बुधवार, १६ एप्रिल, २०१४

सैनिकहो तुमच्यासाठी

काजव्यांची किर्र किर्र कानात घुमत राहते...रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराशी चंद्राचा नितळ, शितल प्रकाश दोन हात करत राहतो...त्यामुळेच चंद्राची कोर निष्पाप निरागस भासत राहते...बाहेर कधी हळूवार तर कधी सोसाट्याच्या वाऱ्याचा लपंडाव सुरू असतो...रात्रीच्या चिरशांततेत वाऱ्याच्या झुळुकीबरोबर घराजवळच्या झाडांची सळसळ बंद दाराआडही कानाला जाणवत राहते...बाहेरची अलवार थंडी दारा-खिडकीच्या फटीतून एव्हाना अंगाला बोचत राहिलेली असते...घराबाजूच्या गटारातून बेडकांची डरावडराव अधूनमधून येतच असते...मध्येच एखाद्या भुंग्याचा कुंजारव घुमत राहतो...गाव निपचित पहुडलेलं असतं...शांत-निरव शांततेत गावात कुठतरी लांबवर कुत्र्यांचं भुंकणं शांततेचा भंग करत राहतं...गावाला वळसा घालत गेलेल्या रस्त्यावरून मधूनच एखादं वाहन आवाज करत जातं, त्याचा आवाज शांततेचा भंग करतं...

घरातल्या सगळ्यांनी झोपेची चादर डोळ्यांवर पाघरून घेतलेली असते...या सगळ्या वातावरणात दोन जीवांची मात्र घालमेल चालू असते...घराच्या कोपऱ्यात भरून ठेवलेल्या बॅगा बघताना हुंदका अनावर झालेला असतो...15-20 दिवसांची मिळालेली सुट्टी कधी संपली कळतही नाही...उद्या सकाळी लवकर उठून शहरातल्या रेल्वेने ड्युटीवर जायचं असतं...उण्यापुऱ्या सुट्टीत एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांची उजळणी करण्याचा, भावी आयुष्याच्या स्वप्नांना रंग देण्याचा प्रयत्न चाललेला असतो...मिलिटरीत नोकरी करणाऱ्या प्रत्येक विवाहित जवानाच्या घरातला हा प्रसंग...आयुष्याची स्वप्न बघत आई-बापाला सोडून नांदायला आलेली गृहलक्ष्मी नवऱ्याच्या वियोगानं व्याकूळ झालेली असते...आयुष्याचा जोडीदार तीन-चार महिन्यांनंतर सुट्टी मिळाल्यावरच भेटणार म्हणून त्याला डोळ्यात साठवू पाहते...एक हात हातात पकडून दुसरा हात डोक्यावरून
फिरवत जवानही तिची समजूत काढतो...त्यालाही विरह वेदना असह्य असतात, पण देशसेवेच्या कर्तव्याचं वचन पाळायलाच हवं म्हणत तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळण्याआधीच पुसतो...

रात्रभर मनात कालवाकालव सुरू राहते...घराजवळ कुठूनतरी कोंबडा आरवतो...सूर्यदेवानं तांबडा गुलाल उधळलेला असतोच...आई-बाप पोरगा ड्युटीवर जाणार म्हणून केव्हाचेच तयार झालेले असतात...पोराला निरोप देण्यासाठी घरातली कामं-धामं उरकण्याची धांदल उडते...जवान ताडकन उठून अंघोळ-पांघोळ उरकून जाण्याच्या तयारीला लागतो...कपडे, बुटांची भराभर झालेली असतेच...माऊली लगबगीनं पापड, खोबऱ्याची चटणी, खरावडे-कुरवड्याच्या पिशव्या भरगच्च भरलेल्या बॅगेत कोंबण्याचा प्रयत्न करते...लोणची, तुपाच्या बरण्या बॅगेच्या एकेका कप्प्यात विसावतात...लहान बहिणीची ओवाळण्याचं ताट तयार करण्याची लगबग उडते...जन्मदाता पिता राजबिंड्या पोराकडे बघत राहिलेला असतो...अंगाखांद्यावर खेळवलेल्या सुटाबुटातल्या पोटच्या गोळ्यावरून नजर हटत नाही...आळीतल्या-वाडीतल्या-भावकीतल्या आयाबाया निरोप देण्यासाठी सकाळी-सकाळीच गोळा झालेल्या असतात...

भावकीतली म्हातारी दुडक्या चालीनं जवानाजवळ येते अन् त्याच्या तोंडावरून हात फिरवते...लहानपणापासून सवंगडी असलेले मित्रही एकएक करत जमतात...जवान सर्वांच्या पाया पडतो...आईच्या पायाला हात लाऊन उभा राहतोय न राहतोय तोच आई त्याला घट्ट मिठी मारते...डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक होत राहतो...वात्सल्याचा चिरंतन दरवळ लाभलेल्या पदराने पोराचे डोळे कोरडे केले जातात...पायाला हात लाऊन समोर उभा राहिलेल्या पोराकडे बघताना बापाचा उर अभिमानाने फुलतो...डोळ्यात कृतार्थ झाल्याची भावना ओसंडून वाहते...हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं आपलं पोर देशाच्या सेवेसाठी उभं राहतंय म्हणून बाप गर्वाने त्याच्या खांद्यावर हात ठेवतो...इतक्यात लहानगी बहिण पुढं सरसावते...ताटातल्या निरंजनाच्या प्रकाशात जवानाचा चेहरा उजळून निघतो...ओवाळणी होते...जवान जमा झालेल्या आयाबायांचे आशीर्वाद घेत पुढ सरकत राहतो...

एवढ्यात जवानाची अर्धांगिणी डोक्यावरचा पदर सांभाळत एका हातात साखर-पेढ्याची वाटी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या घेत पुढं येते...उजव्या हातावर साखर-पेढा ठेवून पाण्याचा तांब्या जवानाच्या हातात सोपवून परमेश्वर मानलेल्या पतीच्या पाया पडते...पाया पडण्यासाठी वाकलेल्या अर्धांगिणीच्या डोळ्यातला अश्रू जवानाच्या पायावर टपकतो...जवानाला पायावर पडलेल्या अश्रूची ऊब जाणवते...तसा मनात एकच हलकल्लोळ माजतो...अर्धांगिणीच्या डोळ्यातली विरहवेदना जवानाचं काळीज कापत जाते...जवान आतून गहिवरून जातो...मना-मनाच्या झालेल्या संवादाची खबर निरोप द्यायला जमलेल्या इतरांना होतच नाही...जवान भानावर येतो...भावनांचा गळा दाबत देशसेवेच्या भावनेनं कर्तव्यकठोर होतो...ताडकन मागे वळतो...देवघराकडे पाहून नमस्कार करत जवान घराबाहेर पडलेला असतो...वाड्यातल्या, भावकीतल्यांचा निरोप घेत पुन्हा पुन्हा घराकडे वळून पाहत राहतो...घराच्या उंबरठ्यात थांबलेल्या सर्वांना लांबून हात करतो...जवळच्या मित्राने फटफटीला किक मारलेली असते...बॅगांचं ओझं सांभाळत जवान सावरून बसतो...फटफटीनं वेग पकडलेला असतो...गावापासून दूरदूर जात राहतो...शेकडो मैलावर ड्युटीला जायचं असल्याने आणि परत गावाला येण्यासाठी दोन-चार महिने असल्याने दिसणारी प्रत्येक गोष्ट मनाच्या कप्प्यात जमा करत राहतो...आई-बाप-बहिण-बायको आणि गावाशी जोडलेली नाळ तुटू न देता जवान गावाची वेस ओलांडून पुढे निघून गेलेला असतो...इकडे घरात आई-बाप, बहिण, बायको गलबलून गेलेले असतात...जेवण तयार असतं, पण जेवण्याची इच्छा मात्र नसते...जवान सुट्टीवर आल्यापासून पंधरा-वीस दिवस गजबजलेलं घर एकाएकी मोकळं, ओसाड वाटू लागतं...बहिण उगाच टीव्ही लावून, बाप पेपरात डोकं खुपसून, आई घरातलं धान्य निवडत मन वळवण्याचा प्रयत्न करत असते...आतल्या खोलीत अर्धांगिणीनं पदरानं डोळे पुसत हुंदका आवरण्याचा प्रयत्न चालवलेला असतो...

एव्हाना दुपार झालेली असते...सूर्य डोक्यावर चढलेला असतो...कधी झाडांची पानगळ चालू असते तर कधी रापलेल्या, करपलेल्या खोडांना हिरवीगार पालवी फुटत राहिलेली असते...घराशेजारच्या झाडावर चिमणा-चिमणीचं काडी-काडी गोळा करत घरटं बांधण्याचं काम अविरत चालू असतं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा