शुक्रवार, १५ जुलै, २०१६

मन सुखावणारी चिंधवलीची यात्रा

पांढऱ्या सिमेंटची घरं कुशीत घेऊन, निमशहरी झूल पांघरलेल्या पाचवडवडपासून पूर्वेला दोनएक किलोमिटरवर गेलं की कृष्णा नदीचं नयनवेल्हाळ रुपडं मनाला भुरळ घालतं...पाचवडच्या गजबजाटाचा कानात भरून गेलेला आवाज कुठल्याकुठं विरून जातो अन् नदीकाठच्या झाडांवर, अवकाशात स्वच्छंदपणे फिरणाऱ्या पाखरा-पक्षांचा नाद कानात कुंजारव करत राहतो...कितीतरी पिढ्यांच्या कानांना आनंदाचा रतीब घालणारा नदीच्या अवखळ पाण्याचा खळखळाट आपल्याही कानांना गारवा देतो आणि थेट पूर्वजांशी नातं असल्याची जाणीव करून देतो...तापलेल्या-रापलेल्या सर्वांगाला एव्हाना आल्हाददायक गारवा जाणवू लागलेला असतो... पक्षांचा किलबिलाट,फुलपाखरांची रंगउधळण, शाळा बुडवून किंवा शाळा सुटल्याने नदीच्या डोहात स्वत:ला झोकून देणारी पोरं आणि नदीच्या अर्धकोरड्या पात्रात त्यांची पडलेली अल्लड दफ्तरं, नदीशेजारच्या हिरवळीवर आणि आजूबाजूच्या शेता-वावरात रमतगमत चरणारी गुरं-ढोरं, डोक्यावर गवत-लाकडाच्या ओझ्यानं चेहरा न दिसता रानातून घराकडे जाणाऱ्या आयाबाया अन् त्यांच्या हातातल्या कासऱ्याला ओढ देत मागे चालणाऱ्या शेळ्या...रस्त्यावर वाकलेल्या चिंच-आंबा-लिंब आणि अशाच कशाकशाच्या फांद्या आपल्याला स्पर्ष करण्याचा प्रयत्न करतायत की काय असं वाटत असतानाच कुणी सायकलवरून, कुणी बुलेट किंवा फटफटीवरून सुसाट येतजात राहतं...सबंध भोवतालात असं कायच्याकाय चाललेलं असताना समोर चिंधवली गावची भलीमोठी कमान नजरेस पडते...

कमानीवरची अक्षरं वाचत वाचत आपण नदीचा पूल पार केलेला असतो...चिंधवलीची वेस आणि तिच्या आतलं गाव नजरेच्या टप्प्यात येतं....कृष्णा नदीनं दोन्ही हातांनी दिलेलं दान, नदीच्या कृपादृष्टीनं शेतांना मिळालेला ओलावा चिंधवलीच्या जगण्यात डोकावत राहतो...त्या ओलाव्याला असते समृद्धी आणि समाधानाची किनार...कृष्णामाई ही खऱ्या अर्थानं आई का आहे हे चिंधवलीसारख्या गावांनाच उमजून राहिलेलं असतं...आईच्या पदरात वाढलेलं बाळ जसं टुटुमीत-गुबगुबीत दिसतं तसं चिंधवलीच्या टुमदारपणाला कृष्णेच्या पदराची ऊब मिळाल्याचं जाणवत राहतं...गावात आताशा सिमेंटची भलीमोठी घरं-बंगले,सिमेंट-डांबराचे रस्ते उभारलेत,दरएक घरासमोर दुचाकी-चारचाकी गाड्या दिमाखात उभ्या दिसतात, मोकळ्या जागांमध्ये फाळांना माती चिकटलेले ट्रॅक्टर दिसतात...जगात आधुनिकीकरणाचं वारं बेफाम वाहतंय त्याची झुळूक चिंधवलीलाही लागलीय, पण संस्कृतीला आधुनिकतेचा मुलामा जरी दिला असला तरी संस्कृती मोडून, चोळामोळा करून फेकून दिली नसल्याचं जाणवत राहतं...इथल्या मातीला चिरंतन चिकटलेला परंपरेचा दरवळ लपता लपत नाही...

चिंधवली गाव तसं चार-पाचशे उंबरठ्याचं, इथली लोकसंखा सुमारे तीन हजार...अठरापगड जाती अन् धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदानं नांदतात...इथापे,निकम, पवार,कांबळे, चव्हाण, गायकवाड, फरास, शिंदे, मोरे, जाधव अशा विविध आडनावांचे-जाती-धर्मांचे ग्रामस्थ जात-धर्म विसरून निव्वळ चिंधवलीकर म्हणून जगत राहतात...गावात लग्न असो, बारसं असो की एखाद्याला शेवटचा निरोप देण्याचा बिकट सोहळा...सगळे यथाशक्ती-यथामती आनंद-दु:ख वाटत आणि अनुभूवत राहतात...कुणी गावात राहून शेती करतं, कुणी नोकरीला सातारा-पुणे-मुंबईला राहतं, कुणी कुठंकुठं व्यवसाय करतं पण गावच्या मातीशी नाळ मात्र तुटू देत नाही...रखरखीत उन्हाळ्यात आजूबाजूची गावं वाळक्या गवतासारखी तापत पडलेली असताना चिंधवलीच्या रानाशिवारात मात्र हिरवळीचं कोंदन बारमाही दिसतं...विविधता आणि प्रयोगशीलतेतून चिंधवलीचे ग्रामस्थ शेतात पिकोत्सव साजरा करत असतात...निसर्गाने बहाल केलेल्या वरदानातून समृद्धी साधताना परंपरा,संस्कृती, सणसूद, जयंत्या साजऱ्या केल्या जातात...गेल्या काही वर्षांत चिंधवलीकरांनी डॉल्बीबंदीचा निर्णय घेऊन उत्सवांच्या उत्साहाला संयम आणि शांततेचा आयाम दिला...

गाव म्हटलं की ग्रामदैवत आलंच...दिवाळी-उन्हाळी सुट्टीला गावाकडं फिरकणारे शहरात राहताना ग्रामदेवतेचं स्मरण केल्याशिवाय राहात नाहीत...पोटापाण्यासाठी शेकडो-हजारो मैलावर राहणारे चिंधवलीकर ग्रामदेवता श्री नवलाईच्या दर्शनासाठी आतूर झालेले असतात...सुट्टी संपवून शहराकडे जाताना आई-बापाच्या पायाला हात लावून उठणाऱ्या चिंधवलीकरांचे पाय अपसूक नवलाई देवीच्या मंदिराकडे चालत राहतात...अगदीच धांदल असेल तर क्षणभर थांबून बाहेरूनच कळसाचं दर्शन घेणं मात्र विसरत नाहीत...चहुबाजूंना पोटापाण्यासाठी घरटी उभारलेल्या चिंधवलीकरांना नवलाई देवी खुनावत राहते...

शाळा-कॉलेजांना सुट्ट्या लागलेल्या असतातच...रानाशिवारातलीही कामंधामं बऱ्यापैकी संपलेली असतात...चगळा-काट्याचं काम करणारे वगळता रानात माणूसकाणूस दिसत नसतं...लायटीच्या वेळेनुसार उसा-बिसाला पाणी द्यायचं काम रात्रीच करावं लागत असल्यानं बाप्ये घराशेजारचा सावलीचा आडोसा नाहीतर झाड पकडून भरदुपारी आडवे झालेले असतात...वर्षभर पाटी-पुस्तकानं कुरतडलेली पोरांची डोकी बोडकीच उन्हात भोवरे-लपाछपी-गोट्या-हाणामाऱ्या-लगोऱ्या आणि कायकाय खेळत राहतात...थोराड पोरं उगाच तापल्या सडकेवरून सायकलचे हाफ पायंडल मारत चकाऱ्या हाणत असतात...टण् टण् टण् करत गारीगारवाला, गुलाबी कापूसवाला गावात डेरेदाखल होतो आणि पोरं-टोरं त्याच्याभोवती फेर धरतात...आय-बापासोबत पाचवड नायतर भुंईंजला गेलेलं पोरगं कशाकशानं भरलेल्या पिशव्या घेऊन घराकडं धूम ठोकत...इकडं शेजारपाजारच्या आयाबाया जमून खरावडे-कुरवडे-पापड-सांडगे करण्यात रमून गेलेल्या असतात...कोंबड्या-उंदरांपासून वाचवण्यासाठी कंबरेत वाकलेली म्हातारी त्याची इळभर राखण करत बसते...रणरणता उन्हाळा लाहीलाही करत असताना आणि उन्हाळोत्सव ऐन भरात आलेला असतानाच कुणीतरी कुजबुजतं...बुद्ध पौर्णिमा आली..! बुद्ध पौर्णिमा आली..!!!

पोरांच्या इवल्याशा गालावर आनंदाची लकेर उमटते, नवी कपडे, जिलेबी-गोडीशेव-रेवड्या, तमाशाचा फड अन् खेळण्याची दुकानं पोरांच्या डोळ्यांसमोर पिंगा घालू लागतात...घरात भांडीकुंडी-झाडलोट करणाऱ्या माऊलीच्या डोळ्यांत विलक्षण चमक उमटते, नांदायला गेलेली पोरगी, नातवंडं येणार म्हणून घरातले डब्बे फरसाण-बिस्कीट-चॉकलेटनं भरून ठेवायचं मनोमन ठरवते...घराशेजारच्या गोट्यात म्हशी-बैलांना पाणी पाजणारा पिता आनंदानं पाण्याची बादली म्हशीच्या अंगावर उपडी करून टाकतो...तापलेली म्हैस मान हलवते आणि पित्याच्या आनंदाला गळ्यातल्या घंटीचं अनुमोदन देते...नोकरी-धंद्याला गेलेला पोरगा, सून, त्याची इवलीशी दुडक्या चालीची पोरं येणार आणि गजबजून गेलेलं घर डोळ्यासमोर तराळू लागतं...नवी कपडे...नव्या चपला, तमाशाचा फड, रात्री बारा वाजता चंद्राच्या साक्षीनं निघणारी पालखी, उधळलेला गुलाल, दांडपट्टा, मल्लखांब, मटणाची दुकानं, घराघरांतून आदानाचा दरवळणारा वास, तामानातल्या गरमागरम आदानाचा चटकदार झुरका...पाव्हण्या-रावळ्यांची वर्दळ...आणि काय काय..! जत्रा आलेली असते...जत्रा..! आणि आणि अख्खी चिंधवली जत्रामय होऊन जाते...

हाहा म्हणता जत्रेचा दिवस येऊन समोर राहतो...दिवसभर गावभर फिरताना रात्रीच्या पालखीची लागलेली चाहूल मानात काहूर माजवत राहते...रात्री बाराच्या सुमारास चंद्रानं आभाळ आणि जमीनभर पांढऱ्या प्रकाशाच्या लाह्या पसरलेल्या असताना नवलाई देवीची पालखी मोठ्या दिमाखात बाहेर पडते...नवलाई देवीच्या नावाSSSSSनं चांSSSSगभलंSSSS ची आरोळी गावाच्या वेस-शिवार-पारापर्यंत धडकते आणि गाव तरारून निघतं...दारात आलेल्या पालखीला हळद-कुंकू लावण्याचं ताट तयार करताना सुवासिनींची तारांबळ उडते...गुलालाची उधळण चंद्राच्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात मिसळून वेगळाच रंग चढवते...मजल-दरमजल, घोष-जयघोष करत पालखी गावभर फिरवली जाते...साक्षात नवलाई देवी प्रत्येक आळीत, पेठेत, प्रत्येकाच्या दारात येऊन आशीर्वाद देतेय की काय असं वाटू लागतं... चिंधवलीनं हातपाय पसरल्याने मळा, धनगर वस्ती, रामोशी वस्ती, जॅकवेलजवळची पाटील वस्ती अशा लांबच्या ठिकाणी पालखी जात नसली तरी तिथले बाया-बाप्ये गावात पोराटोरांना घेऊन नवलाईचं, तिच्या पालखीचं दर्शन घेतात अन् गुलालाने माखून निघतात...
पालखीच्या पाया पडताना आयाबाया कृतार्थ होत राहतात...आनंदाला पारावर उरत नाही...पालखीसमोर ढोल-लेझिमचे फेर धरले जातात...पुढे पुढे मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती चिंधवलीकरांच्या काळजाचा ठोका चुकवतात...शिवबाच्या काळापासून चपळाईच्या कौशल्याचा अविभाज्य भाग बनलेल्या दांडपट्ट्याचा मनोहारी खेळ रंगतो...जत्रेतल्या या कसरतींसाठी पोरं, बाप्ये वर्षभर सराव करत राहतात...
पालखीत विराजमान झालेली श्री नवलाई देवी पहाटे दिवस फटाटायला लागेपर्यंत गावभर आशीर्वादाचा वर्षाव करत राहते...आशीर्वादाचा प्रसाद प्रत्येक चिंधवलीकराच्या पदरात टाकून नवलाई पुन्हा मंदिरात विसावते...पांढरीशुभ्र परीटघडीची कपडे घालून आलेले चिंधवलीकर गुलालाच्या रंगाने माखून पहाटेच घराची वाट धरतात...तशाच अंगानं झोपून सकाळी अंघोळीच्या वेळी गुलाबी पाण्यानं नाले वाहत राहतात...चिंधवलीच्या जत्रेतल्या गुलालाचा अभिषेक असा गावभर दिसत राहतो...

सकाळ उजाडते आणि बाप्ये पाचवड, कारखाना, भुईंज किंवा गावात पडलेल्या बोकड-बकऱ्याच्या वाट्याकडे सरकत राहतात...मटणाच्या थैल्या घराघरात शिरू लागतात...घरात बायामाणसांची मसाला, भाकरी करण्याची लगबग उडालेली असते...उन्ह डोक्यावर चढू लागलं की पाव्हणे-रावळे जमू लागतात...मटणाच्या पंगती उठतात...पोरांच्या किलबिलाटानं गाव कलकलाटून जातं...गावातल्या प्रत्येक रस्त्यांवर जत्रेचे सुखासीन ठसे जाणवत राहतात...पाव्हण्यांची पांगापांग होते...जत्रेतल्या खाऊचे पुडे पिशवीत कोंबून सासुरवासिनीनं पोरांचा हात पकडत सासरची वाट धरलेली असते...गुलालाचा मळवट ल्यालेले चिंधवलीतले रस्ते तुडवत जाताना काळीज तुटत राहतं...मुंबई-पुण्याहून जत्रेसाठी आलेले पुन्हा माघारी फिरतात...त्यांची पोरं ‘”नको जाऊया” म्हणत फुंदू लागतात...पोटाची तार मात्र पप्पा-मम्मीला थांबू देत नाही...

गावातून बाहेर पडताना वळून अख्खी चिंधवली डोळ्यांत साठवत, पुन्हा जत्रेला येण्याचं ठरवत गुलालभरली पावलं गावापासून दूर-दूर जात राहतात...मातीशी जोडलेली नाळ पक्की करत..!
वरीसभर गावगाडा नेटानं चालताना यात्रेच्या दोन दिवसांत गाव तरूण होऊन जातं...चिंधवलीकर नवं चैतन्य मिळवतात...ते चैतन्य वर्षभर पुरेल अशी आशा चिंधवलीकरांच्या मनात तेवत राहिलेली असते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा