गुरुवार, १० जुलै, २०१४

पावसा पावसा जाग रे, पावसासारखा वाग रे

वाळकं गवत चघळत रवंथ करणाऱ्या ढवळ्या-पवळ्याच्या फेसदार तोंडातून एखादा थेंब तार तुटत बांधावरच्या गतप्राण गवतावर अलवार पडल्याक्षणी गवताची काडी त्या उबदार थेंबाच्या स्पर्षानं मोहरत जाते…ढवळ्या-पवळ्याच्या अंगाखांद्यांवर कावळ्या-चिमण्यांचं बिनदिक्कत बसणं अन् फडफड करत उडणं चालूच असतं... बैलांच्या तोंडावर घोंघावणाऱ्या माशा फिरत राहतात...माशा फिरता फिरता डोळ्यांच्या आजूबाजूला आल्या की घंटी वाजवत बैल मान हलवून माशीला झिडकारत राहतो...बैलाच्या गळ्यातल्या घंटीच्या आवाजानं पानगळ झालेल्या बोडक्या झाडावरच्या चिमण्या चिवचिवाट करत आभाळाकडे झेपावत राहतात...खपाटीचं पोट, कातड्याबाहेर डोकावणाऱ्या बरगड्या सांभाळत तांबरलेले, ओघळलेले डोळे फिरवत बैलांचं चरणं कसंबसं सुरू असतं...तापलेल्या उन्हात गावभर फिरून मिळालेला अर्धामुर्धा भाकरीचा तुकडा पोटात ढकलून आणि कुठल्यातरी हापशीजवळच्या साचलेल्या पाण्याचं चाटण करून कुत्र थोडा जीव वाचलेल्या झुडुपाखाली पासललेलं असतं...खपाटीला गेलेलं कुत्र्याचं पोट खालीवर करत राहतं...गर्भात ठिपूसभरही पाणी नसलेली विहीर आभाळाकडं तोंड करून उताणी पडलेली असते...धारातीर्थी पडलेल्या देहावर तुटून पडलेल्या गिधाडांसारखं विहिरीचा ताबा कावळ्या-पारव्यांनी घेतलेला असतो...

ओळख नसलेल्या कुत्र्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांच्या कळपासारखं ऊन अख्या शिवारावर कोसळत राहतं...भेगाळलेल्या चिरांमधून वाफांच्या रुपाने रापलेली जमीन चटकेदार श्वास सोडत राहते...शिवारभर उन्हाच्या रणरणत्या लाह्या फुटत राहतात...लांबलांब डोंगरापर्यंत डोळ्यांना गारवा देणारं एखादं झुडूपही नजरेला पडत नाही...अख्ख्या शिवारभर नुसता शुकशुकाट...उन्हाच्या काहिलीचा निषेध म्हणून डोंगरावरच्या गवतानं पेटवून घेतलेलं असतं...डोंगराची, डोंगराच्या पायथ्याशी पसरलेल्या काळ्या आईची नुसती तगमग-तगमग चाललेली असते...इतक्यात कित्येक दिवसांपासून थबकलेला वारा हलू लागतो...वाऱ्याचा वेग वाढत

राहतो...रानभर उंडारणारा पाचोळा गोल-गोल फिरत आभाळाकडे झेप घेतो...आभाळाच्या कुशीतून एकेक ढग गोळा होत राहतात...ढग कूस बदलू लागतात तसं त्यांचा पांढरा रंग हळूहळू काळाभोर होत राहतो...उन्हाचे कवडसे तिरपे-तिरपे होत राहतात...ढगांच्या सावलीच्या पंखाखाली अख्खं रान शिरतं...गुरं-ढोरं, झाडं-झुडपं, शेत-शिवार निर्जीवपणाची, मरगळलेपणाची लक्तरं फेकून देऊ पाहतात...वाऱ्याच्या फक्त झुळुकीने सृष्टी ताजीतवानी होते...काळ्या मातीच्या आड गेलेल्या बियांना पावसाचे वेध लागतात...जमिनीच्या भेगा आशाळभूतपणे ढेकळांच्या आडून आभाळाकडे बघत राहतात...आता येणार...आता येणार अशी जणू खात्री वाटत राहते...परिसराला ओल्याचिंब पावसाचं स्वप्न पडू लागलेलं असतं...तहानलेल्या पाऊलवाटा भकासपणाची झालर झुगारून धारानृत्याच्या स्वागताला करपलेल्या चेहऱ्यांसह तयार होतात...बांधांवर चरणाऱ्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज वाढत राहतो...

माळावर उभ्या असलेल्या एकमेव झाडाच्या बुंध्याशी झोपलेला बळीराजा सृष्टीच्या, वाऱ्याच्या, गुरा-ढोरांच्या हालचालीनं जागा होतो...अंगभर वणवा पेटवणाऱ्या उन्हाची काहिली कमी झाल्यानं चेहरा फुलवत शेतकरी धावत झाडाखालून बाहेर येतो...झाडाखाली झोपताना उशाशी ठेवलेल्या चपलांचंही भान राहत नाही...बेभरवशाच्या वागणुकीमुळं नातं तोडलेल्या आभाळाकडं बघत राहतो...बळीराजाला काळ्याकुट्ट ढगांनी सलामी दिलेली असते...बळीराजाही ढगांना कुर्निसात करत शिवारभर नजर फिरवत राहतो...दोन दिवसांपूर्वी पेरणी करत काळ्या आईची बियांनी ओटी भरलेली असते...आता पावसांचा शिडकावा होईल, मायेच्या भरलेल्या ओटीला कोंब फुटू लागतील...अख्खं शिवार एका लयीत डोलू लागेल...शिवाराला हिरव्या पानांचा शालू नेसवला जाईल... एकदा आभाळाकडं तर एकदा जमिनीकडं बघत कृतार्थ होत राहतो...पंढरपूरची पायी वारी करून कालच परतलेला बळीराजा मनोमन सुखावत राहतो...पेरलेल्या बियांच्या गर्भातून सुखाची-समृद्धीची पालवी जन्माला येईल, पोटापुरतं धनधान्य कणगीत भरून उरलेलं बाजारात विकता येईल...चार पैसे हातात पडतील...बारक्या पोराची शाळा सुरू होऊन दोन महिने होऊनही आणायचं राहिलेलं बीजगणित, बालभारती, भूगोलाचं पुस्तक आणता येईल, कॉलेजला जाणाऱ्या मोठ्या पोराला फुल पॅन्ट घेता येईल, पहिल्याच बाळंतपणाला आलेल्या पोरीसाठी आणि कारभारणीसाठी नवी साडी घेता येईल, झालेल्या बाळाला पाळणा घेता येईल, सोसायटीच्या कर्जाचं व्याज भरता येईल, म्हाताऱ्या आईच्या डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करता येईल, वर्षभरापूर्वीच वारलेल्या बापाचं वर्षश्राद्ध घालता येईल, बैलगाडीतून पडल्यानं बऱ्याच दिवसांपासून दुखावलेला गुडघा डॉक्टरला दाखवता येईल...एक ना अनेक गोष्टींची जंत्री बळीराजाच्या मनात झिम्मा खेळत राहते...

भेगाळलेल्या वावरात पाय रोऊन उभा राहिलेल्या शेतकऱ्याची नजर शिवारावरून सरकत आभाळाकडं जाऊन पोहोचते...आभाळाकडं नजर गेल्या गेल्या शेतकऱ्याच्या मनात चर्रर्रर्र होतं...स्वप्नांची भीक घालणाऱ्या ढगांनी बेमालूमपणे पळ काढलेला असतो...गडगडाट करत आलेले काळे ढग एखाद्या वैऱ्यासारखे क्षितिजापल्याड पोहोचलेले असतात...मनावर, सृष्टीवर, प्राण्यांवर काही क्षणांपुरतं घातलेलं सुखाचं झाकण घेऊन ढगांनी पुढच्या गावाकडं कूच केलेलं असतं...पुढच्या गावातील लोकांना, शिवाराला गंडवण्यासाठी ढगांची पावलं आभाळात झपाझप वेगानं पुढं सरकत राहतात...काही वेळांपूर्वी अलवार झालेलं वातावरण क्षणार्धात उनाड, ओसाड होऊन जातं...सूर्याचा भगभगीत प्रकाश पुन्हा मनामनाला जाळण्याचं काम अविरत चालू करत राहतो...हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखा बळीराजा डोक्याला हात लावत उभ्या जागेवरच स्वत:ला सावर बसून जातो...शरिराला सावरत बसतो खरा पण मनाने पुरता कोलमडलेला असतो...

पाऊस असा दगा देत असताना बळीराजा डोक्याला हात लावत उठतो...संकटांचा डोंगर उचलण्यासाठी मनाला खंबीर करत राहतो...बेभरवशाच्या पावसाची जणू सवय झाल्यासारखं ताडकन उठून बसतो...आयुष्यात जेवढे पावसाळे पाहिलेत तेवढेच उन्हाळेही पाहिलेत...असं म्हणत खचलेल्या मनाला सकारात्मकतेचं खतपाणी घालत राहतो...रुसलेल्या वरुणराजाला हात जोडत पावसाची विनवणी करत राहतो...बळीराजाची ही केविलवाणी अवस्था बघताना युवा कवी गुरूप्रसाद जाधवला कवितेच्या ओळी स्फुरतात...

किती काळ आहे घसा कोरडा हा
जसा वाळवंटी फिरे उंट प्यासा
दारिद्र्य माझे मला पूज्य आहे,
परि हातावरी या कोरड्याच रेषा
तरी मावळेना भिजण्याची आशा
पावसा पावसा जाग रे, पावसासारखा वाग रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा