शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

बाळासाहेब, उद्धव आणि शिवसैनिक

सकाळी-सकाळीच फोन वाजला...मोबाईल स्क्रीनवर सुनील गायकवाडचं नाव दिसलं...एवढ्या सकाळी सुनील गायकवाडनं काय काम काढलं? असा विचार करत फोन उचलला...आवाज कातावलेला...सुनील गायकवाडचा आवाज नव्हताच तो...सुनील गायकवाडच्या मुलानं फोन केला होता.

नवनाथ दादा, पप्पांना सुराणा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. खूप पोटात दुखतंय म्हणून त्यांना आयसीयूत ठेवलंय...डॉक्टरांना फोन करून सांगा व्यवस्थित उपचार करायला...ठेवतो...बाय

गायकवाडच्या पोरानं एका श्वासात सांगून फोन ठेवला...सुराणा हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन केला...निवासी डॉक्टरांनी गायकवाडांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं आणि लिव्हरही काम करत नसल्याचं सांगितलं...सध्या बेशुद्ध अवस्थेत असून अशा परिस्थितीतून बाहेर येण्याचे चान्सेस कमी असल्याचंही सांगितलं...आमचे प्रयत्न चालू आहेतच...देवाकडे प्रार्थना करणं एवढंच आपण करू शकतो...

डॉक्टरांचे शब्द काळजात आरपार घुसत होते...पण कुणाला काही सांगू नका अशी डॉक्टरांनी तंबी दिल्याने गप्प बसण्यावाचून पर्याय नव्हता...

सुनील गायकवाडचं आणि माझं शेवटचं बोलणं 27 ऑगस्टला झालेलं...माझ्या वाढदिवशी...जास्त नाही पण फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सुनील गायकवाडनं फोन ठेवलेला...त्यानंतर थेट सुनील गायकवाडला रुग्णालयात दाखल केल्याचा त्याच्या मुलाचा फोन...

त्याच दिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास सुराणा हॉस्पिटलला गेलो...डॉक्टरांची परवानगी घेऊन आयसीयूत गेलो...व्हेंटिलेटरवर सुनील गायकवाडला ऑक्सिजन मास्क लाऊन झोपवलेलं...पाण्याने ओथंबलेले डोळे अर्धवट झाकलेले...हार्ट रेट मॉनिटरची टीकटीक चालूच...गायकवाड काही क्षण आपला वाटलाच नाही...का कुणास ठाऊक पण गायकवाड खूप दूरच्या प्रवासाला निघाल्यासारखा भासला...

सुनील गायकवाड तसा सरळमार्गी माणूस...बापाचं छत्र लहानपणीच हरवलेलं...आईनं मोठ्या कष्टानं मोठा केलेला...छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत पोटाची खळगी भरायचा...कधी भल्या पहाटे घरोघरी दूध टाकायचं, कधी कुठल्याशा कंपनीत नोकरी तर कधी पापड लोणची घरोघरी जाऊन विकायची...मधल्या काळात कुठल्याशा छोट्या बारमध्ये मॅनेजरची नोकरीही केली...पाठीवर पोटाचं ओझं घेऊन आयुष्य वेचणारा सुनील हल्ली जरा स्थीर झाला होता.

छोट्याशा गल्लीत वडापावची गाडी चालवत होता...आयुष्याच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून चालताना सुनीलनं शिवसेनेचा भगवा मात्र कायम खांद्यावर ठेवला...बाळासाहेबांची सभा, मग ती कोल्हापुरात असो की चंद्रपुरात किंवा मग कोकणात...स्वखर्चानं सुनील सभेच्या ठिकाणी पोहोचायचा...सुनीलनं हा शिरस्ता हाफ चड्डी घालत होता तेव्हापासून जपलेला...बाळासाहेबांच्या निधनानंतर घरातला कर्ता माणूस गेल्यासारखा सुनील ढसाढसा रडला होता...बाळासाहेबांचा फोटो पोटाशी धरून सुनीलनं हंबरडा फोडला होता...शिवसेनेनंही सुनीलला उपशाखाप्रमुख केलं होतं...

परिसरात कुणालाही कसलीही गरज लागो, सुनील धावून जायचा...कुणाच्या घरचं कुणी दवाखान्यात अॅडमीट झालं तर सुनील सर्वात आधी धाऊन जायचा...मागे एकदा एका मुस्लीम कुटुंबातील कर्ता माणूस गेला...केईएम हॉस्पिटलमधून बॉडी नगरापर्यंत आणण्याची जबाबदारी सुनीलनं कर्तव्यानं पार पाडली...त्याच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यापासून ते बॉडी गावी पाठवण्यासाठी लागणाऱ्या अॅम्ब्युलन्सची तजवीज करेपर्यंत सुनील झटत होता...

सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सुनील चेहऱ्यावर निराकार भाव घेऊन पहुडलेला पाहावतच नव्हता...सुनील अवचित क्षणी उठेल असं वाटत होतं...कधी नव्हे तो निर्विकार झालेला सुनीलचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता...कायम लांबसडक नाम ल्यायलेलं सुनीलचं कपाळ आज पहिल्यांदाच मोकळं दिसत होतं...निरभ्र वाटत होतं...सुनील गायकवाडच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर हेलकावू लागल्या होत्या...सुनीलच्या मुलांना भेटून घरी आलो तर डोळा लागेना...अनेक प्रश्नांचा आणि भावनांचा हलकल्लोळ मनात माजलेला...पहाटे पहाटे डोळा लागला...सकाळी 7 वाजताच्या सुमारास मोबाईलवर कुणाचातरी मेसेज आला...सुनील गायकवाड नो मोअर...

सामना ऑफिसला फॅक्स केला...त्यांनीही दुसऱ्या दिवशी बातमी छापली...एवढंच काय ते सुनीलला शिवसेनेनं दिलंय असं वाटलं...सुनील हॉस्पिटलमध्ये असताना दोन-एक नगरसेवकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यापलिकडे काहीही झालं नव्हतं...डोक्यात आणि मनात तांडव सुरू झालं...हातावरचं पोट असणाऱ्या
सुनीलच्या उपचाराचा खर्च कोण करणार...मोठं नाव आणि सुविधा असणाऱ्या सुराणा हॉस्पिटलचं बिल कोण भरणार..? दोघा-तिघांना फोन केला...तर संतोष नावाच्या सुनीलच्या एका जीवलग मित्रानं हॉस्पिटलची अनामत रक्कम भरल्याचं सांगितलं...तोच पुढचा खर्च करणार असल्याचंही समजलं...न राहवून सुनीलच्या मुलाला फोन केला...मी काही बोलण्याआधीच त्यानं रडायला सुरूवात केली...शब्दच सुचेनात...कोणत्या शब्दात सांत्वन करायचं काहीच कळेना...तसाच फोन ठेऊन दिला...

सुनीलचा मुलगा कुठल्यातरी नातेवाईकाकडून पैसे जमा करून रुग्णालयात भरायला गेला तर तिथल्या डॉक्टरांनी तुमचं पूर्ण बिल भरलं गेल्याचं सांगितलं. विचारणा केल्यावर समजलं की उद्धव ठाकरेंनी सुनीलच्या उपचाराचा संपूर्ण खर्च भरला होता...उद्धव ठाकरेंनी केलेली मदत विलक्षण होती...विलक्षण यासाठी की या मदतीमागे कसलीही राजकीय गणितं नव्हती...मदत करताना कसलेही ढोल बडवले गेले नव्हते...साधं सुनीलच्या बायको-मुलांनाही पैसे भरत असल्याचं कळवलं नव्हतं.

सध्याच्या राजकारणात नेते उदंड झालेत पण सामान्य कार्यकर्त्यांकडे बघायला वेळ आहे कुणाला..? डोळ्यावर गॉगल लावून, बोट उंचवणारे नेते खूप आहेत...ते कार्यकर्त्यांना आंदोलनं करायला सांगतात...आंदोलनात कार्यकर्त्यांना पोलिस मारहाण करतात...गुन्हे दाखल होतात...पोरांचं करिअर बरबाद होतं...पण नेत्यांना पाहायला वेळ आहे कुठे..? उद्धव ठाकरे मिळमिळीत वाटतील...त्यांच्या भाषणात जोश नसेल पण कार्यकर्त्यांना जोडण्याची ही किमया त्यांनी कायम जपली तर सत्ता नाही मिळाली तरी चालेल...पण कार्यकर्त्यांच्या हृदयावर मात्र त्यांची सत्ता कायम राहील यात शंका नाही...कारण एक सुनील गायकवाड गेला तरी त्याची दोन्ही मुलं शिवसेनेचं कार्य पुढं रेटतील यात शंका नाही...एक शिवसैनिक गेला पण दोन नवे शिवसैनिक उद्धव ठाकरेंनी मिळवले असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही...

सुनीलला घेऊन जाण्यामागे देवाची काही गणितं असतील...पण मोहिते-पाटील नगरातल्या लोकांच्या जीवनातून सुनीलचं वजा होणं कल्पनेच्या बाहेरचं होतं...न पटणारं होतं...नगरात लागलेल्या होर्डिंगवरच्या बाळासाहेबांच्या फोटोखाली कपाळावर भलामोठा नाम ल्यायलेला सुनीलचा फोटो आठवत राहतोय...बाळासाहेबांनी अथांग आकाशात दोन्ही हात पसरलेत आणि सुनील बाळासाहेबांकडे बघतोय अशा आशयाचं होर्डिंग नगरातल्या प्रत्येकानं पाहिलंय...होर्डिंगवर सुनील गायकवाड दिसत राहिल पण त्या होर्डिंगच्या खाली असणाऱ्या जय महाराष्ट्र वडापाव सेंटरमध्ये वडे तळताना सुनील दिसणार नाही...

सुनील, तुझ्या हातचे गरमागरम वडे आम्ही मिस करत राहू...

स्वर्गात आता तुला बाळासाहेब भेटतील, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला म्हणून आनंदात असशील...बाळासाहेबांना सांग, सर्वांना दु:खात टाकून निघून येण्याचं कसब मी तुमच्याकडूनच शिकलोय...तू कुणालाही भेटलास की जय महाराष्ट्र म्हणायचास, आता तू केलेला अखेरचा जय महाराष्ट्र आमच्या पचनी पडत नाहीय रे...

काहीतरी कर पण परत ये... कविता महाजन यांच्या कवितेचा आधार घेत एवढंच म्हणावसं वाटतं...

सुनील, तुझ्यासाठी वाजणार्‍या टाळ्या
थांबल्यानंतरही जी टाळी
शेवटानंतरही वाजत राहिली असेल
ती आमची आहे समज!

तुझं नसून असणं
स्वीकारलंय अखेर आम्ही
जय महाराष्ट्र..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा