सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

अखेर सविता लोखंडे मॅडम सापडल्या

हा लेख साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या झुंबर पुरवणीत 7 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाला, सुमारे तीन-चार वर्षांची शोधमोहीम ऐक्यमुळे थांबली...त्याचदिवशी रात्री 10 च्या सुमारास मॅडमशी फोनवरून बोलणं झालं...थँक्स ऐक्य..!

त्याचप्रमाणे सविता लोखंडे मॅडमना शोधण्यासाठी माझ्या मोहिमेत मला मदत करणारे शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, पवार सर, नलगे सर आणि इतरही सर्वांचा ऋणी आहे...

तो लेख जसाच्या तसा....




सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

त्या दिवसांत गावची शाळा लक्ष्मीआईच्या देवळात भरायची...शाळेचा वर्ग चालू असताना एखादा आगंतूक भक्त मध्येच देवळात येऊन घंटा वाजवून, देवीच्या पाया पडून जायचा तेव्हा शिक्षकांसह पोरंही सवयीप्रमाणे आपापलं काम करत राहायची...आता आहे तशी शाळेची इमारत गावाबाहेर किंवा सर्व वर्ग एकाच इमारतीत नव्हते...त्याकाळी गावच्या शाळेची दुमजली इमारत होती पण जागा कमी पडत असल्याने काही वर्ग लक्ष्मीआईच्या देवळात आणि कुणाच्यातरी भल्यामोठ्या घरात भरायचे...त्यामुळे पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि डोक्यावर टोपी घातलेल्या पोरांचे अन् पांढऱ्या-निळ्या कपड्यातल्या आणि डोक्यावर लाल रिबिनने दोन वेण्या बांधलेल्या पोरींचे थवे गावभर इथे-तिथे दिसायचे...त्यानिमित्ताने सर-मॅडमचीही गावभर रपेट व्हायची...तास सुरू होताना किंवा संपल्यावर खडूच्या रंगाने माखलेल्या हातात डस्टर आणि पुस्तक घेऊन सर-मॅडम गावातील रस्त्यांवर चालताना दिसत राहायचे...गायी-गुरं, बैलगाडी घेऊन किंवा डोक्यावर ओझं घेऊन रानात चाललेले पालक आपल्या पोरांची प्रगती सर-मॅडमला रस्त्यातच अडवून विचारत बसायचे...हल्ली चालतात तशा पालकसभा त्याकाळात अशा भररस्त्यातच चालायच्या...पोरगा बाकी विषयांत बरा आहे पण गणितात जरा कच्चा आहे असं शिक्षकांनी सांगताच ‘दणकवा त्याला, चांगला फटकवा’ हा एकमेव उपाय पालकांना तेव्हा माहित असायचा...पालक-शिक्षकांचा समन्वय आणि सुसंवाद असा भररस्त्यात लाईव्ह घडायचा...त्या सुसंवादाला हातातल्या कासऱ्याला ओढ देणाऱ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटेचं बॅकग्राऊंड म्युझिक असायचं...वर्गातल्या पोरा-पोरींचं फक्त संपूर्ण नावच नाही तर त्यांच्या घरच्या परिस्थितीचा, वातावरणाचा अंदाज शिक्षकांना असायचा...त्यामुळे विद्यार्थ्यांशी बोलताना, एखादी गोष्ट त्याला समजावून सांगताना शिक्षक बरोब्बर सांगड घालायचे...गावातून टापटिप साडीतल्या मॅडम जाताना बायका कौतुकाने बघत राहायच्या...

जिल्हा परिषदेच्या चौथीपर्यंतच्या शाळेतील सर्व विषयांना एकच गुरुजी किंवा बाई या सरकारकृत बहुउद्देशीय तत्वाला सरावलेल्या आम्हाला तेव्हा विषयागणिक वेगवेगळ्या शिक्षकांचं कोण कौतुक...पाचवीत गेल्यावर प्रत्येक तासाला वेगळा विषय, वेगळ्या विषयाला वेगळे सर किंवा मॅडम बघून आम्ही पोरं हरखून जायचो...शाळा पंचक्रोशीने स्थापन केलेली असल्यामुळे एखाददुसरा शिक्षक वगळता बहुतांश शिक्षक गावातलेच असायचे...त्यामुळे शाळेत शिकवणारे शिक्षक सुट्टीच्या दिवशी रानात बैलगाडी घेऊन जाताना दिसायचे...बाहेरगावातून शिकवायला आलेल्या सर आणि मॅडमबद्दल आम्हाला आदरमिश्रित दरारा आणि कुतुहल असायचं...त्या दिवसांतला चार्म काही वेगळाच होता...त्याच झापटलेल्या दिवसांत आम्हाला गणित शिकवायला लोखंडे मॅडम होत्या ते अजून तंतोतंत आठवतंय...माहेरची साडी पिक्चरची हवा असलेले ते दिवस...अलका कुबलनं महिला वर्गावर केलेलं गारूड अजून स्पष्ट आठवतंय...लोखंडे मॅडम दिसल्या की आम्हाला अलका कुबलची आठवण यायची...त्यांची देहबोली, चालण्याची ढब अलका कुबलसारखी हुबेहूब असायची...पहिल्या दिवशी मराठी आणि हिंदीचा तास संपल्यावर सविता लोखंडे मॅडमनी वर्गात पाय ठेवला आणि माहेरची साडी यांनीच नेसली की काय असं वाटायला लागलं...आजूबाजूच्या गावात साधं जत्रेलाही जाण्याची परवानगी नसलेल्या वयात आम्ही पोरांनी माहेरची साडी पिक्चर बघितला असण्याचा प्रश्नच नव्हता...पण माहेरची साडी पिक्चर बघितलेल्या थोरा-मोठ्या बाया-बापड्या बोलताना ऐकल्याने आमच्या काही कल्पना आम्ही मनाशीच बांधून ठेवलेल्या...लोखंडे मॅडम का कुणास ठावूक पण त्या पिक्चरशी संबंधित असतील असं आम्हा बापुड्या पोरांना वाटत राहायचं...

वर्गात आल्याआल्या सविता लोखंडे मॅडमनी रांगेत मांडी घालून बसलेल्या प्रत्येक पोराला उठवून ओळख करून घेतली आणि मग स्वत:ची ओळख करून दिली...मी सविता लोखंडे...मी साताऱ्याजवळच्या कृष्णा नगरची...आजपासून मी तुम्हाला गणित विषय शिकवणार...आयुष्यात गणिताचं मोठं महत्त्व आहे...त्यामुळे गणित शिकायलाच हवं...दुकानात गोळ्या-बिस्कीटांना किती रुपये लागतात किंवा गोळ्या-बिस्कीटं घेतल्यावर किती रुपये शिल्लक राहणार हे आपल्या माहित असायला हवं की नाही? असं सांगताना पोरं माना
हलवायचे...गणितासारखा त्या काळी अवघड वाटणारा आकडेमोडीचा विषय मॅडमनी आमच्यासमोर असा उभा केला...शिकण्याआधीच गणिताबद्दलची भीती घालवण्याचा मॅडमचा प्रयत्न होता हे नंतर-नंतर समजायला लागलं...गणितासारखा मुलांना कडू वाटणारा व्यवहारिक औषधाचा खुराक मॅडम रंजकतेच्या आणि कल्पकतेच्या मधूर मधात मिसळून पोरांना रोज देऊ लागल्या...परिणामी फक्त मराठी, चित्रकला किंवा पीटीच्या तासाला खुलणारी पोरं गणिताच्या तासालाही फुललेल्या चेहऱ्यांनी बसू लागली...शाळेतून घरी जाताना पोरं हाताच्या बोटांनी हिशेब करू लागली...लायटीच्या तारेवर बसलेल्या पक्षांची मोजदाद करू लागले...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उंडारणारी पोरं उजेड असेपर्यंत घराच्या अंगणात पोतं टाकून गणिताचा अभ्यास करायला बसू लागली...लोखंडे मॅडमनी इवल्या-इवल्या पोरांवर जादू करून टाकली होती...

हा-हा म्हणता घटक चाचणीची धामधूम सुरू झाली...हायस्कूलला आल्यावरची पहिली परीक्षा...अभ्यासावर पोरांची मुरकंड पडायची...पोरांना सर्वात जास्त काळजी गणिताची...इंग्रजीची भीती होती, पण पाचवीला फक्त एबीसीडीपर्यंतचीच तयारी असल्याने पोरांना इंग्रजीपेक्षा गणिताने छळलं होतं...पोरांच्या चेहऱ्यावरच्या तणावाच्या रेषा मॅडमनी अचूक ओळखल्या...प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून मॅडमनी पोरांची भीती कुठच्या कुठं पळवून लावली... ...पाचवीच्या वर्गातील पोरांचा निकाल भन्नाट लागला...मराठीपेक्षा गणिताच्या मार्कांचे आकडे मोठे दिसू लागले...इतर शिक्षकांसह पालकांनीही तोंडात बोटं घातली...घरच्या मंडळींनी घरातले छोटे-मोठे हिशेब छोटुकल्या पोरांच्या हाती स्वाधीन करून टाकले...दुधाचं, लाईटचं बिल बघत पोरं हाताच्या बोटांनी लिलया टोटल मारू लागायची...मॅडमच्या मार्गदर्शनाने पोरांना गणितातले आकडे दोस्त वाटू लागले आणि मॅडम सखी

पोरांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मॅडमनी पदरचे पैसे घालून चकमकी कागदात गुंडाळलेली भारी चॉकलेट वर्गातल्या पोरांना वाटली...चारआण्यात दोन मिळणारी लालचुटूक किस्मी चॉकलेट अवसंपुनवंला बघायला मिळायची...त्यात अशी भारी-भारी चॉकलेट बघून पोरांच्या आनंदाला पारावर राहायचा नाही...गणितात पडलेली मार्क बघताना पोरांच्या आनंदी चेहऱ्यांकडे मॅडम कौतुकानं बघत राहायच्या...निकाल हातात आल्यावर मॅडमनी पोरांची वर्गवारी केली...कुठल्या विद्यार्थ्याची कोणती तयारी करून घ्यायची हे निश्चित केलं...आम्ही सातवीला आलो तेव्हा माझ्यासह काही मुलांना मॅडमनी स्कॉलरशीपच्या परीक्षेला बसवायची तयारी केली...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत मॅडम सराव करून घेऊ लागल्या...त्याकाळी वाहतुकीची तुलनेनं आताइतकी साधनं नव्हती, तरीही मॅडम रात्री साडेआठच्या शेवट्या एसटीने सातारला जायच्या...सकाळी पुन्हा आठ वाजता मॅडम शाळेत हजर...स्कालरशीपच्या परीक्षेला कोरेगावला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं...परीक्षेच्या दिवशी माझ्यासह दोन-तीन मुलांकडे पैसे नसल्याचं कळल्यावर मॅडमनी पर्समधून वीस-वीस रुपयांच्या नोटा आमच्या हातात ठेवलेल्या स्पष्ट आठवतायत...सातवीला माझा वर्गात पहिला नंबर आला...मॅडमनी डोक्यावरून हात फिरवला...प्रगतीपुस्तकावर मिळालेल्या मार्कांवर मॅडमच्या परिश्रमाचं तोरण होतं...होणारं कौतुक आधी गणंग म्हणून हिणवल्या गेलेल्या माझ्यासारख्याला  आवरता येत नव्हतं...डोळ्यातल्या अश्रूंचा एक थेंब मॅडमच्या हातावर पडला आणि मॅडमनी लगबगीनं मला जवळ घेत डोळे पुसून काढले...मॅडमनी पर्समधून एक पेन काढून हातात ठेवला तसा मी विजेच्या वेगाने वाकून मॅडमच्या पायाला हात लावला...

उन्हाळ्याची सुट्टी लागली...शाळा भकास वाटू लागली...रोज दिसणाऱ्या मॅडमची ताटातूट झाल्यासारखं पोरांना वाटायला लागलं...गणिताचे आकडे निराधार दिसू लागले...शाळा सुरू व्हायला आठवडा उरला असतानाच मला शिक्षणासाठी मुंबईला नेण्याचं ठरलं...माझा विरोध मोडून काढत घरच्यांनी जवळजवळ फरफटतच मुंबईला नेलं...गावची शाळा सुटली...मॅडमच्या शिकवण्याची संस्काराच्या नाजूक फुलांची पखरण माझ्यापुरती थांबली...पुढं कधीतरी उन्हाळी-दिवाळीच्या सुट्टीला गावी आल्यावर मॅडमची बदली झाल्याचं कळलं...बालपणाच्या नाजूक शेतातल्या निरागस तळ्यात प्रतिबिंब उमटवणारा ध्रुव तारा निखळल्यासारखं वाटलं...माझ्या आभाळातून निखळलेला तो तारा आता कुणाच्यातरी डोक्यावरच्या आकाशात नक्कीच तळपत असेल याची पक्की खात्रीय मला...मॅडम पोरांच्या आयुष्यात एक दंतकथा बनू राहिल्या...माझ्यासकट...

आता त्या दंतकथेला तब्बल पंचवीसएक वर्ष झाली...मागच्या वर्षी शाळेतल्या रिटायर्ड झालेल्या इतर शिक्षकांशी चर्चा करून मॅडमला शोधण्याचा प्रयत्न केला...मॅडमचे वडील साताऱ्यातल्या पाटबंधारे खात्यात नोकरीला होते...पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी वसाहतीत चौकशी केली...धो-धो पावसात चौकशीची मोहीम चालू असताना मॅडमचा तपास काही लागलाच नाही...दिवसभर भर पावसात वणव्यासारखा फिरत राहिलो...मॅडमचा मागमूस काही लागलाच नाही...पावसात पूर्ण अंग भिजलेलं असताना कोरड्या मनाने हताशपणे माघारी फिरलो...बॉम्बे रेस्टॉरंटजवळच्या पुलाखालून दुचाकी वळवताना गाडी स्लीप झाली...हाताचं हाड मोडलं, दोन-चार टाके पडले...हात बरा झालाय आता, पण एव्हाना आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय...मॅडमला अजून शोधू शकलेलो नाही...कुणी सांगेल का, माननीय सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा