गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

आभाळाएवढी बहीण

‘माझी बहीण आजारी हाय, आज लवकर घरी जाऊ का गुरूजी?’ दुपार कलायला लागल्याबरोबर गण्याचा दाटलेला आवाज गुरूजींच्या कानावर पडताच गुरूजी सर्रकन वळले...गुरूजींच्या करड्या नजरेला नजर भिडल्याक्षणी गण्याचे डोळे गरंगळत जमिनीला जाऊन भिडले...वर्गातली सारी पोरं-पोरी कुजबूज थांबवून मागे हात बांधलेल्या पाठमोऱ्या गण्याकडं आ वासून बघत राहिली...गण्याचे थरथरणारे हात काहीसे सैल होत राहिले...चिडीचूप बसलेल्या वर्गात मान खाली घालून उभं राहिलेल्या गण्याकडे बघत गुरूजी जवळ येतात...गण्याच्या काळजातली धडधड वाढत राहते...गुरूजींच्या एकेका प्रश्नांनी घायाळ होत गण्या अर्धमेला होत राहतो...भीतीने झाकलेल्या गण्याच्या डोळ्यासमोर आजारी बहीणीचा चेहरा तरळल्याबरोबर गण्या धीरोधात्तपणे तडक वर पाहत गुरूजींच्या डोळ्यात डोळे घालून बोलत राहतो...बोलता बोलता गण्याच्या डोळ्यांना फुटलेला पाझर अख्खा वर्ग पाहत राहतो...हातातली अंकलिपी बोलताबोलता हातातून घसरत धपकन पडते...खापऱ्याच्या पाटीवर पडलेली अंकलिपी उचलताना गण्याची तारांबळ उडते...गण्याची धांदल बघून वर्गातल्या पोरा-पोरींमध्ये खसखस पिकते...हातातला अर्धामुर्धा खडूचा तुकडा दात काढणाऱ्या पोराच्या अंगावर भिरकावत गुरूजी अख्ख्या वर्गाला शांत करू पाहतात...

एका झटक्यात पोरांच्या माना खाली...सारा वर्ग क्षणार्धात शांत...गुरूजींच्या रुद्रावतार पाहून इकडं गण्या आतून कोसळू पाहतो...कंठ दाटू पाहतो...गण्याच्या मनातली घालमेल, जीवाचा आकांत गुरूजींच्या नजरेतून लपत नाही...विस्तवासारखे झालेले गुरूजींचे डोळे गण्याजवळ येताना निवळू लागतात...मायेचा हात गण्याच्या डोक्यावर पडल्याक्षणी काही विचारण्याच्या आतच ‘गुरूजी खरंच, माझी बहीण रातीपसनं लय आजारी हाय, मला तिची सारखी आठवण येते...ती पण माझीच वाट पाहात असेल, जाऊ का घरी...?’ गण्या बोलून गेलेला असतो...पानावलेल्या डोळ्यांनी गण्या गुरूजींकडे मान वर करून पाहात राहतो...गुरूजींनी मानेने होकारार्थी इशारा करताच मोठ्या लगबगीनं गण्या पसरलेला दफ्तराचा पसारा आवरू पाहतो...दफ्तराची तुटक्या बंधाची पिशवी कशीबशी खांद्याला अडकवत गण्या धूम ठोकतो...

कधी एकदा बहीणीला भेटतोय असं गण्याला झालेलं असतं...सकाळी शाळेत येताना बहीणीचा सुकलेला चेहरा गण्याच्या डोळ्यासमोरून हटत नाही...आजारी असूनही, तापाची फणफण अंगात असूनही दुडक्या चालीनं बहीणीनं सकाळी भरून दिलेलं दफ्तर गण्याच्या खांद्याला जडावत राहतं...घराकडं जाताना गण्याच्या पायांनी वेग पकडलेला असतोच...कधी एकदा बहीणीचा चेहरा बघतोय असा आकांत गण्याच्या मनात दाटत राहतो...अनवानी पायांनी गण्या दगड-धोंडे तुडवत रस्ता मागे टाकत चालत राहिलेला असतो...घराच्या दारात
आल्या-आल्या वाकून गण्या घरभर पाहात राहतो...भिरभिरणारी गण्याची नजर एका कोपऱ्यात येऊन थबकते...आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या बहीणीचा कातावलेला चेहरा बघून गण्या गलबलत राहतो...खांद्याला अडकवलेली दफ्तराची पिशवी कुठल्याकुठं भिरकावत झोपलेल्या बहीणीच्या शेजारी बसून तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघत राहतो...आईनं डोक्यावर लावलेली मिठाची पट्टी काढून वाटीतल्या पाण्यात भिजवून पुन्हा बहीणीच्या डोक्यावर लावत राहतो...जीवाभावाचा भाऊ आल्यानं ओसंडणारा आनंद बहीण लपवू शकत नाही...आईला बाजूला सारत बहीणीनं गण्याच्या इवल्याशा मांडीवर डोकं टेकवलेलं असतंच...बहीणीचा हात हातात घेऊन गण्या पाणावलेल्या डोळ्यानं बघत राहतो...भावा-बहीणीचा लळा बघून आई कृतार्थ होत कामाला निघून गेलेली असते...

धडपडत्या, थरथरत्या हाताने बहीण डोक्याखाली ठेवलेल्या उशीखाली काहीतरी चापसण्याचा प्रयत्न करते...उशीखालून हळूवार हात काढत झाकलेल्या मुठी गण्याच्या तळहातावर ठेवू पाहते...गण्याच्या तोंडाकडे पाहात झाकलेल्या मुठी सैल होत राहतात...आजारी बहीणीला पाहून गेलेल्या कुणीतरी दिलेला रुपयाचा ठोकळा गण्या डोळे विस्फारत पाहात राहतो...आजारपणात स्वत:चं भान हरपलेल्या बहीणीनं आपल्यासाठी सकाळपासून जपून ठेवलेल्या रुपयाचा ठोकळा बघून गण्या गलबलत राहतो...हातावर ठेवलेल्या ठोकळ्यावर गण्याच्या डोळ्यातल्या अश्रूचा थेंब टपकल्याबरोबर रुपया चमकत राहतो...गण्याच्या डोळ्यातल्या पाण्याची चाहूल लागताच बहीण ताडकन उठून बसू पाहते....बहीण उठून गण्याच्या गळ्यात पडलेली असते...गण्याचे इवले हात मोठ्या बहीणीच्या डोक्यावरून फिरत राहतात...भावा-बहीणीचा अवघा भावसोहळा घरभर दरवळत राहतो...देव्हाऱ्यातल्या समईचा प्रकाश किंचितसा वाढत दोघांवर तेजोमय प्रकाशाचा अभिषेक करत राहतो...

घरातल्या खुर्च्यांवर ऐटीत बसलेल्या पाहुण्यांना चहा देताना गण्याच्या हाताला सुटलेला कंप कुणाच्याच नजरेतून चुकत नाही...सवय नसल्यानं साडी सावरत समोरच्या पाटावर बसलेली बहीण पाहुण्यांच्या प्रत्येक प्रश्नानंतर गण्याकडं पाहात राहते...गण्याशी नजरानजर करत एक नवं चैतन्य, एक नवा आत्मविश्वास घेत बहीण पाहुण्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं देत राहते...डोक्यावर घेतलेल्या पदराआडून दिसणाऱ्या बहीणीच्या चेहऱ्याकडे बघत गण्या आतून कोसळत राहतो...आपल्या घरात बागडलेली, प्रत्येकक्षणी माझाच विचार करणारी बहीण लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार या विचारानेच गण्या आतल्या आत गडगडत राहतो...

तुताऱ्या, सनई-चौघडे वाजत राहतात...नवरा मुलगा तालेवार घोड्यावरून राजकुमारासारखा मांडवात हजर होतो...सजलेल्या बहीणीला मांडवात घेऊन येताना गण्याचे पाय लटपटू पाहतात...बहीणीचा हातात घेतलेला हात गण्याला सोडवत नाही...आभाळभर तापलेल्या उन्हात सावली देणारी बहीण सोडून जाणार या विचारानेच गण्याचे डोळे अंधारू पाहतात...डोक्यावर बांधलेल्या कुरवल्याच्या मानाच्या फेट्याचा तुरा वाऱ्यानं फडफडत राहतो...बहीण सजवलेल्या गाडीतून सासरच्या दिशेनं चालती झालेली असते...पावण्या-रावळ्यांनी गजबजलेला लग्नाचा अख्खा हॉल गण्याला रिता वाटत राहतो...हॉलभर इथंतिथं लावलेली रंगिबिरंगी लायटिंग गण्याच्या डोळ्यांसमोर निर्माण झालेला अंध:कार गिळू शकत नव्हती...गण्या चाचपडत राहिलेला असतो...अभ्यासाच्या जोरावर एक-एक वर्ग पुढे जाणाऱ्या बहीणीची पुस्तकं वाचत शिकलेल्या गण्याला आज बहीणीने निघून जाण्याचा शिकवलेला धडा पचणी पडत नाही...

गेल्यावर्षी रक्षाबंधनाला मनगटावर बांधलेल्या राखीचा जीर्ण झालेला धागा बघत गण्या गावातल्या एसटी स्टॅण्डवर तिष्ठत उभा राहिलेला असतो...रक्षाबंधनासाठी येणाऱ्या बहीणीच्या वाटेकडे बघताना गण्याच्या डोळ्यांत आलेला जीव झाकोळला जात नव्हता...धुक्याच्या झुंजूमुंजू चादरीत गुंडाळलेल्या रस्त्यावरून लाल-पिवळी एसटी दिसताच गण्या ताडकन उठून उभा राहिला...एसटी आली...दार उघडून बहीण समोर दत्त म्हणून कधी उभी राहिली याची गण्याला टोटलच लागत नाही...कशाबशानं भरून ओसंडून वाहणाऱ्य़ा पिशव्या सांभाळत उभी राहिलेल्या बहीणीकडे गण्या शून्य नजरेनं पाहात राहिलेला असतो...आयुष्यभर सावलीसारखं सोबत राहणार आणि अवचितपणे सोडून गेलेलं  आभाळच समोर उभं ठाकल्याचं गण्याला वाटत राहतं...सोडून गेलेल्या आभाळाची आभाळाएवढी माया गण्याच्या चेहऱ्यावरून पाझरत राहिलेली असते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा