शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

पांदीतली चिंच...


गावाची वेस संपते तिथं पांदीशेजारी भलमोठं चिंचेचं झाड दरवेळी गावी गेल्यावर नजरेत भरतं...झाडाच्या शेंड्याकडं बघितलं तर जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाची टोपी खाली पडावी...पण आम्ही मात्र चिंचेच्या शेंड्यावर सरासरा चढत असू...गाभुळलेल्या चिंचेचे आकडे ओळखण्यात आम्ही तरबेज...ढुंगणावर विविध रंगाची ठिगळं लावलेल्या खाक्या चड्डीच्या खिशात मावतील एवढ्या गाभुळलेल्या चिंचा गोळा करायच्या आणि शाळेत येऊन बसायचं...चिंचांनी भरलेले आणि फुगलेले खिसे घोलप गुरुजींच्या लगेच नजरेत यायचे...चिंचा जप्त केल्या जायच्या…शाळा सुटेपर्यंत शाळेचा वरांडा झाडून घेतला जायचा...जामीनावर सुटलेल्या एखाद्या गुन्हेगाराकडं पाहावं तसं वर्गातली पोरंपोरी बघायच्या तेव्हा लाज वाटायची...


शाळा सुटल्यावर वर्गाच्या दारात उभं केलं जायचं...सगळी पोरंपोरी बाहेर पडेपर्यंत हात वर करून उभं केलं जायचं...तोंडाला हात लावत खिदीखिदी करत पोरंपोरी घराकडं जायच्या...गावभर भभ्रा व्हायचा...मग संपूर्ण वर्ग झाडून घेतला जायचा...मग गुरुजींसमोर कान धरून 10-20 उठबशा काढायच्या...हातावर निरगुडीच्या फोकाच्या 10 छड्या खायच्या...मग कुठं सुटका...! एवढं करूनही जप्त केलेल्या चिंचा परत मिळायच्या नाहीतच... गुरूजी त्या चिंचा घेऊन जायचे...त्या चिंचांचं ते काय करायचे ते अजूनही समजलेलं नाही...वर्गातल्या कुणीतरी बातमी घरी पोहोचवलेली असायचीच...घरी पाऊल ठेवायच्या आधीच उद्धार ठरलेला...धपाटे, चापट्या, लाखोल्या सर्व काही मनसोक्त भोगायचं... अब्रूचा गड पण जायचा अन् चिंचाही...

पुढंपुढं चिंचांच्या सिझनमध्ये आम्ही गावभर प्रसिद्ध झालो...वर्गातल्या पोरीतर पाटीवरच्या पेन्सिलींच्या बदल्यात आमच्याकडून चिंचा विकत घेऊ लागल्या...गावातल्या कुणीकुणी बाया आमच्याकडून गुपचुप चिंचा घेऊ लागल्या...गावभर चिंचांच्या मामल्यात आमचा डंका झाला...

हल्ली गावी गेलो की चिंचांचा सिझन असो-नसो पांदीतल्या चिंचेखाली घटकाभर बसायला हमखास जावं वाटतं...पांदीतल्या चिंचेखाली बसल्यावर बालपणीचा काळ सर्रकन डोळ्यासमोरून जातो...ठिगळाची खाकी चड्डी, डोक्यावर मळलेली टोपी...कळकटलेली आणि बटनं तुटलेली पैरण, गाभुळल्यामुळे धुरकट झालेल्या चिंचा, इवल्याशा तळहातावर घेतलेल्या मिठात बुडवून चिंच चाटल्यावर सर्वांगाला जाणवणारा शहारा...सारं-सारं डोळ्यासमोर हेलकाऊ लागतं...बालपण देगा देवा असं कुणीतरी का म्हंटलंय याचा अर्थ उमगून जातो...


मागच्या आठवड्यात गावी गेलो...सहज पांदीतून जाताना नेहमी दिसणारी भलीमोठी चिंच दिसलीच नाही...काळजात चर्रचर्र झालं...जवळ जाऊन पाहिलं तर चिंच आडवी झालेली...पानं सुकलेली, फांद्या शरीरावेगळ्या झालेल्या...खोड उताणा पडलेला...फांद्या-खोडांवर कुठं-कुठं कुऱ्हाडीचे घाव...फांद्यांवरून हात फिरवला...चिंचेचा श्वास अजून चालू असल्याचा भास झाला...प्रत्येक वर्षी शाळेतल्या पोरांना अंगाखांद्यांवर खेळवणाऱ्या, कितीतरी पिढ्यांना आंबट-गोड चिंचांचा रतीब घालणारी पांदीतली चिंच शेवटचा श्वास मोजत होती...

खेळ संपला होता...पांदीतल्या चिंचेचाही आणि वय वाढल्यानं आमच्या बालपणाचाही..!

परवा पोरांनी मॉलमधून चिंचेची पेस्ट आणली...थोडी हातावर घेऊन चव चाखली...पांदीतल्या चिंचेची चव तिला नव्हती...पोराला म्हंटलं तूच खारे बाबा...तुझा बालपणीचा काळ नक्की आहे पण आमच्यासारखा सुखाचा नाही..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा