सोमवार, १८ जुलै, २०१६

सायकल...मुर्दाड संवेदनेची

ऐन पहाटे सायकलचा पायंडल मारायचो तेव्हा सायकलची दोन चाकं संध्याकाळी कुठली शिदोरी पदरात टाकणार हे नेमकं माहिती नसायचं...पण रोज उठून सायकलवर बसून नशिबाची चाकं मात्र फिरवत राहायचो...मागच्या कॅरेजला पेपरचा बंडल, हँडलच्या बेचकीत पुढच्या दुकान-घरात टाकायचा असलेला पेपर अडकवला की नियोजन म्हणतात ते झालं..! पेपर टाकला की पुढच्या दारात किंवा दुकानात टाकायचा पेपर शे-दीडशे पेपरच्या बंडलामधून बरोबर हाताला लागायचा...तेव्हा हिवाळ्याच्या दिवसांत मुंबईत आतापेक्षा बरी थंडी असायची...हाडं गोठवणारी नसली तरी दात थडथडवणाऱ्या थंडीत घामाचा एखादा ओघळ अवचित कानामागून मानेकडे झेपावायचा...मोल असायचं पण भान नसायचं त्या घामाचं...दोन्ही हँडलला अडकवलेले लाल रंगांचे गोंडे होते ना ते खूप अवखळ असायचे त्या काळी...अशा दु:खाचा विसर पाडण्याचं कसब असायचं त्यांच्या भुरभुरण्यात...हे झालं मनाचं, पण फक्त मनाचं नाही सांगत...कातावलेल्या अंगाला गुदगुल्या करून रमवून टाकायचे ते गोंडे त्या काळी...पुढे पुढे सायकलच्या चाकांना घुंगरू बांधले अन् सायकलचा रुबाब वाढला...पहाटे पहाटे घुंगुरांचा आवाज पेपरवाला आल्याची वर्दी द्यायचा चाळी-चाळींना...

रात्री कधीतरी पोस्टर चिकटवून झोपलेले डोळे पहाटे पहाटे जागे व्हायचे...पारोशा अंगानेच सायकलवर टांग मारून मानखुर्द स्टेशनपर्यंत अंधाऱ्या रात्रीत पोहोचायचं...पहिल्या पाळीला जाणाऱ्यांची बरी वर्दळ असायची...सायकल स्टेशनबाहेरच्या भिंतीला टेकवून उभी करायची अन् पहिली ट्रेन पकडायची...दादर गाठून अवनी ट्रस्टच्या ब्रिजखाली पेपरची गाडी येईपर्यंत एखाददुसरा डुलका हाणायचा...आजूबाजूला चूळबुळ वाढली की गाडी आल्याचं समजायचं...धावत जाऊन पेपरचे गठ्ठे ताब्यात घेऊन पुरवण्या लावायचं काम सुरू करायचं...आताशा त्या ब्रिजकडे जाणं झालं नाही त्यामुळे माहित नाही पण तेव्हा त्या ब्रिजखाली अनेक पेपरवाले जागोजागी पुरवण्या लावायचं काम करत बसलेले असायचे... पुरवण्या लावलेल्या पेपरचे गठ्ठे खांद्यावर टाकून ट्रेनमध्ये लगेजच्या डब्यात गठ्ठे फेकायचे...एखादा चुकारीचा माणूस सोडला तर पहाटे-पहाटे लगेजच्या डब्यात सारे पेपरवालेच पेंगत बसलेले असायचे...पेपरच्या गठ्ठ्यावर बसून मान टाकून, डोळे झाकून बसून राहायचं...आपलं स्टेशन येण्यावेळी आपोआप जाग यायची...दोनएक वर्ष पेपरचा धंदा केला पण या काळात कधीच झोप लागली म्हणून पुढच्या स्टेशनला गेलो नाही...आता अलार्म लावूनच उठायची सवय लागली असताना तेव्हा अलार्म नसतानाही आपल्या स्टेशनवर जाग यायची...मानखुर्द स्टेशनला पेपरचे गठ्ठे घेऊन उतरलो की पायऱ्या उतरताना पहाटे उभी केलेली सायकल वाट बघत असल्यासारखी वाटायची...आता लिहिता लिहिता आठवलं, की सायकलला कुलूप लावलेलं नसताना ती कधी चोरी कशी नाही झाली काय माहित?

खांद्यावरचे पेपरचे गट्ठे भिंतीला टेकून तिरपी उभी असलेल्या सायकलच्या मागील कॅरेजवर टाकायचे, सुतळीने बांधायचे अन् पुढचा प्रवास सुरू...हँडल गार पडलेला असायचा... चारदोन तासांच्या विरहामुळे सायकलशी नातं तुटल्यासारखं झालेलं असायचं पण फर्लांगभर अंतर कापलं की हँडल हाताला उब द्यायला लागायचा...महाराष्ट्रनगरच्या चौकात लाकडी फळकुटावर पेपर लावायचे अन् घरोघरी टाकायचे पेपर घेऊन सायकलवर टांग मारायची...फळकुटावर पेपर लावताना सायकल बघत बसलीय असं वाटायचं... एखादा मित्र कामात गुंतलेला असताना कौतुकाने बघत बसतो ना आपण तसं... संतोष राजदेव नावाचा पोरगा पेपरचा स्टॉल सांभाळायचा...त्याच्या ताब्यात पेपरचा स्टॉल दिला की सायकलची अन् माझी यारी-दोस्ती सुरू...दुपारी बाराएक वाजेपर्यंत सायकल आणि मी गावगन्ना पेपर टाकत फिरायचो...त्याकाळी चहाची चाहत खूप असायची...जिथं मिळेल तिथे सायकलवर बसून, एक पाय जमिनीवर टेकवून चहाचे झुरके मारायचे हा ठरलेला सोहळा...

दुपारी पुन्हा स्टॉलवर जाऊन राहिलेले पेपर, जमलेली चिल्लर घेऊन घरी... सायकल सोबत असायचीच... झोपडपट्टीत तेव्हा पत्र्याच्या भिंतीची घरं असायची...माझं घरं पूर्ण पत्र्याचं नव्हतं...कमरेएवढ्या उंचीची विटांची भिंत आणि त्यावर पत्र्याची भिंत असं तुलनेने श्रीमंत घर होतं माझं...त्या भिंतीला टेकवून सायकल उभी करायची...अंघोळ करायची...ओला टॉवेल सायकलवर आणून टाकायचा...दोन घास पोटात ढकलायचे अन् चटईवर आडवं व्हायचं...संध्याकाळी पाचसहा वाजता उठायचो तेव्हा सायकल घराची राखण करत बसलेली दिसायची...डोक्यावर टॉवेल घेऊन रानात राखण करतात ना तशी...

संध्याकाळी एका पतपेढीचं डेली कलेक्शन करायचो त्यावेळी...पतपेढीत काल जमा झालेलं कलेक्शन भरलं की आजचं कलेक्शन सुरू...दुकानं-घरं पालथी घालत १०-२० रुपयांच्या पावत्या फाडत दिवसाला ७-८ हजार गोळा करायचो...१०-१२ किमीचं तुकड्यातुकड्याचं अंतर कापताना सायकल सोबत असायची...कधीमधी पंक्चर झालं तर तेवढी उसंत मिळायची पंक्चर काढेपर्यंत...सायकलला आणि मलाही...

रात्री ११ पर्यंत गल्ला घेऊन घरी आलं की सायकल परत अर्ध्या भिंतीला टेकून ऊभी राहायची...जेवण खाणं उरकून उगाच दारात येऊन सायकलवर नजर फिरवून झोपून जायचो...पहाटे परत सायकल अन् माझी यारी-दोस्ती सुरू...उन्हाळ्याच्या
दिवसात गल्ली वजा बोळात झोपायचो तेव्हा सायकलला खेटून अंथरून पडायचं...रात्री कधीतरी जाग आली तर सायकलच्या चाकांच्या तारांमधून जो चंद्र दिसायचा तसं चंद्रमौळी सौंदर्य अजून नाही दिसलं रज्जो..!

पुढे सायकलवर जीव जडत गेला, मग सायकलच्या मटगार्डवर जीवाची राणी अशी अक्षरं कोरली गेली...मागच्या चाकाच्या मटगार्डला मासोळी लावली गेली...त्यावरचा बदाम आणि मैने प्यार किया ही अक्षरं अजून आठवतायत...

चारदोन दिवसांसाठी गावी गेलो की सायकल दगाबाजी झालेल्या निराधार प्रेयसीसारखी भिंतीला टेकून उभी असायची...गावावरून आलं की सायकल पुन्हा सेवेत हजर व्हायची, दुर्लक्ष केलं म्हणून कुरबुर न करता संसारी पत्नीसारखी साथ देत राहायची...एखादा नवरा लग्न करून बायकोला घरात आणून ठेवतो पण गळ्यात फुटका मणी घालत नाही, तरी बायको संसारात स्वत:ला गाढून घेते तशी..!

पुढे पुढे काॅलेजच्या दिवसांत रेल्वेच्या पासाला पैसे नसायचे म्हणून काॅलेजवारी सायकलच्या सीटवर बसूनच व्हायची...रेल्वेने येणाऱ्या इतर पोरांना सायकल दिसू नये म्हणून तिला गार्डनच्या कोपऱ्यात उभी करायचो...पहाटेपासून पेपर टाकताना आणि संध्याकाळी कलेक्शनला सोबत राबणाऱ्या सायकलचा दुपारचा आराम काॅलेजमुळे बुडाला होता तरी सायकल गार्डनमध्ये लपून बसायची...माझ्या मनातली प्रतिष्ठेची कल्पना फोकनाड होती पण माझी अब्रू वाचवण्यासाठी ती लपून बसायची...

सायकलची अन् माझी सोबत दोनएक वर्ष होती...पुढे नोकऱ्यांमुळे पासाचे पैसे हातात आले आणि सायकलशी ताटातूट झाली...पुढे नवी मुंबईत राहायला आलो तेव्हा घरातलं सामान गाडीत भरताना भिंतीला टेकून उभ्या असलेल्या सायकलकडे बघितल्याचं आठवत नाही, नसेलच बघितलं...आणि बघितलं असतं तरी तिला नव्या घरी आणलं नसतं एवढं नक्की...एखादी व्यक्ती जीव लावत राहते, भक्ती करत राहते, आतून बाहेरून होरपळत राहते, पण समोरच्या व्यक्तीला त्याचा मागमूसही नसतो...मुर्दाड स्वार्थीपणाने चालत राहताना अशा भक्तीकडे ढुंकून पाहण्याएवढीही संवेदना मनात नसते...एकतर्फी प्रेमात असंच होतं रज्जो..!

परवा सहज मोहिते पाटील नगरला जाणं झालं, जुन्या लोकांना भेटताना, खिदळताना मेंदूची कुठलीच शीर सायकलची आठवण काढत नव्हती...घराकडे परतताना पायात कायतरी आल्यामुळे अडखळलो, होलपडत असताना किंचित तोल गेला म्हणून भिंतीला आधारासाठी हात लावला तर, बारदान सर्रकन घसरलं...तांबरलेली, तारा मोडलेली, सीट-मासोळी फाटलेली, चाकं वाकलेली सायकल उघडी पडलेली...सायकल मेली होती, तिच्या देहाचं मढं पूर्वीसारखं भिंतीला टेकून तिरपं उभं होतं...सायकलकडे बघताना जुने दिवस वेगाने डोळ्यांसमोर सरकले, बाकीच्या लोकांनी आवाज दिल्याने तसाच निघून आलो...पुन्हा मुर्दाडासारखा..!

उपाशीपोटी सायकलवरून फिरताना तिच्याकडे बघत नसायचो, आता तुलनेने पोटभर खाऊन सायकलबद्दलची संवेदना कुठून येणार? संवेदनेची किंवा समोरच्याच्या प्रेमाची किंमत कळायच्या गोळ्या कुठेच मिळत नाहीत रज्जो, ते आतून यावं लागतं...


रात्री बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना गेटवर घरांची राखण करत चादर पांघरून बसलेला वाॅचमन दिसला...घरी आल्यावर बेडरूममध्ये पोरांच्या नव्या चकचकीत स्टाईलबाज सायकल दिसल्या...जेवणाचं ताट समोर आलं, भरपेट जेऊन झोपलो...पुन्हा मुर्दाडासारखा...बस्स इतकंच..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा