गुरुवार, ६ मार्च, २०१४

‘जत्रंला इशील का रं ?’

जत्रा म्हंटलं की गावाकडच्या माणसाच्या आनंदाला पारावर राहात नाही...जत्रेच्या आधीच महिना-दोन महिन्यांपासून पावण्या-रावळ्याला ‘जत्रंला इशील का रं?’ असं प्रश्नांकित आमंत्रण दिलं जातं. नांदायला गेलेल्या लेकीला-बहिणींना, नोकरी-धंद्याच्या निमित्तानं गाव सोडलेल्या पोरांना-भावांना कुटुंब कबिल्यासह गावाकडं येण्याची संधी म्हणजे जत्रा...पूर्वी पोस्टानं पत्रं पाठवून जत्रेची निमंत्रणं धाडली जायची...आता तर मोबाईल आले...उद्याच्या जत्रेचं निमंत्रण आजच...’या जत्रंला...मटान-बिटान करू...पोराबाळांना घेऊन या...मोबाईलवरनं अजून निमंत्रणं द्यायचीयत...चला ठिवतो...बॅलन्स संपत चाललाय’ अशी आवतानं धाडली जातायत...

जत्रेतही गावात धांदल...कुठं तमाशाचा फडं...कुठं कुस्त्यांचा आखाडा...कुठं बैलगाड्यांच्या शर्यती, कुठं मटणाच्या दुकानात बकऱ्या-मेंढ्यांना कापून उलटं टांगलेलं...गावातल्या रस्त्यांवर खेळणी-मिठाईची दुकानं..! नवी कापडं घालून पोराटोरांसह म्हाताऱ्या-कोताऱ्यांचीही कोण लगबग...रस्त्यावर मांडलेल्या मिठाईच्या दुकानात रेवड्या, गोडी शेव, फरसाण, जिलेबी, लाह्या, बताशे, पेढ्यांच्या पराती भरून ठेवलेल्या बघून तोंडाला पाणीच सुटतं...! देवीला अर्पण करण्यासाठी लागणारे गोंडे, पालखीवर उधळण्यासाठी गुलाल-खोबरं, भंडाऱ्याच्या दुकानांची रेलचेल...सर्व वातावरण कसं जत्रामय होऊन जातं...

कुठं देवीपुढं लोटांगणं, कुठं दंडस्तानं...देवाचं नाव घेत विस्तवातून चालत जाणाऱ्यांना बघणाऱ्यांची तोबा गर्दी...पालखीची धांदल तर ठरलेलीच...दारापुढं किंवा वाड्यापुढं पालखी आली की डोक्यावर पदर घेऊन आया-बायांची पालखीला हळदी-कुंकू वाहायची लगबग...बगाडावर बसणाऱ्या मानकऱ्याचे फोटो मोबाईलमध्ये काढण्याची तरुण-तुर्कांची घाई...सगळीकडे गुलालाचा खच...अख्खं गाव गुलाबी होऊन जातं...एकमेकांना कपाळभर गुलाल थापण्यासाठी सर्वांचे हात सरसावतात...गोडाचा नैवद्य बनवण्यासाठी बायकांची तारांबळ, पाच सुवासिनींना गोडाचं जेवण वाढत, सुवासिनींना हळदी-कुंकू लावत आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना बायका थकत नाहीत...सुवासिनींचं जेवण उरकलेलं असतंच...आता मटणाच्या स्वयंपाकाची आयाबायांची लगबग सुरू होते...

इकडं हालगीच्या नाहीतर ढोल-ताशांच्या तालात पैलवानांची मिरवणूक निघालेली असते...बलदंड शरीयष्टीचे पैलवान डोक्यावर तालेवार फेटा बांधून आखाड्याकडे निघालेले असतात...गावाबाहेरच्या कुस्त्यांच्या फडावर कुस्त्या बघायला तोबा गर्दी...नामचिन पैलवानांच्या कुस्त्या सुरू होण्याआधी गावातल्या लहानग्या पोरांच्या
खोबऱ्याच्या कुस्त्या लावून गम्मत बघितली जाते...मिसरुडही न फुटलेल्या हाडकुळ्या पोरांच्या कुस्त्यात बाजी मारेल त्याला नारळाची अर्धी वाटी बक्षीस म्हणून दिली जाते...अंगभर गुलाल थापून हाडकुळा पैलवान नारळाची अर्धी वाटी मिरवत घराकडे निघून जातो...आईला नाचवत दाखवतो...पोरगा हिंदकेसरी झाल्यासारखा आनंद मायच्या डोळ्यात झिरपतो...मोठ्यांच्या कुस्त्या होतात...खांद्यावर गदा घेतलेल्या विजयी पैलवानाची मिरवणूक निघते...

उन्हं डोक्यावर आलेली असतातच...पोरं-टोरं, जत्रेला आलेले पावणे-रावळे गावभर फिरून आपापल्या पावण्याच्या घराकडे कूच करतात...एखादा शौकीन पावणा कुवतीप्रमाणे दहा-पाचची इंग्रजी-देशी ढकलून मटणावर ताव मारायला पळतो...मटणं-बिटणं खाऊन तमाशाच्या फडाकडे जाऊन घुंगराच्या तालावर नाचू पाहतो...नाच-गाणी संपून एव्हाना वग सुरू झालेला असतो...वगातल्या हवालदाराच्या, राजाच्या, राणीच्या, मावशीच्या विनोदांना दाद देत आनंदून जातो...अंधार दाटू लागलेला असतोच...काळोख दाटू लागेल तसा कोलाहल ओसरत जातो...जत्रेच्या सकाळी असलेला हुरूप संध्याकाळी हरवत जातो...दिवसभर उत्साह, आनंदानं ओसंडून वाहणारं गाव सायंकाळी मात्र भयाण, उदास आणि तितकचं एकटं वाटतं...आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे एक प्रकारची जत्राच आहे...दिवसभराच्या आनंदोत्सवाला रात्रीच्या एकाकीपणाची झालर आहे...आयुष्य जे काही रंगीबिरंगी करायचंय ते मधल्या वेळेतच...

यंदाच्या जत्रांवर गेल्यावर्षीच्या दुष्काळाचं सावट आहे...जत्रा-बित्रा भरतायत पण तेवढा उत्साह नाही...दुष्काळाच्या भीतीनं गावकऱ्यांचं कंबरंड मोडलंय...गावचे पुढारी वर्गणीसाठी फिरतायत...’आधी गावाला पाणी दे की मुडद्या, मग कर जत्रा-बित्रा’ असं घरोघरी ऐकायला मिळतंय...गेल्या वर्षीचा दुष्काळ बाया-बापड्यांच्या गळ्याशी आला होता...जमिनीला भेगा पडल्या तर गुरं-ढोरं हाडकली...जीवाचं रान करुन सांभाळलेल्या बैलांचे डोळे खपाटीला गेले...शेतकरी आभाळाकडं आशेनं बघत राहिला...सरकारी योजनांचाही दुष्काळ पडला...आठवड्या-पंधरवड्यातून गावात पाण्याचा टँकर आलाच किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी बायाबापड्या हंडा-कळशी, बादल्या घेऊन टँकरमागे गोळा होत होत्या...पोरा-टोरांना दिवसाआड अंघोळ करावी लागत होती...असा हा दुष्काळाचा फेरा गावा-गावात आणि वाड्या-वाड्यांवर पडला होता...गेल्या दुष्काळानं लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं...

मराठवाड्यातल्या एका गावानं यंदा गावची जत्रा अवघ्या 250 रुपयांत साजरी केल्याची बातमी पेपरात वाचली...गावानं फक्त देव-देव केलं...ना मटणाच्या पंगती उठवल्या...ना तमाशाच्या फडात बाया नाचवल्या...ना बैला-घोड्यांच्या शर्यती भरवल्या...सर्व गावकऱ्यांनी मिळून देवाला ‘गावात घर आन् घरात माणूस राव्हं दे रं बाबा’ असा नवस केला...आणि गावच्या शाळेत दुष्काळावर कशी मात करायची यासाठी विचारमंथन केलं...या गावाकडून सर्वांनी आदर्श घ्यायला हवा...कायमचा नाही, पण किमान यंदापूरता तरी..! जत्रा काय दरवर्षीच येतात...पण यंदाच्या जत्रेतला थाटमाट आयुष्याची जत्रा उठवू शकतो हे ध्यानात ठेवलं पाहिजे...जमलेल्या वर्गणीतून चमकोगिरी करण्यापेक्षा पाऊस पडेपर्यंत गावाला पाणी कसं मिळेल याचा विचार व्हायला हवा...असं केलं तरच जत्रेतला देव पावेल...अन्यथा ‘जत्रंला इशील का रं?’ असं निमंत्रण देण्याची ताकद आपण हरवून बसू....कायमची..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा