गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

ही नकारात्मकता येते कुठून?

मध्यरात्रीचे बारा-साडेबारा वाजले असतील, ऑफिसवरून घरी जाताना थकव्यानं डोळे मिटून गाडीत बसून होतो…सायलेंटवर ठेवलेला खिशातला मोबाईल थरथरू लागल्याने डोळे चोळत मोबाईल स्क्रीनवर पाहिलं तर संदीप लोहारचं नाव दिसलं...कराडजवळच्या खेड्यात राहणारा संदीप इतक्या रात्री जागा कसा, इतक्या रात्री कशासाठी फोन केला असेल? अशा प्रश्नांची सरबत्ती मेंदूतल्या मेंदूत घोंघावून गेली...डोक्यातल्या प्रश्नचिन्हांना तसंच सोडून चपळाईनं फोन उचलला...संदीपचा आवाज कातावला होता...थकला होता...नेहमी नमस्कार मित्रवर्य म्हणत उत्साहानं बोलणाऱ्या संदीपचा आवाज निराशाच्या गर्तेत अडकल्यासारखा वाटला...

‘मित्रा, तू जेव्हा गावी येशील तेव्हा माझ्या दुकानात ये...दुकानातील टेबलच्या एका कप्प्यात तुला माझं पत्र सापडेल, त्यात माझ्या आत्महत्येचं कारण सापडेल’ एका श्वासात भडाभडा बोलून संदीपन फोन ठेवून दिला...डोळ्यावर आलेली झोपेची झापडं खाडकन गळून पडली...संदीपला पुन्हा फोन लावला तर मोबाईल स्वीच ऑफ...पोटात कालवाकालव झाली...काय करावं काहीच कळेना...संदीप मुंबईला शाळेत असतानाचा माझा वर्गमित्र, नंतर कौटुंबिक कारणांनी कराडला स्थायिक झाला...नंतर मात्र संपर्क फक्त पोनवरून...तोही 15-20 दिवसांनी...कराडमध्ये कसलासा व्यवसाय करतो...व्यवसाय बरा चालल्याचंही माहित होतं...लग्न करून स्थिर झाल्याचंही ऐकून होतो...मग आज असं अचानक काय झालं...दहा-बारा वेळा फोन केला, मोबाईल स्वीच ऑफ...काय करावं काहीच कळेना...टापटिप कपड्यातला संदीप डोळ्यांसमोर तरळू लागला...कविता करून मनातली संवेदनशीलता व्यक्त करणारा संदीप मनात काहर माजवून गेला होता…आधी संदीप मस्करी करतोय असं वाटलं पण नंतर विचारचक्र थांबता थांबेना...मस्करी म्हणून दुर्लक्ष केलं आणि काही अघटित घडलं तर? संदीपची आत्महत्या रोखू न शकल्याची अपराधीपणाची भावना मनात आयुष्यभर कुजत राहिली असती...विचारागणिक श्वासाची गती वाढत होती...काहीतरी करायला हवं...मनानं उचलं खाल्ली...पण नेमकं करायचं काय? संदीपचा मोबाईल तर बंद, त्यात त्याचा आता न पता माहित...

सातारचे पोलीसप्रमुख अभिनव देशमुखांना फोन लावला...संदीपच्या फोनबाबत त्यांना माहिती दिली...त्यांनी संदीपचा मोबाईल नंबर आणि पत्ता मागितला मागितला...पत्ता मला माहित असण्याचं काहीच कारण नव्हतं...संदीपचा नंबर मेसेज करून हताशपणे डोळे मिटून गाडीत बसून राहिलो...एव्हाना माझ्या इमारतीसमोर येऊन गाडी थांबलेली...ड्रायव्हरने आवाज देऊन भानावर आणलं...गाडीतून उतरलो, पण घरी जाऊ वाटेना...तसाच गेटवर बसून राहिलो...सोडायला आलेली ऑफिसची गाडी कधीचीच निघून गेलेली...इमारतीच्या गेटच्या जाळ्यांमधून सिक्युरिटी गार्ड पाहात राहिला होता...रोज थेट आत शिरणारा आज
गेटवर का बसलाय? तो सुद्धा विचार करत खुर्चीतच पेंगू लागला...चिटपाखरू नसलेला रस्ता खायला उठत होता...रोज अख्खा परिसर लखलखून टाकणारे स्ट्रीट लाईटचे दिवे भगभगीत वाटत होते...कधी नव्हे ते आज अंगावर येत होते...संदीपच्या आयुष्यात अंधार दाटला असेल काय? काय झालं असेल? मनात प्रश्नांचं तांडव सुरू असतानाच अनसेव्ह नंबरवरून एक कॉल आला...काळीज आतल्याआत धुमसायला लागलं होतं...थरथरत्या हातांनी फोन उचलून कानावर लावला...’यार नवनाथ, मला पोलिसांनी पकडलंय, काहीतरी कर, मला ते घेऊन निघालेयत..’ संदीपचा रडका आवाज कापत मध्येच पोलिसी आवाज आल्याबरोबर संदीपकडून पोलिसांनी मोबाईल काढून घेतल्याचं लक्षात आलं...पोलिसांनी मोबाईलच्या नंबरवरून मध्यरात्रीच पत्ता शोधून संदीपला ताब्यात घेतलं होतं...तेही अवघ्या अर्धा-पाऊण तासांत...इकडे घोंघावणारा माझा जीव भांड्यात पडला होता...संदीप ठीकठाक असल्याचं समजल्यावर झोपून गेलो...सकाळी चौकशी केली तर संदीपला जिथून पकडलं होतं तिथं टोमॅटोवर मारायचं औषध सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं...संदीपला फोन करून बोललो, तर त्याने कौटुंबिक समस्यांचा डोंगर सांगायला सुरुवात केला...संदीपची बहीण, भाऊ रडरडून बोलत होते...स्वत:ला संपवून संकटं संपतात का? असं विचारत होते...

मित्रहो, संदीप हा एकटाच नाही, असे कीतीतरी जीव मृत्युच्या काळ्याशार मूर्तीला मिठी मारण्यासाठी धावताना दिसतायत...संकटांचा उभा राहिलेला डोंगर असह्य झाल्याने आयुष्याची दोरी कापून अनाकलनीय दरीत झोकून देऊ पाहतायत...असं करून समस्या सुटते का? नक्कीच नाही...आपल्या जाण्याने आपल्या लेखी आपली सुटका होते हे गैरसमजाचं केवळ तंतोतंत मृगजळ आहे, मात्र आपल्या जाण्यामुळे मागे राहिलेली आपली माणसं आयुष्यभर आपल्या आठवणी उराशी कवटाळून चाचपडत राहतात...त्यांना सावरायला मात्र आपण नसतो...आयुष्यात संकटं असतात...ती येतच राहतात...संकटं आपल्या सावलीसारखी असतात...संकटं नसती तर आयुष्य एकसुरी आणि एकाच रंगाचं बनलं असतं...रुग्णालयात हार्ट बिट मॉनिटर पाहिलंय का कधी? हृदयाची कंपनं चालू असतील तर त्यावरच्या रेषा डोंगराच्या कडांसारखं खालीवर करत चालत राहतात...हृदयानं काम थांबवलं की त्या रेषा सरळ रेषेत संथ चालत राहतात...खाटेवर झोपलेल्या माणसाचा खेळ संपल्याचं सांगत राहतात त्या सरळ रेषा...म्हणूनच आयुष्यसुद्धा हार्ट बिट मॉनिटरसारखंच असतं...संकटांची कंपनं संपली की आयुष्य संथ होऊन थांबू पाहतं...जगण्यातला चार्म संपून जातो...

आंधळी कोशिंबिरीचा खेळ माहित्येय तुम्हाला...? डोळ्यावरची पट्टी सोडल्यावर समजतं की कुठे होतो आपण आणि आलो कुठं..? मधल्या काळाचा हिशेब लागत नाही....अजिबात..! प्रवास करताना झाडे पळताना दिसतात तसा काळही चकवा देत निघून जातो...मग रस्ता सोडून नावेत बसतो आपण...लाटांवर स्वार होण्यासाठी,  एकटेच....पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला...कायमची चुकामूक...ही चुकामूक आपल्याला वेदनादायी असतेच पण ती आपण मैदान सोडून पळाल्याचं निदर्शक असते...आपण जिंकलो नाही याचा अर्थ आपली कायमची हार झाली असा होत नाही मित्रांनो, लढाई संपत नाही...तशी ती संपणारी असती तर तिला लढाई का बरं म्हटलं असतं...हार होणार असं वाटणारा खेळही शेवटपर्यंत खेळणारा शूर असतो...

कधी एखाद्या रुग्णालयात जा, शंभरीच्या आसपास वय असलेल्या एखाद्या म्हाताऱ्याकडे पाहा, अख्खं आयुष्य समरसून जगूनही जगण्याची आकांक्षा सुटत नाही...लावलेल्या सलाईनच्या नळीकडे म्हातारं मोठ्या आशेनं बघत राहतं...आयुष्याची तुटत आलेली दोरी ही सलाईनची नळी पुन्हा मजबूत करेल असा आशावाद त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसत राहतो...किंवा पाहा नुकतंच जन्माला आलेल्या पण काचेत ठेवलेल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे...जन्मताच काही त्रुटी असल्यानं इवल्या इवल्या बरगड्या धाप लागल्याने खाली-वर होत राहतात...जन्माला येताना वेदना घेऊन आलेलं बाळ किलकिल्या डोळ्यांची उघडझाप करत जगाला पाहण्यासाठी आतुरलेलं असतं...जग कसं आहे, इथली माती, इथली माणसं नेमकी कशी आहेत, आपण कसल्या घरात जन्माला आलोय, इथली माणसं आपल्याशी कशी वागणार आहेत या कशाहीबद्दल कसलीही माहिती नसताना बाळ जगाकडे पाहण्यासाठी आसुसलेलं असतं...नकारात्मक विचार डोक्यात घुमत असतील, आयुष्याचा कंटाळा आला असेल तर एकदा दवाखान्यात नक्की जा...आयुष्याची लढाई लढत राहिलेलं शंभरीचं म्हातारं तुम्हाला आयुष्याचं महत्त्व सांगेल...म्हाताऱ्याचं नाहीच पटलं तर नवजात बाळ मात्र तुम्हाला नक्कीच जीवाचं महत्त्व सांगेल...

संदीपचा कालच फोन आला होता...साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून...लहानग्या बाळानं, खितपत पडलेल्या म्हाताऱ्यानं त्याला जगण्याचं बळ दिलं होतं...आणि त्याच्या फोनमुळे मलाही..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा