शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

जिव्हाळा तितुका मेळवावा...शेजारधर्म वाढवावा...

इडा पिडा टळो, आजाराचा डोंगर जळो..ssss हाताची बोटं कडाकडा मोडत शेजारची बायजाबाई भाकरीचा घास पोराच्या तोंडासमोर खाली वर करत राहते...पातळाच्या पदराला गाठी मारून ठेवलेल्या दोनतीन वाळक्या लाल मिरच्या काढून भाकरीचा घास मुठीत धरून चुलीत फेकल्याबरोबर तडातडा आवाज आल्यासरशी बायजाबाईचा चेहरा खुलला...’कुणाची तरी नजर लागलीवती जणू पोराला, काजाळ लावत जा गं बाय रोज त्याला...’ असं पोराच्या आईला बजावत बायजाबाई पोराला मांडीवर घेऊन कुरवाळत राहिली...बायजाबाईच्या पदराखाली तोंड झाकलेल्या इवल्याशा पोराला तरतरी आल्यासारखं झालं...भाकरीचा घास, मिरच्यांनी असर केला नव्हताच...इतक्या मायेनं शेजारी राहणारी बायजाबाई आपल्यावर प्रेम करतेय या भावनेनंच पोराला बळ आलेलं...दहा-बारा वर्षाच्या पोराची जडणघडण जन्मदात्या आई-बापाच्या सावलीत झाली असली तरी शेजारी राहणाऱ्या बायजाबाईनं दिलेले सुखाचे क्षण पोरगं विसरू शकत नव्हतं...चाळीस-पन्नाशीचं वय गाठलेल्या बायजाबाईनं दिलेल्या मायेच्या संचितानं पोरगं भरून पावलेलं असतं...पोटच्या पोरासाठी बाजारातून काहीबाही आणताना आपल्यासाठीही बायजाबाईनं आणलेला खुळखुळा पोरगं विसरू शकत नसतं...शेजारच्या बायजाबाईनं घरात काही गोडधोड केलं तर त्याचा वास घरात येण्याआधी तामानात पदार्थ पुढ्यात आलेला पोराला आठवत राहतो...मागच्या जन्माचं काहीतरी नातं असल्यासारखं बायजाबाई शेजाऱ्याच्या पोराला जीव लावत राहते...

कधीतरी शाळेतून घरी येताना ठेच लागून रक्ताळलेला अंगठा वर धरत लंगडत आलेलं पोरगं पाहून धावत येणाऱ्या जन्मदात्या आईमागोमाग हळदीची वाटी घेऊन लगबगीनं धावलेली बायजाबाय डोळ्यांसमोर दिसत राहते जशीच्या तशी...रक्तावर माती चिकटून मळलेला अंगठा साफ करून त्यावर बायजाबाय मोठ्या मायेनं फुंकर घालत राहते....मोठ्या बहिणीच्या लग्नावेळी घरातल्यांबरोबर समरसून गेलेल्या बायजाबाईची धावपळ अजून आठवते...नांदायला जाताना लग्नात शेजारच्या बायजाबाईनं घेतलेली साडी पाहताना हरखून गेलेल्या मोठ्या बहिणीचा आनंद आयुष्यभर पुरेल असा असतो...बायजाबाईलाही एक पोरगं अन् एक पोरगी आहेच की...बायजाबाईचं पोरगं शिक्षण, लग्न होऊन एव्हाना शहरात स्थिरही झालेलं असतं...लग्न होऊन सासरी रमलेली पोरगी अन् बायकापोरांसोबत संसारात मिसळलेलं पोरगं सणासुदीला बायजाबाईला भेटायला येतं तेव्हा स्वत:च्या आईसाठी आणलेल्या थैल्यांपैकी एखादी थैली आपल्या हक्काची असणार याची सवय पोराला झालेली असतेच...आई मोठ्या बहिणीकडे शहराकडे जाताना रानातून आणलेली भाजी पिशवीत भरून देताना
बायजाबाई कृतार्थ होत राहते...शहरात राहणारी शेजाऱ्याची पोरगी बायजाबाईला परकी वाटत नसतेच...आईसुद्धा पोरीला भेटून येताना बायजाबाईसाठी काहीतरी नक्कीच न विसरता आणतेच...आई-बापाला लिहलेल्या पत्रात बहिण आमच्या घरातल्यांसोबत बायजाबाईची खुशाली हमखास विचारतेच...बायजाबाईचा मालक मुंबईवरून येताना घरातल्यांबरोबर शेजारच्या घरातील सर्वांसाठी काहीतरी आणतोच...पोराचा बापसुद्धा रानातून घरी येताना उगाच कोथिंबिरीची एखादी जुडी, मेथीची भाजी, भेंडी-गवारीची उपणी शेजाऱ्यांच्या दारात उभं राहून निगुतीनं देत राहतो...

पोरगं परीक्षेला जाताना आईनं हातावर दिलेली दही-साखर जशी आठवत राहते तशीच बायजाबाईनं डोक्यावर मायेचा हात ठेवून दिलेला आशीर्वादही पोरगं विसरू शकत नसतं...निकालादिवशी पास झाल्यावर प्रगतीपुस्तक घेऊन आल्याबरोबर दारात काहीबाही निवडत बसलेली बायजाबाई धावत येऊन मोठ्या आनंदानं पोराला कवटाळत राहते...

मित्रहो, वर लिहिलेला फक्त आणि फक्त कल्पनाविलास आहे...अशा बायजाबाई आता कुठं असतील की नाही माहित नाही, पण हे खोटं मात्र वाटत नाही...थोडी चौकशी करा, मग आपल्या घराशेजारी अशा बायजाबाई होऊन गेल्या असतील हे कळेल...आपल्या घरावर जीव लावणाऱ्या बायजाबाईच्या खाणाखुणा याच मातीत आपल्याला आढळतील...शेजारधर्माची स्थापना याच बायजाबाईंसारख्या शेजाऱ्यांनी केलेली आहे...तुमचा धर्म कुठचा का असेना, तुमची जात कुठची का असेना, पण या शेजारधर्माची उपासना आपल्याआधी कितीतरी पिढ्यांनी केलेली असते...अखंड मानवजातीच्या कल्याणाची धुरा आपण सांभाळू शकू की नाही माहीत नाही, पण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या आवाक्यातल्या माणसांना जीव लावण्याचं माणूसपण मात्र आपण नक्कीच जतन करू शकतो...हेच सूत्र कालातीत चालत आलेला शेजारधर्म सांगतो...

शेजार हा असा धर्म आहे, ज्याचा धर्मग्रंथ नाही, त्याचा कुठला विधी नाही की ना त्याचा उपास-तापास...एकमेकांच्या सुखदु:खात मिसळून जाण्याचा हा अविरत, अखंड सोहळा माणसाचं जीवन फुलवत राहतो...बायबल, गीता, कुराणाच्या पल्याड नेऊन ठेवणारा हा शेजारधर्म आता आटत चाललाय का? फोकनाड आत्मप्रौढीपणाच्या मृगजळी झालरी पांघरून माणूस आकसत चाललाय का? आता कोण कुणाच्या दारात जाताना कमीपणाची भावना उराशी का कवटाळत राहतोय? माणसाचं जगणं आतून बाहेरून ओलावणाऱ्या शेजाऱ्यांबद्दलच्या भावना कोरड्याठाक होऊ का पाहतायत? आनंद वाटल्यानं वाढतो, अगदी तसंच दु:ख वाटल्यानं कमी होतं हाच शेजारधर्माचा गाभा आहे...नोकरी-प्रपंचाच्या धावपळीत माणूस चोहोबाजूनं वेढला गेला आहेच, पण तो चारी बाजूनं वेढलेल्या पण एकाकी बेटासारखा होऊन बसलाय...जखमेवर फुंकर घालणारी घरातली मंडळीच दुरावत चालली असताना शेजाऱ्यांकडून मिळणारा धीर आता कुठल्या बाजारात किंवा कुठल्या मॉलमध्ये मिळणार? आयुष्य सुखकर बनवणारा रस्ता आपला आपण नक्कीच बनवू पण त्या रस्त्यावर चालताना होलपडल्यावर सावरायला किंवा धावण्याचा धीर द्यायला शेजाऱ्याचा हात खांद्यावर तर पडायला हवा की नाही?

म्हणूनच आता जिव्हाळा तितुका मेळवूया...शेजारधर्म वाढवूया...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा