सोमवार, २७ एप्रिल, २०१५

आता बिनरंगांचा टीव्ही येणार?



सीता राम चरित पति पावन, मधुर सरस...रविवारी सकाळी रामायणाचं गाणं लागलं की घरात, वाड्यापुढं, परड्यात, पांदीत कुठंही असलं की सगळं सोडून कोंडीराम बापूंच्या घराकडं पावलं पळत सुटायची...रामायणाचं गाणं कानावर पडलं की आठवड्यात शेशंभर गोट्यांचे डाव खेळून जमवलेल्या गोट्या डावात तशाच सोडून टीव्हीकडं पळत जाऊ वाटायचं...सूरपारंब्या खेळताना झाडावरून धपाधप उड्या पडायच्या, रामायण बघायला जाण्यासाठी घाई करताना परड्यात शेण काढणाऱ्या बायांना हात धुण्याचंही भान राहायचं नाही, तशाच शेणभरल्या हातांनी अख्खं रामायण पाहिलं जायचं...

रविवारी सकाळी पांदीशेजारच्या पांडू न्हाव्याकडे केस-दाढी करायला गर्दी जमायची, पण रामायण सुरू झालं की पांडू न्हावी गुडघ्यावर हात ठेऊन बसायचे...कपाळाच्या वरच्या भागात चार बोटांएवढ्या जागेत केस ठेऊन बाकी चकोट केलेली पोरं वस्तारा बाजूला सारत कोंडीराम बापूंच्या घराकडे धावायची...खाक्या चड्डीला लाल, पिवळ्या, काळ्या, निळ्या, जांभळ्या किंवा ओळखता येणार नाहीत अशा रंगाची ठिगळं लावलेली असायची...ठिगळ नसेलच तर पोठीमागे दोन डोबळे असलेल्या चड्ड्या करगुट्याला आवळलेल्या असायच्या...करगुटा ढिला असल्याने कुणीकुणी गळणारी चड्डी सांभाळत कोंडीराम बापूंच्या घराच्या पायऱ्या चढायचा...नाकातून गळणारा हिरवट-पिवळाधमक शेंबूड पुसल्याने ढोपरांवर पांढरट चट्टे उमटलेले असायचे...दर रविवारी कोंडीराम बापूंच्या घरात जत्रा भरायची नुसती...कोंडीराम बापूंच्या घरातलेही आढेवेढे न घेता पोरांना रामायण बघू द्यायचे...आजही गावात रामायणाचे संस्कार झालेले अनेकजण कोंडीराम बापूंच्या घरात बघितलेलं रामायण विसरू शकत नाहीत...कारण गावात त्याकाळी एकच टीव्ही...

नंतर नंतर टीव्हीवरच्या इतरही कार्यक्रमांची गोडी वाढू लागली...छायागीत, चित्रहार, गोट्या, चंद्रकांता, महाभारत, शक्तिमान असे एक ना अनेक कार्यक्रम बघायला झुंबड उडू लागली...बसायला जागा मिळावी म्हणून काहीजण आधीच कोंडीराम बापूंच्या घराजवळ घुटमळत राहायचे...शाळेसमोरच्या पडवीवर, समोरच्या विहिरीच्या कट्ट्यावर पोरं-बाप्ये घिरट्या घालू लागायचे...कार्यक्रम लागला रे लागला की पोरंटोरं मोठ्या माणसांवानी अन् मोठी माणसं पोराटोरांवानी धावत सुटायचे...जात-धर्म-लहान-थोर अशा सगळ्या भेदांपलिकडे जाऊन टीव्ही बघण्याचा सोहळा कोंडीराम बापूंच्या घरात
रंगायचा...कामंधामं सोडून लोकं तासभर रामायणात घुसायचे...त्यात कधी खंड नाही पडायचा...अगदीच रविवार गाठून एखादा पुचाकला तरच लोकं रामायण सोडून माती द्यायला जायचे...टीव्हीत राम  झालेले अरुण गोविल आणि सीता झालेली दीपिका एव्हाना घराघरातल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाले होते...श्रीकृष्ण झालेले नितीश भारद्वाज पोरांच्या वह्यांवर, कंपासपेटीवर सुदर्शनचक्र फिरवत राहिलेले असायचे...हनुमान झालेले दारासिंग तर पेनावर डोंगर करंगळीने उचलून उडत राहायचे...

टीव्हीचा काळ तोपर्यंत यायचा बाकी होता...देशात टीव्ही आला होता पण खेडोपाडी टीव्ही म्हणजे मिरवणूक काढून आणायची गोष्ट असायची...एखाद्याच्यात टीव्ही आणलाच तर शेजारपाजारच्या किंवा भावकीतल्या सुवासिनींना बोलवून पूजा-अर्चा केली जायची...हळद-कुंकू लावलेल्या टीव्हीपुढे उदबत्तीचा दरवळ पसरत राहायचा...टीव्ही आणि रामायणाची ओळख एकाचवेळी झालेली आमची पिढी टीव्ही म्हटलं की अजूनही रामायणाचीच आठवण काढते...ज्या घरात टीव्ही आणलाय त्या घरातल्या पोराला वेगळीच इज्जत मिळायची...वर्गात सर्वात पुढे बसायला जागा देण्यापासून ते गोट्या खेळतानाही त्याला विशेष सवलत असायची...लपाछपी खेळताना त्याच्यावर राज्य आलं तरी त्याला सन्मानानं पोरं आपणहून सापडून घ्यायची...लपल्याचं केवळ नाटक करत तो शोधायला आला की त्याच्या स्वाधीन व्हायची...

आ बलमा नदिया किनारे..किंवा तू मुझे कुबुल, मै तुझे कुबुल, खुदा गवाहवगैरे गाणी लोकांच्या ओठावर यायला लागली...कपिल देव, संदीप पाटीलसारख्या खेळाडू मंडळींची खेळी फक्त रेडिओवरून ऐकलेले लोक त्यांना याचि देही-याचि डोळा पाहू लागले...निरमा पावडरच्या पुड्यावरील पोरीचं झुबकेदार फ्रॉक घालायची स्वप्न पोरसवदा पोरी पाहू लागायच्या...पारले-जीच्या पुड्यावरच्या पोराचं बाळसं, त्याचा गुटगुटीतपणा आपल्या पोराला यावा म्हणून आया पोटच्या बाळांना डबल रतीब घालू लागल्या...बातम्या सांगणारे प्रदीप भिडे तर लोकांच्या प्रतीक्षेचा केंद्रबिंदू झाले...बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हे गाणं लोक सायकलवरून फिरताना किंवा बैलगाडीतून शेतात जातानाही गुणगुणत राहायचे...मिले सूर मेरा तुम्हाराची धून लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवायचा आग्रह धरायचे...ऐन लग्नाची तारीख गाठून कुणी देवाघरी गेलं तर पोस्टपॉंड झालेल्या लग्नाची तुलना लोक टीव्हीवरच्या व्यत्यय आल्यावर दिसणाऱ्या उभ्या रंगीत पट्ट्यांशी करायचे...आधी ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर टीव्ही लोकांच्या मनात घर करत राहिला...आवडीच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली की लोकं वीज बोर्डाच्या नावानं बोटं मोडायचे...लाईट येईपर्यंत बंद टीव्हीकडे बघत राहायचे...बंद टीव्ही बघताना आपलं कुणीतरी कामाधंद्याला शहरात जाताना होणारं दु:ख लोकांच्या डोळ्यांत दिसायचं...

आता जसा टीव्ही शोकेसमध्ये किंवा भिंतीवर टांगलेला दिसतो तसा तेव्हा नसायचा...जुना बॅलर, पाण्याची मोठी टाकी किंवा अगदीच पुढारलेलं घर असेल तर लाकडी टेबल असला की टीव्ही त्यावर सुखाने नांदायची...घरात गणपती आले की गणपतीएवढंच टीव्हीपुढे लोक बसायचे...टीव्हीनं जग हे असं लोकांच्या घरात आणि मनात आणून ठेवलं...अमेरिकेत क्षेपणास्त्राच्या घेतलेल्या चाचणीचा धूर सरळ लोकांच्या घरात दिसू लागला...क्राऊनचा लाकडी सेटरवाला टीव्ही अजूनही अनेकांच्या मनात रुंजी घालतो...चॅनल एकच तोही दूरदर्शन, तरीही चॅनल बदलण्यासाठी टीव्हीवर असलेल्या गोल खटक्यासदृष बटनाकडे लोक कौतुकाने बघायचे...

आता आता तर घराघरात टीव्ही आलेत...रेडिओनं गावतल्या नाटकांचा, तमाशांचा, पार्ट्यांचा आणि पंचमीला वगैरे होणाऱ्या झिम्मा फुगड्यांचा गळा आवळला, नंतर टीव्हीनं रेडिओच्या गळ्याला नख लावलं...आता एलसीडी किंवा एलईडीनं टीव्हीचं शरीर मानेवेगळं केलं...

गेल्या आठवड्यात घरातली लाईट टीव्ही चालू असताना गेली...परत लाईट आली पण टीव्ही काही चालू होईना...दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला पण ट्यूब गेल्याचं कळल्यावर नाद सोडून दिला...दोन-चार दिवसावर अक्षय्य तृतीया आहे, तेव्हाच टीव्ही आणू असं ठरवलं...बंद टीव्ही कपाटात तसाच पडून होता...मृतदेहासारखा...कुणी त्याच्याकडे बघत नव्हतं की कुणाचं काही बिघडत नव्हतं...लहानपणी लाईट गेल्यावरही टीव्हीकडं बघत बसतानाची हूरहूर जाणवलीच नाही अजिबात...बायको-पोरांना आणि मलाही..!

अक्षय्य तृतीयेला एलईडी स्मार्ट घेऊन कंपनीचा माणूस आला...त्यानं एलईडी सेट केला, चहा घेतला आणि गेला...चेक करायचं म्हणून चालू केला...पण लहानपणी लाईट आल्यावर सुखावणारं मन ढिम्मच...थोड्या वेळानं पोरं शाळेतनं आली...त्यांना सरप्राईजच्या सुरात म्हटलं, बाळांनो आपल्या घरात एलईडी आणलाय...पोरांनी कपडे बदलत फक्त कटाक्ष टाकला...आणि आम्ही खेळायला खाली जाऊ का? म्हणायला लागली...एक वाजता आलो की निक चॅनलवरचा मोटू-पतलू बघताना एलईडी बघू म्हणत बॅट उचलून खाली गेलीही...

टीव्हीबाबतचा चार्म संपलाय, मित्रहो...दुनिया गोल है...एक वह दौर था, आज यह दौर है...कल न जाने क्या होगा...रंगीत टीव्ही, एलईडी आले पण जीवनातला रंग भावनाशून्यतेने फिका पडलाय...जग जवळ आलंय पण शेजारी बसलेले जवळचे दूर गेलेत...टीव्ही दबक्या पावलाने घरात घुसला तेव्हा जीवनात रंगांची उधळण झाली...सात रंगांपेक्षा भलेथोरले रंग टीव्हीनं जीवनात भरले...आता पुढच्या काळात कोणते रंग दाखवणारा टीव्ही जन्माला येणार आहे कुणास ठावूक ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा