शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

उठा उठा दिवाळी आली, लहान होण्याची वेळ झाली

घनघोर अंधारात तंतोतंत खड्या थंडीत कन्हत पडलेल्या किर्र रात्रीची कुस उबल्याबरोबर सूर्यदेवाची डोंगराआडून मान वर काढण्याची लगबग सुरू झाली...बाळंत झालेल्या रात्रीच्या गर्भातून सोनेरी पहाटेनं जन्म घेतला होताच...सगळी क्षितीजं तांबड्या रंगाचा पदर घेऊन नव्या नवरीसारखी सजून बसलेली दिसत राहतात जशीच्या तशी...निपचित पहुडलेलं गाव अवचित हालचाल करत राहिलेलं असतं...धुक्याच्या झुंजूमुंजू पहाटेनं आळोखे-पिळोखे देत आळस झटकलेला असतो...म्हाताऱ्या कोताऱ्यांनी दारातल्या चुलीत लाकडं कोंबण्याचं काम चालवलेलं असतं...अंगणात रात्रभर कुडकुडत पडलेली चुलीची तिन्ही दगडं जाळाच्या उबेसाठी आसुसलेली असतात...पहाटेच्या कोवळ्या अंधारात गावभर बादल्या-भांड्यांचा आवाज इथंतिथं वाजत राहिलेला असतो...भगुल्यातल्या पाण्याला आदण आलेलं असतं...घराघरासमोरून धुरांचे लोट आभाळाकडं झेपावत राहतात...

कानशिलाखाली हात टाकून अस्ताव्यस्त झोपलेल्या पोराच्या डोक्याला हात लावत माऊलीनं झोपेतून उठवायचा प्रयत्न केलेला असतो...माऊलीचा गारेगार हात लागल्यानं उबदार वाकळेत झोपलेलं पोरगं शहारत...गारठ्याची चाहूल लागतात पोरगं उघडं पडलेलं अंग झाकत पुन्हा वाकळ गुरमुसून झोपी जाण्याचा प्रयत्न करत राहतं...सहामाही परीक्षेचं ओझं हलकं झाल्यानं पोरगं बिनधास्त झोपलेलं असतं...घराघरात नुसती धांदल उडालेली असते...उठवलेलं पोरगं पुन्हा झोपलेलं पाहून माऊली गडबडीत येऊन पोराच्या अंगावरची वाकळ फर्रकन ओढते...अलवार गार वाऱ्याची झुळूक लागताच पोरगं डोळे चोळत झोपल्या जागी उठून

बसतं...झुंझूमुंजू उघडलेल्या डोळ्यांत दाराच्या चौकटीत मांडलेल्या पणत्यांचा उजेड दाटत राहतो...शेणानं सारवलेल्या जागेवर ठिपक्यांच्या रांगोळ्यांची नक्षी, त्यावरच्या पणत्या, पणत्यातल्या ज्योती पोराच्या स्वागताला एका लयीत डुलत तयार झालेल्या असतात...

पणत्यांच्या प्रकाशानं भारून गेलेला परिसर पाहून पोराला दिवाळी असल्याचं जाणवतं...झडाझड अंग झाडत पोरगं मोठ्या उत्साहान अंगावरची कापडं उतरवतं...माऊलीनं उटण्याची बशी आणून ठेवलेली असतेच...लाकडाच्या पाटावर उघड्या अंगानं बसून पोरगं डोळे लुकलुकत बसलेलं असतं...माऊलीच्या मऊशार हातांनी सर्वांगाला लागत राहिलेल्या उटण्याची टोचणी घरभर पसरलेल्या स्वर्गीय सुगंधाने कुठच्या कुठं गायब होऊन गेलेली असते...पायाच्या तळव्यावर माऊलीचे हात फिरताना झालेल्या गुदगुल्यांनी पोरगं खुदकन हसत राहतं...नखशिखांत उटण्यानं चोळलेलं पोरगं अंगणातल्या मोरीकडं पळतं...पहाटेच्या अंधारात सूर्यदेवानं प्रकाशाचं मिश्रण चालवल्याने फटाटायला सुरुवात झालेली असतेच...गावकुसाबाहेर लांबवर पसरेल्या डोंगर-टेकड्यांच्या महाकाय शरीराला स्पर्षून आलेलं बोचरं वारं पोराच्या अंगावर शिरशिरी आणत राहतं....

घटकाभर चुलीपुढं बसून पोरगं वाफाळणाऱ्या बादलीकडे धावतं...दोन-चार तांबे भडाभडा अंगावर ओतत पोरगं गारव्याला चकवा देऊ पाहतं...माऊलीनं चंदनाच्या साबणानं अंग फेसाळून टाकलेलं असतं...डोळ्यात साबण जाऊ नये म्हणून पोरानं डोळे गच्च मिटून घेतलेले असतात...पोरगं कातावलेलं पाहून माऊली पाण्याचे तांबे पोराच्या अंगावर एकामागोमाग रिते करत राहते...गारठ्यानं छळलेल्या अंगाला गरम पाण्यानं दिलेला उबदार आल्हाद विरघळत राहतो...पोरगं टावेलनं अंग पुसून घरात पळण्याची घाई करतं...घरात पाय ठेवल्याबरोबर माऊली नव्याकोऱ्या कपड्यांची पिशवी बाहेर काढलेली असतेच...गारठलेल्या अंगात नवी कपडे घालताना कपड्यांच्या नवेपणाचा वास नाकात दरवळत राहतो...खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर टोपीचं रोजचं जग आज रंगारंग कपड्यांनी बदललेलं असतं...अंगात घातलेल्या कपड्यांची घडी मोडू नये किंवा ती चुरगुळू नये म्हणू शक्य तितकी काळजी घेत पोरगं वावरत राहतं...वासाच्या तेलानं डोकं चोळून माऊलीनं अनारशाची बशी पुढ्यात आणून ठेवलेली असतेच...अनारशाचा एकेक तुकडा तोंडात घालताना गोडव्यानं ओठाला चिकटेल्या खसखशीचंही भान राहात नाही...समोर एव्हाना फटाक्यांची थैली येऊन पडलेली असतेच...प्लास्टिकच्या थैलीतून डोकावणारे भुईनळे, लवंगी, सुतळी बॉम्ब पाहून पोरगं हरकून जातं...बशीतला अर्धामुर्धा राहिलेला अनारशाचा तुकडा तोंडात लगबगीनं कोंबत थैली उचलून पोरगं धूम ठोकतं...

दारात मांडलेल्या पणत्यांना उदबत्ती पेटवून पोरगं लवंगीचा एकेक सर वाजवत राहतं...गावभर वाजत राहिलेल्या फटाक्यांच्या आवाजात आणखी आवाजाची भर पडत राहते...हापशीच्या शेजारी साचलेल्या चिखलात फटाका लावल्यावर शेजारच्या भिंतीवर उडणाऱ्या चिखलाच्या ठिकऱ्या मनाला आनंद देत राहतात...कुणाच्यातरी उकरंड्यावर किंवा बोळात सापडलेल्या डबड्यात फटाका लावल्यावर आकाशाकडे झेपावणारं डबडं मान वर करून पाहताना गम्मत वाटत राहते...रस्त्यानं चाललेल्या कुणाच्यातरी गायी-बैलाच्या पायात वात पेटवलेला फटाका टाकून फटाका वाजेपर्यंत मन हुरहुरत राहतं...फटाक्याच्या आवाजानं धावत गेलेल्या गायी-बैल हसवत राहतात...

हा-हा म्हणता फटाक्यांची थैला रिती होऊन जाते...थैलीभर फटाक्यांचा धूर काढूनही मनाची तलखी अपूर्ण राहिलेली असते...विझलेली उदबत्ती हातात घेऊन खट्टू मनाने पोरगं फटाके वाजवणाऱ्या इतरांकडे पाहात राहतं...हिरमुसल्या जीवाच्या खांद्यावर सवंगड्यांचा हात पडतो अन् पोरगं खुलतं...सारे मिळून गावभर उंडारत राहतात...ह्याच्या त्याच्या अंगणात पडलेल्या कागदी तुकड्यांच्या सड्यात फटाक्यांची शोधाशोध होते...वाती गळलेल्या फटाक्यांची कुंडकी गोळा करून त्यांची दारू काढण्याचं काम सुरू होतं...मूठभर जमलेल्या दारुच्या पावडरला काडीपेटीनं पेटवल्यावर उडणारा भडका, त्याचा धडामधूम आवाज पोरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहतो...

दिवस उतरणीला लागलेला असतो...आणि पहाटेपासून चढत गेलेला फटाक्यांचा आवाजही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा