शनिवार, २८ जून, २०१४

रणरागिणी

बारमाही संकटांच्या टळटळीत उन्हातल्या आयुष्याचे भोग उराशी कवटाळून कचेरीबाहेर ताटकळत बसलेल्या वृद्धाच्या रापलेल्या, थकलेल्या खांद्यावर हात पडल्याबरोबर बऱ्याच वेळापासून अदखलपात्र ठरलेल्या म्हाताऱ्याचा चेहरा फुलला...सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आधार मिळाल्याची भावना स्पष्ट दिसू लागली...खांद्यावर आपुलकीचा हात ठेवत ‘काय काम आहे बाबा?’  असा प्रश्न विचारल्याबरोबर डोक्यावरचा फेटा सावरत म्हातारं कसंबसं उठलं ‘राशनकार्डाचं काम हाय, बऱ्याच दिवसापस्न मिळालं न्हाय’ म्हणतं...कचेरीच्या प्रवेशद्वारातूनच संबंधित अधिकाऱ्याला बोलावणं जातं...अधिकाऱ्याशी चर्चा करून उद्या कार्ड मिळेल असं आश्वासन दिलं जातं...कुणीच लक्ष देत नसल्याचा म्हाताऱ्याचा न्यूनगंड कुठल्याकुठं पळून जातो...चेहऱ्यावर समाधानाची फुललेली लकेर घेऊन म्हातारं घराची वाट धरतं...दुसऱ्या दिवशी सकाळी कचेरीत आल्याआल्या म्हाताऱ्याच्या रेशनिंग कार्डाबाबत चौकशी होते...म्हाताऱ्याला रेशनकार्ड मिळाल्याची माहिती मिळते...संबंधित अधिकाऱ्याचं कौतुक होतं...

कोरेगावच्या तहसीलदार अर्चना तांबे दालनात प्रवेश करतात तोच समोरच्या खुर्च्यांवर पळशीजवळच्या सुळकेश्वर बंधाऱ्यातल्या गाळाचं, गावच्या पाणीबाणीचं गाऱ्हाणं घेऊन आलेल्या ग्रामस्थांचा जत्था ताडकन उठून उभा राहतो...स्मितहास्य करत विनम्रपणे हातानेच बसण्याचा इशारा करत अर्चना तांबे खुर्चीवर बसतात...एकापाठोपाठ एकाचं म्हणणं ऐकून अर्चना तांबे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतात...गावाला आणि शेतीला पाणी मिळण्याबाबतची ग्रामस्थांची तळमळ अर्चना तांबेंच्या डोळ्यात उतरलेली असतेच...पेशवेकाळात सरदार खिरेंनी बांधलेल्या दगडी बंधाऱ्याची गाळामुळे झालेली दुरवस्था ऐकून अर्चना तांबे अस्वस्थ होतात...डॉ. अविनाश पोळ, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., प्रांताधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून काहीतरी मार्ग काढण्याचं ठरवतात...पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या ग्रामस्थांना अश्वस्त करतात...दुष्काळामुळे पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची तातडीची गरज लक्षात घेऊन केवळ सरकारी
मदतीवरच विसंबून न राहण्याचा सल्ला देतात...सरकारी योजना तर आहेतच पण आपण सर्वांनी मिळून लोकसहभाग आणि लोकश्रमातून बंधाऱ्याचा कायापालट करू असा आत्मविश्वास देतात...अर्चना तांबेंनी दिलेल्या विश्वासाने आणि बळाने गावकरी माना हलवतात...गावातल्या आयाबाया, बाप्ये, पोरंटोरं कंबर कसून कामाला लागतात...सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सगळे एकजीव होऊन घाम गाळतात...अवघ्या 19 दिवसांत तब्बल 36 हजार घनमीटर गाळ बंधाऱ्याबाहेर...बंधाऱ्याचा कोंडलेला श्वास मोकळा झाला...तळ गाठलेल्या परिसरातील विहिरींचा गेलेला जीव परत आला...प्रगतीच्या सूर्योदयाचं प्रतिबिंब वसना नदीच्या पात्रात उमटू लागलं...आसपासच्या परिसरातील लोकांच्या जीवनात ओलावा आलाय...पिकं डोलू लागलीयत...

अर्चना तांबेंनी कोरेगावच्या तहसीलदार पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा परिसरात वाळूमाफियांनी हैदोस घातला होता...नद्यांच्या उदरात घाव घालून वाळूमाफिया नद्यांचा आणि पर्यावरणाचा गळा घोटत होते...राष्ट्रीय संपत्ती असलेल्या नद्यांवर अहोरात्र दरोडा घालणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचा निर्धार अर्चना तांबेनी केला...अधिकारी, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अर्चना तांबेंनी धाडसत्र सुरू केले...लाखो रुपयांचा दंड, शेकड्यांनी वाहनं जप्त केली...परिसरातील वाळूमाफियांमध्ये घबराट निर्माण झाली...नद्यांच्या पात्रांत भसाभस घुसणारे पोकलन, जेसीबी थंडावले...वाळूचा उपसा थांबला...गेंड्याच्या कातडीचे वाळूमाफिया कारवाई जरा कुठं थंडावली की पुन्हा नद्यांवर चाल करून लागले...पण अर्चना तांबेंनी कारवाईत सातत्य ठेवलं...आणि नद्यांना ओरबाडणारे वाळूचे दरोडे थांबण्यास मदत झाली...नद्यांचा आणि पर्यावरणाचा जीव वाचला...

गेल्या वर्षीचा दुष्काळ बाया-बापड्यांच्या गळ्याशी आला होता...जमिनीला भेगा पडल्या...जीवाचं रान करुन सांभाळलेल्या बैलांचे डोळे खपाटीला गेले...शेतकरी आभाळाकडं आशेनं बघत राहिला...आठवड्या-पंधरवड्यातून गावात पाण्याचा टँकर आलाच किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी बायाबापड्या हंडा-कळशी, बादल्या घेऊन टँकरमागे गोळा होत होत्या...पोरा-टोरांना दिवसाआड अंघोळ करावी लागत होती...असा हा दुष्काळाचा फेरा गावा-गावात आणि वाड्या-वाड्यांवर पडला होता...अशा हलाखीच्या काळात अर्चना तांबेंनी लोकसंवादाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याच्या उपाययोजना आखल्या...दुष्काळाने होरपळत असलेल्या गावात वेळोवेळी टँकर पोहोचलाच पाहिजे यावर वैयक्तिकरित्या लक्ष घातलं...चारा छावण्यांवर गुरा-ढोरांना चारा वेळेवर मिळेल याची दक्षता ठेवली...

अर्चना तांबे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सातवे गावच्या, ग्रामीण आणि निमशहरी भागात शिक्षण घेऊन लग्नानंतर त्या पुण्याच्या शिरूरला स्थायिक झाल्या...पती पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याने सततच्या बदलीमुळे गोगलगाईचं बिऱ्हाड पाठीवर होतंच...संगणक क्षेत्रातील पदवी हातात असताना आणि सुखदायी नोकरीच्या विविध संधी असतानाही समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला...आधुनिक सुविधांची बोंब असलेल्या, वीज, पाणी, फोन असल्या मूलभत सुविधांची वाणवा असलेल्या गडचिरोलीसारख्या भागात पती सेवेत असल्याने एमपीएससीचा अभ्यास तिथूनच सुरू झाला...एटापल्लीसारख्या दुर्गम भागात एमपीएससीचा अभ्यास सुरू केल्याने सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचं अर्चना तांबे सांगतात...ग्रामीण भागातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आल्याने पुढील वाटचालीसाठी मोठं संचित मिळाल्याची भावना त्या बोलून दाखवतात...गडचिरोलीतल्या आठवणी सांगताना अर्चना तांबेंच्या अंगावर रोमांच उभे राहतात...’कोरेगावातल्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवरची कारवाईही कसोटी बघणारी होती’ असं सांगताना कोरेगावचे अतिक्रमणमुक्त रस्ते बघण्याचा सल्ला अर्चना तांबे देतात...

‘महिलांनी प्रशासकीय सेवेत आलं पाहिजे, केवळ चूल-मूल बघणारी आपली सौदामिनी माजघराच्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेर आली पाहिजे...सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रांच्या क्षितिजाला त्यांनी गवसणी घालायला हवी...
स्त्री आणि पुरूषांनी परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले उचलली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशीराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे...एकुणच शिक्षणाची गंगा येण्यास उशीर
नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.’ असं म्हणत अर्चना तांबे महिलांना प्रोत्साहन देतात...

‘आजची तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहे...उद्याच्या देशाचा डोलारा ज्या खांद्यांवर पेलला जाणार आहे ते तरुणाईचे खांदे आजच बळकट कसे होतील हे पाहणे गरजेचे आहे...तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ध्येयधोरणे आखणे ही काळाची गरज आहे...तरुणाईचं अष्टपैलू सशक्तीकरण झालं तर देशाला नक्कीच उज्ज्वल भवितव्य आहे...आजची तरुण पिढी फेसबुक, ट्विटर, वॉट्सअपसारख्या सोशल साईटवर रमताना बघायला मिळते...मात्र या सर्व गोष्टींचा वापर करताना सामाजिक, नैतिक भान पाळत वेळप्रसंगी बंधनं पाळत सोशल साईटच्या माध्यमातून ज्ञानपूरक गोष्टी आत्मसात करता येऊ शकतात...प्रगल्भता आणि निर्णयक्षमतेसाठी तरुणांनी वाचन वाढवलं पाहिजे...तरुणांनी कुटुंब, समाज, देशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास क्रांती होण्यास वेळ लागणार नाही’ असं सांगताना अर्चना तांबेंच्या डोळ्यात जबरदस्त आशावाद चमकून जातो...

‘निसर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे अठराविश्व दारिद्र्य भाळी लिहलेल्या आपल्या बळीराजाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे, संकटांच्या रखरखीत उन्हात पोळून निघणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्याला प्रशासनाच्या मदतीने मायेची सावली देता येऊ शकते...रानावनात बारमाही राबणाऱ्या हातांना विसावा घेता येत नसला तरी शासकीय योजनांच्या मदतीने त्यांच्या रापलेल्या हातांना दिलासा मात्र आपण नक्कीच देऊ शकतो...

पोटापुरता पैसा पाहिजे
नको पिकाया पोळी, 
देणार्‍याचे हात हजारो 
दुबळी माझी झोळी

म्हणणारा शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी शेती जगविली पाहिजे...” अर्चना तांबेंच्या डोळ्यात शेतकऱ्यांपुढील समस्यांची दाहकता उतरलेली असते...


‘शेतीपुढील प्रश्नांमुळं ‘बळी’ जाणारा हा ‘राजा’ असाच तडफडत राहाणार असेल तर ‘यथा राजा तथा प्रजा’ होण्यास वेळ लागेल का ? लालबहाद्दूर शास्त्रींनी ज्या मंत्रात देशाच्या सर्वांगीन विकासाचं तंत्र जाणलं त्या ‘जय जवान जय किसान’ ची आरोळी आपल्या कानापर्यंत कधी पोहोचणार आहे की नाही ? शेतीपुढील प्रश्नांचं हे चक्रव्युह भेदून धन-धान्य देणा-या या काळ्या आईला पाना-फुलांचा हिरवा शालू नेसविलेला आपणाला बघायचा असेल तर चला, पावसामुळे कोरडंठाक पडलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात सरकारी मदतीने मायेचा ओलावा आणू’ असं सांगताना अर्चना तांबेंच्या शब्दाशब्दांत प्रामाणिक प्रयत्नांचा निर्मळ झरा वाहू लागतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा