गुरुवार, २१ मे, २०१५

हा कसला टाईमपास..?

गावात तिकडं निजानिज होत असताना काजव्यांच्या साक्षीनं काळ्याकभिन्न वाटेनं तो चालत राहतो...दिवसभर गुराढोरांच्या श्वासानं मोहरलेला तलाव का म्हणून कुणास ठावूक पण उताणा पहुडलेला असतो....गावाच्या शेजारी दहा-बारा शेता-वावराच्या पल्याड तलावात सुकुमार चंद्राचं प्रतिबिंब हेलकावत राहताना तो बघत राहतो…वाऱ्याच्या झुळुकीनं तालेवार हलणारं पाणी चंद्राला गोंजारत असल्याचं बघताना तो मात्र निश्चल, स्थितप्रज्ञ होऊन गेलेला असतो...तलावाच्या कडेला बांधलेल्या कट्ट्यावर एक पाय ठेवून गुडघ्यावर कोपर आणि हनुवटीला तळहात लावून पाण्यात पडलेल्या चंद्रावरून नजर हटत नाही त्याची अजिबात...

रात्र कुस बदलण्याच्या तयारीत असताना संक्रांतीला माहेरी आलेली ‘ती’ त्याच्या डोळ्यांसमोरून हटत नाही...लहानपणी शाळेत जाताना परकर-पोलक्यात दिसलेली ‘ती’, तिन्ही सांजेला तेलवात घालायला आईसोबत देवळात जाताना दिसलेली ‘ती’, जत्रेत तिच्याच वयाच्या पोरींसोबत पाळण्यात बसून निरागसपणे खिदळताना दिसलेली ‘ती’, शाळेतल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसल्यावर दोन वेण्या आणि त्यांना बांधलेल्या रिबिनींच्या आडून अर्धीमूर्धी दिसणारी ‘ती’, दिवाळीला वासाचं तेल लावून, नवी कपडे घालून भल्या पहाटे घरासमोर चाफ्याच्या झाडाखाली लवंगी फटाक्यांचा सर पेटवून कानाला हात लावत घाबरून पळत जाताना दिसलेली ‘ती’, संध्याकाळच्या वेळी अंगणातल्या ओट्यावर तांदूळ निवडताना दिसलेली ‘ती’, चालताना दिसलेली ‘ती’...हसताना दिसलेली ‘ती’,...बसलेली ‘ती’, जाताना, येताना, धावताना दिसलेली ‘ती’...

सारं सारं आठवत तो जुन्या दिवसांच्या कुशीतली ऊब अनुभूवत राहतो...माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस असं बोलण्याचं धाडस कधीच केलेलं नसतं त्यानं...मनातल्या मनात चेतवलेल्या प्रेमाचा दिवा त्यानं निष्ठेनं जपलेला असतोच...आपल्यासाठी भावनांची वात करून कुठंतरी दिवा तेवत राहिलाय याची तिला कल्पना होती की नाही कुणास ठाऊक? पण तिच्या लग्नातल्या जेवणावळींच्या पंगतीतही तो हसऱ्या चेहऱ्याने वाढप्याचं काम करत राहतो...तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांना हे वाढू का?, ते वाढू का म्हणून आपुलकीने आग्रह करत राहतो...मंगलाष्टकांच्या गदारोळात अक्षदा टाकताना थरथरणाऱ्या हातांचा कंप मात्र त्याच्या हाताला आज होताच...तिच्या लग्नानंतर एव्हाना चार-पाच वर्ष लोटलेली असतानाही लग्नानंतर गाडीत बसून सासरी जाताना तिचा दिसलेला चेहरा आठवल्यासरशी तो विजेच्या वेगाने माघारी फिरून झपाझप पावलं टाकत राहतो...परड्यातल्या फाटक्या वाकळेवर अंग टाकून देत झोपून जातो...सकाळी उगवणारा सूर्य त्याच्या पदरात कसला दिवस देणार आहे देव जाणे...

परवा एक सहकारी सांगत होती, “प्रेमा-बिमाचं काय असतं? हल्ली आयुष्यभर टिकावं असं प्रेम असतंच कुठं आणि ते असावं तरी कशासाठी? काळ बदलेल तसे विचार बदलतात, विचार बदलले की काही गोष्टी नकोशा वाटतात, मग प्रेम कालबाह्य वाटतं, त्यातला चार्म संपतो....हे एकदा समजलं की दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...पुन्हा कुणी कुणाच्या वाटेत यायचं नाही...” ती बोलत होती पण मला टोटल लागत नव्हती...हे सर्व सांगताना ती वारंवार ब्रेकअप नावाची गोंडस व्याख्या सांगत होती...मनात आज असलेली व्यक्ती उद्या नकोशी वाटू शकते हेच मला अघोरी वाटतंय...आपल्याला हवा तसा समोरच्यात बदल करायचा, त्याने तो बदल केला तरच त्याच्यावर प्रेम करायचं, नाहीच बदल होऊ शकला तर दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...मला वाटतं यात समर्पण नावाची गोष्ट वजा शून्य आहे...आपल्याला हवा तसा बदल करायचा आणि मग आपलं म्हणायचं हे स्वत:वर प्रेम करण्यासारखं नाही का?

मागे एकजण सांगत होते, त्याच्या नातेवाईकाची कुणी मुलगी मोबाईलवर चॅट करताना सापडली, घरच्यांनी बदड बदड बदडली...पण धक्कादायक गोष्ट ही की ती मुलगी एकाचवेळी दोन मुलांशी चॅटिंग करत होती...एकाचवेळी दोन्ही मुलांशी प्रेमाच्या आणाभाका घेत होती...काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये दोन मुलं बोलत होती...”अरे उद्या अमूकला पिक्चरला घेऊन जायचंय, परवा तमूकला रिसॉर्टला घेऊन जायचंय, दोन-दोन लफडी सांभाळायची म्हणजे घायकुतीला यायला होतंय यार, एका कुणालातरी ब्रेक करावं लागेल” हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हिमालय जिंकल्याचा अविर्भाव होता...

हा कसला काळ आलाय, काहीच समजेना...त्यांचं बरोबर असेलही पण हा नवपोपटवर्ग निर्मळ प्रेमभावनेचा, निरागसपणे जीव जडण्याच्या युगाचा गळा तर घोटत नाही ना? चंगळवाद, उपभोगवाद बोकाळलाय का? ज्याला जसं जगायचंय त्याच्या अधिकाराला बोट लावण्याचा आपणास अधिकार नाही; पण मग हे सर्व करताना ते प्रेमाच्या पावित्र्याला नख का लावत असावेत? भिल्लासारखं प्रेम करत आभाळाला पोहोचण्याची स्वप्न मातीमोल करताना जीव पिळवटून कसा निघत नाही यांचा? देवदत्त मिळालेली रक्ताची नाती आपण हवी तेव्हा नाकारू शकत नाही मग ही मनाने निर्माण झालेली नाती झुगारण्याची हिम्मत येते कुठून?

आधुनिकीकरणाच्या धबडग्यात घड्याळाचे काटे, कॅलेंडरचे आकडे तोकडे पडू लागलेत, वेळच पुरत नसल्याची ओरड जिथंतिथं कानावर येतेय, म्हणून प्रेमाबिमाला टाईमच नाही म्हणतायत लोक, कामाचं, करिअरचं, संसाराचं टेन्शन मानगुटीवर असताना प्रेमाचं नसतं झेंगाट कशाला असाही सूर हल्ली एेकायला मिळतोय, पण मग असं असलं तरी टाईमपाससाठी प्रेमाची नौटंकी करणाऱ्यांचीही संख्या बोकाळतीय...मित्रहो, प्रेम ही टाईमपासची गोष्ट नाही, प्रेमाला नैतिकतेचं आणि पावित्र्याचं अधिष्ठान दिलं तर पास टेन्स संपन्न होऊन जाईल, मग ते प्रेम मिळो अगर न मिळो...ते प्रेम व्यक्त होवो अगर जिंदगीभर अव्यक्त राहो..! पण त्यासाठी जीव जडल्यावर आतून दाटलेल्या व्याकूळतेची भाषा समजून घेण्यासाठी, एखाद्याच्या निर्व्याज प्रेमाची गाज ऐकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवायला नकोत का?

मित्रहो, वर सांगितलेल्या अव्यक्त आणि तितक्याच निर्मळ प्रेमकहाण्या आपल्याला गावोगावी दिसतील...प्रेम आहे पण तिला कधी सांगितलं नाही अशी अव्यक्त नाती गावोगावी जन्मली पण प्रेमानं बाळसं काही धरलं नाही...तिच्या नावाच्या पहिल्या अक्षरांनी प्रत्येक वहीच्या शेवटच्या पानावर गर्दी केलेली असेल...अभ्यासाला गेल्यावर चपट्या दगडाने तिच्या नावांनी अख्ख्या शिवारातील झाडांची खोडं गिरवली असतील...नदीच्या खडकावर, डोंगरातल्या देवळाच्या दगडांवर, हाताच्या तळहातावर बॉलपेनने तिच्या नावाचं रोजच्यारोज गोंदण करणं हे त्यांचं व्यक्त होणं...त्याकाळी प्रेम करायची अशी तऱ्हा जोपासणाऱ्या अनेक पिढ्या गावागावात अाजही वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दिसतील...त्यांच्या मनातलं प्रेम स्वत:पुरतं का होईना अजूनही जिवंत आहे...कारण काय असेल त्या प्रेमाच्या जिवंतपणाचं? मित्रहो, तुम्हाला काय वाटतं..?

अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत...जन्माला येतील पण वाढत नाहीत...आणि वाढत नाहीत म्हणून संपत नाहीत...बस्स इतकंच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा