शनिवार, २६ जुलै, २०१४

शेत परकं होतंय, काळीज तुटतंय..!

दिवस कलायला आल्यानं शिवारभर पडलेल्या तांबड्या रंगाच्या सड्यात तात्यारावचा चेहरा अजूनच लालेलाल दिसत होता...दोन्ही मुठी आवळून दात-ओठ खात तात्याराव झपाझप पावलं टाकत बांधावरनं चालत होता...बांधावरच्या ओल्याशार गवताला घोळदार लेंगा घासल्याचा सळसळ आवाज चालूच होता...बांधाशेजारच्या झाडावरच्या चिमण्या एव्हाना घरट्याच्या आडोशाला विसावलेल्या असतातच...डोक्यावर जळण, वैरण, गवताच्या पेंढ्या घेऊन चाललेल्या आया-बाया लांबवर दिसत राहतात...चेहरा दिसत नसला तरी त्यांच्या हातातील कासरे आणि त्यांना बांधलेल्या गायी-म्हशी-शेळ्यांच्या माना हलवत चाललेल्या आकृत्या दिसत राहतात...त्यांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज इतक्या दूरवरूनही कानाला रुंजवत राहतो...हाताला पकडून अल्लडपणे चालताना पोराचे बोबडे बोल धूसर-धूसर ऐकू येत राहतात...दुपारच्या उन्हाची काहिली थंडावलेली असते...

वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबवत पुढच्या मार्गाला निघालेली असते...कासरा दोन कासरा चालल्यावर एका मोठ्या टेकाडावर तात्यारावची पावलं थबकतात...श्वासाचा वेग वाढलेलाच असतो...अख्ख्या शिवारभर नजर फिरता-फिरता तात्यारावच्या हाताच्या वळलेल्या मुठी थोड्या सैलावतात...पिढ्यानपिढ्यांना आधार देणाऱ्या काळ्या आईच्या दर्शनाने तात्यारावचे लालबूंद डोळे निवळू लागतात...संध्याकाळच्या तांबूस प्रकाशाची जागा हळूहळू काजळदाट अंधाराने घेतलेली असते...छोट्या भावाचं शिक्षण, पाठच्या बहिणीचं लग्न, पोराचं चाललेलं शिक्षण, पडक्या घराची डागडुजी आणि अशा कितीतरी कामांच्या खर्चाचा भार लिलया ज्याच्या आधारानं पेलला ते अख्खं शिवार तात्याराव डोळ्यांत साठवू पाहतो...एकेकाळी याच शिवाराचा मी राजा होतो असं म्हणत तात्याराव जून्या आठवणीत रमून जातो...याच मातीत रक्ताचं शिंपण करून मोत्याचं धान्य जन्माला घातलं...ढवळ्या-पवळ्यामागे पाबार धरत मूठीतल्या धान्यानं याच काळ्या आईची ओटी भरली...सणासुदीला, लग्नकार्याला याच काळ्या आईनं पैशापाण्याचा आशीर्वाद दिला...पावसाने दगा

दिल्यावरही या शिवारानं पोटापुरता का होईना दाणा दिलाच...पण मी काय दिलं या मायेला...पैशांच्या बकासुरी हव्यासापोटी हे सारं शिवार दुसऱ्याच्या हवाली केलं...गुंठ्या-गुठ्यांचे तुकडे करत राना-वावराला अगडबंब पैशांना विकून टाकलं...तात्याराव आतून गलबलून गेला होता...जमिनीचे मिळालेले पैसे कधीच संपले...आता एकेकाळी मालक असलेल्या याच वावरात रोजानं यायची वेळ येऊन ठेपली होती...काळाची चक्र इतक्या वेगानं फिरली होती की तात्यारावचे डोळे गरागरा फिरू लागले होते...

शहराशेजारच्या जमिनींना सोन्याचा भाव आलाय...व्यापारी वर्गाच्या तोंडाला पाणी सुटू लागलंय...त्यातच पावसाच्या दगाबाजीनं, बाजाराच्या हेकेखोरीमुळं, शेतमालाच्या व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळं शेतकरी खचलाय...वर्षभर घाम गाळून हातात पडणारी दमडी घरातल्या कुणाच्या तोंडाला पुरेनाशी झालीय म्हणून गुंठ्या-गुंठ्यानं जमिनीचे लचके तोडून व्यापाऱ्यांच्या घशात घातले जाऊ लागलेत...जमिनीला आलेल्या दरामुळे नांदायला गेलेली मुलगी, बहिण जमिनीत वाटा मागू लागल्यायत...घराघरात वादाच्या ठिणग्या पडू लागल्यात...आधी रुबाबात येणारा जावई पाण्यात पाहू लागलाय...जमिनींचे वाद कोर्टात गाजू लागलेयत...तारखेला कोर्टात आल्यावर समोरा-समोर येऊनही लेक बापाकडं, बहिण भावाकडं बघेनाशी झालीय...रक्षाबंधनाला बहिण भावाकडे आणि भाऊबिजेला भाऊ बहिणीकडे जाईनासे झालेत...सुगीच्या दिवसांत रानात थांबाव लागलंच तर आसऱ्यासाठी गवताने, पाचटीने बांधलेल्या रानातल्या कोपी, झोपड्या तुटू लागल्यायत...एकरकमी पैशांच्या हव्यासापोटी व्यापाऱ्यांना विकलेल्या जमिनीवर टोलेजंग इमारती नाहीतर छोट्या-मोठ्या कंपन्या उभ्या राहू लागल्यायत...

सुखाची चटणी-भाकर खाऊन सुखा-समाधानानं झोपणारे जमिनीचे पैसे मिळाल्यावर ढाब्यावर जाऊ लागले, दुधा-ताकाचं तीर्थ घेऊन झोपणारे ढाब्यांवर जाऊन दारूचे घोट घशाखाली उतरवू लागले...झिंगाझिंगी करून डुलत, होलपडत रात्री-बेरात्री घराकडे परतू लागले...बैलगाडीत बसून रानात जाणारे चारचाकी गाड्या उडवू लागले...शाळेत जाणारी आणि नुकतंच मिसरूड फुटलेली पोरं फटफटीवरनं घिरट्या मारू लागले...जुन्या साड्या जोडून वापरणाऱ्यांनी भरजरी साड्यांनी कपाटं भरली, गळ्यातल्या फुटक्या मन्यावर समाधानानं धन्याची सेवा करणाऱ्यांचे गळे पिवळेधम्म झाले...पिढ्यापिढ्यांचा वारसा सांगणारी चिरेबंदी घरं भूईसपाट होऊन आरसीसीचे बंगले उभे राहू लागले...सकाळच्या पारी उठून रानात जाणारे 10-10 वाजेपर्यंत पासलू लागले...गावात उगाच बिनकामाचा फेरफटका मारू लागले...जत्रा-बित्रांना आवर्जून जाऊ लागले...पुन्हा झिंगाझिंगी करून कुठं-कुठं मारामाऱ्या होऊ लागल्या...आजा-पंजापासून पोलिस स्टेशनाची पायरी न चढलेले पोलिस स्टेशनात ये-जा करू लागले...जमिनी विकून मिळालेले पैसे हे असे उधळमपट्टीत गेल्याने वर्षा-दोन वर्षांतच भरजरी कापडांचे खिसे मोकळे झाले...होता नव्हता तो पैसा संपला, हक्काची शेतीही गेली...आता दारिद्र्याचं धुपाटणं घेऊन जगण्याशिवाय हातात काहीच उरलं नाही...

तिन्ही सांजेच्या अलवार गारव्यातही बांधावर उभं राहिेलेल्या तात्यारावच्या डोक्यातून घामाचा थेंब ओघळत थेट पायापर्यंत आला...डोक्यातल्या विचारांनी आणि आठवणींनी हात थरथरू लागले...पैशांच्या हव्यासापोटी काळजाचा तुकडाच विकून टाकल्याची भावना तात्यारावच्या मनात दाटून आली...पायाखालची माती तळव्यांना बोचणी देऊ लागली...ज्याला जमीन विकली त्यानं भांडवलाच्या जोरावर घेतलेल्या बोअरचे पाणी अव्याहत खळखळत उसळ्या मारत होते...जमीन विकण्याआधी गवतावर पडलेल्या दवबिंदूचा थेंबही आपुलकीचा, मायेचा ओलावा द्यायचा...आता त्याच जमिनीत बोअरने अवतरलेली पाण्याची धो-धो गंगा मात्र मनाचा कोरडेपणा भिजवू शकत नव्हती...चेंबरमधनं मुजोरपणे खळाळणारं पाणी  जणू तात्यारावकडे बघत कुत्सितपणे हसत होतं...घशाला पडलेल्या कोरडीची जाणीव झाल्याझाल्या तात्यारावची पावलं झपकन पाण्याकडे ओढली गेली...खाली वाकून तात्यारावनं फेसाळणारं पाणी तोंडावर मारलं...अन्...अन्

तात्याराव धाडकन उठून बसला...भर उन्हात झाडाच्या सावलीत विसावलेल्या तात्यारावला कधी डोळा लागला ते समजलंच नव्हतं...स्वप्नात घडलेल्या घटनांनी तात्यारावचे डोळे खाडकन उघडले होते...जमिनीचा व्यवहार करायला आलेले व्यापारी समोर उभे ठाकले होते...तात्यारावने त्यांना खडे बोल सुनावत अक्षरश: पिटाळून लावलं...तात्यारावचा अवतार पाहून व्यापारी कधीचेच निघून गेले...तात्याराव मात्र अख्ख्या शिवाराकडं बघत मटकन खाली बसला...शिवारभर फुललेला रानमळा डुलत तात्यारावकडे आपुलकीने बघत राहिला...शेजारी बांधलेल्या बैलांचा रवंथ मोठ्या जोमानं सुरू होता...डोक्यावर जेवणाची पाटी घेऊन येत असणारी बायको तात्यारावला दिसली, बायकोबरोबर मोठ्या आनंदानं उड्या मारत येणार एकुलतं एक पोरगं तात्याराव हर्षोल्हासानं बघत राहिला...एकुलतं एक पोरगं आणि अख्खं शिवार तात्यारावला तेवढंच प्रेमाचं वाटू लागलं होतं...जणू काळजाचे दोन तुकडेच..!

गुंठा गुंठा जमीन विकून आज
गोफ आलाय गळ्यात
पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला
उद्या रक्त येईल डोळ्यात

चिमण्या पिल्लांनी आईला
कसा मागायचा चुलीवरचा घास ?
अत्तराच्या बाटलीत सांगा ना
भरता येतो का मातीचा वास ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा