मंगळवार, १० जून, २०१४

वाकळेची ऊब कुठं गेली?

टळटळीत उन्हात वारा रुसलेला असल्याने झाडाचं पानसुद्धा हलायचं नाव घेत नाही...एखादा विषाणू अंगभर भिनत जावा तशी उन्हाची तलखी घालमेल करत राहते...शाळा-कॉलेजांना सुट्टी लागल्याने पोरंटोर कुठंकुठं बॅटबॉलचे खेळ मांडत राहतात...उन्हाळ्यात चार-दोन घरच्या बायांनी एकत्र येऊन खरावडे, कुरवडे करायचे...वाळत घालायचे...आणि कोंबड्या-पक्षांनी वाळत घातलेलं खाऊ नये म्हणून सुट्ट्या लागलेल्या पोरांना राखण बसवायचे...हा दरवर्षी उन्हाळ्यात न चुकता साजरा होणारा समारोह...मग सुरू होतात वाकळा शिवायच्या बैठका...राजकारणात वेगवेगळ्या बैठका घेऊन तोडगा काढला जातो अगदी तशाच वाकळा शिवायच्या बैठका घेऊन रंगीबेरंगी वाकळांचा तोडगा काढला जातो...गावोगावी, वाड्या-वाड्यांवर आयाबायांची वाकळा शिवायची लगबग सुरू झालेली दिसते...

वापरून वापरून चिरगुटासारखं झालेलं पातळ, वर्षा-दोन वर्षांपूर्वी वारलेल्या म्हातारीचं नऊवारी लुगडं किंवा म्हाताऱ्याचं डोबळं पडलेलं धोतर गटुळ्यातून शोधून बाहेर काढायचं...जुनी-पुराणी धडुती कापडं काढायची, त्याची कापाकापी करून वाकळंचं पोट भरायचं...खालीवर मोठं लुगडं किंवा धोतर आणि मध्ये बारीकबारीक कापडांच्या चिंध्या अंथरून घ्यायच्या...वाडी-भावकीतल्या आयाबाया भलीमोठी सुई घेऊन हजर झाल्या की वाकळ शिवायची धांदल उडते...वाकळा शिवताना अमूकचा पोरगा मंबयला हाय...रग्गड पगार हाय, तमूकची पोरगी नांदायला गेली पण नवरा चांगला न्हाय, फलाण्याचा पोरगा साळत हुश्शार हाय अशा चर्चांचे फड रंगू लागतात...या चर्चांच्या फडाला तंबाखूच्या मशेरीची आणि चहाची फोडणी ठरलेलीच..! बोटाला मोठमोठ्या सुया लागून झालेल्या बोटाच्या जखमा तांबसर चिरगुटाने गुंडाळलेल्या असतातच...आया-बाया वाकळ शिवण्यात दंग असताना शाळेला सुट्ट्या लागलेल्या पोरांची उगाचच आजूबाजूला लुडबूड...ज्यांची वाकळ शिवायची चालू आहे त्यांनी चहा-बिहा, मशेरी, पाण्याची सोय करायची...कधीमधी जेवायचीपण सोय करायची...गावभर वाकळा शिवायच्या सोहळ्याची नुसती धांदल...

उन्हाळा संपत येईल तसे वाकळा शिवायचे सोहळे आटोपलेले असतातच...घरातल्या बाप्यांना रानातली काम नसतात अन् पोरांच्या शाळांना सुट्टी लागलेली असते...आणि मग घरातल्या वाकळा धुवायच्या तयारीला वेग येतो...गावाशेजारच्या पानवठ्याच्या ठिकाणी घरातल्या सगळ्या मेंबरनी घराला कुलूप लावून वाकळा धुवायला जायचं...कच्चा-बच्चांच्या उत्साहाला पारावर उरलेला नसतो...घरातल्या वाकळा बैलगाडीत काठोकाठ भरायच्या आणि बैलगाडीत सगळ्या्ंनी बसून नदीकडं कूच करायची...ढवळे-पवळे मान हलवत दुडक्या चालीने चालत राहतात...बैलगाडीला मागच्या बाजूला बांधलेल्या शेळ्या, गायी, म्हशीपण माना हलवत
तालात चालत राहतात...डुचकळत चाललेल्या बैलगाडीत बसलेल्या पोरांचा नुसता गलका उडालेला असतो...गावी वाकळ धुण्याचा एक सोहळाच असतो...वर्षा-सहा महिन्यातून एकदा घरातल्या सर्व वाकळा घेऊन नदीवर जाण्याची मजा काही औरच...घरातल्या सर्व वाकळा बैलगाडीत भरून नदीवर न्यायच्या आणि दिवसभर आदळ-आपट करायची...नदीकडेच्या खडकावर आपटून, तुडवून एका विशिष्ट पद्धतीने पिळून त्या वाळत घालायच्या आणि मग घरून आणलेलं जेवण नदीच्या तिरावर बसून सर्वांनी खायचं...घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण वाकळ धुण्याच्या सोहळ्यात सहभागी होत असतात...

रात्री-बेरात्री राना-वावरात, खळ्यावर जाताना फक्त एखादी वाकळ खांद्यावर टाकली तरी कडाक्याच्या थंडीतही तिची ऊब रात्रभर पुरत राहते...अंगावर घेतलेली वाकळ थंडीच्या झोंबीशी लढत राहते...इथेतिथे काजळदाट काळोख सांडलेल्या अंधाऱ्या रात्रीत आपण घोर झोपलेलो असताना वाकळ मात्र आपल्या अंगाशी लगट करत सोयरसुतक नसलेल्या  गारेगार वाऱ्याशी दोनहात करत राहते...चंद्राच्या प्रकाशाशी झिम्मा खेळत राहते...शेपटी हलवत आजूबाजूला रेंगाळणारं कुत्रं रात्र ऐन रंगात आली असताना मध्यरात्रीच कधीतरी पायापाशी गुडूप होतं...आपण अंगावर घेऊन पायाशी लोळत पडलेल्या वाकळंच्या शिल्लक कोपऱ्याचा आधार घेत कुत्रही घोरत राहतं...मांजरसुद्धा वाकळंच्या उबेला शिरण्याचा मोह टाळू शकत नाही...वाकळंच्या ऊबदार स्पर्षात सगळं कसं एकजीव होत राहतं...

दिवसभर घडणाऱ्या अनेकानेक भल्याबुऱ्या घटनांचं, त्यांच्या घुसमटीचं, त्यांच्या आनंदाचं मनात रात्रभर काहूर चाललेलं असताना आपल्या मनातल्या गोष्टी वाकळ कान देऊन ऐकत राहते...दिवसभर भेटलेल्यांशी मनातल्या गोष्टी सांगायच्या राहून जातात त्याची मनातली घुसळण, उद्याचं नियोजन मनात चालू असताना केवळ वाकळच आपल्या सर्वात जवळ असते...जीवाची घालमेल चालू असताना, मनात आनंदाची लकेर उमटलेली असताना रात्री झोपल्यावर आपल्या अंगावर निपचित पहुडलेली वाकळ आपली, आपल्या जीवाची सर्वात जवळची सखी बनून जाते...अशी सखी जी अल्लडपणे आपल्याला गुदगुल्या करत राहते...अशी सखी
जी आपल्याला ऐन झोंबणाऱ्या थंडीतही मायेची ऊब देत राहते...अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यात गुंडाळून कोपऱ्यात टाकलेली वाकळ रात्रभर आपल्याकडे बघत राहते...नव्हे आपल्यावर नजर ठेऊन राहते...

काळाच्या पडद्याआड गेलेल्या म्हातारा-म्हातारीच्या जीर्ण झालेल्या लुगड्याची, धोतराची ऊब देणारी वाकळ आता कुठंकुठंच दिसतेय...पण हल्ली नदीचं पाणी आटलंय...आणि वाकळाही काळानुसार लुप्त होत चालल्यात...हल्ली नवनव्या डिझाईनच्या चादरी आणि कांबळी आल्यात पण आजी-आईच्या जुन्या लुगड्यांपासून शिवलेल्या वाकळची ऊब त्याला नाही...भावकी-वाड्यातल्या बाया एकमेकींकडे बघेनाशा झाल्यात...मग वाकळा शिवायला एकत्र जमणार कशा..? म्हातारा-म्हातारी देवाघरी गेले की त्यांच्या धोतरा-लुगड्यांचा लवलेशही घरात दिसेनासा झालाय...जुन्या कापडापासून शिवलेली वाकळ अंगावर घेण्याची लाज वाटू लागलीय...आधीच्या पिढीची साक्षीदार असलेली वाकळसंस्कृती त्या पिढीच्या अस्ताबरोबरच नेस्तनाबूत होऊ पाहतेय...शिक्षण, पैसा या भौतिक गोष्टींमुळे मनामनात उभारलेली फोकनाड प्रतिष्ठेची बुजगावनं आता वाकळांची ऊब झुगारून देऊ लागलीयत...

धीरोदात्तपणे संसार उभा करून वाढवणारी म्हातारा-म्हातारी पुढच्या कित्येक पिढ्यांना वाकळेच्या रुपाने ऊब आणि आधार देत राहतात...मात्र आता वाकळा गेल्या...नदीवरचा वाकळा धुण्याचा सोहळाही हल्ली दिसत नाही...जाडसर दोऱ्याने शिवलेल्या रापट, कणखर वाकळेचे धागे सैल झालेत जणू...दुष्काळामुळे नदीचा ओलावा गेला अन् माणसाच्या संकुचितपणामुळे वाकळतला ऊबदारपणाही..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा