सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

शेतकरी नवरा (का) नको गं बाई ?

रात्रभर गावभर सांडलेला अंधार निवळू लागला… गावभर उंडारून मध्यरात्री कधीतरी पासललेली भटकी कुत्री पहाटेची चाहूल लागल्याबरोबर कान फडफडवत, शेपटी हलवत उठून चालू लागतात...फटाटल्याबरोबर कोंबड्यांचं बेंबीच्या देठापासून तुरा वर करत कोकलंनं चालू होतं…गावातल्या प्रत्येक वाड्यातून, आळीतून कोंबड्यांच्या आरवण्याचा आवाज सकाळच्या शांततेत कलकलाट करत राहतो...डालग्यावरचं झाकण काढल्याबरोबर कोंबड्यांचा तांडा फडफडत अंगणभर कॉक-कॉक करत मॉर्निंग वॉक करत राहतो...कोंबडीच्या आडोशाने तिची इवलीसी पिलं घोळक्याने चालत राहतात...मिळेल तिथला दाणा चोचीनं अलगद टिपत कोंबडीसह पिल्लांचा नाष्टा चाललेला असतो...सकाळच्या धुक्याची चादर निवळत असतेच...प्रत्येकजण झोपेची झालर झिडकारत नव्या उमेदीनं दिवसाची सुरुवात करत राहिलेला असतो...इतक्यात घरातल्या भांड्यांच्या धडाडधूम आवाजानं संथ लयीत चाललेलं पोटभरण सोडून कोंबड्या, पिल्लं कावरीबावरी होत पळ काढतात...घराच्या दारातून तांब्या, कळशी, ताटं एकापाठोपाठ बाहेर पडू लागतात...भांड्यांच्या कर्णकर्कश आवाजानं झुंजूमुंजू सकाळच्या शांत वातावरणाचा गळा घोटलेला असतो...

’गेल्या जन्मी कुठलं पाप केलं म्हणून हे जगणं नशिबी आलं कुणास ठावूक, सकाळी लवकर उठायचं, रानात जायचं, कडूसं पडेपर्यंत रानात राब-राब राबायचं, अंधार पडल्यावर घरी यायचं, जेवण-खाणं बनवायचं, सगळ्यांना वाढायचं आणि आपल्याही घशात कोंबून भांडीकुंडी घासून झोपायचं...सारं आयुष्य रानातल्या मातीत, गुरांच्या शेणात, धुण्या-भांड्यात, खरकटी काढण्यात अन् चुलीतल्या जाळात गेलं...कसली हौस नाही की मौज, आय-बापानं शेतकरी नवरा पदरात घातला आणि आता आयुष्यभर कष्टाचे कचके खाणंच नशिबात राहि्यलंय...’ लग्नाला जेमतेम दोन वर्ष झालेली सासुरवासिन दुगाण्या झाडत सकाळी-सकाळी घराबाहेर पडली...एका हातात धडुतं-कापडाची पिशवी आणि दुसऱ्या हाताने कमरेवरचं पोरगं सांभाळत थेट माहेरचा रस्ता धरला...डोक्यावर फुलाफुलांचं टकुचं घातलेलं कमरेवरचं पोरगं नाकातून गळणारा हिरवाजार चिवट शेंबूड कोपरानं पुसत माऊलीचा जमदग्नी अवतार किलमिल्या डोळ्यांनी पाहात राहतं...म्हातारी सासू गयावया करत जीवाच्या आकांतानं सुनेला अडवण्याचा प्रयत्न करत राहते...पण समजूत घालणाऱ्या सासूला बाजूला सारत सासुरवासिनीची पावलं वेग वाढवतात...म्हातारी हातपाय गाळत मागे वळून घरात जाते...सासरा कमरवेरचा हात काढत अंगणात उभं राहून सारा प्रकार बघत राहतो...

अंगणात कोपऱ्यातल्या मोरीजवळ दात घासत बसलेला शेतकरी नवरा हतबल होत खांद्यावरच्या टावेलनं तोंड पुसत घरात जातो...खाटेवर बसून आशाळभूत नजरेनं शून्यात बघत पायाच्या अंगठ्यानं शेणानं सारवलेली भुई टोकरत राहतो...डोक्याच्यावर तुळईला टांगलेल्या लग्नातल्या मुंडावळ्या वारा नसूनही हेलकावत राहतात...लग्नात खाटेवर मांडलेली चकाचक भांडी फेकून दिल्यानं चिंबलेली असतातच...चिंबलेली भांडी अनाथासारखं अंगणात इथं-तिथं पडून राहिलेली असतात...आडव्या पडलेल्या तांब्यातलं पाणी घरंगळत नाल्याला जाऊन मिळालेलं असतं...सकाळी-सकाळी घडलेला प्रकार बघण्यासाठी जमलेले बघे, शेजारी-पाजारी कुजबुजत आपापल्या उद्योगाला निघून जातात...तांब्यातून सांडलेल्या पाण्याच्या वेगानं गावभर चर्चांचे फड रंगत राहतात...

शेतकरी नवरा नशिबात आला म्हणून आयुष्यभर कपाळ बडवत राहणाऱ्या सुवासिनी कमी नाहीत...शंभरात दहा-बारा सोडल्या तर शेतकरी नवरा मिळाल्यानं हातपाय आदळणाऱ्यांची संख्या मोठी...लग्न झालेल्यांची ही तऱ्हा तर लग्नाला आलेल्या उपवर मुलींचा तोरा काय सांगावा...ग्रॅज्युएट वगैरे झाल्यावर लग्नासाठी स्थळं
शोधण्याची लगबग सुरू झाली की, लाजत-मुरडत ‘सरकारी नोकरीवाला पायजे, मंबयत किंवा शहरात घर पायजे अगदीच नाय जमलं तर प्रायव्हेट कंपनीत रग्गड पगाराची नोकरी पायजे...कसलाबी चालंल पण शेतकरी नको’ अशा फर्माईशी केल्या जातात...आय-बापाचासुद्धा मुलीचं चांगलं व्हावं म्हणून नोकरीवालाच जावई शोधण्याकडे कल असतो...खांद्यावर नांगर घेऊन जाणारा, रानात पाबार हाकणारा, गुरं-ढोरं सांभाळून घराला दूध-दुभत्यानं समृद्ध करणारा, मातीत राबणारा, जगाच्या अन्नाची भूक भागवणारा मुलगा कुणी सुचवलाच तर नाकं मुरडली जातायत...नोकरी-धंद्यावाला मुलगा पाहिला तरी त्याला गावाकडं गुंठाभर तरी जमीन हवीच अशा अपेक्षाही केला जातात...

नोकरीवाल्या मुलाशी लग्न करून शहरात राहणाऱ्या पोरी रानातली ताजी भाजी, ताजं दूध मिळावं म्हणून प्रयत्न करत राहतात...सुट्ट्या-बिट्ट्याला गावी आल्याच तर रानात फेरफटका मारण्याचा छंद मात्र जोपासत राहतात...रानात फेरफटका मारायला गेल्यावर रानात राबणारा शेतकरी, त्याची मातीत राबणारी बायको, अख्ख्या शिवारभर मनसोक्त फिरणारी, उड्या हाणणारी शेतकऱ्याची पोरं, अल्लडपणे डोलणारी पिकं, झाडं आणि डोंगरांचे फोटो मोबाईलवर काढून तिथल्या-तिथं फेसबुक, ट्विटरवर अपलोड केले जातायत...सदा हसतमुख सूर्यफुलांसोबत दात काढतानाचे काढलेले फोटो क्षणभरात इंटरनेटच्या मायाजालात फेकले जातायत...गायी-म्हशींची धार काढताना उगाच दुधाची एखादी चिळकांडी तोंडावर उडवली जाते...अपलोड केलेल्या फोटोंना ढिगभर लाईक्स आणि कमेंट मिळू लागल्यायत...शेत आणि वावर हा त्यांच्या पर्यटनाचा विषय बनून राहतो...शेतीचं पर्यटन आवडू लागतं पण ती फुलवणारा शेतकरी मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून नको असतो...हे गणित नेमकं काय? हे ज्यांचं त्यांना माहित...

आपण पाण्यात उतरायचं नाही, अंगाला पाण्याचा एकही थेंबही लागू द्यायचा नाही पण काठावर बसून पाण्यात पोहणाऱ्यांची मजा बघण्याइकंच हे कोरडेपणाचं नाही का? शिक्षणाच्या भल्यामोठ्या डिग्र्या घेऊन एखाद्यानं शेतीतच करिअर करायचा निर्णय घेतला तर त्याच्या आई-बापानं पोराचे दोनाचे चार हात करण्याची स्वप्न बघायचीच नाहीत का?, पोरीचे हात पिवळे करताना रानातल्या मातीनं माखलेल्या हातांना आपण कुठवर नाकारणार आहोत?, अर्धएक आयुष्य जन्मदात्या शेतकरी बापाच्या सावलीत काढणाऱ्या मुलींना पुढच्या आयुष्यात शेतकरी नवऱ्याची सावली मात्र टोचत का राहते? वॉट्सअपवर, फेसबुकवर ‘दारू बनवणारे श्रीमंत, बिडी-सिगारेट बनवणारे श्रीमंत मग शेतकरी गरीब का?’ असल्या संदेशासह तोंडावर सुरकुत्या पडलेल्या शेतकऱ्याचे निष्पाप, निरागस चेहऱ्यांचे फोटो फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात शेतकरी तरुणांनी डोक्याला मुंडावळ्या बांधायचं स्वप्न बघायचं की नाही? पावसाच्या दगाबाजीनं होरपळूनही वावरात पिकाचं नंदनवन फुलवणाऱ्या शेतकऱ्याच्या संसारवेलीचं हे करपणं कधी थांबणार आहे की नाही...? की शेतकऱ्याच्या अंगणात पोरांनी बागडण्याऐवजी घरातली भांडीकुंडी आदळतच राहणार ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा