बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

कमीतलं घर



लग्नाचा डामडौल सुरू असताना एव्हाना नवरा श्रीवंदनाहून वाजत गाजत हॉलमध्ये प्रवेश करतो...हॉलभर नुसती धांदल उडालेली असते...पाव्हण्या-रावळ्याच्या मुली सजून मिरवत राहतात...नवरदेवाची मित्रमंडळी किंवा नातलगांची वयात आलेली पोरं डोक्याला फेटे बांधून रुबाबात ये-जा करत राहतात...श्रीवंदनावेळी नवरदेवाच्या घोड्यापुढे किंवा मागे नाचताना हललेले फेटे सावरत घाम पुसून मोबाईलवर वेगवेगळ्या पोजचे फोटो काढले जातात...यातल्याच एखाद्या वयात आलेल्या मुलाला हॉलमधली एखादी पोरगी आवडलेली असते...तिच्याकडे बघत आयुष्याची सोबतीन म्हणून चित्र रंगवलं जातं...
एखाद्या पोक्त बाईकडे किंवा बाप्याकडे मुलीबद्दलची चौकशी दबकत-दबकत केली जाते...इतक्यात कुणीतरी डोक्यावर हात मारत, दाताखाली जीभ चावत आरं, पोरगी हाय चांगली दिसायला-वागायला, शिक्षाणबी चांगलं झालंय, पर कमीतल्या घरातली हाय...आपलं आन त्यांचं नाय जमायचं...असं म्हणतं आणि पोरगं डोक्यावर हात मारून हिरमुसल्या तोंडानं हॉलचा कोपरा धरून बसतं...लग्नाचा अख्खा सोहळा उतरल्या तोंडानं बघत राहतं...

गावागावत अशी कमीतलं घर म्हणून हिनवली गेलेली कित्येक घरं आहेत...अशा घरांशी सोयरिक करायला कुणी धजावत नाही...अशा घरातल्या मुला-मुलींची लग्न लावताना तशाच कमीतल्या घराच्या मुला-मुलींची निवड केली जाते...चुकून जर एखाद्या घराची अशा कमीतल्या घराशी सोयरिक झालीच तर ते घरंही कमीतलं घर म्हणून गणलं जातं...अशा कमीतल्या घराशी खाण्यापिण्याचे, उठण्याबसण्याचे व्यवहार होतात मात्र लग्नाच्या विषयात मात्र अशा घरांना लांब ठेवलं जातं...पैशापाण्याचे आणि रोटीचे व्यवहार होतात, मात्र बेटीचा व्यवहार करताना साळसूदपणाचा आव आणत नाकं मुरडली जातात...

एखादा नवरा बायकोला सोडून देतो, दारू पिऊन एखादा पोरगा गावभर राडा घालतो, एखाद्या घरात सुनेला हुंड्यासाठी छळलं जातं, एखाद्या घरातील मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, एखादा मुलगा किंवा मुलगी आई-बापाला सांभाळत नसेल, बापजाद्यांनी कष्टातून उभारलेली दौलतजादा जुगार, दारू किंवा तत्सम गोष्टींसाठी उधळली जात असेल तर अशी घरं कमीतल्या घराच्या कॅटगरीत का टाकली जात नसावीत..? सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक पातळीवर मनमानी करत उडाणटप्पूगिरी करणारी मुलं मात्र कमीतली ठरत नाहीत आणि सर्वंकष बाबतीत सर्वांगसुंदर काम करणारी मुंल केवळ कमीतल्या घरातली आहेत म्हणून लग्नासारख्या व्यवहारात त्यांना डावललं जात असेल तर कसली आलीय सामाजिक समानता? चंद्रावर जग गेलेलं असताना, माणुसकी लोप पावत चालली असताता कमीतल्या घराची चिंधीगिरी का जोपासली जातेय?

मागे नाशकात एका मुलीनं परजातीय विवाह केल्यामुळे एका कुटुंबाला बहिष्कृत केलं गेलं...मुलीनं आपल्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न केलंमुलीच्या निर्णयाचं मोठ्या मनाने स्वागत करणाऱ्या अण्णा हिंगमिरेंच्या कुटुंबाला जातपंचायतीन बहिष्कृत केलं...अण्णा हिंगमिरेंनी आवाज उठवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला...अण्णा हिंगमिरेंसारखे बाप जेव्हा अशा जातीपातीच्या जोखडांना झुगारून उभे राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती होईल...

महाराष्ट्रातील आणि विशेषकरून साताऱ्यातील काही भागांत अजूनही कमीतलं घरअशा नावाखाली बहिष्काराची अलिखित प्रथा सांभाळली जाते...ज्याच्या घरातल्या मुलानं किंवा मुलीनं आंतरजातीय लग्न केलंय आणि लग्नाअगोदरच प्रेमप्रकरणातून प्रजनन झालं असेल तर असं कुटुंब कमीतलं घरम्हणून संबोधलं जातं...त्या घरातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न जमवणं टाळलं जातं...मग अशाच कमीतलं घरम्हणून संबोधल्या गेलेल्या घरातील मुला-मुलींशीच लग्नाचे सोपस्कार पार पाडले जातायत... कमीतलं घरम्हणून कुठंही कागदोपत्री नोंद नसते मात्र गावभर त्या घराची कमीतलं घरम्हणूनच अलिखित नोंद असते...लग्नासाठी स्थळ आलं की गावामध्ये चौकशी केली जाते... कमीतलं घरअसेल तर लग्नाला नकार दिला जातो...पूर्वीच्या 10-12 पिढ्यांकडून झालेल्या कृत्याबद्दलची शिक्षाआतापर्यंतच्या पिढ्यांना भोगायला लावली जातेय...

कुणी कोणत्या घरात जन्माला यावं, कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे कुणाच्याही हातात नसलेली गोष्ट आहे...जन्मानंतर जाती-धर्माची जशी लेबल लावली जातात तशीच ही कमीतल्या घराचा बहिष्कृतपणाही जन्म घेणाऱ्याच्या कपाळावर गोंदवला जातो...त्याच्या कितव्या पिढीने काय कृत्य केलेय याची साधी कल्पनाही त्याला नसते मात्र त्याचे भोग मात्र त्याच्या वाट्याला येत राहतात...हे भोग जो समाज आणि जी व्यवस्था त्याला भोगायला लावते ते सर्वजण त्याचा वैयक्तिक अधिकारच पायदळी तुडवत नाहीत काय? त्याच्या पूर्वजाने केलेलं कृत्य कोणत्या कायद्याच्या चौकटीत अनैतिक आहे हेही नेमकेपणानं त्याला ठाऊक नसतं...

सामाजिक चळवळींची खाज असणारे मात्र या प्रथेविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत... कमीतलं घरम्हणून संबोधले गेलेले पिढ्यांपिढ्या या प्रथेचे बळी पडतायत...सामाजिक प्रतिष्ठा नावाचा बागलबुवा उभा करणाऱ्या या तथाकथित बुजगावण्यांना कोण उखडून टाकणार आहे की नाही..? पूर्वापार चालत आलेली जाती-धर्माची मानवानेच उभी केलेली अमानुष भिंत नेस्तनाबूत करण्यासाठी अनेकांनी आयुष्य पणाला लावले...त्यात त्यांना काहीअंशी यश आलेही असेल...मात्र जाती-धर्माचे भेदाभेद आणि महापुरूषांना जातींचे लेबल लावण्याचे उद्योग करणारे अजून मेले नाहीत, पण एखाद्या स्वजातीतल्याच घराला 'कमीतलं घर' म्हणून लेबलं तर जातीतल्या जातीतच लावली जातायत, जातीच्या जांघेत बांडगुळासारखी गाठ यावी तशी अवस्थाय सगळी...

मित्रहो, कमीतलं घर या गुपचूप चाललेल्या सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे...सतीची चाल, हुंडाबळी, जाती-धर्माच्या भेदाविरोधात आवाज उठवला गेला तसाच या प्रथेविरुद्धही आवाज उठवण्याची गरज आहे...ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन करण्यासोबतच कायदेशीरदृष्ट्या काही करता येईल का याची चाचपणी होणे गरजेचं आहे...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीतलं घरं संबोधल्या गेलेल्या घरातील कर्त्या महिला-पुरुषांनी सामाजिक न्यूनगंड झुगारून याप्रकरणी पुढं येण्याची गरज आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा