सोमवार, १८ जुलै, २०१६

सारे शिकूया...पण कधी?

दहावी-बारावीपर्यंत एकत्र शाळेत जाणारी मैत्रीण कॉलेजचा युनिफॉर्म घालून कॉलेजला जातेय आणि चुलीपुढं भाकरी-कालवण करणारी पोरगी आशाळभूतपणे बघत राहते...पैशा-पाण्याने समृद्ध असणाऱ्यांची पोरं उच्चशिक्षणासाठी कॉलेजला रुबाबात जात असताना गरीबांची पोरं मात्र हनुवटीला हात लावून परिस्थितीला सामोरी जातात...कोणतरी भरपेट जेऊन ढेकर देत असताना अर्धपोटी राहणारा हसू शकतो पण ढेकर मात्र काढता येत नसतो...चागंली मार्क मिळूनही केवळ परिस्थितीमुळे घरात बसून राहणाऱ्यांची संख्या कमी नाही...उलट तुलनेने कमी मार्क मिळूनही केवळ आर्थिक सुबत्तेमुळे पोरं उच्च शिक्षण घेतायत...ते तसं शिक्षण घेतायत म्हणून तक्रार नाही किंवा त्यांनी उच्चशिक्षण घेऊ नये असं आपल्याला म्हणायचं नाही...कारण आर्थिक सुबत्ता असणं हा त्यांचा दोष नाही, याच न्यायाने आर्थिक दुर्बलता असणं हासुद्धा गरीब मुलांचा दोष कसा असू शकतो ? पैशापाण्याने जरा बरी अवस्था असणारे किंवा गब्बर असणारे शिक्षण घेऊ शकतात आणि गरीबांची पोरं शेताच्या बांधावर किंवा चुलीपुढं राबताना दिसतात हा या दोघांचाही दोष नसून तो एकूणच व्यवस्थेचा, धोरणांचा दोष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...

सर्वांना शिक्षण मिळायला हवं यासाठी फार पुरातन चळवळी कार्यरत आहेत...शासनही आवश्यक ती पावलं उचलतंय पण तरीही केलेल्या उपाययोजना तळागाळापर्यंत झिरपत नाहीत...कुठल्यातरी एसटी स्टँडच्या थुंकून रंगलेल्या भिंतीवर, टीव्ही-रेडिओच्या फोकनाड जाहिरातींमध्ये नाहीतर जिल्हा परिषद शाळांच्या भिंतींवरच्या पेन्सिलीवर बसलेल्या निरागस मुलांच्या पोस्टरवर ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ची वाक्य झळकतील पण वाड्या-वस्त्यांवर आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या पेन्सिलीची रेष काही उमटताना दिसत नाही...परिस्थितीचा खोडरबर या मुलींचं शिक्षण पुसट करून टाकतोय...गावागावात-वाड्यावस्त्यांवर थोडी चिकित्सक नजर फिरवली तरी शैक्षणिक विषमतेचं दाहक वास्तव आ वासून उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल...स्वप्न पाहणं फुकटात होत असलं तरी ती साकारण्यासाठी तशी परिस्थिती असावी लागते...सर्व शिक्षा अभियानाचे ढोल कुणी कितीही बडवले तरी त्याचा आवाज मात्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत नाहीच...

परवा भोरजवळच्या वडवाडी येथील अभिनव इंजिनियरिंग कॉलेजला जाणं झालं, मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या अभिनवच्या कॅम्पसमध्ये फिरत असताना मुलींची संख्या लक्षणीय दिसली...प्रिन्सिपल प्रशांत पाटील यांची भेट घेतली तर त्यांनी मुलींच्या तांत्रिक शिक्षणाबद्दल मांडलेली मतं डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात...प्रशांत पाटील म्हणतात “शासनाने विविध उपक्रमांमधून मुलींच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन दिलं असलं तरी, मुळात पालकांना या उपक्रमांची माहिती असत नाही...त्यात मुलींना जास्त शिकवून काय उपयोग? अशीही मानसिकता अनेक पालकांची अजूनही दिसतेय, अगदीच वैचारिक पुढारलेपण असलेल्या मुलींना शिकवलं जातं, पण तेही बीए, बीकॉम किंवा बीएससीपर्यंतच...पदवीचं पारंपरिक शिक्षण देण्यात धन्यता मानली जात असताना, तंत्रशिक्षण किंवा चाकोरीबाहेरचं शिक्षण देण्याएवढं प्रबोधन अजून ग्रामीण भागात झालेलं नाही...त्यासाठी सरकारसोबतच सामाजिक संस्था, समाजसेवकांनीही पालकांचं प्रबोधन करणाऱ्या चळवळी उभारायला हव्यात, पण हे सर्व होत असताना तंत्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटनी हात झटकून नामानिराळं राहता कामा नये, विशेषत: ग्रामीण भागातील  टेक्निकल इन्स्टिट्यूटनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे, जगभरात तंत्रशिक्षणाची चाकं वेगानं फिरत असताना आपल्याकडे ती चाकं परिस्थितीच्या दलदलीत रुतलेली दिसतात"  प्रशांत पाटील ताडकन बोलून गेले.

"सामाजिक संस्था, समाजसेवक करतील तेव्हा करतील पण तुमचं इन्स्टिट्यूट यासाठी नेमकं काय करतंय?" एका नामांकित टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलसमोर माझा रोखठोक सवाल पडल्याबरोबर लिहिता-लिहिता पाटील सर उत्साहाने सांगू लागले.

"आमच्या काॅलेजची वार्षिक फी सुमारे 45 हजार आहे, पण ही फी आम्ही फक्त मुलांकडून घेतो, गरीब मुलांना ती फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सूट दिली आहेच, पण मुलींसाठी मात्र आम्ही केवळ 5 हजारांत शिक्षण उपलब्ध करून दिलंय, ज्या मुलींना येणं-जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी मोफत होस्टेलची सोय केलीय, मुलींकडून 5 हजार फी घेताना शासनाच्या लालफितीतून अनुदान मिळालं तर मिळालं, नाहीतर वरचे सुमारे 40 हजार रुपये काॅलेज भरतं...त्यासाठी कालेजनं स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू केलीय, या योजनेतून सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थिनी तंत्रशिक्षणाचे धडे गिरवतायत, इतकंच नाही तर ज्या मुली अभ्यासात तुलनेने कमी पडतायत त्यांना होस्टेलवर मोफत पर्सनल ट्यूशनही दिलं जातं, त्यासाठी काॅलेजचे शिक्षक आपली काॅलेजची ड्यूटी पूर्ण करून एक्स्ट्रा वेळेत हे काम करतात, 6 वाजता काॅलेज सुटलं की नंतर हे पर्सनल ट्यूशन दिलं जातं, वेळप्रसंगी शिक्षक मुक्काम करून मुलींची तयारी करून घेतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा काॅलेजची ड्यूटी करतात" पाटील सर एका श्वासात सगळं सांगून गेले, पण टेक्निकल इन्स्टिट्यूटबद्दलच्या माझ्या पूर्वग्रहांना धक्का लावून गेले, पाटील सरांचं बोलणं यासाठी महत्त्वाचं वाटलं की देशभरात टेक्निकल इन्स्टिट्यूटची नुसती गर्दी झालीय, प्रत्येक शहराजवळ अशा इन्स्टिट्यूटच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत, त्यात तंत्रशिक्षणाच्या नावाखाली चाललेल्या नफेखोरीच्या सुरस कथा माध्यमांमधून वाचायला मिळत असताना अभिनव इन्स्टिट्यूटची ही अनोखी सामाजिक बांधिलकी नक्कीच कौतुकास्पद आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेले पाटील सर या योजनेबद्दल भरभरून सांगत राहतात, मुलींच्या तंत्रशिक्षणाबद्दलची तळमळ त्यांच्या डोळ्यांत दिसत राहते. पाटील सरांसह इतर शिक्षकांनी ही कल्पना मांडल्याक्षणी संस्थेचे संस्थापक राजीव जगताप यांनी हिरवा कंदील दाखवला. शहरात शिक्षण घेतलेल्या राजीव जगताप यांनी
ग्रामीण मुलींसाठी उचललेलं हे पाऊल सर्वांनी उचललं आणि प्रत्येकाच्या मनात ही तळमळ निर्माण झाली तर पुढच्या पिढीला भविष्यात हळहळ करण्याची वेळ येणार नाही हे नक्की. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजधुरिणांनी चेतवलेल्या स्त्री शिक्षणाच्या ज्योतीला अशा अभिवन संवेदनेचं तेल मिळालं तर तंत्रशिक्षित मुलींची मोठी मशाल प्रज्वलित होईल.

परवा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न झालं, मार्कने आपल्या नवजात मुलीला उद्देशून ‘अ लेटर टू अवर डॉटर’ असे पत्र देखील फेसबुकवर पोस्ट केले आहे. मार्क आपल्या नवजात मुलीला पत्रात म्हणतो की, "तू आम्हाला भविष्यासाठी जी उमेद दिली आहेस ते सांगण्यासाठी तुझी आई आणि माझ्याकडे शब्द नाहीत. तुझं नवं आयुष्य हे वचनांनी भरलेलं आहे. तूझ्या नव्या आयुष्याचा शोध घेण्यासाठी तू नेहमी आनंदी आणि सुदृढ राहशील अशी आशा आहे. तू ज्या जगात राहशील त्यावर प्रकाश टाकण्याचं एक निमित्त तू एव्हाना आम्हाला दिलं आहेस. सर्व पालकांप्रमाणेच आम्हालाही तू सध्यापेक्षा आणखी चांगल्या जगात वाढावीस अशी आमचीही इच्छा आहे.
तंत्रज्ञानाने माणसं भरपूर जवळ येतायत. ज्ञान वाढतयं. गरीबी कमी होतेयं. आरोग्य व्यवस्था प्रबळ होतेयं. सर्वच श्रेत्रात होणाऱ्या तांत्रिक प्रगतीमुळे तुला नक्कीच सध्यापेक्षा सर्व सुखसोयी असलेल्या चांगल्या वातावरणात जगता येईल" असे देखील मार्कने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, मुलीच्या स्वागताची बातमी देतानाच मार्कने आपल्या कंपनीचे ९९ टक्के शेअर म्हणजेच जवळपास साडेचार हजार कोटी डॉलर दान करणार असल्याचीही घोषणा केली आहे. गरीबी हटवणे, मुलींच्या आणि एकूणच शिक्षणाचा दर्जा सुधारणे, रोगांचा सामना आणि समान अधिकारांचा प्रसार करणारी एक नवीन संस्था मार्क सुरू करणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी जागतिक पातळीवर अशी संवेदनेची मोट बांधली जातेय. त्याला आपलाही हातभार लागला पाहिजे की नाही?

वर्षानुवर्षे पुरूषी परंपरेनं “स्त्री ”ला माजघराच्या अंधार कोठडीत कोंडून ठेवलं होतं. केवळ स्त्रीलाच नाही तर तिच्यातल्या अस्मितेला, प्रगतीच्या दिशेनं झेपावण्याच्या क्षमतेलाही मर्यादा घातल्या गेल्या. पण माजघराच्या अंधार कोठडीच्या कवडशातून पडणारा जगातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा प्रकाशझोत “ती ”ला खुणावत होता आणि अशातच ज्योतिबा-सावित्रीबाई डॉ. आंबेडकर, शाहू महाराज यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या तीव्र विरोधाला न जुमानता स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे रेटलीच. पूर्वीपासूनच स्त्रीने घर सांभाळायचे आणि पुरूषाने नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडायचे असा “रिवाज ”जोपासला जात होता. आता ते चित्र बदलू लागलंय. पुरूषी परंपरेनं घट्ट पाय रोवलेल्या चिरेबंदी वाड्याचा उंबरठा स्त्रीनं ओलांडला आणि जगाच्या प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी ती सज्ज झाली. ती आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू लागली आहे. ती मुख्यमंत्री ... पंतप्रधान... राष्ट्रपती तर झालीच पण पायलट, शास्त्रज्ञ आणि पत्रकारही झली.

मात्र ही तेजस्विनी आपल्या कर्तृत्वाने जगाच्या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण करत असली तरी पुरूषी साम्राज्यात अजूनही स्त्रीला समान संधी देण्याबाबत मत मतांतरे चालूच आहेत. स्त्रीने विविध क्षेत्रात आपले सामर्थ्य सिध्द करूनही आपण तिला समान संधी देण्यास धजावत नाही. ही बाब दुर्दैवी आहे. प्रगतीच्या दिशेने स्त्रीचं पडणारं प्रत्येक पाऊल हे ऊजळून निघत असताना अशा प्रकारच्या वादविवादात काय अर्थ आहे?

परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले दोन्ही बाजूंनी उचलली गेली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशिराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे.एकूणच स्त्री शिक्षणाची गंगा येण्यास उशीर नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा