिक साधनांचा प्रकाशझोत उपलब्ध नसला तरी आपणच इवलासा ज्ञानदीप लावावा...स्पर्धेच्या युगात गावची पोरं जिंकली नाही तरी चालतील पण त्यांना किमान त्या स्पर्धेत उतरण्याएवढे तरी सक्षम आपण नक्कीच बनवू...अभ्यासक्रमात आखून दिलेलं शिक्षण तर शिकवूच पण कला, क्रीडा सारख्या शिक्षणेतर विषयांबद्दलही पोरांना साक्षर बनवण्याचं कार्य सुरू झालं...वेळप्रसंगी खिशाला चाट लावून, पदरमोड करून ज्ञानदानाचं काम सुरू झालं...काम सुरू होतंय न होतंय तोच सरांची बदली कोरेगाव तालुक्यातील अंबवडे गावच्या शाळेत झाली...

शाळा बदलली, पोरं बदलली पण सरांचं कार्य अव्याहतपणे सुरूच...सरांनी आधी पोरांशी व्यक्तीश: संवाद साधला, कुणाला कशात रस आहे याचा कानोसा घेतला...ज्याला ज्याच्यात आवड त्याला तशाच पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी सुरू केलं...विविध क्षेत्रातली माहिती गोळा करण्यासाठी सरांनी पायपीट केली...अनेक व्यक्ती-संस्था-शाळांना भेटी दिल्या...अंबवडेतल्या विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, पालकांशी संवाद साधला...कुणाचा कल कोणत्या विषयाकडे आहे हे त्या-त्या पालकांना समजावून सांगितलं...शाळेच्या कामात पालकांचा, ग्रामस्थांचा सहभाग वाढवला...गावातील आजी-माजी सैनिकांनी शाळेच्या व्हरांड्यात बांधकाम करून दिलं...गावातल्या एकानं शिक्षणेतर विविध विषयांची पुस्तकं दिली...शाळेत छोटं ग्रंथालय सुरू झालं...रोजचा अभ्यासक्रम शिकवून झाल्यावर सरांनी मुलांना शिक्षणेतर पुस्तकं वाचायला देणं सुरू केलं...पोरांना अभ्यासाच्या पुस्तकांसोबत इतर विषयांच्या पुस्तकांचीही गोडी लागली...मैदानी खेळांचे रोजच्यारोज सराव सुरू झाले...पोरांना पोषक आहार मिळावा म्हणून गावातल्या काहींनी फळांच्या पेट्या देणं सुरू केलं...दर महिन्याला स्वत:च्या पगाराला चाट लावत पोरांसाठी सरांची आवश्यक त्या वस्तूंची खरेदी सुरू आहेच...

वृद्ध आई-वडील, बायको, अडीच वर्षांचा मुलगा असा सरांचा परिवार...सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत क्षीरसागर सर शाळेत असतात...सुट्टीदिवशी सर शाळेतल्या पोरांसोबत कुठल्यातरी स्पर्धेला नाहीतर परीक्षेला...त्यांची पत्नी, आई-वडिलांना त्यांच्या कामाचा अभिमान वाटतोय...म्हणून ते त्यांना कुरबूर न करता पाठिंबा देतात...कुटुंबाच्या पाठिंब्याविषयी बोलताना सरांच्या डोळ्यात अडीच वर्षांच्या पोटच्या पोराची आठवण दाटते...पण सर स्वत:ला सावरत, आलेलं पाणी डोळ्यांच्या कडांवरून ओघळण्याआधीच पुसत वर्गातल्या पोरांना मिळालेल्या बक्षीसाच्या ट्रॉफी अभिमानाने दाखवतात...

सर मागे एकदा शहरातल्या कुठल्यातरी नावाजलेल्या खासगी शाळेत गेले...तिथं मुलांना प्रशिक्षणासाठी वापरलेली आधुनिक साधनं पाहून सरांना कौतुक वाटलं...आपल्या वर्गातील पोरांना ही साधनं नाहीत म्हणून कासावीस झाले...तडक शाळेतून बाहेर पडून सर थेट शिक्षक बँकेत...75 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला...आठवड्याभरात कर्जाची रक्कम हातात...इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाऊन एक लॅपटॉप, एक प्रोजेक्टर, एक होम थिएटर, अभ्यासाच्या विविध डीव्हीडी असं साहित्य घेऊन सर वर्गात...पोरं डोळे फाडून बघू लागली...जिल्हा परिषदेच्या शाळेतला नवा प्रयोग बघायला अंबवडेतल्या बाप्ये-बायांनी गर्दी केली...आता पोरं जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळेत हायटेक शिक्षण घेतायत...पोरांच्या आकलनशक्तीनं गावाची वेस केव्हाच ओलांडलीय...


जिल्हा परिषदेच्या शाळेत क्षीरसागर सरांनी आणलेला नवा पॅटर्न राज्यभर सरकारी खर्चातून राबवला तर सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळेल...होणाऱ्या परीक्षा, त्यांचे निकाल अधिक न्यायाधारित होतील...सरकार हे करेल की नाही माहित नाही...पण उज्ज्वल भविष्यासाठी पोरांच्या पखांना बळ देणाऱ्या क्षीरसागर सरांसारख्या गुरूजींना आर्थिक नसलं तरी प्रोत्साहनाचं बळ मात्र आपण नक्कीच देऊ शकतो...ते आपण करायलाच हवं...

२ टिप्पण्या:

  1. अरे, हा फारच महत्त्वाचा माणूस आहे.
    याला बळ देऊ,
    मला त्याचा नंबर पाठवा.
    पण हो, याचा सेलेब्रिटी होऊ नये.
    करुदेत त्याला ... अशी कामे करणा-या लोकांवरच तर उभे आहे सारे
    कुछ बात है हस्ती मिटती नहीं यहां की ...
    ही ती बात आहे ...

    - संजय आवटे

    उत्तर द्याहटवा