शुक्रवार, १५ जुलै, २०१६

योग कर्मसु कौशल्यम्

बाहेरच्या रस्त्यांवर कामावर जाणाऱ्यांची वर्दळ वाढलेली असतेच. वेळेत गाडी पकडण्यासाठी बाया-बाप्ये ओल्या केसांनी, डब्यांच्या बॅगा सांभाळत धावतपळत स्टेशनकडे चाललेले असतात...दूधवाला-पेपरवाला सायकलवरून येत जात राहतो...रस्त्यांकडेला थाटलेल्या गाड्यांवरून वडा-मिसळ-उसळ, आलेदार चहाच्या वासाचा झणका आल्हाद देतो...स्टेशन जवळच असल्याने स्टेशनातल्या अनाऊन्समेंटचा किंवा ट्रेनच्या भोंग्याचा आवाज अधनं-मधनं येत राहतो....आणि अशा सगळ्या वातावरणात चिंचपोकळीच्या डॉक्टर कम्पाऊडजवळच्या इमारतीतील छोट्या कार्यालयात सकाळी सकाळी लगबग उडालेली असते...कसल्या-कसल्या कागदाच्या गुंडाळ्या काखेत टाकून लोक सकाळीसकाळी जमलेले असतात...वाट बघत बसलेल्या सर्वांना तुपे नावाचा शिपाई हसऱ्या चेहऱ्याने चहाचं फुलपात्र देत राहतो...पोरा-पोरीचं लग्न, घराचं काम, नोकरी लागत नसल्याने पोराला रिक्षा घेऊन द्यायचीय, पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या  चाळीतल्या पाच-पन्नास लोकांच्या मुक्कामाची सोय करायचीय, हरिनाम सप्ताहाचं नियोजन, वारकरी मेळावा, कुठल्यातरी गावाजवळच्या डोंगरात वृक्षारोपण, वधु-वर मेळाव्याचं आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश आणि अशीच कसली कसली कामं घेऊन लोक सकाळच्या पारी चिंचपोकळीचा रस्ता धरतात...प्रोग्रेसिव्ह ब इमारतीत जमतात...कार्यालयात बाबामहाराज सातारकरांच्या मंजूळ गगनभेदी आवाजात राम कृष्ण हरीचा जयघोष अखंड चालूच असतो...अगरबत्तीच्या दरवळाच्या मांगल्याचा आनंद घेणाऱ्या लोकांवर विठ्ठलाच्या भल्यामोठ्या मूर्तीची कृपादृष्टी असतेच...एव्हाना सकाळचे नऊ वाजत आलेले असतात...एकेक कर्मचारी कार्यालयात येऊन मस्टरवर सह्या करून आपापल्या विभागाकडे निघून गेलेले असतात...कार्यालयात लोकांची अजून गर्दी वाढते...प्रत्येकजण ओळखी-अनोळखी लोकांशी संवाद साधत बसलेले असतात...इतक्यात कोणतरी कुजबुजतं...नाना आले...नाना आले..!

जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटते. सावळ्या रंगाची उंचीपुरी, आपल्या घरातली वाटावी अशी, गंभीर पण प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती कार्यालयाच्या उंबरठ्याला वाकून नमस्कार करते आणि सर्वजण आदरपूर्वक उभे राहतात...कार्यालयाबाहेर जमलेल्या चपलांच्या ढिगात नानांची चप्पल विसावते...नाना कार्यालयातील केबिनमध्ये प्रवेश करताच उभे राहिलेले सर्वजण खाली बसतात...केबिनमध्ये लावलेल्या विठ्ठलाच्या फोटोला मनोभावे नमस्कार करत नाना खुर्चीत विसावतात आणि सुरू होतो दिवस...असा सुरू होणारा दिवस हे कार्यालय गेल्या तब्बल 27 वर्षांपासून अविरत पाहात आलेलं असतं...जमलेल्या माणसांमधून एकेकाला आत बोलावण्याऐवजी नाना पाच-सहा अशा गटा गटाने बोलावतात...आत गेल्याबरोबर कुणी हात जोडून नमस्कार करतं तर कुणी नानांचा हात हातात घेऊन हस्तांदोलन करतं...नाना प्रत्येकाचं हसतमुख चेहऱ्याने स्वागत करतात...कुणी पाया पडण्यासाठी खाली वाकायला लागलं की नाना किंचित चिडून विरोध करतात आणि शेजारच्या विठ्ठलाकडे हात दाखवतात...कदाचित अनेक वर्षांच्या अनुभवामुळे पाया पडणाऱ्यांची मात्र नानांनी अडचण करून ठेवलीय...त्यांच्या टेबलची रचनाच अशी करून ठेवलीय की त्यांचे पाय कुणाला दिसूच नयेत...मग पाया पडायचं तर लांबच....बसलेल्या सर्वांना नाना चहा विचारतात...कुणी चहाचं राहिलं असेल तर तुपेला सांगून चहा पिण्याचा आग्रह करतात...

“ही संस्था म्हणजे एक प्रकारचं शेत आहे, याची मालकी सभासद आणि ठेवीदारांची आहे. कर्जदार हे या शेतीतून आलेल्या शेतमालाचे ग्राहक असतात आणि आम्ही संचालक या शेतीची राखण करणारे राखणदार असतो, संस्थेच्या दारातून येणाऱ्या प्रत्येक पैशाला व्याज द्यावं लागतं त्यामुळे संस्थेच्या दारातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पैशाला व्याज घ्यावं लागेलच. त्यामुळे तुमच्या कर्जाचं व्याज माफ करता येणार नाही, तुमची परिस्थिती पाहता आपण नियमात बसेल तेवढा केवळ दंड कमी करू शकतो, यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही” कर्जदाराला स्पष्ट भाषेत सांगत नानांनी हात जोडलेले असतात. कर्जदाराना मनोमन पटतं आणि तोसुद्धा नानांना नमस्कार करत निघून जातो. पुढे एकेकाचे ऐकून घेत नाना प्रकरणं रफादफा करत राहतात...बघू-करूची भाषा नाहीच. होईल तर कसं होईल किंवा कोणत्या नियमानुसार होईल हे सांगतानाच काम होणार नसेल तर कसं होणार नाही हे नाना नियमावर बोट ठेवत स्पष्टपणे सांगतात. शेंबडात माशी अडकल्यासारखं काम लोंबकळत ठेवणं नानांना जमत नाहीच. ज्यांचं काम होईल त्याबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून बोलवून तिथल्या तिथं आदेश-सूचना दिल्या जातात. एव्हाना बारा वाजत आलेले असतात. भेटायला आलेल्या शेवटच्या माणसाशी बोलणं संपलं की नाना बाहेर पडतात. बाहेर जाताना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे काल सांगितलेल्या कामांचा पाठपुरावा करत नाना बाहेर पडतात.

मग सुरू होतो मुंबईसह उपनगरात पसरेल्या शाखांना भेटी देण्यासाठीचा प्रवास. शाखांना भेटी देण्याचे नानांचे वार-वेळा ठरलेल्या असतात. एका मार्गावरच्या शाखा एका दिवशी असं त्याचं स्वरूप. ग्रामीण भागांतील शाखांना नाना शनिवारी किंवा रविवारी भेटी देत राहतात...त्या-त्या शाखांतील अधिकाऱ्यांनी समस्या असणाऱ्या सभासद-ठेवीदार किंवा तत्सम लोकांना नानांच्या ठरलेल्या वेळेला बोलावून ठेवलेलं असतंच. क्वचित प्रसंगी काही कारणास्तव किंवा इतर कार्यक्रमास्तव भेट रद्द झाली तर नाना शाखांना आधीच
कळवतात. नाना शाखांना जेव्हा भेटी देतात तेव्हा शाखेबाहेर साचलेल्या कचऱ्यापासून ते देव्हाऱ्यातल्या दिव्यापर्यंत नानांची नजर असते. शाखेच्या उंबरठ्याला वाकून हात लावू आत शिरल्याबरोबर नाना मॅनेजरला दारातल्या कचऱ्याबद्दल सूचना देतात आणि पुढे जाऊन प्रत्येक शाखेत स्थानापन्न केलेल्या विठ्ठलाच्या पाच फुटी मूर्तीचं दर्शन घेऊन खुर्चीवर बसतात. आलेल्या ठेवीदारांच्या समस्यांचं निराकरण करून प्रत्येक कर्मचाऱ्याची विचारपूस करत त्यांच्या समस्यांबद्दल जनरल मॅनेजरला लगोलग फोन करून सूचना देत नाना पुढच्या शाखेकडे कूच करतात. जेवणाचा डबा सोबत असतोच. वेळ मिळाला तर शाखेत नाहीतर गाडीत जेवण आटोपत नाना ठरलेल्या शाखांकडे सरकत राहतात. शेवटची शाखा करून निघताना घराकडे जाणाऱ्या मार्गावर एखादा कर्मचारी राहात असेल तर त्याला गाडीतून घरापर्यंत पोहोचवत, रस्त्यावर एखाद्या कर्मचारी-पदाधिकाऱ्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तर तिथं भेट देऊन घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजत आलेले असतात. घरी आल्यावरही पेपर किंवा गाडीत वाचायचं अर्धवट राहिलेलं पुस्तक नाना वाचत राहतात. एखादा कर्मचारी मग तो शिपाई असो की अधिकारी किंवा पदाधिकारी त्याच्या घरी कोणताही कार्यक्रम असला की नाना आवर्जून उपस्थित राहतात. कुणाच्या घरी कुणाचं निधन झालं तर नाना रात्र-दिवस किंवा किती लांब आहे हे न पाहता सांत्वन करायला पोहोचतात. आजारी असो की अजून काही नानांचा हा शिरस्ता गेल्या 27 वर्षांपासून सुरूय.

नानांच्या संस्थेचं नाव न्यू सातारा जिल्हा नागरिक पतसंस्था. प्रसूती वेदनेचा कल्लोळ उठतो तेव्हाच गोंडस बाळाचा जन्म होतो. संस्थेला जन्माला घालण्यामागेही एक वेदना होती. जी होती कष्टकरी, घामधारी जनतेच्या मनात चाललेल्या घालमेलीची..! मायानगरी मुंबापुरीच्या धबडग्यात मराठी माणसाची होणारी आर्थिक घुसमट नानांनी पाहिली. डिलाईल रोड, चिंचपोकळी, लालबागसारख्या भागात त्याकाळी मिल किंवा भाजी मार्केट आणि कपडा बाजारात हमाली करणाऱ्यांची वस्ती. नोकरी करणाऱ्या बाप्यांना खानावळ चालवत, भाजी विकत मदत करत बायामाणसं घराचा गाडा हाकत...त्यात पोरांचं शिक्षण, पोरीचं लग्न, बहिणीचं लग्न, शेता-वावरातली कामं, आई-बापाचं आजारपण अशा सगळ्या मोठ्या खर्चांचा गाडा खांद्यावर असायचाच...तुटपुंज्या पगारात भागेना म्हणून सावकाराच्या हातापाया पडलं जायचं... सावकार दारात उभा राहिल्यावर निराधार बसलेले बाप्ये, लाज सावरत पदराचा बोळा तोंडात कोंबून दारामागे मुसमुसणाऱ्या बाया, निरागसपणे मान खाली टाकून पायाच्या बोटाने भुई उकरणारी उमदी पोरं अन् वयात येऊनही बापाची पैशांच्या चणचणीमुळे लोंबकळणारी इभ्रत बघणाऱ्या हताश पोरी आणि अद्वातद्वा बोलणारा सावकार इथं-तिथं दिसायचा..डिलाईल रोडवरच्या गावच्या गाळ्यात राहणारे अनेकजण सुट्टीदिवशी फुटपाथवर चार-पाच कप्प्यांचा डब्बा शेजारी ठेऊन डोक्याला हात लावून बसायचे...बायका पोरांचा मुंबईतला खर्च भागवत, पोटाला चिमटा काढत लोक गावाकडं हणुवटीला हात लावून बसलेल्या म्हातारा-म्हातारीला पैकापाणी पाठवण्याचा तो काळ...तो काळ होता 1985 चा...

हे सर्व पाहून नानांच्या उरात अस्वस्थता उचंबळून यायची. हे आपले लोक आहेत. त्यांना बँका दारात उभं करत नाहीत. त्यांनी जायचं कुठं..? संकटं-समस्यांच्या उन्हात चाचपडणाऱ्यांना आर्थिक सावलीचं केंद्र बनायला हवं. आतून उर्मी आली आणि नानांनी 1985 साली पतसंस्थेचा प्रयोग केला...अनुभवाच्या अभावाने तो प्रयोग फसला पण नाना शांत बसले नाहीत...त्रुटींचा अभ्यास करून 1989 साली पुन्हा बांधणी केली आणि आबा यादव, सूर्यकांत वाडकर, एम. आर. वरे, दशरथ शिंगाडे, नामदेव कोचळे, एन. डी. वरे, जी. बी. पाटील अशा सहकाऱ्यांना घेऊन 1990 साली न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली...चिंचपोकळीच्या छोट्या खोलीत सहकाराची पणती चेतली...

त्याकाळात कर्मचारी मिळेनात म्हणून नानांनी गावावरून दोन-तीन तरुणांना मुंबईत आणलं आणि संस्थेत कामाला ठेवलं...खानावळ-घरभाडं-सकाळचा चहा-वाटखर्ची अशा खर्चाचा हिशोब लावत नानांनी कर्मचाऱ्यांना 300 रुपयांचा पगार दिला...पतसंस्थेचा विस्तार वाढत होताच, वेदनेच्या हुंकारातून जन्मलेल्या पालवीने गोरगरीब गरजवंतांच्या तोंडावरून मायेचा हात फिरवत मुंबईभर हातपाय पसरायला सुरुवात केली...घाटकोपर, धारावीला दुसरं-तिसरं पुष्प विनत संस्था मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. स्पष्ट विचार आणि ठाम भूमिकेच्या जोरावर नानांनी सहकार्यांच्या मदतीने संस्थेला नवा आयाम मिळवून दिला. मोबाईलचा काळ नव्हता तेव्हा दररोज पाच रुपये भरणारा ग्राहकही थेट नानांना संस्थेत फोन करायचा...रोज हजार-दोन हजार भरणाऱ्याला आणि दररोज पाच रुपये भरणाऱ्या नाना तितकाच वेळ द्यायचे...त्यांच्या लेखी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा...

1996 चा काळ असावा...नाना पंढरपूरहून मुंबईकडे येताना रात्रीच्या वेळी कुणी सायकलस्वार नानांच्या गाडीखाली आला...वीस-तीस फूट फरफटत गेल्यावर गाडी थांबली...पाहिलं तर तो मरणयातना भोगत होता...रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं...त्याला तसाच रक्ताच्या थोराळ्यात टाकून निघून जाणं अवघड नव्हतं...इतर गाडीवाल्यांनी नानांना तो सल्ला दिलाही, पण नानांनी पळ काढला नाही...”त्याला वाचवलं पाहिजे, तो मरेल” म्हणत नानांनी भर अंधारात त्याला दवाखान्यात नेलं...जिथं नेलं तिथं उपचार होईनात, पुढे मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळाला...नानांनी धावपळ करत रुग्णवाहिका शोधली...त्याला मोठ्या दवाखान्यात उपचाराला दाखल करून, त्याच्या नातेवाईकांना बोलावूनच नाना निघाले... इथंच एक प्रकाशमान ठिणगी पडली...रुग्णवाहिका अवघ्या दीड रुपये किलोमीटर भाड्याने मिळाली होती...नाना रस्त्याने विचार करत राहिले...आणि तिथंच मनोमन ठरवलं की संस्थेची रुग्णवाहिका घ्यायची...मुंबई आल्याबरोबर रुग्णवाहिका घेऊन लोकांच्या सेवेत अर्पण केली...न्यू सातारा वेल्फेअर हे त्या संस्थेचं नावं...आता चार एक रुग्णवाहिका संस्थेच्या पदरी आहेत...ठिणगी ही ठिणगी असते, ती कशावर पडते यावर तिचं अस्तित्व ठरतं...ती दगड-पाण्यावर पडली तर विझून जाते...पण सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेल्या पणतीवर पडली तर स्वत: प्रकाशमान होते आणि अंधारात चाचपडणाऱ्यांना संधीप्रकाश बहाल करते...

पुढे पुढे संस्थेच्या शाखांचा जसा विस्तार वटवृक्षासारखा वाढला तसा नानांच्या कल्पनेतून मानवतेची सावली देणाऱ्या पोटसंस्थांच्या पारंब्याही निर्माण झाल्या...मजूर संस्था, परिवहन संस्था, भव्य पॉलिटेक्निक कॉलेज, विद्यामंदिर शाळा, गृहनिर्माण संस्था, पंढरपूरचं सुसज्ज भक्त निवास संकुल, पसरणीची गोशाळा, शाहीर साबळे प्रतिष्ठान, मुद्रण संस्था, वारकरी प्रबोधन संस्था, आम्ही सातारकर प्रतिष्ठान, साप्ताहिक महासत्ता अशा कितीतरी माध्यमातून नानांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजांना मूर्त स्वरूप दिले...रक्तदान शिबिरं, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना मदत, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव, महिला, वृद्धांचा गौरव असे उपक्रम तर आहेतच... बाबामहाराज सातारकरांचा हरिनाम सप्ताह सुमारे दीड-दोन दशकं भरवत नानांनी अध्यात्मिक अमृताचा ठेवा भाविकांना उपलब्ध करून दिला...

लोकहो, हा प्रवास सोपा नाही, न की हा प्रवास विनासायास झालाय...किती संकटं आणि किती समस्या..! “संकटं हवीच, ती नसतील तर आयुष्य एकसुरी होईल, संकटं आपल्याला घायाळ करतात असं मानायचं कारण नाही, उलट संकटं आपल्याला खंबीर होण्याची संधी देतात आणि आपला सरावही करून घेतात...संस्थेच्या सुरुवातीला आर्थिक चणचण भासली तेव्हा घरातलं सोनं गहाण ठेवलं, पण वाटचाल चालू ठेवली...निंदा-विरोध करणारी माणसं नसती तर अवघड झालं असतं जगाचं...रावण होता म्हणून रामाला महत्त्व आहे”  विठ्ठलाच्या फोटोकडे हात दाखवत सांगताना नानांच्या डोळ्यांत विलक्षण चमक जाणवते... ”समस्या कोणतीही असो, काळ हा सर्वावरचा सर्वात मोठा उपाय असतो, काळ जे शिकवतो ते शिकवणारं विद्यापीठ जगात कुठंच नाही...शरीरावर झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी बाजारात औषधं मिळतील पण, मनावर झालेले शाब्दिक वार बरे करण्यासाठी अंतरीतून औषध तयार होतं...असं आतून औषध तयार होण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची, ती सकारात्मकता आपल्याला आपल्या प्रामाणिकपणातून मिळते, लोकांच्या गरजांमध्ये मदत केल्यावर वाटणारं समाधान ते औषध निर्माण करतं” नाना एकेक वाक्य बोलत राहतात आणि कसा घडलाय हा माणूस असा प्रश्न उभा राहतो...

शिक्षणासाठी मुंबईत येऊन धडकलेला हा माणूस पुढे पोर्ट ट्रस्टची नोकरी करू लागला...संस्थेची वाढ होत गेली आणि नोकरी सोडून संस्थेच्या भरभराटीसाठी अहोरात्र राबू लागला...34 हजार 800 रुपयांच्या शिदोरीवर सुरू झालेल्या संस्थेचा पसारा राज्यभरात तब्बल 28 शाखांच्या विस्तारातून, इतर संस्थांच्या अथक कार्यप्रणालीतून झालाय... अष्टपैलूत्वाने न्यू सातारा समूहाचा कारभार चाललाय...

“मला काही कळत नाही असं म्हणण्याचा समजूतदारपणा, मी खूप गरीब आहे असं म्हणण्याचा श्रीमंतपणा आणि मी खूप लहान आहे असं म्हणण्यातला मोठेपणा ज्याला कळला तोच खरा जगज्जेता” असं नेहमी म्हणणारे नाना बोलता बोलता अवचित काळीज चर्रर्रर्र करणारं बोलून जातात की “संस्था जन्माला घातली तेव्हा ती अपत्य होती, आज ती सर्वांची आई झालीय, अजून काही स्वप्न आहेत, ती दृष्टिक्षेपात आहेत...ती पूर्ण झाली की संस्था लोकार्पण करायची आणि निवृत्त व्हायचं...” नाना बोलून जातात पण संस्थेचा डोलारा, प्रवास, तळागाळापर्यंत तिची पोहोचलेली मुळं आणि काय काय डोळ्यांसमोर हेलकावत राहतं...हा लेख लिहला म्हणून प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे नाना रागावतील पण तरी लहान तोंडी मोठा घास घेत एकच सांगावसं वाटतं...

नाना, तो सूर्य पाहा...तो काय म्हणतोय ते ऐका, तो म्हणतोय “दिवसा मी जगातल्या प्रत्येक लेकराला प्रकाश देईन, पण काळ्याकभिन्न संकटांच्या रात्रीत या जगाला रस्ता कोण दाखवणार ? ह्याच काळजीपोटी मी दीपस्तंभ उभे केलेत...” नाना तुम्ही दीपस्तंभ आहात, तुम्हाला हलण्याचा किंवा किनाऱ्याला जाऊन उभं राहण्याचा अधिकार नाही, संस्था स्थापन केल्यापासू तुम्ही एकच खुर्ची वापरता ना? बरे-वाईट दिवस त्याच खुर्चीतून बघत-झेलत तुम्ही आम्हाला चालायला शिकवलं, लढायला शिकवलं, तुम्ही मध्यवर्ती उभे राहा...तसे झाले नाही तर साम्राज्याच्या समुद्रात ही जहाजं हेलकावतील, समस्यांच्या लाटा घाबरवतील...अशावेळी आधारासाठी तुमच्याकडे बघता यायला हवं...आणि आणि...आमच्या वाटचालीवर तुमची करडी नजर हवीच...कारण तुम्हीच शिकवलंय ना “योग कर्मसु कौशल्यम्”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा