गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

आयुष्याचा बाजार

‘भाजी घ्या भाजीsssss, ताजी ताजी भाsssजी’ अशी आरोळी ठोकत म्हातारीनं डाव्या हातातल्या डबड्यातलं पाणी उजव्या हाताच्या इवल्याशा ओंजळीत घेऊन भाजीच्या पेंड्यावर शिंपडलेलं असतं...पाण्याचा शिडकावा पडल्यासरशी भाजीच्या पेंड्या शहारल्यागत होऊन अजूनच हिरवाईचा पदर घेऊ पाहतात...रापलेल्या, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या म्हातारीनं हाताची लोंबकळणारी चामडी हलवत ठोकलेली गगनभेदी आरोळी ऐकून शेजारच्या पोरसवदा पोराला चेव फुटू पाहतो...’ नका बघू इकडं तिकडं, तरणीताटी भाजी इकडं’ म्हणत पोरानं म्हातारीला डिवचलेलं असतं...पोराच्या डिवचण्याकडं पोक्तपणानं कानाडोळा करत म्हातारी भाजीच्या पेंड्या थरथरत्या हातानं रचून ठेवत राहते...अख्ख्या बाजारभर वेगवेगळ्या वस्तूंच्या आरोळ्यांचा नुसता कोलाहल माजलेला असतो...भाजी, फळं, गुरा-ढोरांना बांधायचे कासरे, कंदीलाच्या काचा, लाईट गेल्यावर घरात लावायचे घासलेटचे पत्र्याचे दिवे, केसांना, साडींना लावायचे रंगीबिरंगी चाफ, लाह्या-बत्ताशे-कुरमुरे आणखी काय काय...आपापल्या वस्तू विकणाऱ्यांचा जाहिराती करणारा आवाज...बाजारभर घुमणाऱ्या आरोळ्यांच्या आवाजाला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंट्यांची साथ अन् वेगवेगळ्या फुलांच्या हार-गजऱ्यांचा सुवास...बाजारभर नुसती लगबग...

गावाखेड्यात राहणारे आठवडी बाजाराची आतुरतेने वाट पाहात राहतात...शाळेतली पोरं आयबापाबरोबर बाजारात घेऊन जाण्यासाठी हातपाय आपटत हट्ट धरू पाहतात...पिकलेले केस विंचरण्यासाठी लागणारी मोठ्या दाताची, बारक्या दाताची फणी आणण्याचा हुकूम म्हातारी सोडलेला असतो...कुणाच्यातरी लग्नातल्या पोशाखात मिळालेल्या टोपीला भोकं पडल्यानं नवी टोपी आणायचं फर्मान कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्यानं सोडलेलं असतं...जवळच्याच गावात नांदायला गेलेल्या पोरीला आवडणारी जिलेबी आणण्याचा सल्ला घरमालकीनीनं दिलेला असतोच...घरातल्या घरात गुडूगुडू करत रांगणाऱ्या पोरानं बोबड्या बोलानं खुळखुळा आणायचं खुनावलेलं असतं...काजळाची डबी, तोंडाला लावायची पावडर, टकुचं शिवण्यासाठी लागणारी लालभडक रिबीन, डोक्याला लावायचं वाशेल तेल इत्यादींची यादी तयार झालेलीच असते...बाजाराच्या आधी तीन-चार दिवस अशा याद्या घराघरांतून बनत राहतात...आठवेल तसं यादीत एकेका वस्तूची भर पडत राहते...तिकडं रोजानं जाणाऱ्या आयाबाया ज्याच्या शेतात काम करतात त्याच्याकडे उचल म्हणून जास्तीचे पैसे मागत राहिलेल्या असतातच...जमीनमालकही आढेवेढे घेत जास्तीचे पैसे देऊ करतो, पण पुढच्या आठवडाभर रोज रानात कामाला येण्याची हमी घेऊनच...

इकडं बाजारात दिवस उजाडल्यापासूनच घाई-गडबड...बाजार भरतो त्या गावातील शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या गावातली मंडळीही आपापल्या शेतातला जिन्नस विकायला घेऊन येत राहतात...कुणी बैलगाडीतून, कुणी डोक्यावर तर कुणी गाडीबिडीतनं सामानाची रास बाजाराच्या ठिकाणी लावत राहतो...मोक्याच्या जागेवर सलीदा, ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा कागद अंथरून पथारी पसरण्याची प्रत्येकाची
धांदल...आणलेली भाजी, फळं लोकांना दिसतील अशा पद्धतीनं लाऊन आरोळी ठोकण्यासाठी विक्रेते सज्ज होत राहतात...कुणीतरी बाजाराशेजारी घातलेल्या मांडवात जिलेबी, पेढे, बत्ताशांच्या मोठमोठाल्या पराती मन भरावं अशा मांडलेला असतात...मांडवावर उरलेल्या कळकाला बांधलेला लाऊडस्पिकरचा कर्णा कसलीबसली गाणी ओकत राहतो...बाजारात सामान विकणाऱ्यांच्या आणि विकत घेणाऱ्यांच्या संवादाला संगीतमय रुपडं आलेलं असतं...विक्रेत्यांच्या आरोळीला म्युझिकल बॅकग्राऊंड मिळालेलं असतंच...

दहा रुपयांच्या मेथीच्या पेंडीला सात रुपयांना मागणाऱ्यांना विक्रेता खत, पाणी, राबताना वाहून गेलेल्या घामाचं महत्व जीवाच्या आकांतानं सांगत राहतो...पंधरा रुपयांना कंदीलाची काच विकणाऱ्यासमोर विकत घेणारी आयबाय डोक्यावर हात मारत महागाईचं गाऱ्हाणं गात राहते...क्षणभराच्या घासाघिसी आणि झोंबाझोंबीनंतर मेथीच्या पेंडीचा आठ रुपयांना तर कंदीलाच्या काचेचा व्यवहार तेरा रुपयांना पार पडतो...एकमेकांशी डोळे वटारून बोलणारे क्षणार्धात एकमेकांना रामराम करत हसऱ्या चेहऱ्यांने निरोप घेत राहतात...गिऱ्हायकाला गंडवलं नसल्याचं आणि आपणही गंडलो नसल्याचं समाधान एकमेकांत मिसळत अख्ख्या बाजारात दुकानागणिक नवी नाती जन्म घेत राहतात...बाजाराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर गारीगाsssर असं कोकलंत सायकल घेऊन एकजण उभा ठाकलेला असतोच...सायकलीच्या नळीला बांधलेल्या घंटीचा टणटण आवाज पोरांच्या कानांना साद घालत राहतो...पैरणीच्या कोपऱ्याला ओढत पोरगं बापाला गारीगारवाल्याकडं ओढत नेत असतं...आढेवेढे घेत बापही पोराला रुपयाचं गारीगार देऊ पाहतो...गारीगाराच्या काडीला धरून पोरगं लालेला बर्फाचा गोळा चोखत घराकडे उड्या हाणत निघतं...गारीगारवाल्याभोवती पोरांचा गरांडा पडलेला असतोच...

इतक्यात बाजारात गलका उडतो...हाईक-हाईक म्हणत कुणीतरी मांडलेल्या पथारींच्या मधल्या रस्त्याने धावत राहतो...गर्दीने भरलेल्या बाजारात डेअरिंग करत घुसलेल्या जाण्या गायीला बाहेर हाकलून हातातली काठी नाचवत आपल्या दुकानात येऊन बसतो...दुकानांच्या मागून भटक्या कुत्र्यांचा वास काढत फिरण्याचा कार्यक्रम अखंडपणे चालूच असतो...उगाच एखादी म्हातारी शेजारचा दगडाचा खडा उचलून कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत राहते...बोंबील, सुकटीवर बसलेल्या माशांना हाकलताना दुकानदाराचा हात दुखत नाही...

हा-हा म्हणता दिवस कलायला लागलेला असतो...पिशव्या भरभरून लोकं घराकडे कूच करत राहतात...चेहऱ्यावर आनंदाची लकेर घेऊन लोकांचे जत्थेच्या जत्थे बाजारातून बाहेर पडत राहतात...हातात खेळणी, खुळखुळे, पिपाण्या घेऊन पोरं मोठ्या उल्हासाने चालत राहतात...आयुष्याची संध्याकाळ झालेला एखादा म्हातारा कमरेत वाकून दुडक्या चालीनं काठी टेकवत घराकडे निघालेला असतो...खिशात दमडीही नसलेला गरीबाचा पोरगा गारीगारवाल्याच्या बाजूला दुपारपास्नं ताटकळलेला असतो...गारीगार चोखून इतर पोरांचे लालबुंद झालेले ओठ आवंढा गिळत पाहात दिवसभर रेंगाळलेला असतो...पोरांची गर्दी कमी झाल्याने गारीगारवाला पेटीला झाकण लाऊन निघण्याची तयारी करतो तसा पोरगा हिरमुसल्या चेहऱ्यानं घराकडे चालू लागतो...सायकलीवर चढलेला गारीगारवाला पायंडल मारता-मारता थबकतो...पोराला हाक मारून राहिलेली सगळी गारीगार त्याच्या इवल्याशा हातावर ठेऊ पाहतो...पोरग्याचं इवलंस आभाळ गारीगाराच्या रंगानं रंगून जातं...

जसजसा काळोख कोसळू लागेल तसतसा बाजारातला कोलाहल मान टाकत जातो...शिल्लक राहिलेली भाजी उतरत्या दरानं विकून दुकानदार पथारी आवरू लागतो...दिवसभर गर्दीच्या आवाजाची सवय लागलेल्या कानांना शुकशुकाटाचा, शांततेचा आवाज बोचत राहतो...बाजार ऐन भरात असताना आरोळ्या मारण्यातला
हुरूप कुठल्याकुठं विरगळून गेलेला असतो...दिवसभर मानसाळलेल्या बाजाराच्या परिसराला अंधारानं गिळून टाकलेलं असतं...अख्खा बाजार उदास, भकास होत पेंगू पाहतो...दिवसभर साथसंगत करणारे दुकानदार, गिऱ्हाईक सोडून गेल्यानं बाजाराचा परिसर रुसून बसल्यासारखा भासत राहतो...रुसलेल्या बाजाराच्या अंगाखांद्यावर मोकाट जनावरांनी थैमान मांडलेलं असतं...चारी बाजूंनी वेढलेल्या एकाकी बेटासारखी बाजाराच्या परिसराची अवस्था झालेली असते...अग्नी दिल्यानंतर रक्ताच्या नात्याचे नातेवाईक निघून गेल्यावरही धडधडत राहणाऱ्या चितेसारखा बाजार आतून धुमसत राहतो...आठवड्याने होणाऱ्या पुनर्जन्माची वाट बघत...

आपलं आयुष्यही एकप्रकारचा बाजारच...प्रत्येक दिवशी बाजार भरवायचा, सकाळचा हुरूप संध्याकाळपर्यंत वापरत उधळून टाकायचा...जो काही खरे-खोटेपणाचा रंग भरायचा तो हुरूप असतानाच..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा