बुधवार, २३ एप्रिल, २०१४

खेळ ओव्हर...गेम मांडला..!

झाडावर चिवचिव करत उंडारणाऱ्या चिमण्या, कावळे आज आपला झाडावरचा मुक्काम हलवून आभाळभर फिरत होत्याखारुताईनंही दुसरीकडे आसरा शोधलेला...शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याची वर्दी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते जणू...पोरांनी पक्ष्यांचं रोजच्या मुक्कामाचं झाड ताब्यात घेतलेलं असतं एव्हाना...गावाशेजारच्या डेरेदार झाडावर पोरांचा गलका उडालेला...कुणी झाडाखाली उभं राहून एक पाय वर करून खालून काठी फेकतंय...काही पोरं झाडावर चढण्यासाठी धावतायत, तर काहींची काठी पकडण्यासाठी तारांबळ... चला रं पवायलाsssssसुरपाट्यांचा खेळ ऐन रंगात आलेला असतानाच कुणीतरी ओरडतं...झाडावरची पोरं धडाधड उड्या टाकत पळत सुटतात...भर उन्हाळ्यातही एखाद्या विहिरीनं जीव सांभाळलेल्या असतो...पोरं अंगावरची एकएक कपडे पळतापळताच उतरवत विहिरीजवळ पोहोचलेली असतात...करगुट्याच्या बांधणीत काटकानं आवळलेली चड्डी ढिली केल्यानं सर्रकन खाली घरंगळते...क्षणाचीही उसंत न लावता विहिरीत भोंगळेपणानं सुळकी मारली जाते...ढम्म अशा पाण्याच्या आवाजाबरोबरच खोल तळाशी गेलेलं पाणी काठाच्या वर झेपावतं...काठावरची पोरं एव्हाना कपड्यांचा उणापुरा ऐवज उतरवून विहिरीत घुसलेली असतातच...विहिरीच्या पाण्यात शिवनाभवनीचा खेळ सुरू होतो...जो हरेल त्याच्यावर राज्य...ज्याच्यावर राज्य आलंय त्यानं जवळच्या डोंगरावरून सगळ्यांना पुरतील एवढी करवंदं आणायची...विहिरीशेजारी झाड्याच्या गार सावलीत बैठक मारायची...तोंडात घोळवत बिया अलगदपणे थुंकत करवंदांचा रतीब पोटात ढकलायची लगबग उडते...

इकडं गावात देवळासमोर गोट्यांचा डाव रंगलेला असतो...जमिनीत वाटीएवढी गल बनवून गोट्या एकमेकांवर आदळत राहतात...एका हाताच्या मधल्या बोटाला दुसऱ्या हाताच्या दोन बोटांनी घट्ट धरलेली गोटी सुसाट सुटते अन् समोरच्या गोटीचा कपाळमोक्ष करते...गोटी मारणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्या सगळ्यांच्या तोंडावर हिमालय जिंकल्याचा आनंद ओसंडतो...ज्याच्या गोटीला मार बसला तो डोक्याला हात लाऊन बघत राहतो...एवढ्यात कुणीतरी थोराड पोरगा येऊन भुर्रभुर्रर्रर्रर्र करत मांडलेल्या सगळ्या गोट्या दोन्ही हातात घेऊन पळ काढतो...थोराड पोरगा गोट्या घेऊन गायब झालेला असतो...त्याला पकडण्याची किंवा त्याच्याशी भांडणाची ताकद नसल्याने पोरांचे डोळे राग आणि दु:खाने लाल होतात...धुरळा बसल्याने हातापायाचा रंग बदललेली कुणीकुणी पोरं शाळेमागच्या झाडाला झोका बांधून झुलत राहतात...हुय्या करत झोक्याला दातओठ खात जोराचा झोका देणारा पोरगा दमून खाली बसलेला असतो...झोक्यावर झुलून समाधानी झालेला खाली उतरतो अन् दमलेलं पोर उड्या मारत झोक्यावर बसतं...

इकडे पोरसवदा पोरींनी विटेच्या तुकड्याने रिंगणं आखलेली असतात...दगडाच्या चपट्या चकतीने रिंगणाचा सोहळा रंगलेला असतो...एका रिंगणातून दुसऱ्या रिंगणात लंगडी घालताना पोरी दमत नाहीत...कुणी घराच्या अंगणात किंवा झाडाच्या सावलीत चिंचोक्याचा खेळ मांडलेला असतो...अगदीच लहानग्या पोरा-पोरींनी भांड्याकुंड्याच्या खेळाचा संसार मांडलेला असतो...सावलीच्या आडोशाला बसलेली शंभरीतली म्हातारी लहानग्या पोरींचा खेळ बघत मनोमन आनंदून जाते...सुरकुत्यांमुळे लोंबकळणाऱ्या कातड्याचा थरथरणारा हात पोरींच्या तोंडावरून फिरतो अन् पोरी सुखावून जातात... कुणीतरी आणून दिलेलं जुनं चुरघळलेलं चांदोबाचं पुस्तक वाचण्यात एखादा पोरगा दंग असतो...विक्रम-वेताळाची गोष्ट वाचताना त्याच्या अंगावरचा शहारा स्पष्ट जाणवत राहतो...कुणीतरी भोवऱ्याला दोरी गुंडाळून वेगाने सोडतं तसा भोवरा मान हलवत स्वत:भोवतीच गरागरा फिरत राहतो...फिरणाऱ्या भोवऱ्याला अलगद तळहातावर घेऊन होणाऱ्या गुदगुल्यांनी पोर सुखावतं...

परड्यात किंवा वाड्यात पाचसहा जणांनी लपाछपीचा खेळ चालवलेला असतो...ज्याच्यावर डाव आलाय तो पोलिसांसारखा शोधत सुटतो...कुणी झाडावर, कुणी परड्याच्या झापामागे, कुणी गाई-बैलामागे लपलेला असतो...एकएक करत सगळ्यांना शोधण्यात यश येतं...सगळ्यात आधी सापडला त्याच्यावर राज्य...पुन्हा शोधाशोध सुरू...लपलेला एकजण पायांचा आवाज न करता हळून राज्य असणाऱ्याच्या पाठीत जोराचा धपाटा घालतो...लपलेले सगळे हुर्येsss करत बाहेर येतात...पुन्हा आपल्यावर डाव आल्याने हिरमुसल्या तोंडाने पुन्हा शोधाशोध सुरू होते...चिंचेची झाडं तर पोरांनी गजबजून गेलेली असतात...शेंड्यावर सरसर चढत चिंचेचे लांब वाकडे आकडे चड्डीच्या खिशात कोंबले जातात...चिंचेचा मालक ओरडत येतो तेव्हा जीवाची बाजी लावत पोरं झाडावरून उड्या टाकतात आणि धूम ठोकतात...एखाद्या झाडावरच अडकलेल्या पोराची गचांडी पकडून चिंचेचा मालक पोराच्या घराकडे घेऊन जातो... झापाझापीनंतर पोरगा घरातच गुडूगुडू करत राहतो...दुसरा दिवस उजाडला की तेच सवंगडी आणि पुन्हा तेच चिंचेचं झाड...

कुठल्यातरी आळीतल्या बोळवजा रस्त्यातून घंटी वाजल्याचा आवाज येतो अन् झाडाच्या सावलीला आडवे झालेले बाप्ये उठून बसतात...कुणाच्यातरी घरात वाकळा शिवण्यासाठी जमा झालेल्या बाया मिसरीचं काळं बोटं पोत्याला पुसत बाहेर
येतात...परड्यात, देवळासमोर, झाडावर, घरामागे आणि गावभर इथंतिथं सांडलेली पोरं धावत सुटतात...गारीगार विकणाऱ्याच्या सायकलभोवती मुरकंड पडते नुसती...मला लाल, मला पिवळं म्हणत पोरं पैसे ठेवलेला इवलासा तळहात पुढं करतात...आठ आण्याला मिळणारं लाल-पिवळं गारीगार चाटत पोरं आपापल्या खेळभूमीकडं सरकत राहतात...गारीगार खाऊन लाल-पिवळे ओठ मिचकावत पोरं पुन्हा खेळरंगात भिजून जातात...उन्हाच्या काहिलीत परड्याच्या नाहीतर सपराच्या सावलीत गळ्यातली घंटा वाजवत किंवा शेपटाचा आणि पायांचा आवाज करत गुरं-ढोरं वाळल्या चगळाचा रवंथ करत राहतात...त्यांच्या तोंडातून गळणारी लाळ शेणभरल्या दावणीला भिजवत राहते...आडोसा बघून झोपून गेलेल्या कुत्र्यांच्या पोटाच्या बरगड्या खालीवर होत राहतात...झोपलेल्या कुत्र्याचे अर्धे असलेले डोळे लहानगी पोरं कौतुकाने न्याहाळत राहतात...

एव्हाना उन्हं कलू लागलेली असतात...क्षितिजानं तांबूस सूर्यदेवाला गिळंकृत केलेलं असतं...गावभर उंडारणारी ही पोरं दिवेलागणीला आपापल्या घराकडे परतू लागलेली असतात...अंगाची लाही करणाऱ्या उन्हातही गाव पोरांमुळे जिवंत राहतं...उन्हाळ्याच्या सुट्टीत भर उन्हातान्हातही गावभर पोरांचा असा गलका उडालेला असताना शाळेचा परिसर मात्र पानगळ झालेल्या झाडासारखा एकाकी वाटत राहतो...वणवा लागून गेलेल्या डोंगरासारखी शाळेची वास्तू ओसाड वाटू लागते...पोरांच्या किलबिलाटाची सवय लागलेला शाळेचा परिसर शांततेत पहुडलेला असतो...रोजच्यारोज गणवेशात येणाऱ्या पोरांना गोंजारणारी शाळा खेळणाऱ्या पोरांना लांबूनच बघत राहते...शांत वातावरणात गावात कुठंतरी पोरांच्या चाललेल्या गलक्याचा कानोसा घेत शाळा उदासवाण्या अवस्थेत टळटळीत उन्हात पहुडलेली असते...

मागच्या रविवारी गावी गेलो तर पोरं टीव्हीवर तुटून पडलेली...शाळांना सुट्टी लागलेली असल्यानं कार्टूनचे चॅनल लावून पोरं टीव्हीसमोर बसलेली...हातात कुठल्याशा बड्या कंपनीचं आयस्क्रीम चाखत टीव्हीसमोर ऐटीत बैठक मारलेली...डोरेमॅन, स्पायडर मॅन, मिकी-माऊस, सुपरमॅन, फॅण्टम, बॅटमॅन, डोनाल्ड डक, पॉपाय, मिकी माऊस, पोकेमॅन, शिनचॅन, बेनटेन, पॉवरपफ र्गल्स, हॅरी पॉटर, मोटू पतलू असे नवे सवंगडी पोरांना मिळालेत...जादूचा झगा चढवून गायब होणाऱ्या हॅरीची क्रेझ पोरांच्या डोक्यात घुमतेय...लपाछपी, लंगडी, झोका, भोवरा, गोट्यांचे खेळ कुठल्याकुठं गायब झालेत...मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या गेममध्ये नव्या भिडूसह नवे खेळ सुरू झालेत...भोवऱ्याचं गरागरा फिरणं, झोक्यावर बसून झोका घेण, लपाछपीतली शोधाशोध, चिंचेचे आंबटगोड आकडे, विहिरीत मुटका किंवा सुळकी ठोकल्यावर मेंदूपर्यंत भिनत जाणारा गारवा अशा गोष्टीतला चार्म आता राहिला नाही...आमच्या लहानपणी लपाछपीत लपलेला पोरगा आम्हाला सापडला पण लपलेल्या पोरासोबत लपलेली मजा काही आता सापडत नाही...लपलेल्या पोराने टीव्हीवरच्या कार्टून्सच्या रुपाने पुनर्जन्म घेतलाय जणू...

चटणी-भाकर-कांद्याची लज्जत देणाऱ्या मातीतल्या खेळांनी जीव सोडलाय...बर्गर-पिझ्झाची टेस्ट देणारे गेम उधळले जातायत...आता काय..? मग काय? खेळ ओव्हर...गेम मांडला..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा