बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

चहूबाजूंनी वेढलेली एकाकी बेटं

पावसाच्या धारा नेम धरून बरसू लागल्यावर चिल्ल्यापिल्ल्यांच्या आनंदाला पारावर राहात नाही...आभाळभर झिम्मा घालणारे पक्षी पाऊस आला की झाडाच्या फांदीवर, विजेच्या तारांवर भिजलेले पंख फडफडवत बैठक मारतात...रापलेल्या भुईवर पाण्याचे थेंब कोसळून मोती बनून जातात आणि मातीचा स्वर्गीय सुगंध अख्खा परिसरात भारून उरतो...पोरं-टोरं पहिल्या पावसात भिजण्यासाठी कपड्यांसह अंगणभर उड्या मारत राहतात...उन्हाळाभर कोरडा घसा घेऊन तापत पडलेल्या नाल्यातून पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्यात कागदाच्या होड्या सोडण्यात कुणी दंग होतं तर वळचणीचं पाणी तळहातावर घेऊन इवलसं तळ पिऊन टाकण्यासाठी कुणाची धांदल उडते...शहारल्या अंगाने कुणी तोंड वर करून पावसाच्या अगणित सुया चेहऱ्यावर टोचून घेत राहतं तर कुणी आडोसा धरून झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर पाणी उडवण्याचा आनंद लुटतं राहतं...

गावभर असा पाऊसोत्सवाचा गलका सुरू असताना ही सगळी झिम्माड गंम्मत उंबरठ्याच्या आत बसून कुणीतरी कोरड्या अंगानं पण हसऱ्या चेहऱ्यानं बघत राहतं...ऐन धारानृत्यात चाललेला हा आनंदोत्सव पाहताना चेहऱ्यावर हास्याची लकेर असते पण डोळ्यांतल्या कोरडेपणाची वेदना मात्र लपत नाही...आपण असं पावसात नाचू शकत नाही ही हळहळ मनाला रुतत राहते...आपल्याला पाय नाहीत हा आपला दोष आहे का?  असा रोखठोक सवाल नजर जगाला विचारत राहते...शारीरिक अपंगत्व ठसठसत राहतं...आपल्यात काहीतरी कमी आहे ही न्यूनगंडाची भावना क्षणाक्षणाला बळावत राहते....

स्टँडवर एसटी लागली की धडधाकट माणसांची एसटीच्या दारावर मुरकंड पडते, रेटारेटी करताना बाया-लहान मुलांचंही भान राहात नाही...कुणी एसटीच्या खिडकीतून वह्या-दफ्तर-रुमाल टाकून बाहेरूनच सीट बुक करतात...बसून प्रवास करायला मिळावा म्हणून जागा पटकावतात...अशावेळी एखादा अपंग एसटीत चढायचं असूनही लांबूनच हतबलतेनं हा सामुदायिक हावरटपणा बघत राहतो...बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून धडपडणाऱ्यांची मश्गुलता इतक्या पराकोटीची असते की एकालाही लांबवर उभ्या असलेल्या अपंगाकडे बघण्यास उसंत नसते...अपंग कसाबसा एसटीत चढल्यावरही त्याच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर एखादा धडधाकट माणूस फतकाल घालून बसतो...शारीरिक असमर्थ असणारा अपंग केवळ आशाळभूतपणे पाहण्याखेरीज काही करू शकत नाही...धाडस करून एखादा अपंग बोललाच तर सीट रिकामी केली जाते...पण तसं करताना तोंडालरचे भाव मात्र उपकार केल्यासारखे किंवा ‘काय ही कटकट’ असेच असतात...

मुंबईसारख्या शहरांतील लोकल किंवा ट्रेनमध्ये अपंगांसाठी राखीव डब्बा असतो पण त्याकडेही तुसडेपणाने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही...तुसडेपणाने बघण्याचं सोडाच पण अशा डब्यांमध्ये घुसून प्रवास करणाऱ्या धडधाकड धेंडांचीही कमी नाही...रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला तासंतास ताटकळणाऱ्या अपंगाच्या हाताला धरून मदत करणाऱ्यांची संख्या तशी कमीच...बाहेरचे असं वागत असताना घरात महत्वाच्या चर्चेचं गुऱ्हाळ चालू असताना घरातली करतीसवरती माणसं आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न करत राहतात मात्र अशावेळी कुठंतरी कोपऱ्यात बसलेल्या अपंगाचं मत काय? याची दखलही घ्यावीशी न वाटणं हे आपल्यातल्या आटलेल्या मानवतेचंच द्योतक नाही का?

आपल्या वर्गात आपल्या शेजारी बसणाऱ्या सखीचं लग्न ठरतं, उत्साहात लग्न होतं पण आपल्या लग्नाचा साधा विषयही निघू नये याची भावना एखाद्या अपंग मुलीला बोचत राहते...आपणही कुणाचातरी संसार फुलवू शकतो, कुणाच्यातरी घरची लक्ष्मी बनू शकतो हेच जणू समाज अनुल्लेख करत नाकारत असतो...अगदीच मायेचा उमाळा असेल तर अपंग मुलीसाठी किंवा मुलासाठी अपंग असलेल्या व्यक्तीचाच शोध घेतला जातो...नाहीतर कोऱ्या कपाळानं आणि बोडक्या हातानं आयुष्य कातरत राहायचं...मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे मग समाजाच्या मुख्य प्रवाहात असण्याची भावना या अपंगांच्या मनात निर्माण होण्यात गैर काय? की समाज नकळतपणे त्यांचं मनुष्यपणच नाकारतोय?

विहंगम सृष्टीचं दर्शन घेऊ न शकणारा एखादा अंध व्यक्ती हाताला लागतील त्या गोष्टी स्पर्शातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करतो...मायेनं हातात हात घेणाऱ्या किंवा खांद्यावर मदतीचा हात ठेवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा कसा आहे? हे बघू न शकणाऱ्या अंधाला माणुसकीच्या चेहऱ्याचं मात्र दर्शन होत राहातं...मात्र असं कुणी आधार देण्यास येत नसेल तर एकूण समाजाचाच विदारक चेहरा त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो...

मित्रहो, कुणाला जन्मताच तर कुणाला अपघाती किंवा आजारपणातून अपंगत्व येतं...त्यात त्यांचा दोष असू अगर नसू पण त्यांना आपल्यासारखं जगता येत नाही ही त्यांची एकप्रकारची घुसमटच असते...ही घुसमट त्यांच्यातल्या सकारात्मकतेचा गळा घोटत राहते...नकारात्मकतेची बीजं त्यांच्या मनात बाळसं धरू लागतात...समाज म्हणून त्यांच्या घुसमटीचा बांध तोडून त्यांना खळाळतं ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे...ती जबाबदारी जर आपण उचलत नसू तर ते आपल्या सामाजिक, नैतिक, मानवीय आणि मानसिक पंगूपणाचं लक्षण आहे, हा पांगळेपणा आपण सोडला नाही तर चहूबाजूंनी वेढलेली अपंगांची ही एकाकी बेटं काळाच्या ओघात गटांगळ्या खात राहतील.

२ टिप्पण्या: