सोमवार, २७ एप्रिल, २०१५

मातीत रुजलेला आप्पा


शहराच्या पायथ्याशी वसलेली वस्ती गारठून पहाटेच्या समयी अतोनात शांत पहुडलेली असताना, रात्रभर क्याव-क्याव करत कोकलणारी कुत्री थकून एव्हाना आडोशाला तंतोतंत पसरलेली असतात...भल्या पहाटे एका छोट्या घरातून भांड्याकुंड्यांचा आवाज येत राहतो...रात्रभर कुरतडण्याचा खानदानी आणि जन्मजात व्यवसाय करणाऱ्या उंदीर, घुशींच्या कामकाजात आवाजानं खंड पडलेला असतोच...रात्रीचं जेवन-खाणं उरकून सामसूम झालेल्या घरात झोपाझोपी झाल्यावर लागलीच कामाला लागून सकाळी उजाडेपर्यंत अव्याहत उकीर काढणारी घुशी-उंदीर मंडळी आज जरा कावरी-बावरी होतात...पहाटेच घरात हालचाल सुरू झाल्याने घर सोडून पळ काढत कुठंतरी बनवलेल्या बिळात विसावतात...आप्पा सुट्टीवर आला की दररोज सूर्य उगवल्यावर जागं होणारं घर पहाटेच अंग झडझडून उभं राहतं...

मिलिटरीत सेवा करणारा आप्पा सुट्टीवर आला की पहाटेच्या कोवळ्या अंधारातच बायको-पोरांच्या दिवसाला सुरुवात होते...आप्पा सोडून बाकी सगळे चारच्या ठोक्याला उठून बसतात...त्याआधीच उठून अंघोळ वगैरे उरकून आप्पाची पोरांना उठवण्याची लगबग सुरू झालेली असते...दोन पोरींची अंघोळ झालेली असतेच...इवलासा पोरगा अंथरुनात लोळत पडलेला असतो...आप्पा त्याला तसा उचलून थेट बाथरुममध्ये पोहोचवतो...गार पाण्याची बादली अंगावर उपडी केल्यावर पोरगं भोकाड पसरतं...अंग पुसून कपडे घालण्याची बायकोची घाई उडते...थरथरत्या अंगानं पोरगं आईच्या कुशीत शिरतं...तोपर्यंत इकडं आप्पानं किचनचा ताबा घेतलेला असतो...गरमागरम पोह्याची डिश बायको-पोरांच्या पुढ्यात येऊन विसावते...पोहे संपत आल्यावर चमचांचा डिशला थडकण्याचा आवाज वाढत असतानाच आप्पा बायकोसाठी वाफाळलेला चहा आणि पोरांना ग्लासातून दूध आणून ठेवतो...भल्या पहाटे शहर झोपलेलं असताना आप्पाच्या घरात धांदल उडालेली असते...दोन मोठ्या पोरींना पुढं बसवून, छोट्या पोराला मांडीवर घेऊन बायकोला मागे बसवून आप्पानं दुचाकीची कीक मारलेली असते...पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून आप्पाची सहकुटुंब सहल सुरू झालेली असते...फटाटायला लागण्याच्या सुमारास आप्पा कुटुंबकबिल्याला घेऊन जवळच्या डोंगरावर डेरेदाखल झालेला असतो...डोंगराच्या एका कड्यावर बसून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारी दहाबारा गावं बघताना पोरं हरखून गेलेली असतात...गावांतील घरांच्या अंगणात शिलगावलेल्या चुलींतून आकाशाकडे झेपावणाऱ्या धुरांड्या आप्पाची बायको न्याहाळत राहते...

काय हा वेडेपणा, इतक्या सकाळी असं कुणी डोंगरावर येतं का?’ बायकोच्या रागभऱ्या अल्लड प्रश्नावर आप्पा फक्त गालातल्या गालात मिश्किलपणे हसत राहतो...अगं, गावात उभं राहून डोंगर तर आपण रोजच बघतो, पण डोंगरावरनं गावाकडे बघायचा आनंद वेगळाच, या पोरांना शाळेतल्या पुस्तकात गाव दिसेल, डोंगर दिसेल पण सकाळच्यापारी कूस बदलणारी गावं डोंगरावरून कशी दिसतात हे पोरांना
कोण दाखवणार?’ पिशवीतल्या चिवड्या-फरसाणाच्या पिशव्या काढत आप्पानं बायकोच्या प्रश्नाला प्रश्नानंच उत्तर दिलेलं असतं...निरुत्तर होत आप्पाची बायको आप्पाच्या मांडीवर विसावत डोंगरावर उभारलेल्या पवनचक्क्यांच्या फिरणाऱ्या पंख्याकडे पाहात राहते...कानात जबरदस्तीनं घुसू पाहणारा पवनचक्कीचा आवाज आक्रमक होऊन गेलेला असतो...रात्रीच्या थंडीत कुठंतरी वस्तीला गेलेले पक्षी एकेक करत डोंगरावर जमू लागतात...पक्षांसाठी ज्वारी-बाजरीचे दाणे भिरकावताना आप्पाच्या डोळ्यांतून समाधान पाझरत राहतं...

अवली म्हणून गावात अन् गावाबाहेर आप्पाची ओळख...15-16 वर्षांपूर्वी मिलिटरीत भरती झालेला आप्पा सुट्टीला गावी आला की त्याचे उद्योग जोमाने सुरू होतात...गावात कुठंही साप निघाला की आप्पाला बोलावणं ठरलेलंच...आप्पा थेट अडगळीत हात घालून सापाला अलगद बाहेर काढून लांब रानात सोडून देतो...नागासारखे अट्टल विखारी पसाप पकडून आप्पानं लोकांची भीती घालवलेली असते...कौटुंबिक वादात आप्पाच्या वाट्याला शेतीचा तुकडाही आलेला नसताना आप्पा असा रानावनात रमत राहतो...मित्राच्या शेतीत मित्रापेक्षा उत्साहानं कष्ट करत राहतो...प्राण्यांवर तर आप्पाचं जीवापाड प्रेम...गावात राहायचा तेव्हा मांजर, कुत्री आप्पाच्या अवतीभवती घुटमळत राहायची...रात्री अंगणात झोपताना आप्पाच्या डाव्या-उजव्या बाजूंना कुत्री-मांजरांची मुरकंड पडलेली असायची...जेवायला बसल्यावर आप्पा स्वत:च्या तोंडात घास घालण्याआधी ताटातला एकेक तुकडा कुत्र्या-मांजरांना टाकत राहायचा...आप्पा सुट्टीवर आला की त्यांची चंगळच व्हायची...कुणाबुनाच्यातनं आप्पासाठी आणलेलं दूध आप्पा सढळहस्ते मांजरांना वाटी-वाटीनं दिवसभर पाजत राहायचा...घराच्या अंगणात आप्पानं लावलेली वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांची झाडं अजून डोलारत उभी आहेत...एकदा सुट्टीवरनं आल्यावर हाडकेली कुत्री-मांजरं बघून आप्पा व्याकूळ झाला...कुत्र्या-मांजराला अलगद उचलून लांबवर सोडून आला...आता आप्पा कुत्री मांजरं सांभाळत नाही, पण गावातल्या कुणाच्याही कुत्र्यांना जाताजाता बिस्किटं टाकत राहतो...

आप्पाचं एव्हाना लग्न झालंय...दोन पोरी, एक पोरगा जन्माला आला....आता आप्पानं संसारात मनापासून रमावं असं घरच्यांना वाटू लागलं, पण आप्पाचा छंद काही थांबेना...आप्पाच्या उचापती पाहून त्याच्या घरच्यांनी भलतंच टेन्शन घेतलं आणि आप्पाची रवानगी थेट साताऱ्यात केली...आप्पा आता बायको-पोरांसह साताऱ्यात राहतो...पंधरा-वीस दिवसांच्या सुट्टीवर आलाच तर एखाद्या दिवशीच गावाकडे फिरकण्याची परवानगी...पण मिळालेल्या एखाद्या दिवसातही आप्पानं दारात लावलेल्या झाडांची छाटणी, खुरपणी केलेली असतेच...झाडांच्या बुंध्याशी साचलेला पालापाचोळा काढून त्यांना पाणी घालूनच आप्पा संध्याकाळी साताऱ्याकडे निघतो...साताऱ्यात पोहोचल्यावरही शांत बसेल तो आप्पा कसला...आप्पा सुट्टीवर आला की त्याच्या बायकोला किचनमध्ये नो एन्ट्री, नाष्टा, जेवण बनवण्यापासून भांडीकुंडी घासण्यापर्यंतची सारी कामं आप्पा एकहाती करत राहतो...आप्पाची सुट्टी संपेपर्यंत त्याच्या बायकोला सारं काही जागेवर मिळतं...मागे एकदोनदा त्याच्याकडे जाणं झालं तेव्हा त्यानेच बनवलेलं जेवण चाखायला मिळालं...झाडा-झुडपांची-प्राण्यांची सेवा करणाऱ्या हातांना वेगळीच चव बहाल झालेली जाणवलं...

गेल्या उन्हाळ्यात गावी गेलो तेव्हा आप्पा सुट्टीवर होता....भेटायला आप्पाच्या घरी गेलो तर आप्पानं सकाळीच घर सोडलेलं...दोन-तीन दिवसापासून आप्पा सकाळी बाहेर पडून रात्री उशिरा घरी येत असल्याचं समजलं...आप्पाला फोन केला तर आप्पा म्हणे मी खटावला आलोय...कशासाठी गेलास असं विचारलं तर म्हणाला दुष्काळ पाहायला...आप्पाचं उत्तर ऐकलं अन् डोकं भनकलं...लोकं पाण्यासाठी वणवण करत असताना, हाडकलेली गुरं-ढोरं चाऱ्या-पाण्याविना तडफडत चाराछावणीत धापा टाकत असताना पर्यटनाला म्हणून आप्पा तिकडं कसं जाऊ शकतो?, मित्राला सोबत घेऊन आप्पाचा माग काढला तर एका धूळभरल्या माळरानातल्या छावणीत आप्पा कसलीशी गवताची ओझी वाहताना दिसला...वासरांच्या, गायींच्या अंगावरून हात फिरवत आप्पा गवताचा एकेक घास भरवताना दिसला...आतल्याआत गलबलून गेलो...एसी ऑफिसमध्ये बसून दुष्काळाच्या कर्मकहाण्याच्या बातम्या लोकांना दाखवून मनावर जमलेली समाधानाची तथाकथित कवचकुंडलं गळून पडली...आप्पाला आम्ही दिसलो पण आप्पा गुराढोरांच्या सेवेत इतका रमला होता की आमच्याशी बोलायचीही उसंत त्याच्याकडे नव्हती...आप्पाच्या खांद्याला कायम अडकवलेली बॅग धुळीनं माखून अनाथासारखी पडली होती...बॅग उघडून पाहिली तर त्यात घोटीव लाकडाची लगोरी, गोट्या, छोट्या-छोट्या पिशव्यात गुंडाळलेल्या कसल्या-कसल्या झाडांच्या बिया, छोटी-छोटी रोपं आणि कलम करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या झाडांच्या फांद्या सापडल्या...

ज्या मातीत शेतकरी राबतो त्या मातीतच आप्पाची मूळं रोवलेली दिसली...कातावलेल्या शेतकऱ्याचे सुरकुतलेले चेहरे आम्हा शहरातल्या कोरड्या लोकांना फोटोजेनिक वाटतात...पण हळूवार वाऱ्याची झुळूक टाकून त्या सुरकुत्या फुलवणारा आप्पा शेतकऱ्याचा खरा दोस्त वाटला...रणरणत्या उन्हात सावली पाहून वस्तीला आलेल्या पक्षांचा चिवचिवाट सुरूच होता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा