गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

हे म्हातारे दिवे जपायला हवेत...

दिवस कलायला लागताना देवळात दिवा लावायची वेळ झालेली...गुरं-ढोरं पाय खुरडत धुरळा उडवत घराकडे निघत राहतात...रानातनं निघता-निघताच बांधावरच्या अर्धमेल्या गवताचा घाईने ओरबाडलेला घास रवंथ करत राहतात...चालताना तोंडातून गळणाऱ्या लाळेचे थेंब मळकटेल्या मण्यासारखा गोल आकार घेऊन मातीत घुसळू पाहतात...गुरांच्या मुताच्या आडव्या तिडव्या रेषा बघत मागे चालणारं कुत्रं कावऱ्या-बावऱ्या नजरेनं वाट चालत राहतं...तेवढ्यात गोविंदअण्णा गेल्याचं कुणीतरी सांगतं...अर्धमेल्या दिवसाची मावळू पाहणारी संध्याकाळ विजेच्या वेगाने अंगणात, बोळाबोळांत, खडबडीत रस्त्यांवर, गोठ्या-परड्यात, राना-शिवारात, झाडा-झुडपांवर, नदी-नाले-उकिरड्यांवर, घरांच्या कौलांवर नाहीतर तांबरलेल्या पत्र्यांवर आणि जमेल तिथे घनघोर अंधार पेरत राहते...गपगार झालेल्या गावात गोविंदअण्णाच्या म्हाताऱ्या बायकोचा, सावित्रीबाईचा आक्रोश घुमत राहतो...शेजारपाजारची, भावकीतली मंडळी गारठ्यातही डोक्याला फड्या बांधून अंत्यविधीच्या सामानाची जुळवाजुळव करत राहतात...कुणी कळक, कुणी लाकडं असलं काहीबीही गोळा करत राहतात...बरा शिकलेला एकजण गोविंदअण्णाच्या पोराचा नंबर हुडकून फोन लावून गोविंदअण्णा गेल्याचा सांगावा धाडतो....उमेदीतला पोरगा फटफटीला किक मारून गोविंदअण्णाच्या पोरीला आणायला लगबगीनं जातो...भिंतीला उशीचा टेकू लावून बसवलेल्या गोविंदअण्णाच्या पार्थिवाकडे म्हातारी सावित्रीबाई बघत राहिलेली असते...नव्वदी गाठलेल्या गोविंदअण्णाने अखेरचा श्वास घेतल्याने म्हातारीचा श्वास कधी थांबत तर कधी वेगाने धावत राहतो...गोविंदअण्णाच्या घरात, अंगणात, आजूबाजूच्या परिसरात दु:खमग्न सुन्नतेने शांततेचं कोलाहल चालू असताना म्हातारीच्या श्वासांचा लपंडावाचा खेळ मात्र ऐन रंगात आलेला असतो...

शेजारच्या आयबायनं निर्जीव होऊन निपचीत बसलेल्या गोविंदाअण्णापुढं पणती लावलेली असते...पणतीतला दिवा झोकांड्या खात राहतो...गोविंदअण्णानं वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपलेलं चेहऱ्यावरचं तेज झाकोळून गेलेलं असतं...अगदीच जवळची मंडळी भर थंडीत घराभोवती गुडघ्यावर बसून राहतात...भावकीतल्या बाया गोविंदअण्णाकडे बघत राहतात...गोविंदअण्णाचा निघून जाण्याचा प्रवास सुरू झालेला असताना वेळ थांबता थांबत नसते...किर्र अंधारात गावात लांबवर कुठंतरी कुत्र्याचं रडणं वाढत राहतं...डोळ्यावर झोपेच्या मुंडावळ्या
डोकावू लागल्याने जरा लांबची मंडळी आजूबाजूला बघत काढता पाय घेऊन घरात जाऊन झोपी जातात...चिल्ले-पिल्ले काय झालंय ?, माणूस मेलंय म्हणजे नेमकं काय ? हे न कळल्याने गारठून गुडूप होऊन गेलेली असतात…रात्र अशी गर्भात येत असताना गोविंदअण्णाचे पावणे-रावळे जमत राहतात...गोविंदअण्णाच्या लेकीचा बेभानपणे धावत येतानाचा आक्रोश चीरशांतता कापत जाते...पोक्त बाया बाप्ये तिला शांत करत राहतात...आता गोविंदअण्णाच्या पोराच्या वाटेकडे सर्वांचे डोळे...पहाटे-पहाटे कधीतरी गोविंदअण्णाचा पोरगा येऊन पोहोचतो...पोराच्या येण्याआधीच अंत्यविधीची सगळी तयारी झालेली असते...दिवस फटाटायला लागताना अंघोळ घालून तिरडीवर झोपवून गोविंदअण्णाला बनाऱ्यात नेऊन पोहोचवलेलं असतं...आगीचे लोळ उठलेले असताना वरच्या दिशेने झेपावणारा धूर गोविंदअण्णाला घेऊन आभाळात पोहोचलेला असतो...आणि अंत्यविधीला आलेल्या सर्वांनी घर गाठलेलं असतं...कुणीबुणी मध्येच लागणाऱ्या रस्त्यांवरून पसार होऊ पाहतात...जवळचे गोविंदअण्णाच्या आठवणींवर बोलत चालत राहिलेले असतात...

इकडे गोविंदअण्णाच्या घरात डोळे सुजवून बसलेल्या बाया शून्यात नजर लावून बसून राहिलेल्या असतात...गोविंदअण्णाला माती दिलेल्या बनाऱ्यातली स्मशानशांतता धावत येऊन सर्वांच्याआधी घरात पोहोचलेली असतेच...सावित्रीबाईचं वयाने जीर्ण झालेलं आयुष्य हेलकावे खात राहतं...जोडलेल्या पातळाच्या पदराचा बोळा तोंडात धरून सावित्रीबाई धुमसत राहिलेली असते...रेटत-रेमटवत दु:खाचे चार-पाच दिवस निघून गेलेले असतात...सावडण्याचा, दहाव्याचा विधी उरकून गोविंदअण्णाचा पोरगा, पोरगी आपापल्या वाटेनं निघून जातात...शे-दीडशेची नोट सावित्रीबाईच्या हातात टेकवून पोरगा-पोरगी वाट धरतात...

आता सावित्रीबाई घरात एकट्याच असतात...सकाळ-संध्याकाळ फुकणीनं फुंकत घरातल्या चुलीत जाळ घालत राहतात...घरातलं एकटेपण त्यांना खायला उठतंय. आधी दिवाळी-पंचमीला-जत्रेला मुलाबाळांनी घर भरून जायचं...दिवाळीचे दिवस कसे लख्ख असायचे...पण आता उजाडलेला प्रत्येक दिवस काळवंडलेल्या रात्रीशी स्पर्धा करत राहतोय...पोराला-पोरीला पोरं झाल्याचं कळल्यावर सावित्रीबाईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या उल्हासित होत राहतात...संसारात रमलेले पोरगा-पोरगी नातवंडांना घेऊन घरी येतच नाहीत...पण सावित्रीबाईचं वाट पाहणं संपत नाही...अंगणात खेळणाऱ्या इतरांच्या नातवंडांकडे आशाळभूत नजरेने बघत राहतात...सावित्रीबाई आजही बायाबापड्यांमध्ये नातवंडं पोतरूंडांबाबत भरभरून बोलतात...

सावित्रीबाई काय किंवा गोविंदअण्णा काय यांच्यासोबत जे घडतंय, ते काही निव्वळ त्यांच्याबाबतीतच घडलेलं नाहीय...पाच-पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेल्या प्रत्येक पिढीची ही शोकांतिका आहे...ऐन कर्त्या-सवरत्या वयात त्यांना याची कानकूनही नसेल की आयुष्याची संध्याकाळ अशी पोटच्या पोरांची, नात-नातीची वाट पाहण्यात घालवावी लागेल...आताची पिढी चार बुकं शिकून मोठी झाली...कामा-धंद्याला लागली आणि जिथं गेली
तिकडचीच झाली...नोकरी-धंद्याच्या ठिकाणी घरटी उभारली...त्यांच्याच गोविंअण्णांसारख्या बापजाद्यांनी कष्ट उपसून, सावित्रीबाईंसारख्यांनी चवली-पावली गोळा करून गावात ऐपतीप्रमाणे घरं बांधली...गुंठे-गुंठे जमिनी घेतल्या...त्यांच्या नावानं आंब्याची झाडं लावली...कधी तरी त्यांची पुढची पिढी गावात येईल, घरात बागडेल आणि आपण पाणी देऊन वाढवलेल्या आंब्याचा रस चाखेल...ते घडलं नाही असं नाही, पण आता ते फार दिसत नाही....गावाकडचे वाडे आता कोसळून गेलेत...उंदीर-घुशींनी उकीर काढलाय...घरं ओस पडलीत...हुंदाड्यासारखे उंडारणारे पोपट-कावळे आंबे कुरतडून नासधूस करतायत...दारा-अंगणात बसणाऱ्या अशा एकाकी पडलेल्या सावित्रीबाईंची संख्या वाढत राहतेय...

गावात कुणी तरूण राहतो की नाही, अशी शंका यावी इतकी उतारवयातली माणसं गावात झालीत...गावंच्या गावं म्हातारी झालीत जणू...आणि अशात गोविंदअण्णासारखं कुणी गेल्याचं कळलं की गावाची हालचाल अशी अचानक थिजल्यासारखी होते...सणावाराला गावातलं एकांतपण, सामसुमी भटक्या कुत्र्यासारखी अंगावर येते...सगळ्या अंगाला बधिरपण येतं...अशा एखाद्या घरात जावं तर घरात असतो अर्धा अंधार आणि अर्धा उजेड...कारण घरभरून दिवे लावावेत एवढी माणसंच असतातच कुठं घरात ?

सावित्रीबाईनं आता सत्तरीही ओलांडलीय...चालताना कमरेत वाकून चालावं लागतंय...आता-आता डोळे पाणेजत असल्याचंही त्या सांगतात...आवाजात कापरं तर आहेच...आयुष्याची कातरवेळ झालीय पण म्हणून काही भाकरीचा चंद्र आपोआप उगवत नाही...जन्मापासून पाचवीला पुजलेल्या मोलमजुरीचा सूर्यास्त लोंबकळत राहतोय...पण तरीही दुकानात गेल्या तर गावाकडे न फिरकणाऱ्या नातरूंडं-पोतरूंडांसाठी गोळ्या बिस्किटं आणायला त्या विसरत नाहीत...मी ज्या ज्या वेळी सावित्रीबाईला पाहतो त्यावेळेस वाटतं, स्वातंत्र्याची साठी झाली पण आपण अजूनही अशी व्यवस्था का निर्माण करू शकलो नाही ज्यात सावित्रीबाईंसारख्यांच्या वटलेल्या झाडांचं आयुष्य आनंदी नाही पण, सोपं झालं असतं...कातरवेळेतही संधीप्रकाश दिसत असताना डोळे मिणमिणले नसते...

परवा गावी गेलो तेव्हा सावित्रीबाई अंगणातच बसून होती...उजेडातल्या आयुष्याचा हिशेब अंधारात बसून लावण्याचा प्रयत्न करत होती...टोटल लागत होती...पण बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार करूनही हातात शून्यच लागत होतं...काय म्हातारे काय चाललंय? असं विचारलं पण सावित्रीबाईचं लक्षच नव्हतं...कुणीतरी वाटेनं जाणाऱ्यानं जोरात बोला, सावित्रीबाईला ऐकू येत नाही असं खुणावलं...हातवारे करत म्हातारीची मूक विचारपूस केली...म्हातारीनं कानाला हात लावत ऐकू येत नसल्याचा इशारा केला...आणि एवढंच म्हणाली...बाबा, ऐकू येत नाही तेच बरं, मनापासून ऐकण्यासारखं जगात आता कुणी बोलतंच नाही...काही बघायचीही इच्छा नाही, पण रांडचे डोळे अजून साथ सोडत नाहीत...

म्हातारीचे हे शब्द ऐकून पंधरवडा झाला...माझे कान, डोळे अजून बधिरलेत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा