शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

शाळा सुटली अन् पाटीही फुटली..!

टण…टण...टण...शाळेची घंटा वाजल्यानंतर लगेचच पांढऱ्या-खाकी कपड्याचे जत्थेचे जथ्थे शाळेच्या अंगणात एका रांगेत उभे राहिले...पाणवठ्यावर पांढऱ्याशुभ्र बगळ्यांनी इथे-तिथे बैठक मारावी तशी विखुरलेली पाढंऱ्या कपड्यातली ही निष्पाप जमात एका क्षनात एका रांगेत उभी राहिली...‘जन गण मन अधिनायक जय हे…’चे सूर कानावर पडू लागले...कुणाचा बोबडा, कुणाचा घोगरा, कुणाचा नाजूक तर कुणाचा कोकिळेसारखा निरागस आवाज एकमेकांत मिसळून एव्हाना एक लयबद्ध आवाज आकाराला आला होता...’नमस्कार, मी अमूक-अमूक, इयत्ता चौथी....आज दिनांक अलाना-फलाना....आजचा सुविचार....नेहमी खरे बोलावे, खोटे बालू नये’ राष्ट्रगीत संपल्या-संपल्या त्यातल्याच एका पोरानं पुढं होऊन सुविचार सांगितला...आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन सावधानच्या अवस्थेत उभा राहिला...परत थोड्याशा मोठ्या पोरानं पुढं येऊन एकसाथ विश्रामची गगनभेदी घोषणा केली...पांढऱ्याशुभ्र मांजरीनं कूस बदलावी तसा या पोरा-पोरींचा जत्था एकसाथ हलला...एक-एक रांग वर्गाच्या दरवाजाकडे सरकू लागली...दोन्ही हात मागे बांधलेल्या पोरा-पोरींच्या रांगा कधी वर्गात शिरल्या समजलेच नाही...शाळेचा व्हरांडा मात्र अजून ‘जन गन मन’चे सूर आळवत असल्याचं भासलं...वर्गातल्या गलक्याचा आवाज व्हरांडा ऐकत बसला होता...जणू चिमुरड्यांच्या बोबड्या बोलांना व्हरांडा होकार देत असल्याचं जाणवलं...

लेंगा किंवा धोतर घातलेले पांढऱ्या कपड्यातले गुरूजी आणि हातात कसलीशी पुस्तकं घेऊन बाई एकेका वर्गात जाऊ लागल्या तसतसा किलबिलाटही विरत गेला...‘उभा एक, आडवे दोन, गाठीचे तीन, गायला पाय चार, हाताची बोटं पाच...’ गुरूजींच्या अधिकारी वाणीमागे पोरंही पाढे गुणगुणू लागले...मध्येच ‘ए गण्या, झोपू नकोस, लेका बाप तिकडं रानात मरमर मरतूय आण तू इथं झोपा काढतूयस व्हयरं...’ असा गुरूजींचा आवाज आला...आणि धप्प अशा आवाजाबरोबरच वर्गातली हलक्या आवाजातली कुजबूजही शांत झाली...मानगुटीला धरून गुरूजी गण्याला घेऊन शाळेच्या पडवीत आले सुद्धा...गण्याला अंगठे धरून उभ केलं अन् पाठीवर अंकलिपी आपटली...’अंकलिपी पडली तर शाळेचा पूर्ण व्हरांडा झाडून घीन...’ असा सज्जड इशारा देऊन गुरूजी अंतर्धान पावले...मेटाकुटीला आलेला गण्या मुकाट अंगठे धरून उभा राहिला...शिक्षा झाल्यानं आधीच भेदरलेल्या गण्याच्या पाठीवरची अंकलिपीही थरथरत राहिली...थरथरणारी अंकलिपी पडून नये म्हणून शिकस्त करत गण्या कमरेत वाकून निमूट उभा होता...वर्गातल्या पोरापोरींसमोर भभ्रा झाल्यानं गण्या काकुळतीला येऊन परिस्थितीसमोर नतमस्तक झाला होता...वर्गातल्या पोरांचा कालवा सुरूच होता...गुरूजींचा पहाडी आवाजही अधून-मधून घुमत होताच...

इतक्यात पुन्हा टण...टण...टण...घंटेचा आवाज झाल्याबरोबर पोरा-पोरींचा लोंढा बाहेर पडला...लघवीसाठी छोटी सुट्टी झाली असावी कदाचित...कुणी-बुणी शाळेच्या व्हरांड्याच्या कडेला तर कुणी-बुणी खुरट्या काँग्रेसच्या झुडुपात विधी उरकून घेत होतं...कुणी अंगठेठेपेची शिक्षा झालेल्या गण्याभोवती गोळा झालेलं...वाकून उभं राहिलेल्या गण्याकडं बघून कुणी खिदळत होतं तर कुणी गण्याची खेचत होतं...कुणी गण्याची पडायला झालेली टोपी उडवत होतं...गुरूजी हातात लाकडी पट्टी घेऊन प्रकटले अन् पोरं कुठच्याकुठं पांगून गेली...गुरूजींनी गण्याच्या पाठीवरची अंकलिपी उचलून पाठीवर जोराचा आवाजी धपाटा मारत ‘चल पळ, परत वर्गात झोपू नकोस’ असं म्हंटल्याबरोबर गण्यानं सुटकेचा निश्वास टाकला...तासाभराच्या वाकण्यानं आलेला शीण घालवत आळोखे-पिळोखे देत गण्यानं धूम ठोकली...

कुणी शाळेशेजारच्या चिंचेवरनं आणलेल्या कच्च्या हिरव्या चिंचा डोळे मिचकावत चाखत होतं, तर कुणी मुलींना पाटीवरच्या पेन्सिलींच्या बदल्यात चिंचा विकत होतं...कुणी व्हरांड्यातल्या फरशीवर कोळशानं घरं आखून लंगडीचा डाव मांडत होतं तर कुणी चिंचोक्यांचा खेळ मांडत होतं तर कुणी लपाछपी खेळत होतं...कुणी दगडांच्या मदतीने झाडावरच्या चिंचा पाडायचा प्रयत्न करत होतं तर कुणी शाळेच्या व्हरांड्यात कुणीतरी आणून उभ्या केलेल्या बैलगाडीवर घसरगुंडी खेळत होतं...कुणी शाळेच्या व्हरांड्यात शेजारच्या आया-बायांनी वाळत घातलेलं सूर्यफूल चोरून खिसे भरण्यात मग्न होतं...कुणी शाळेच्या आवारात बांधलेल्या टाकीतलं थंडगार पाणी मिटक्या मारत गळ्याखाली उतरवत होतं तर कुणी त्या पाण्यावर बसलेल्या माशांना उठवण्याचा कार्यक्रम पार पाडत होतं...पुन्हा टण...टण...टण...लघवीची सुट्टी संपली...

गावभर किंवा वाड्याभर उंडारणाऱ्या कोंबड्या कडुसं पडायच्या वेळी पुन्हा डालग्याभोवती गोळा होतात तशी सगळी पोर-पोरी शाळेत घुसली...’पुन्हा येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’चा सूर शाळेच्या आवारात झिम्मा घालू लागला...कुठल्यातरी वर्गातून परत ‘क ख ग घ’चे सूर तर कुठल्या वर्गातून ‘भारतात विविधतेतही एकतेचं दर्शन होतं...’चा आवाज....’आता बालभारतीचं पुस्तक काढा आणि पयला धडा वाचा’ म्हणत गुरूजी शाळेच्या पडवीत येऊन उगाचच वर्गात वाकून पहात उभे राहतात...कुणी मस्ती किंवा चलबिचल करताना दिसलं की
पडवीतून गुरूजींचा धमकीवजा इशारा जाई...गुरूजींच्या पहाडी आवाजाने वर्ग पुन्हा चिडीचूप...मग बाजूच्या वर्गातून हळूच बाई पडवीत येऊन ‘आमच्या वर्गात ना, पोरं अभ्यासच करायला मागत नाहीत, सारख्या टिवल्या-बावल्या, उताराही नीट काढून आणत नाहीत...’ असा तक्रारीचा सूर लावतात...गुरूजीही मग त्यांच्या तक्रारीला होकाराची मान डोलावतात...परत दोन्ही वर्गात कुजबुजीच्या आवाजानं गलका...गुरूजी आणि बाई विचारमंथन थांबवून पुन्हा वर्गात...पुन्हा टाचणी पडेल एवढी शांतता...फक्त अवती-भवतीच्या पक्षांचा किलबिलाट...दिवस वर आल्याने उन्हाच्या झळा बसू लागल्यावर शाळेच्या व्हरांड्यात झोपलेल्या कुत्र्यानं उठून कान झाडल्यावर येणारा फड्फड् आवाज हवेत विरतोय न् विरतोय तोच पुन्हा टण...टण...टण...जेवणाची मोठी सुट्टी झाली...

घंटेचा आवाज थांबल्याबरोबर पोरा-पोरींचा घोळका वेगानं बाहेर पडला...ज्याचं घर जवळ त्यानं घर गाठलं, ज्याचं घर लांब आहे किंवा जो शेजारच्या गावातून आलाय त्यानं शाळेच्या व्हरांड्यातच आपला संसार मांडला...जुन्या धोतराच्या किंवा नऊवारी पातळाच्या चटणीचे डाग पडलेल्या चिरगुटात बांधून आणलेली भाकर सोडून पोटपूजा करू लागला...कुणी वर्गात बसून खाऊ लागला...किलबिल्या डोळ्यांत समाधानाची लकेर उमटू लागली...जेवायला बरोबर बसलेल्यांना जिन्नसाची देवाणघेवाण झाली...एकोप्यानं मुलं जेवायला लागली...मी तुला माझी भाकरी दिली म्हणून गर्व नाही किंवा मी तू दिलेली भाकरी खातोय म्हणून संकोच नाही...भाकरीचा अर्धा घास दुसऱ्याला देत किंवा चपातीचा अर्धा घास दुसऱ्याकडून घेत मानवतेचा अवघा भावसोहळा सुरू होतो...एकमेकांचा ना धर्म माहित, ना जात...’हे विश्वची माझे घर’चं मूर्तीमंत दर्शन घडतं...जेवायला घरी गेलेली पोरं हळूहळू जमायला लागतात...व्हरांड्यात जेवायला बसलेल्यांच्या शिदोरीतला एखादा घास हळूच मिटकावतात...आनंदाला पारावर राहात नाही...

एव्हाना शाळेची घंटा वाजलेली असते...जेवण उरकलेलं असतंच...भाकरीचं चिरगूट गुंडाळून ठिगळाच्या चड्डीच्या खिशात कोंबत हौदाकडे जाऊन पाणी पिण्यासाठी धांदल उडते...भरपेट पाणी पिऊन पोरं शाळेत जाऊन बसतातही...पडवीच्या वर कौलाच्या खोपचीत चिमणा-चिमणीचं एकमेकांच्या चोचीत दाणं भरण सुरूच राहातं...शेजारच्या झाडावर बसलेला कावळाही निमूटपणे पाहात राहतो...पोरं निघून गेल्यानं हौदाच्या पाण्यावर माशांचं घोंघावणं पुन्हा सुरू होतं...हळूच एखादी खारूताई धाडस करत झाडावरून उतरून हौदाशेजारी साचलेल्या पाण्यात डुंबून घेते...शाळेशेजारच्या गोठ्यातून गाईचं वात्सल्यपूर्ण हंबरणं सुरू होतं...रवंथाची लाळ गाळत वासराची धडपड स्पष्ट ऐकू येते...विविध पक्षांचे चिवचिवाटी थवे शाळेच्या वर अथांग पसरलेल्या आभाळात फेर धरू पाहतात...

सूर्य कलू लागलेला असतो...तांबडी चादर पांघरण्याची घाई सूर्य लपवू इच्छित नसतो...पुन्हा वर्गात किलबिलाट सुरू होतो...निरागस किलबिलाटाला दिवसभराच्या थकव्याचा लवलेशही नसतो...गुरूजींचाही आवाज सकाळइतकाच स्पष्ट आणि ताजा असतो...शाळेसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर, शाळेमागच्या पाऊलवाटेवर एव्हाना वर्दळ वाढलेली असते...रानावणातली कामं आटोपून बळीराजा अन् बळीराणीन डोक्यावर ओझी घेऊन घराची वाट धरलेली असते...डोक्यावर ओझं घेतलेल्या आया-बायांनी हातात धरलेल्या कासऱ्याला उगाच हिसका देत, गळ्यातल्या घुंगुराचा खळखळाट करत शेळ्याही घराकडे कूच करत राहतात...बैलगाडीचं ओझं वहात ढवळे-पवळेही मान हलवत दुडक्या चालीनं चालत राहतात...शिवारभर मनसोक्त हिंडणाऱ्या पाखरांनीही घरट्याची वाट धरलेली असते...दुपारच्या रखरखीत उन्हात तापत पडलेली वाट आता जिवंत होऊ पाहात असते...शाळेशेजारून जाणाऱ्या पाऊलवाटेवर वाढलेल्या कोलाहलात शाळेतल्या पोरांचा आवाज मिसळत राहतो...शाळेत उद्याच्या उताऱ्याची तयारी सुरू झालेली असते...’सगळ्यांनी उद्या येताना एक ते शंभरचे पाढे लिहून आणायचे, साताचा पाढा पाठ करून यायचा’ गुरूजींनी आदेश फर्मावलेला असतो...शाळा सुटायची वेळ झाल्याने पोरांची चुळबूळ सुरू झालेली असते...पाटी, अंकलिपी दप्तरात भरायची घडबड उडालेली असते... महाबीज बियान्याच्या मोकळ्या झालेल्या पिशवीत किंवा खत-युरियाच्या मोकळ्या झालेल्या ठिक्यापासून शिवलेल्या दप्तरात खापराची पाटी, अंकलिपी कोंबून मुलांचे कान घंटेकडे लागलेले असतात...इतक्यात वर्गातून ‘आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे || तोषुनी मज द्यावे | पसायदान हे...’चे सूर कानावर पडू लागतात...एका सुरात, एका तालात ज्ञानोबांच्या पसायदानाचे चैतन्यमयी सूर मनाला आल्हाददायक गारवा देतात...मानवतेच्या भावनांचा यथेच्छ आभिषेक होत राहतो...शाळेतल्या इवल्या-इवल्या निरागस पोरांना ज्ञानोबा माऊलीने कवेत घेतलंय, छातीशी कवटाळून माऊली पोरांना कुरवाळतेय असं वाटू लागतं...अवघी सृष्टी पसायदान ऐकण्यात गुंगून गेलेली भासते...पसायदानाचे चिन्मयी सूर स्पष्ट ऐकता यावेत म्हणून जणू झाडांच्या पानांची सळसळही काही काळ विसावते... ‘येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला’ पसायदान संपल्याबरोबर शाळेची घंटा घणघणते...दफ्तराच्या पिशव्या खांद्याला अडकवून पोरांचा लोंढा नवोन्मेषानं बाहेर पडू लागतो...धबधब्याच्या फेसाळणाऱ्या पाण्यालाही लाजवेल असा लोंढा मोठ्या आनंदानं वर्गाच्याबाहेर पडताना दिसत राहतो...डोक्यावरच्या टोप्यांची गुंडाळी करून ठिगळाच्या चड्डीच्या खिशात कोंबत पोरं घराकडे धूम ठोकत होती...बटणं तुटलेल्या पांढऱ्या पैरणीचे झेंडे वाऱ्यानं फडफडवत पोरं पळ काढतात...
आणि...आणि अचानक कुणीतरी माझीच पैरण धरून ओढतंय असा भास झाला...मी धप्पकन भानावर आलो...पाहतो तर माझीच दोन्ही मुलं माझ्या पैरणीच्या शेंड्याला लोंबकळत होती...शाळा सुटल्यानं पोरं बऱ्याच वेळापासून बाहेर आली होती...गळ्यात टाय, चौकडीचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू कलरची हाफचड्डी, शाळेचं नाव लिहलेला बेल्ट, पायात सॉक्स-बूट...गळ्यात शाळेचं आयकार्ड, एका हातात रुमाल, एका हातात टोमॅटो सॉस लावलेला बर्गरचा तुकडा...मुलांकडे बघत सहज समोर पाहिलं...इतका वेळ मनात रुंजी घालत असलेली, भावनांचा ओलावा जपणारी जिल्हा परिषदेची कौलारू शाळा कुठल्याकुठं लुप्त झाली होती...माझ्या मुलांची इंग्राजळलेली, रुक्ष, कोरडीठाक शाळा अन् तिची भलीमोठी इमारत नजरेत भरत होती...गचांडीला धरून मला माझ्याच बालपणात घेऊन जाणारी माझी जिल्हा परिषदेची शाळा समोर नव्हती, माझे गुरूजी, माझ्या बाई, हातावर लाकडी पट्टीचा मार, शाळेसमोरची बैलगाडी, पाण्याचा हौद, चिऊकाऊंचा चिवटिवाट, चिंचेचं झाड, व्हरांड्यात जेवणाच्या सुट्टीत सोडलेल्या चटणी-भाकरीचा दरवळ...काही काही नव्हतं...

मनगटाला शेंबूड पुसत, करगुट्याला लटकवलेली ठिगळाची चड्डी सांभाळत गण्या उद्या पुन्हा शाळेत येईल...शाळेत झोपणार नाही असा निर्धार करत गण्या वर्गात दाखल होईल...पोरं-पोरी उतारा काढून गुरूजींना-बाईंना दाखवण्यासाठी गलका करतील...पुन्हा घंटा वाजत राहतील...

आमच्या आयुष्याची मात्र शाळा सुटली अन् शाळेतली शिक्षा तेवढी उरली...आता परिस्थितीसमोर आयुष्यभर अंगठे धरून उभं राहायचं एवढंच आपल्या हातात...निष्पाप, निरागस अल्लडपणाची किनार असलेल्या शिस्तीची शाळाही सुटली अन् आनंदाचे डोई आनंद तरंगवणारी खापराची पाटीही फुटली...

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

सासू हवी..?

सलाईनच्या नळीतून पडणारे औषधाचे आणि त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंचेही थेंब थांबता थांबत नव्हते...तो हमसून-धुमसून सांगत होता...बायकोची आणि आईची सारखी भांडणं होतायत रे...काल रात्री बायको पार्टीहून उशिरा आली आणि घरी आल्यावर आईने तिला झापलं...मग बायको उलट बोलली आणि वादाच्या फैरी झडल्या...पार अगदी हमरी-तुमरीवर गेलं...

वादाला कंटाळून रात्री त्यानं झोपेच्या 10 गोळ्या एकदम खाल्ल्या...गडी एकदम आडवाच झाला...घरातल्या बेडवरून थेट हॉस्पिटलच्या कॉटवर...हाताला सलाईन लाऊन उताणा...हाताला अडकवलेल्या सलाईनच्या नळ्या हलवत वियोगानं गाऱ्हाणं मांडत होता...आई डोक्याशी तर बायको पायाशी शून्यात नजर लावून बसलेली...मराठी सिनेमात शोभावं असं चित्र...यापुढे वाद होणार नाहीत


असं आश्वासन दोघींनी दिलं तेव्हा कुठं याचा चेहरा फुलला...

हल्ली सासूला आई म्हणायची फॅशन आलीय...सासरला आल्यावरही आईची उणीव भासू नये म्हणून असेल कदाचित पण आता सासवांना आई म्हणून हाक मारणाऱ्या सुना घरोघरी दिसू लागल्यायत...माहेरातही आई आणि सासरलाई आई...सुनांची चंगळच झालीय राव..!

सासूला वात्सल्यमूर्ती असलेल्या आई नावाचं लेबल मिळत असताना आणि घरोघरी अशा सासू कम आयांची संख्या वाढली असतानाही सासू-सुनांच्या भांडणाचं प्रमाण मात्र वाढतंय...मागे टाटा सोशल सायन्सच्या एका पथकाने केलेल्या पाहणीत धक्कादायक आकडे समोर आलेत...राज्यात तब्बल 69 टक्के घरांमध्ये सासू-सुनांचं पटत नसल्याचं तसेच 54 टक्के घरांतील सासू-सुनांचे किरकोळ कारणावरून खटके उडत असल्याचं पाहणीत दिसून आलंय. सासू-सुनांचं पटत नसल्याच्या कारणावरून घटस्फोट झाल्याचं प्रमाण सुमारे 7 टक्के आहे...तर बायको आणि आईचं पटत नसल्यानं पुरुषांच्या आत्महत्या झाल्याचं प्रमाण 0.2 टक्के आहे...सासूशी पटत नसल्यानं सासर सोडून माहेरीच राहाणं पसंत करणाऱ्या सुनांचं प्रमाण 10 टक्के आहे...

आकडेवारी लक्षात घेता चित्र विदारक होत चाललंय...असं का होतंय हे मात्र कळायला मार्ग नाही...नात्यांमधला ओलावा कमी होत चाललाय आणि नाती कोरडी, रुक्ष होत चाललीयत काय? तशी ती होत चालली असतील तर त्याची नक्की कारणं काय?
मला वाटतं या संघर्षाकडे केवळ सासू आणि सुनेचा संघर्ष म्हणून पाहता कामा नये...हा संघर्ष जुन्याचा आणि नव्याचा आहे...माश्यांचा आणि पाण्याचा आहे....वाऱ्याचा आणि दिव्याचा आहे...एकमेकांना पुरक आणि पोषक कृती केली तर चिरंजीव असा आनंद पदरात पडेल, परस्पर विरोधी कृती केली तर एकमेकांना मारक ठरेल...जुन्यानं नव्याला सांभाळून घ्यायला हवं....जुन्याने नव्याच्या काही गोष्टी काळ ओळखून स्वीकारायला हव्यात तसेच नव्याने जुन्याला विश्वासात घेऊन जुन्याच्या अनुभवाचा आदर करायला हवा...गरज पडेल तेव्हा जुन्याची कास धरून वाटचाल केली पाहिजे...

संसाराचा गाडा चालवताना नवरा आणि बायको ही दोन चाकं महत्त्वाची आहेतच पण गाडीत एक स्टेपनी असायलाच हवी...घराला घरपण येतं तसं गाडीला गाडीपणही स्टेपनीनंच येतं...संकटाच्या वेळी ती उपयोगाला येते...हे कायम लक्षात ठेवायला हवं...

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

आयुष्याची गंज...


सकाळी मित्रासारखा असणाऱ्या भावाला फोन केला...म्हंटलं राजे कुठं आहात...? तर म्हणे गावी आलोय सकाळीच...गंज लावायच्या कामगिरीवर चाललोय...

गंज शब्द ऐकला आणि कडब्याच्या पेंड्यांची भलीमोठी गंज डोळ्यासमोर उभी राहिली...एकमेंकींना बिलगून झोपलेल्या पेंड्यांची भलीमोठी गंज म्हणजे गुरा-ढोरांच्या वर्षभराच्या चाऱ्याची शिदोरी...ज्वारीची पेरणी झाल्यापासून ते गंज उभी राहण्यापर्यंतचा कडब्याचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला...

दिवाळीची धामधूम संपल्यावर गौरी-गणपतीचा सण संपला की बळीराजाची लगबग सुरू होते ती पेरण्यांसाठी...पाऊस पडून गेलेला असतोच...मातीच्या वरच्या थराचा ओलावा थोडा कमी होतो अन् मातीच्या गर्भात उबदार वापसा तयार होतो...हाच वापसा पेरणीसाठी पोषक ठरतो...मातीच्या पोटातल्या उबीमध्ये शेतकरी ज्वारीचं बियानं प्रेमानं घालतो...अन् कोंब फुटेपर्यंत शेत-शिवाराकडं डोळे लावून बसतो...मातीनं पोटात घेतलेलं बियाणं कोंब बनून थोड्याच दिवसांत मातीच्यावर डोकं काढू पाहतं...हिरवे-तांबडे कोंब मातीच्या रंगात मिसळून जातात...शेताच्या पृष्ठभागावर एकप्रकारचा लयदार रंग तयार होतो...पीकाजवळ उगवलेलं बिनकामाचं गवत काढून टाकण्यासाठी खुरपणी-भांगलणीचा सोहळा होतो...अन् शाळेतली पोरं एका रांगेत उभी राहिल्यावर दिसतात तशी ज्वारीच्या नाजूक कोंबांचीही रांग दिसू लागते...

नुकतंच जन्माला आलेल्या आणि बाळसं धरलेल्या ज्वारीच्या कोंबांना पक्षी-कोंबड्यांनी खाऊ नये म्हणून काळजी घेत पीक गुडघ्याएवढं कधी होतं कळतच नाही...पोटचं पोर शाळा शिकून नोकरी-धंद्याला लागल्यावर पहिला पगार हातात ठेवतं आणि पोरगं मोठं झाल्याचं बापाला वाटतं...अगदी तस्संच...

मग ज्वारीचं पीक वाढता वाढता वाढतच जातं...ज्वारीची कणसं फुलू लागतात...कणसांतून टपोऱ्या ज्वारीचे इवलेसे दाणे बाहेर डोकावू पाहतात...जग पाहण्याच्या आतुरतेनं नवजात बाळ डोळे उघडल्यावर जसं चहूबाजूला लूकलूक पाहतं तस कणसातले टपोरे दाणे नव्या नवरीनं पदराआडून पाहावं तसं आभाळाकडं पाहतात...वाऱ्याच्या झुळकीबरोबर अख्खं शिवार ताल धरतं...अख्खं शेत वाऱ्याशी लेझीम खेळतं...सबंध शिवार वाऱ्याच्या झुळकीनेही हेलकावू लागतं...

मग सुरू होतो पक्षांचा चिवचिवाट...उडत-उडत येऊन कणसातला दाणा अलगद टिपून पक्षी  कुठच्याकुठं पसारही होतात...चिमण्या-पक्षांनी पीकाचं नुकसान करू नये म्हणून मग शेतात वेगवेगळ्या प्रकारची बुजगावणं उभी केली जातात...काही भागात दिवाळीतले फटाके वाजवले जातात तर काही भागात मचान उभी करून पक्षांना हाकललं जातं...

एव्हाना थंडीचे दिवस सुरू झालेले असतात...कुठं-कुठं शेकोट्या पेटू लागलेल्या असतात...आणि याच थंडीच्या मोसमात हुरड्याच्या मेजवाण्या झडू लागतात...नगर जिल्ह्यातील काही भागांत तर चक्क हुरडा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं...रात्रीच्या वेळी रानात जाऊन कसदार कणसं घेऊन ती शेकोटीवर भाजायची...कणसातले भाजलेले दाणे वेगळे काढून शेकोटीशेजारीच बसून खायचे...गाण्यांच्या भेंड्या लावायच्या...गाणी म्हणायची....कवितावाचन...गोष्टी सांगायच्या...नकला करायच्या...व्वा मस्त..!

बापाला वयात आलेल्या पोरीचा अन् शेतकऱ्याला हातात आलेल्या पिकाचा घोर अशी एक म्हण गावाकडं प्रचलित आहे...ज्वारीची कणसं प्रमाणापेक्षा जास्त वाळून त्याचे दाणे गळून पडू नयेत म्हणून ज्वारीची काढणी वेळेत हाती घ्यावी लागते...शेतकऱ्याचं टाईम मॅनेजमेंट इथं कामी येतं...कोणत्या वेळी पिकाला पाणी दिलं पाहिजे...कोणत्या वेळी खुरपणी-भांगलणी केली पाहिजे...कोणत्या वेळी काढणी-मळणी केली पाहिजे हे शेतकऱ्यानं केलेलं एकप्रकारचं व्यवस्थापनच असतं...

मग उभ्या असलेल्या ज्वारीची कणसं वरच्यावर छाटून एका ठिकाणी गोळा करायची...मशीनच्या सहाय्यानं त्याची मळणी करायची...हल्ली मळणी करण्यासाठी मशीनची सोय आहे...पण पूर्वी शेतातच खळं असायचं...बैलांच्या सहाय्यानं कणसांचे दाणे वेगळे केले जायचे...वाऱ्यावर वाडवून त्यातला कचरा वेगळा केला जायचा...भावकी किंवा वाड्यात मिळून एक खळं असायचं...सर्वांनी सर्वांचं काम करायचं...आता तसं होत नाही...मशीन आल्यामुळे खळी मातीखाली गेली...अन् माणूसकीतल्या, नात्यातल्या ओलाव्यानंही अखेरचा श्वास सोडला....पूर्वी खळ्यांवर करावी लागायची तेवढी झगझग आता करावी लागत नाही... मशीनमुळे सर्व काही तासा-दोन तासांत..! कणसातले दाणे वेगळे आणि दाण्यातला कचरा क्षणात वेगळा...आपण फक्त दाण्याची पोती भरायची...गावभर गप्पांचे फड रंगतात तेव्हा अमूकला इतकी पोती ज्वारी झाली...तमूकला इतकी झाली अशी इर्षीरी सुरू होते...

त्यानंतर सुरू होते कणसाविना उभ्या असलेल्या कडब्याची उपटणी...हाताला फोड येईपर्यंत ताटं उपटायची...शेतातच आडवी करायची...त्यातल्याच किंचित ओल्या ताटाच्या सहाय्यानं पेंड्या बांधायच्या...आणि गुरं-ढोरं बांधायच्या ठिकाणी अर्थात परड्यात आणून टाकायच्या...मग सुरू होते गंज लावण्याची धांदल...गंज लावण्यासाठी वारंगुळा केला जातो...गंज लावण्याचा वारंगुळा म्हणजे एकप्रकारची धम्माल असते...दोन-तीन घरच्या लोकांनी एकमेकांच्या गंजी लावायच्या...ज्याची गंज लावायची त्याच्याच घरी त्यादिवशीचं जेवण...या गंजीच्या निमित्ताने मटणा-बिटणाच्या पार्ट्या झोडल्या जातात...हल्ली रोजंदारीनं माणसं आणून गंजी लावल्या जातात...वारंगुळा हा प्रकार तर नावापुरताच शिल्लक राहिलाय...उसा-बिसाच्या पिकानं शेतकऱ्याच्या हातात पैसा खुळखुळू लागलाय...त्या पैशांच्या जीवावर माणसं लावून गंजी लावल्या जातायत...

सकाळी भावाशी फोनवर बोलून झाल्यावर गंज आठवली आणि गंजीची कहानीही...पण दुष्काळामुळं जमिनीच्या भेगा वाढल्यात अन् शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही...गुरांना चारायला गवतही उगवत नसलेल्या शेतात आता ज्वारी कशी उगवणार...आणि ज्वारीविना हुरड्याची लज्जत कशी चाखायला मिळणार...शेतकऱ्याच्या आयुष्याची गंज विस्कटत चाललीय...आणि कडब्याची गंज उभी कशी राहणार...?

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

पांदीतली चिंच...


गावाची वेस संपते तिथं पांदीशेजारी भलमोठं चिंचेचं झाड दरवेळी गावी गेल्यावर नजरेत भरतं...झाडाच्या शेंड्याकडं बघितलं तर जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाची टोपी खाली पडावी...पण आम्ही मात्र चिंचेच्या शेंड्यावर सरासरा चढत असू...गाभुळलेल्या चिंचेचे आकडे ओळखण्यात आम्ही तरबेज...ढुंगणावर विविध रंगाची ठिगळं लावलेल्या खाक्या चड्डीच्या खिशात मावतील एवढ्या गाभुळलेल्या चिंचा गोळा करायच्या आणि शाळेत येऊन बसायचं...चिंचांनी भरलेले आणि फुगलेले खिसे घोलप गुरुजींच्या लगेच नजरेत यायचे...चिंचा जप्त केल्या जायच्या…शाळा सुटेपर्यंत शाळेचा वरांडा झाडून घेतला जायचा...जामीनावर सुटलेल्या एखाद्या गुन्हेगाराकडं पाहावं तसं वर्गातली पोरंपोरी बघायच्या तेव्हा लाज वाटायची...


शाळा सुटल्यावर वर्गाच्या दारात उभं केलं जायचं...सगळी पोरंपोरी बाहेर पडेपर्यंत हात वर करून उभं केलं जायचं...तोंडाला हात लावत खिदीखिदी करत पोरंपोरी घराकडं जायच्या...गावभर भभ्रा व्हायचा...मग संपूर्ण वर्ग झाडून घेतला जायचा...मग गुरुजींसमोर कान धरून 10-20 उठबशा काढायच्या...हातावर निरगुडीच्या फोकाच्या 10 छड्या खायच्या...मग कुठं सुटका...! एवढं करूनही जप्त केलेल्या चिंचा परत मिळायच्या नाहीतच... गुरूजी त्या चिंचा घेऊन जायचे...त्या चिंचांचं ते काय करायचे ते अजूनही समजलेलं नाही...वर्गातल्या कुणीतरी बातमी घरी पोहोचवलेली असायचीच...घरी पाऊल ठेवायच्या आधीच उद्धार ठरलेला...धपाटे, चापट्या, लाखोल्या सर्व काही मनसोक्त भोगायचं... अब्रूचा गड पण जायचा अन् चिंचाही...

पुढंपुढं चिंचांच्या सिझनमध्ये आम्ही गावभर प्रसिद्ध झालो...वर्गातल्या पोरीतर पाटीवरच्या पेन्सिलींच्या बदल्यात आमच्याकडून चिंचा विकत घेऊ लागल्या...गावातल्या कुणीकुणी बाया आमच्याकडून गुपचुप चिंचा घेऊ लागल्या...गावभर चिंचांच्या मामल्यात आमचा डंका झाला...

हल्ली गावी गेलो की चिंचांचा सिझन असो-नसो पांदीतल्या चिंचेखाली घटकाभर बसायला हमखास जावं वाटतं...पांदीतल्या चिंचेखाली बसल्यावर बालपणीचा काळ सर्रकन डोळ्यासमोरून जातो...ठिगळाची खाकी चड्डी, डोक्यावर मळलेली टोपी...कळकटलेली आणि बटनं तुटलेली पैरण, गाभुळल्यामुळे धुरकट झालेल्या चिंचा, इवल्याशा तळहातावर घेतलेल्या मिठात बुडवून चिंच चाटल्यावर सर्वांगाला जाणवणारा शहारा...सारं-सारं डोळ्यासमोर हेलकाऊ लागतं...बालपण देगा देवा असं कुणीतरी का म्हंटलंय याचा अर्थ उमगून जातो...


मागच्या आठवड्यात गावी गेलो...सहज पांदीतून जाताना नेहमी दिसणारी भलीमोठी चिंच दिसलीच नाही...काळजात चर्रचर्र झालं...जवळ जाऊन पाहिलं तर चिंच आडवी झालेली...पानं सुकलेली, फांद्या शरीरावेगळ्या झालेल्या...खोड उताणा पडलेला...फांद्या-खोडांवर कुठं-कुठं कुऱ्हाडीचे घाव...फांद्यांवरून हात फिरवला...चिंचेचा श्वास अजून चालू असल्याचा भास झाला...प्रत्येक वर्षी शाळेतल्या पोरांना अंगाखांद्यांवर खेळवणाऱ्या, कितीतरी पिढ्यांना आंबट-गोड चिंचांचा रतीब घालणारी पांदीतली चिंच शेवटचा श्वास मोजत होती...

खेळ संपला होता...पांदीतल्या चिंचेचाही आणि वय वाढल्यानं आमच्या बालपणाचाही..!

परवा पोरांनी मॉलमधून चिंचेची पेस्ट आणली...थोडी हातावर घेऊन चव चाखली...पांदीतल्या चिंचेची चव तिला नव्हती...पोराला म्हंटलं तूच खारे बाबा...तुझा बालपणीचा काळ नक्की आहे पण आमच्यासारखा सुखाचा नाही..!

असले लोकप्रबोधनकार काय कामाचे?


परवा सानपाड्याला हरिनाम सप्ताहाला जाणं झालं....सप्ताहाचं पहिलं पुष्प म्हणजे पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं. निवृत्ती महाराज देशमुखांची प्रवचनं त्याआधी कॅसेट, सीडींमधून पाहिली ऐकली होती...माणूस स्पष्ट बोलणारा...लोकांच्या भाषेत...गावरान उदाहरणं देत...लोकांचं मनोरंजन करत आणि हसवत खेळवत लोकांचं प्रबोधन करणारा...निवृत्ती महाराज देशमुखांची ही अशी ओळख महाराष्ट्राला झालेली...वेळेवर कार्यक्रम स्थळी न येणं किंवा आयत्यावेळी येत नाही म्हणून कुठं-कुठं महाराजांवर गुन्हेही दाखल झाल्याचं ऐकलं होतं. पण म्हंटलं आपल्याला काय? निवृत्ती महाराजांना याचि देही, याचि डोळा पाहता ऐकता येईल म्हणून जाऊया एकदा...महाराजांच्या प्रवचनाची वेळ रात्री आठ वाजताची...साडेआठ वाजले...नऊ वाजले...साडेनऊ वाजले...मंडपात प्रचंड गर्दी....निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांची कीर्तीच तेवढी मोठी ना? मंडपात जागा नाही म्हणून समोरच्या रस्त्यावर, झाडांवर, मैदानाच्या कम्पाऊंडच्या भींतींवर लोकांची तोबा गर्दी...स्वयंपाकाची वेळ असूनही आयाबायाही प्रवचनाला मोठ्या संख्येनं हजर...आणि बरोब्बर पावणेदहा वाजता अचानक आयोजक लाऊडस्पिकरवरून जाहीर करतात...निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर येऊ शकत नाहीत...दुसरे किर्तनकार किर्तन करतील...लोकांमध्ये चुळबूळ...अनेकजण उठून गेले....काठोकाठ भरलेलं मैदान क्षणार्धात अर्ध रिकामं झालं...वाईट वाटलं...एवढ्या नावाजलेल्या प्रवचनकाराने असं वागणं बरं नव्हं...म्हणून निवृत्ती महाराज देशमुखांना मोबाईलवर संपर्क केला...आधी किमान दहा एक वेळा महाराजांनी फोन उचललाच नाही...नंतर उचलला तेव्हा महाराज म्हणे...’मी तिथें आलो होतो, पण दुसराच किर्तनकार किर्तनाला उभा केल्याचं पाहून तसाच माघारी फिरलो...’म्हंटलं किती वाजता आला होतात...आणि आत्ता कुठं आहात... तर म्हणे ‘पावणे दहा वाजता आलो होतो...आता मी एक्स्प्रेस वेला लागलोय..पुण्यापर्यंत पोहोचलोय’ एवढं बोलून महाराजांनी फोन कट केला...नंतर फोन स्वीच ऑफ ते रात्री 1 वाजेपर्यंत फोन स्वीच ऑफ...

मला प्रश्न पडले, आठ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम ठरला होता तर महाराज पावणे दहा वाजता कशाला आले...? की उशिरा येणं हे महाराजांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे ? पावणे दहा वाजता नवी मुंबईत सानपाड्याच्या कार्यक्रम स्थळी आलेले महाराज सव्वा दहा वाजता पुण्याला पोहोचले? सानपाड्यातून पुण्याजवळ महाराज फक्त अर्ध्या तासात पोहोचले...व्वा महाराज...विठ्ठलाची तुमच्यावर खुपच कृपा दिसतेय...कदाचित पुण्याला जायला तुम्हाला विठ्ठलानं पुष्पक विमान दिलं होतं वाटतं...महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी वारी करत आलेल्या वारकऱ्यांच्या भेटीला आसुसलेल्या विठ्ठलानं तुम्हाला नेमकं कोणतं वाहन दिलं की तुम्ही केवळ अर्ध्या तासात पुण्याला पोहोचला...?

बरं ते जाऊद्या...महाराज जर कार्यक्रमस्थळी आले होते..तर मग लोकांची दिलगिरी व्यक्त करायला किंवा माफी मागायला का थांबले नाहीत…? निवृत्ती महाराज देशमुख...वैष्णव धर्माचं पालन छान करत आहात...महाराष्ट्राची थोर संत परंपरा आपल्या कर्माने कृतार्थ होत असेल...नाही का ?

दिंडीची रचना


पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या सहभागी होत असतात. मात्र त्यातल्या केवळ दोनशेच्या आसपास दिंड्यांनाच क्रमांक दिलेले आहेत. इतर दिंड्या बिनक्रमांकाच्या आहेत. दिंडीचा क्रमांक मिळवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर संस्थानचे सदस्य अर्ज केलेली दिंडी सलग पाच वर्षे सर्व नियमांचे पालन करून संपन्न होते का याची पाहणी करून दिंडीला क्रमांक देतात.
दिंडीच्या सर्वात पुढे भगव्या पताका असतात, त्याच्या मागे टाळकरी, मध्यभागी मृदुंगमणी सर्वात मागे विणेकरी अशी दिंडीची रचना असते. कुणी कोणते भजन म्हणायचे याच्या सुचना विणेकरी करत असतात तर चापदोर दिंडीभर फिरत शिस्तपालनावर लक्ष ठेवत असतात. दिंडीचे नियम आणि शिस्त मोडणाऱ्यांना दिंडीतून बाहेर काढण्याचे अधिकार चोपदारांना असतात. अर्थात असे प्रकार फार अपवादानेच घडतात.

न्याय- पालखी सोहळ्यात लाखो वारकरी चालत असले तरी त्यांच्या अत्यंत कमी वेळावाद उद्भवतात. किरकोळ वाद झालेच तर त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी चोपदारांवर असते. चोपदारच त्याचा न्यायनिवाडा करतात. दररोज संध्याकाळी दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी समाज आरती करण्याची परंपरा जोपासली जाते. आरतीच्या ठिकाणी मोठा चौरंग मांडून त्यावर पालखी ठेवली जाते. सर्व दिंड्याचे विणेकरी गोलाकार उभे राहतात. त्यांच्या मागे दिंड्या दिंडीतील वारकरी उभे राहतात. मग समाज आरती होते. त्यानंतर मायबाप विठ्ठलाची आरती होते. ज्ञानोबा-तुकोबाच्या नामघोषाने अवघे वातारवरण दुमदुमुन जाते. त्यानंतर सर्व दिंड्या जमा झाल्याची खात्री करून चोपदार आपल्या हातात असलेला दंड म्हणजे काठी उंचावून मोठ्याने आरोळी देतात. चोपदारांचा दंडक वर जाताक्षणीच सर्व वारकऱ्यांचे टाळ बंद होतात. मात्र ज्यांची काही तक्रार असते त्यांचे टाळ वाजायचे थांबत नाहीत. अशा वारकऱ्यांची तक्रार ऐकून चोपदार त्यावर न्याय देतात. चोपदारांनी दिलेला न्याय अंतिम असतो. तो सर्वजण आनंदाने स्वीकारतात.

संपर्क यंत्रणा- रोज रात्री मुक्कामाच्या ठिकाणी दिवसभरातल्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करून हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंची घोषणा केली जाते. वस्तू ज्यांची असेल त्यांनी जुजबी ओळख पटवली की त्यांना ती दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला वर्दी असं म्हणतात. वारीला गेलेल्या वारकऱ्यांशी त्याच्या घरच्या लोकांना संपर्क करायचा असेल तर आता मोबाईलसारखी सुविधा उपलब्ध आहे. मात्र मोबाईल वैगरे नव्हते तेव्हा घरचे लोक पत्र पाठवत असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पत्रावर व्यक्तीचं नाव आणि दिंडी क्रमांक लिहला तरी आपल्या व्यक्तीला त्याचं पत्र मिळायचं.

भोजन व्यवस्था- वारकरी दिंडीत भजन-किर्तनात रमलेले असतात. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी काही लोकांवर दिलेली असते. भोजन व्यवस्थेची जबाबदारी असणारे लोक दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी अगोदर पोहोचून जेवन बनवण्याचे काम करत असतात. तंबू ठोकणे, शेगड्या मांडणे अशी कामे करून ही मंडळी दिंडी पोहोचण्याअगोदरच वारकऱ्यांच्या जेवनाची व्यवस्था करत असतात. दिंडी पोहोचलीय. आणि जेवन तयार नाही. असे कधीही घडत नाही.

जेव्हा नव्हते चराचर...तेव्हा होते पंढरपूर...!


ज्याच्या भेटीची आस बाळगून वारकरी पंढरपूरच्या दिशेने कुणी पायी, कुणी वाहनाने तर कुणी मिळेल त्या सोयींनी पंढरपूर गाठतात त्या श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तींविषयी...
देशभरात विठ्ठल रखुमाईची मंदिरं अनेक ठिकाणी आढळतात. परदेशातही काही ठिकाणी विठ्ठल-रखुमाईची मंदिरं उभारली आहेत. मात्र या सर्व ठिकाणी विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीशेजारी-शेजारीच प्रतिष्ठापित केलेल्या आढळतात. पंढरपुरात मात्र विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली आहेत. याची एक आख्यायिका आहे. राधा आणि कृष्ण यांना एकत्र बसलेले पाहून रखुमाई नाराज झाल्या आणि रुसून दिंडिरवनात (आत्ताच्या पंढरपुरात) येऊन बसल्या. त्यांची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्णही दिंडिरवनात दाखल झाले. रखुमाईची समजूत काढून ते पुढे आई-वडिलांच्या सेवेत असणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीसाठी निघाले. मात्र माता-पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने शेजारीच पडलेली वीट भिरकावली आणि श्रीकृष्णाला सांगितले की माझी मातृ-पितृ सेवा झाल्याशिवाय मी तुला भेटू शकत नाही. माझी सेवा होईपर्यंत तू विटेवरच उभा राहा. श्रीकृष्णही मग पुंडलिकासारख्या भक्तासाठी विटेवर उभे ठाकले ते आजपर्यंत. म्हणून तर युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा असं श्रीविठ्ठलाच्या आरतीत म्हंटलय.
त्यानंतर विठ्ठलाचा शोध घेत आलेली रखुमाईही कृतककोपाने एका बाजुला उभी राहिली. भगवान विठ्ठल आणि रखुमाई जिथे उभे राहिले तिथेच त्यांची मंदिरे उभारली गेली. त्यामुळे इतर ठिकाणची मंदिरे आणि घरातील देव्हाऱ्यांत जरी विठ्ठल-रखुमाई शेजारी-शेजारी उभे राहिलेले असले तरी पंढरपुरात मात्र दोघांच्या मध्ये एक भिंत आहे.


पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे प्रांगण पूर्व-पश्चिम 300 फूट तर दक्षिणोत्तर 170 फूट लांब आहे. मंदिराच्या द्वाराला 12 पायऱ्या असून यातील पहिल्या पायरीवर नामदेव महाराजांनी समाधी घेतल्यानं या पायरीला नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते. नामदेव पायरीसमोरच संत चोखामेळा यांची समाधी आहे. या पायऱ्यांच्या पुढे 120 फूट लांब आणि 60 फूट रुंदीचा सभामंडप आहे. याच सभामंडपातून तीन मार्गांनी सोळखांबी मंडपात प्रवेश करता येतो. सोळखांबी मंडपात असलेल्या गरूड खांबास आलिंगन देण्याची परंपरा आहे. पुढे चौखांबी मंडप आणि कमान ओलांडली की आपण गाभाऱ्यात पोहोचतो. तेथेच हा सावळा विठ्ठल भक्तांची वाट पाहात उभा असलेला दिसतो.
तीन फुटांच्या नक्षीकाम केलेल्या व्यासपीठावर तीन फूट उंचीची श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. कमरेवर हात ठेवलेल्या मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ असून पाच फणे असलेल्या नागाची भव्य प्रतिमाही आहे. श्रीविठ्ठलाच्या व्यासपीठाचे छत चांदीने मढवले असून श्रीविठ्ठलमूर्ती स्वयंभू, वाळुकामय शिळेतून साकारली आहे.

पंढरपूर हे क्षेत्र पंढरी, फागनीपूर, पंडुरंगे, आणि पांडुरंगपल्ली अशा नावांनी वेगवेगळ्या कालखंडात परिचित होते. काही प्राचीन ग्रंथांमध्ये पंढरपूरचा उल्लेख पौंडरिक क्षेत्र, पंढरीपूर असाही आढळतो. चंद्रभागेने अर्धचंद्राकृती आकार धारण केलेल्या ठिकाणी पंढरपूर वसले आहे. पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र असल्याचे दाखले अनेक प्राचीन ग्रंथातही आढळतात. जेव्हा नव्हते चराचर...तेव्हा होते पंढरपूर असे संत नामदेव महाराजांनी म्हणून ठेवलंय ते याचसाठी. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारत काळाच्याही आधीपासून आस्तित्वात आहे. भागा (आता चंद्रभागा) नदीचा उल्लेख श्रीमभागवत आणि महाभारतातही आहे. पंढरपूर आर्यकाळात दिंडीरवन अशा नावाने ओळखले जायचे असेही काही ग्रंथांमध्ये म्हंटले आहे. मालूतारण ग्रंथातील माहितीनुसार पूर्वी दिंडीरवन नावाचे जंगल होते. त्या जंगलात दींडिरव या राक्षसाचे वास्तव्य होते. त्याचा वध मल्लिकार्जुनाने केल्यावर पुढे शालिवहन राजवटीत या जंगलाची साफसफाई केली गेली आणि चंद्रभागेच्या (पूर्वीची भागा) पाण्याच्या आसऱ्याने तीन योजन (आताची एक पंचक्रोशी) अंतरात लोकवस्ती वसवली गेली. शालिवहन राजाने वसवलेल्या लोकवस्तीत धार्मिक अधिष्ठानाच्या स्थापनेसाठी मल्लिकार्जुन आणि पांडुरंगाचे मंदिर उभारले. त्यानंतर या वस्तीला पांडुरंगनगरी असे नाव दिले. इ.स. 516 मधील एका शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतो. इ.स. 732 ते 788 या कालावधीत केरळच्या कालंटी परिसरात होऊन गेलेल्या श्रीआद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या श्री पांडुरंगाष्टकम् या काव्यामध्येही पंढरपूरचा उल्लेख आढळतो. इ.स.1226 मधील सोळखांबी शिलालेखातही चंद्रभागा आणि पंढरपूरचा उल्लेख आहे. इ.स.1270 मध्ये झालेल्या एका महायज्ञाचा तपशील देणाऱ्या एका शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगनगरी असा आजही पाहायला मिळतो. यादवकाळातील 1260 ते 1309 या कालावधीत यादवसत्तेतील हेमाद्री या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढरपूर व पांडुरंगाचा उल्लेख केल्याचंही पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे चौंडरस या कवीच्या 1303 साली लिहलेल्या अभिनव दसकुमारचरित या ग्रंथातही पंढरी आणि श्री विठलाचे महात्म्य सांगितले आहे. 1490-1508 या कालावधीत निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्याने लिहिलेल्या नृसिंहप्रसाद या ग्रंथातील तीर्थसार भागात भागा नदीच्या काठावर श्रीकृष्ण पांडुरंगाचे रूप घेऊन वास्तव्य करत असल्याचं म्हंटलंय. अशा तऱ्हेने पुरातन काळापासून आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारे पंढरपूर आणि पांडुरंग त्या-त्या काळात विविध नावांनी ओळखले जात असले तरी आज शासन दरबारी या पुण्यनगरीचा उल्लेख पंढरपूर असाच केला आहे.