शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

कोणता झेंडा घेऊ हाती?

रक्ताळलेल्या हातांनी शब्बीरनं कापलेल्या दहा-बारा कोंबड्यांची पिशवी फटफटीवर बसलेल्या कार्यकर्त्याच्या हातात सोपवली...कोंबड्या कापून होईपर्यंत फटफट सुरूच ठेवून रुबाबात बसलेल्या कार्यकर्त्यानं रेस पिळली...धुरांड्या फेकणाऱ्या फटफटीनं गचका मारत वेग पकडला...फटफटीच्या हँडलला लावलेला कोणत्यातरी पक्षाचा झेंडा गाडीच्या वेगानं फडफडू लागला...अख्ख्या परिसरात आवाजाचा कोलाहल करत, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कट मारत मोटारसायकल दिसेनाशी झाली...इतक्यात कुठूनतरी ‘ताईsss माईsss अक्का, विचार करा पक्का, **** वर मारा शिक्का’ आवाज आल्याबरोबर चौकातल्या सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेला वळत्या झाल्या...चारचाकी गाडीच्या मूळ आकारात बदल केलेली, तिन्ही बाजूंनी नेत्याचे, त्याच्या गॉडफादरचे आणि दहाबारा लोकल कार्यकर्त्यांचे निव्वळ फोटो असलेले बॅनर लावलेली गाडी डेरेदाखल झाली...राना-वावरातली कामं आटोपून चौकात चकाट्या पिटायला आलेली चार-दोन टाळकी गाडीभोवती जमा झाली...खांद्याला अडकवलेलं दफ्तर आणि गळकी चड्डी सांभाळत शाळेतून घरी जाणारी पोरं शेंबूड पुसत गाडीकडं कुतूहलानं बघत राहिली...घरातलं घरसामान घेण्यासाठी चौकातल्या दुकानात आलेली आयबाय डोक्यावरचा पदर तोंडाला लावत चोरून गाडीकडे बघत राहते...

ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला माणूस कोकलून कोकलून बसलेल्या घरड्या आवाजात आपल्या नेत्याचे पोवाडे बेंबीच्या देठापासून गात राहिला होता...आम्ही याव केलं, आम्ही त्याव केलं...ज्यांना पटत होतं ते माना हलवत होते, ज्यांना पटत नव्हतं ते नाकं मुरडत काढता पाय घेत होते...दुसऱ्या बाजूला दुसऱ्या उमेदवाराची गाडी येऊन थबकली अन् दोन्ही लाऊडस्पिकरमधून ओकल्या जाणाऱ्या घोषणांतील शब्दांची टोटलच लागेनाशी झाली...दिवसभर ओरडून ओरडून थकलेल्या जीवांना समोरच्या पार्टीची गाडी बघून चेव चढत राहिला...घटकाभर थांबून एकमेकांकडे खुनशी नजरेनं बघत कार्यकर्ते आपापल्या गाड्या घेऊन हळूहळू निघून गेले...चौकात क्षणभर उठलेला आवाजाचा गदारोळ विरघळत गेला...

‘आज रात्री अमूक ढाब्यावर पार्टी हाय...’ असं कुणीतरी कुजबूजलं आणि जमलेल्या खास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं...आपला नेता कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतोय असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडू लागला...संध्याकाळ होऊ लागल्यानं एव्हाना अंधार गळू लागला होता...दिवसभर उन्हातान्हात प्रचार
करून दमलेली मंडळी घराकडे सरकू लागली...रात्री पुन्हा ढाब्यावर जमायचं अशा विचारानं सगळ्या कार्यकर्त्यांची पांगापांग झाली...घरात पाऊल ठेवल्या-ठेवल्याच कार्यकर्त्याच्या पोरानं भोकाड पसरलं...बापाचे रिकामे हात बघून चॉकलेट-बिस्कीटची आस बाळगून दिवसभर बापाची वाट पाहणारं पोरगं बसल्या जागीच हातपाय चोळत राहतं...पोराच्या रडण्याच्या आवाजानं नवरा आल्याचा अंदाज आतल्या घरात काहीबाही काम करणाऱ्या बायकोला आलेला असतोच...

घरातल्या भांड्यांच्या आदळआपटीचा आवाज वाढता झाला...कमरेला पदर खोचून हातातला मोकळा डब्बा समोर आदळत रणरागिणी कार्यकर्त्यासमोर येऊन उभी ठाकली...’कालपास्न साखर आणा म्हणून सागितलं, पण रोज संध्याकाळी हात हलवत घरी यायचं, घरात लहानगं पोर हाय, काय कळतं का न्हाय, शेजारच्या काकीकडून कालपास्न साखर आणून चहा करते, पोराला दूध पाजतेय...काय काळजी हाय का न्हाय?’ घराच्या कोपऱ्यातील मोरीत हातपाय धुणारा कार्यकर्ता मिठाची गुळणी घेतल्यागत गुमान ऐकत राहिला होता...बापाला बघून ओरडणारं पोरगं एव्हाना थकून शांत झालं होतं...घरात पाय ठेवल्या-ठेवल्या चॉकलेट-गोळ्या आणल्या असतील असं वाटून रांगत दरापाशी आलेलं पोरगं दारातच आडवं पडून झोपी गेलं होतं...दिवसभर गावभर उंडारणाऱ्या कोंबड्यांना डालग्यात डालत कार्यकर्त्याच्या बायकोची चीरचीर सुरूच होती...टावेलनं हातपाय पुसत कार्यकर्त्यानं बिनसाखरेचा चहा नरड्याखाली गुमान उतरवून बैठक मारलेली असतेच...चहाची कपबशी आवाज होऊ न देता भुईवर टेकवत ‘आज माझं जेवान बनवू नकोस’ म्हणत कार्यकर्ता घराबाहेर पडलेला असतो...दारापाशी येऊन गाढ झोपी गेलेलं पोरगं धुरामुळे झोपेतच खोकत राहतं...जळण घातल्यानं चूल धुमसत राहते अन् नवऱ्याच्या बेजबाबदारपणानं कार्यकर्त्याची बायकोही...

इकडे कुणाच्यातरी परड्यात मोठ्या भगुल्यात दहा-बारा कोंबड्यांचे बारीक केलेले तुकडे रटरटत राहतात...तीन दगड मांडून केलेल्या चुलीत लाकडं घालून जाळ फुंकताना कार्यकर्त्याच्या डोळ्यातून धुरानं पाणी दाटलेलं असतं...इतर कार्यकर्ते चुलाणाभोवती फेर दरून गुडघ्याला हात बांधून बघत बसलेले असतात...रटरटणाऱ्या आवाजाबरोबर मटण-मसाल्याच्या वासानं तोंडाला आलेलं पाणी लपत नव्हतं...परड्यातल्या झाडाला टेकवून उभे केलेले प्रचाराचे झेंडे चुलाणातल्या जाळानं एव्हाना तापून निघालेले असतात...मटण शिजल्याची चाहूल लागताच एकेकजण ताटं घेऊन जमू लागला...गरम-गरम मटणाचा रस्सा ओरपताना आपल्या नेत्याच्या कार्याची आत्मप्रौढी स्तुती थांबत नव्हती...मटणाच्या चवीला नेत्याच्या कार्याच्या चुरचुरीत चर्चेनं रंगत आणलेली असते...एखादा जुनाट कार्यकर्ता उगाच परड्यातल्या गंजीमागे जाऊन संत्रा-मोसंबीचा झटका मारून जेवायला येऊन बसतो...जेवायला घालणाऱ्या नेत्याची स्तुती करत, विरोधी उमेदवाराची उणीदुणी काढत जेवणावळी उठलेल्या असतात...पांगापांग होते...गाव गुडूप झालेलं असतं...

दारात झोपलेल्या कुत्र्याला लाथ घालत कार्यकर्ता दाराची कडी वाजवत राहतो...पेकाटात लाथ बसल्याबसल्या कुत्रं कोकलत कुठच्याकुठं गायब होतं...आतून कन्हत-कुंथत म्हातारी दार उघडते...झोकांड्या देत कार्यकर्ता अंथरूनावर जाऊन उताणा पडून राहतो...इकडं जेवायला थांबलेली म्हातारी जेवनाचं ताट वाढायला घेते...’मी जेऊन आलोय...’ म्हणत कार्यकर्ता कूस बदलून डोळे झाकून घेतो...म्हातारी एकलीच कालवण-भाकरीचा एकेक घास कोरड पडलेल्या घशातून आत सरकवत राहते...घरात मिणमिणत राहिलेल्या बल्बच्या धुरांडीसारख्या पिवळ्याफक्क प्रकाशात म्हातारी पाण्याबरोबर एकेक घास घशाखाली उतरवत राहते...कार्यकर्त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत म्हातारी त्याच्या भविष्याची चिंता करत राहते...नोकरी कधी लागणार, लग्न कधी करणार आणि नातवंडांच्या कलकलाटाने घर कधी गजबजणार..? असंख्य प्रश्नांचं काहूर मनात दाटत राहतं...नवऱ्यानं जगाचा निरोप घेत कधीच साथ सोडलेली, त्यात पोरगा असा राजकारण-बिजकारणाच्या नादी लागून आयुष्याकडं बघेनासा झालाय...म्हातारी कोऱ्या कपाळावर तळहात ठेवून गाढ झोपी गेलेल्या कार्यकर्त्याकडे शून्य नजरेनं पाहात राहिलेली असते...

नेता तिकडं चिरेबंदी वाड्यात नाहीतर बंगल्यात झोपला असेल की नाही माहित नाही पण...पण इकडं गावातल्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला असतो...दिवसभर प्रचाराच्या घोषणांनी, प्रचारफेऱ्यांनी गजबजलेले रस्ते कुत्र्यांनी एव्हाना ताब्यात घेतलेले असतात...माणसं झोपलेली असताना काजळदाट अंधारावर कुत्र्यांचं साम्राज्य सुरू झालेलं असतं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा