बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

धोंडी का रडे?


तापत्या उन्हात ओल आटून गेलेल्या रणरणत्या डांबरी रस्त्यांवरून फटफट ऐन दुपारी चौकात विसावते अन् पावसाने दगा दिल्याने पानपट्टी किंवा वडापावच्या गाड्यावर उगाच रेंगाळणारी पोरं फटफटीभोवती जमायला लागतात...धोंडी आला, धोंडी आलाsss म्हणत चारही रस्त्यांवरची पोरं धोंडीला गराडा घालतात...उन्हाच्या लाह्या गावपांढरीवर तडतडत असतानाही गळ्यात भडक रंगाचा मफलर, डोळ्यांना गॉगल घातलेला धोंडी रुबाबात येऊन प्रत्येक गावाच्या चौकात क्षणभर थांबणारच...येण्याची आणि जाण्याची ठरलेली वेळ नसूनही धोंडीची वाट बघत बसणारी पोरं धोंडी आल्याबरोबर हरखून जातात...गप्पाटप्पा करून धोंडीची फटफट चालू होते...रामराम करत धोंडी पुढच्या प्रवासाला निघतो...पुढच्या चौकात तरुणांचं टोळकं धोंडीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतंच...धोंडीकडं त्यांचं आणि धोंडीचं त्यांच्याकडे काय काम असतं कुणास ठाऊक पण धोंडी आला म्हटलं की सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात...

धोंडी नेमका काय धंदा करतो हे सर्वांनाच सांगता येईल असं नाही...चारपाच आंधळ्यांनी हत्तीच्या प्रत्येक अवयवाला चापसत हत्तीचं वर्णन करावं तसंय सगळं...शेपूट धरणारा म्हणेल हत्ती कासऱ्यासारखा तर हत्ती खांबासारखा आहे असं पायाला हात लावणारा आंधळा म्हणेल...धोंडीची ओळख ही अशी तुकड्या तुकड्यांनी लोकांना माहित झालेली...धोंडीचं जे रुप ज्यांनी पाहिलंय तसाच धोंडी त्यांना दिसणार...अनेक रंगांच्या काचांचा दिसणारा कोलाज मन रमवून टाकतो तसा धोंडीही सगळ्यांना हवाहवासा वाटतो...धोंडीची अशी ठिपक्या-ठिपक्याची ओळख होण्याचं कारण धोंडीच...आयुष्याची वाट कातरताना जिथं विसावा मिळेल तिथं धोंडी रमत राहिला...विसाव्याच्या ठिकाणी मिसळून गेला...घटकाभर थांबून धोंडी पुढच्या विसाव्याकडे चाललाच म्हणून समजा...एकाच विसाव्यावर थांबेल तो धोंडी कसला? धोंडीला विचारलं तर म्हणतो, काकासाहेब, आयुष्य एकाच रंगाचं असलं तर मजा नाय यायची, आयुष्य विविध रंगांनी भरलेलं असायला हवं...बरं, आपल्या आयुष्याला वेगवेगळे रंग द्यायचे तर जग डबा आणि ब्रश घेऊन येणार नाही...आपल्यालाच रंगरंगोटी करावी लागणार...

दीड-दोन वर्षांपूर्वी धोंडीची माझी ओळख एका मित्राने करून दिली...गावच्या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉक्युमेंटरी बनवायच्या होत्या...धोंडींला कल्पना सांगितली तर धोंडीचा चेहरा उत्साहाने फेसाळला...रात्री उशिरा भेटून गेलेला धोंडी तोच मफलर, तोच गॉगल अन् तिच फटफट घेऊन सकाळच्या पारी हजर...डॉक्युमेंटरीच्या कामानिमित्त दोन-चार दिवस धोंडीबरोबर फिरलो पण कामासाठी फिरलो असं वाटलंच नाही...निव्वळ मुशाफिरी करून घरी आलोय असं वाटायचं पण कामं काय काय झाली याचा हिशोब मांडायला घेतला तर कामं रफादफा झालेली असायची...गावपातळीवर शुटिंग, व्हाईसओव्हर, एडिटिंगची कामं एकाच ठिकाणी होणं कठीण, पण धोंडीमुळे जिथं जाईल तिथं आधी आपल्या कामांना हात लावला जायचा...काम झाल्यावर पैसे किती असं विचारलं तर समोरचा धोंडीकडे बघून हसत दहा कोटी रुपये झाले असं म्हणत हसायचा...सगळी कामं फुकटात...त्यात जिथं जाईल तिथं नाष्टा, जेवण मिळायचं ते वेगळंच... लाज गुंडाळून धोंडी निर्धास्तपणे मागायचा अन् लोकही मागेपुढे न बघता धोंडीला हवं ते कौतुकाने खायला द्यायचे...

सुट्टी संपल्यावर मुंबईला जायला निघालो तर धोंडी सातारच्या स्टॅण्डवर सोडायला जातीने हजर...पुरस्कार सोहळा आठवड्यावर राहिला असताना शिल्लक कामांची जबाबदारी स्वत: खांद्यावर घेऊन धोंडी निर्धास्त जा म्हणत एसटीच्या खिडकीपाशी ताटकळत उभा होता...एव्हाना धोंडी मला कळला होता...पण कामं पूर्ण होतील का याची धाकधूक होतीच...मुंबईत रात्री उशिरा पोहोचल्यानं सकाळी 10 वाजता वगैरे उठलो आणि मोबाईल बघितला तर धोंडीचे 16 मिस कॉल...फोन केला तर “सर, शेवटच्या डॉक्युमेंटरीवर शेवटचा हात फिरवतोय, तुमच्या स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करायचा होता, तुमच्या परवानगीसाठी थांबलोय” असं म्हणून धोंडी शांतपणे माझ्या बोलण्याची वाट पाहात होता...झोपाळलेले डोळे चोळत धोंडीच्या कर्तव्य तत्परतेनं खडबडून जागा झालो...थोडी चर्चा करून फोन ठेवल्यावर मनात आलं, धोंडी चार दिवस आपल्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत फिरला, पुरस्कार सोहळा माझ्या गावचा आणि हा परगावचा धोंडी किती राबतोय...त्याला मानधनाचं विचारावं म्हणून फोन केला तर त्याने काहीही न बोलता फोन ठेवला...दिवसभर फोन करत राहिलो तर धोंडीचा मोबाईल स्वीच ऑफ...कार्यक्रमाचा दिवस जवळ येत असताना धोंडीचा बंद मोबाईल डोक्यात घुसायचा...कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या पोरांना, ज्याच्यामुळे धोंडीची ओळख झाली त्याला विचारलं तर त्यांनाही धोंडीचा पत्ता लागला नाही...ना धोंडीचं गाव माहित, ना धोंडीचं घर माहित....त्यात शुटिंग केलेल्या कॅसेट, लिहिलेल्या स्क्रीप्ट सगळं धोंडीकडं...धोंडी गायब झाल्याने धाकधुकीचा वेग वाढला...

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जायचं ठरलं होतं पण आधीच दोन दिवस गावी जावं लागलं...मी गावी आलोय हे धोंडीला कुठून कळलं काय माहित...आयोजकांशी मीटिंग चालू असतानाच मफलर गुंडाळलेला धोंडी हजर... सगळ्या डॉक्युमेंटरी तयार आहेत, सर्व सीडींवर क्रमांक आणि नाव टाकलंय म्हणत धोंडी जायला निघाला...आम्ही सर्वजण अवाक् होऊन धोंडीच्या मागे धावत गेलो तर धोंडीने फटफटीवर टांग टाकलेली...किक मारणार तेवढ्यात पुढं जाऊन धोंडीला विचारलं तर म्हणला, “सर कलेचं काम आहे, गावच्या विकासासाठी, गावच्या आदर्श लोकांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही कार्यक्रम करताय, तुम्ही पैशांचा विचार न करता करताय आणि मला पैशांचं विचारताय तर पुढच्या वर्षीपासून मला नका बोलावू” धोंडी किक मारून कधी निघून गेला ते कळलंच नाही...

सगळ्या डॉक्युमेंटरी प्ले करून पाहिल्या आणि स्टेज, साऊंड, लाईट्स, डान्स करणाऱ्यांसाठी ड्रेसच्या जुळवाजुळवीला लागलो...धोंडीनं डॉक्युमेंटरीचं काम प्रामाणिकपणे करून जाताना आमच्या मनावर विलक्षण गोंदण केलं होतं...गोंदण सुबक होतं पण त्याची बोच सलत होती...कुठंतरी जाताना धोंडी चौकात वडापाव खातान दिसला...त्याच्याजवळ जाऊन माफी मागितली पण धोंडी तोंडाकडेही बघत नव्हता...बोलता बोलता बाकीच्या जुळवाजुळवीचं बोललो तर आमूकचं स्टेज मिळेल, तमूकची साऊंड सिस्टिम मिळेल म्हणत धोंडी पुन्हा सगळं विसरून सांगू लागला...जणू काही घडलंच नाही...म्हटलं लाईट्स सिस्टिमचं काय?  तर म्हणला “बसा गाडीवर”  खाल्लेल्या वडापावचे पैसे “परत देतो रे, काय पळून जातोय का?” असं वडापाववाल्याला दरडावत धोंडी किक मारू लागला...” तुला कधी मागितले पैसे, नको देऊस जा” असं म्हणत वडापाववाला हसत टाटा करत राहिला...दिवसभरा धोंडीनं सगळी जुळवाजुळव करून दिली...440 करंट माझा फेम अवलिया दिनकर शिर्केंकडून कार्यक्रमाचं थीम साँग करून घेण्यापासून ते पुष्पगुच्छापर्यंतची सगळी कामं एकही नया पैसा न घालवता धोंडीनं करून दिली...घरी जाताना गाडीचं पेट्रोल संपलं, अंधाऱ्या रात्री गाडी ढकलत पेट्रोल पंपावर आणली, ज्याची गाडी आणली होती त्याला फोन करून धोंडीनं लाखोली वाहिली...”गाडीत पेट्रोल भरता येत नाही का रे रताळ्या” म्हणत त्याचा भररात्री उद्धार केला...पेट्रोल भरल्यावर धोंडी स्वत:चे खिसे चापसू लागलं....धोंडीकडे पैसे नाहीत असं लक्षात आल्यावर मी पुढं होऊन पैसे दिले...

पुरस्कार सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडला...कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांच्या पाया पडण्यासाठी व्यासपीठावर जाताना धोंडीला ओढत नेला...कडाक्याच्या थंडीत मध्यरात्रीपर्यंत मंत्रमुग्ध झालेले रसिक व्यासपीठाकडे धावत येऊन कौतुक करत होते...हा कौतुक सोहळा चालू असताना सगळ्या कार्यक्रमाला चार चाँद लावणारा धोंडी लांबवर जाऊन कोपऱ्यात उभा होता...त्याच्या जवळ गेलो तर पेट्रोलचे मी दिलेले पैसे परत करण्यासाठी धोंडीनं शंभराची नोट पुढं केली...”काय राव” म्हणत धोंडीला मिठी मारली तर म्हणाला, “सर, काळजी करू नका, ज्याची गाडी आहे त्याच्याकडून आणलेत” धोंडी खरं बोलला होता की खोटं माहित नाही, पण धोंडीचं बोलणं ऐकून हसावं की रडावं असं झालं...त्या दहा-बारा दिवसांत धोंडी मनात घर करून गेला...मग वरचेवर गावी गेल्यावर धोंडीची भेट ठरलेलीच...दर आठवड्याला धोंडी फोन करून कधी येणार असं विचारणार म्हणजे विचारणारच...धोंडीबद्दलची माहिती मिळत गेली तसा धोंडी जीवाणूसारखा भिनत गेला...

दूरदर्शनच्या धिना धीन धा आणि झी मराठी वाहिनीच्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाचा धोंडी विनर आहे...धोंडीने लव्ह आज कल या हिंदी सिनेमात सैफ अली खान-दीपिका पदुकोनच्या एका गाण्याचा डान्स बसवलाय, धोंडी गावोगाव फिरून पोरांना डान्सचे धडे देतो, गावच्या नाटकांत, निवडणुकीच्या प्रचारात पथनाट्यात धोंडी अभिनय करतो हे लोकांकडून मला समजू लागलं तसा मी त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो...वाठारपासून काही अंतरावर असेलं आदर्की हे धोंडीचं गाव...जिल्हाभर प्रत्येक गावात एकतरी ओळखीचा माणूस ठेवणाऱ्या धोंडीचा प्रवास मात्र माझ्या पायांना लाज देऊन गेला...

आदर्की ग्रामपंचायतीत शिपाई, गावातल्या नळाला पाणी सोडणारा पाणकाम्या, ट्रकवर क्लीनर असा श्रीगणेशा करणारा धोंडी नंतर नंतर लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवू लागला...स्वत:चा बॅण्ड बनवून लोकांची लग्न, वराती, यात्रा संगीतमय करू लागला...लग्नाचा सीझन संपला की धोंडी वाठारच्या वाग्देव कॉलेजसमोर वडापाव, चहाची गाडी लावायचा...लोकांना चहा देताना, वडापाव देताना धोंडी अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत राहायचा...वडापाव, चहाच्या लज्जतीला धोंडीच्या करमणुकीची फोडणी मिळायची त्यामुळे लोकांच्या उड्या पडायच्या...नंतर वाठार रेल्वे स्टेशनला भेळीचा गाडा चालवत धोंडी पोट भरायचा...दिवसा कॉलेजात शिकायचं, संध्याकाळी स्टॉल लावायचा असा दिनक्रम बनून गेला...कॉलेजची कॅम्प कुठं गेली की धोंडी घामाचे पाट वाहेपर्यंत कष्ट करायचा...ग्रामपंचाय, पंचायत समिती निवडणुकीत धोंडी उभा राहिला पण प्रचार शून्य...उमेदवार असणारा धोंडी गावात थांबायचाच नाही, धोंडीला विचारलं तर म्हणे आपटण्यासाठीच उभा राहिलोय...कॉलेजच्या युवा महोत्सवात धोंडीला सूर गवसला...आणि धोंडीचा अभिनयातला प्रवास सुरू झाला...कधी पतपेढीत शिपायाची नोकरी करत, कधी लग्नात घोडं नाचवत धोंडी चालत राहिला...ठेचकाळत का होईना पण एका आडमार्गाच्या गावातला पोरगा टीव्हीवर दिसायला लागला...केदार शिंदे, भरत जाधवसोबत सिनेमात दिसू लागला...धोंडीच्या हातचा चहा, वडापाव, भेळ खाणारे धोंडीला टीव्हीवर किंवा सिनेमात पाहून हरखून जायचे...जिथं जाईल तिथं धोंडीचं कौतुक व्हायचं, पण धोंडीची मूळं जमिनीत घट रोवली गेली ती आजतागायत...मातीशी नाळ धोंडीनं कधी तुटू दिली नाही...

धोंडीच्या घरची परिस्थिती बेताची...बाप धोंडी लहान असतानाच स्वर्गवासी झालेला...आई-बाप एकसाथ बनलेल्या आईच्याच सावलीत धोंडीचं रोपटं बहरलं...धोंडी असा दुनियादारी करत फिरत राहिला तरी त्याची आई मात्र शिवारात राबत प्रोत्साहन म्हणजे काय? हे न कळूनही धोंडीला पाठिंबा देत राहिली...धोंडीसोबत रोज कुणीबुणी घरी येतंच पण त्याची आई न कंटाळता सगळ्यांचा पाहुणचार पोटच्या लेकराप्रमाणे करत राहते...धोंडीच्या घरातील भिंतीवर ठेवलेल्या असंख्य ट्रॉफींकडे थरथरणारे बोट दाखवत त्याची आई येणाऱ्या प्रत्येकाला पोराचं कौतुक सांगते...टीव्हीवर चमकणारा धोंडी घरात मात्र टीव्ही आणत नाही...टीव्हीमुळं कामं पडून राहतात असा धोंडीचा गैरसमज...धोंडीचा टीव्हीवरचा कार्यक्रम बघायला त्याची आई, बायको, पोरं शेजारच्या घरी जाऊन मन भरून घेतात...

दोस्तहो, असे धोंडी प्रत्येक गावात आहेत...पण त्यांच्या खांद्यांना आधार देऊन लढण्याचं बळ देणारे हात मात्र सापडत नाहीत...हा धोंडी त्यांचंच प्रतिनिधित्व करतो...काल जळून गेलेल्या स्वप्नांची राख मुठीत आवळून हा धोंडी उद्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढत राहतो...लोकांना वाटतं हा धोंडी मुठी आवळून चालतो...गुर्मीय याच्या अंगात...पण धोंडीला मी जवळून पाहिलंय...हा कणखरपणा, रागीटपणा धोंडीला तो ज्या वाटेनं चालत आलाय त्या वाटेनं दिलाय...तापलेल्या खाचखळ्यांच्या रस्त्यांवरून चालणारा माणूस कोमल फुलासारखा कसा असेल बरं? असलाच तर तो बाभळीच्या फुलासारखा असेल...काट्यात फुलूनही मनमोहक पिवळ्याधम्म रंगाची उधळण करत राहणारा...धोंडीचं आयुष्य हे असं ठिगळा-ठिगळांनी जोडलंय...विविध रंगांच्या कापडाच्या तुकड्यांनी जोडलेल्या वाकळेसारखं...प्रत्येक चिंधीच्या मुळाशी जुन्या आठवणींची ओल आणि सल जपलेल्या वाकळेसारखं...वाकळ आता लोकांना आवडते की नाही काय माहित पण तिची आपुलकीची ऊब मात्र दुसऱ्या कशालाच नाही यायची...शंभर रुपयांची खोटी नोट चालवायची तर इतर खऱ्या नोटांमध्ये मिसळून चालवावी लागते, शंभराची खोटी नोट बाजारात एकटी गेली तर तिच्या वांझोटेपणाचं पितळ उघडं पडतं, मात्र एक रुपयाचा खरा ठोकळा बाजारात एकटा चालू शकतो, हिमतीने..! बाजारात त्याचं मूल्य तुलनेने कमी असेल पण तो सच्चा असतो, जसा हा आदर्कीचा धोंडी कारंडे...

तरीही एक प्रश्न उरतोच...उतावीळ, बाजारू, उठावळपणाने तुंबड्या भरणारं जग आजूबाजूला असूनही रक्ताच्या प्रत्येक थेंबाला कलेचं माहेरघर बनवणारा धोंडी का रडे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा