रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

आयुष्याची गंज...


सकाळी मित्रासारखा असणाऱ्या भावाला फोन केला...म्हंटलं राजे कुठं आहात...? तर म्हणे गावी आलोय सकाळीच...गंज लावायच्या कामगिरीवर चाललोय...

गंज शब्द ऐकला आणि कडब्याच्या पेंड्यांची भलीमोठी गंज डोळ्यासमोर उभी राहिली...एकमेंकींना बिलगून झोपलेल्या पेंड्यांची भलीमोठी गंज म्हणजे गुरा-ढोरांच्या वर्षभराच्या चाऱ्याची शिदोरी...ज्वारीची पेरणी झाल्यापासून ते गंज उभी राहण्यापर्यंतचा कडब्याचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला...

दिवाळीची धामधूम संपल्यावर गौरी-गणपतीचा सण संपला की बळीराजाची लगबग सुरू होते ती पेरण्यांसाठी...पाऊस पडून गेलेला असतोच...मातीच्या वरच्या थराचा ओलावा थोडा कमी होतो अन् मातीच्या गर्भात उबदार वापसा तयार होतो...हाच वापसा पेरणीसाठी पोषक ठरतो...मातीच्या पोटातल्या उबीमध्ये शेतकरी ज्वारीचं बियानं प्रेमानं घालतो...अन् कोंब फुटेपर्यंत शेत-शिवाराकडं डोळे लावून बसतो...मातीनं पोटात घेतलेलं बियाणं कोंब बनून थोड्याच दिवसांत मातीच्यावर डोकं काढू पाहतं...हिरवे-तांबडे कोंब मातीच्या रंगात मिसळून जातात...शेताच्या पृष्ठभागावर एकप्रकारचा लयदार रंग तयार होतो...पीकाजवळ उगवलेलं बिनकामाचं गवत काढून टाकण्यासाठी खुरपणी-भांगलणीचा सोहळा होतो...अन् शाळेतली पोरं एका रांगेत उभी राहिल्यावर दिसतात तशी ज्वारीच्या नाजूक कोंबांचीही रांग दिसू लागते...

नुकतंच जन्माला आलेल्या आणि बाळसं धरलेल्या ज्वारीच्या कोंबांना पक्षी-कोंबड्यांनी खाऊ नये म्हणून काळजी घेत पीक गुडघ्याएवढं कधी होतं कळतच नाही...पोटचं पोर शाळा शिकून नोकरी-धंद्याला लागल्यावर पहिला पगार हातात ठेवतं आणि पोरगं मोठं झाल्याचं बापाला वाटतं...अगदी तस्संच...

मग ज्वारीचं पीक वाढता वाढता वाढतच जातं...ज्वारीची कणसं फुलू लागतात...कणसांतून टपोऱ्या ज्वारीचे इवलेसे दाणे बाहेर डोकावू पाहतात...जग पाहण्याच्या आतुरतेनं नवजात बाळ डोळे उघडल्यावर जसं चहूबाजूला लूकलूक पाहतं तस कणसातले टपोरे दाणे नव्या नवरीनं पदराआडून पाहावं तसं आभाळाकडं पाहतात...वाऱ्याच्या झुळकीबरोबर अख्खं शिवार ताल धरतं...अख्खं शेत वाऱ्याशी लेझीम खेळतं...सबंध शिवार वाऱ्याच्या झुळकीनेही हेलकावू लागतं...

मग सुरू होतो पक्षांचा चिवचिवाट...उडत-उडत येऊन कणसातला दाणा अलगद टिपून पक्षी  कुठच्याकुठं पसारही होतात...चिमण्या-पक्षांनी पीकाचं नुकसान करू नये म्हणून मग शेतात वेगवेगळ्या प्रकारची बुजगावणं उभी केली जातात...काही भागात दिवाळीतले फटाके वाजवले जातात तर काही भागात मचान उभी करून पक्षांना हाकललं जातं...

एव्हाना थंडीचे दिवस सुरू झालेले असतात...कुठं-कुठं शेकोट्या पेटू लागलेल्या असतात...आणि याच थंडीच्या मोसमात हुरड्याच्या मेजवाण्या झडू लागतात...नगर जिल्ह्यातील काही भागांत तर चक्क हुरडा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं...रात्रीच्या वेळी रानात जाऊन कसदार कणसं घेऊन ती शेकोटीवर भाजायची...कणसातले भाजलेले दाणे वेगळे काढून शेकोटीशेजारीच बसून खायचे...गाण्यांच्या भेंड्या लावायच्या...गाणी म्हणायची....कवितावाचन...गोष्टी सांगायच्या...नकला करायच्या...व्वा मस्त..!

बापाला वयात आलेल्या पोरीचा अन् शेतकऱ्याला हातात आलेल्या पिकाचा घोर अशी एक म्हण गावाकडं प्रचलित आहे...ज्वारीची कणसं प्रमाणापेक्षा जास्त वाळून त्याचे दाणे गळून पडू नयेत म्हणून ज्वारीची काढणी वेळेत हाती घ्यावी लागते...शेतकऱ्याचं टाईम मॅनेजमेंट इथं कामी येतं...कोणत्या वेळी पिकाला पाणी दिलं पाहिजे...कोणत्या वेळी खुरपणी-भांगलणी केली पाहिजे...कोणत्या वेळी काढणी-मळणी केली पाहिजे हे शेतकऱ्यानं केलेलं एकप्रकारचं व्यवस्थापनच असतं...

मग उभ्या असलेल्या ज्वारीची कणसं वरच्यावर छाटून एका ठिकाणी गोळा करायची...मशीनच्या सहाय्यानं त्याची मळणी करायची...हल्ली मळणी करण्यासाठी मशीनची सोय आहे...पण पूर्वी शेतातच खळं असायचं...बैलांच्या सहाय्यानं कणसांचे दाणे वेगळे केले जायचे...वाऱ्यावर वाडवून त्यातला कचरा वेगळा केला जायचा...भावकी किंवा वाड्यात मिळून एक खळं असायचं...सर्वांनी सर्वांचं काम करायचं...आता तसं होत नाही...मशीन आल्यामुळे खळी मातीखाली गेली...अन् माणूसकीतल्या, नात्यातल्या ओलाव्यानंही अखेरचा श्वास सोडला....पूर्वी खळ्यांवर करावी लागायची तेवढी झगझग आता करावी लागत नाही... मशीनमुळे सर्व काही तासा-दोन तासांत..! कणसातले दाणे वेगळे आणि दाण्यातला कचरा क्षणात वेगळा...आपण फक्त दाण्याची पोती भरायची...गावभर गप्पांचे फड रंगतात तेव्हा अमूकला इतकी पोती ज्वारी झाली...तमूकला इतकी झाली अशी इर्षीरी सुरू होते...

त्यानंतर सुरू होते कणसाविना उभ्या असलेल्या कडब्याची उपटणी...हाताला फोड येईपर्यंत ताटं उपटायची...शेतातच आडवी करायची...त्यातल्याच किंचित ओल्या ताटाच्या सहाय्यानं पेंड्या बांधायच्या...आणि गुरं-ढोरं बांधायच्या ठिकाणी अर्थात परड्यात आणून टाकायच्या...मग सुरू होते गंज लावण्याची धांदल...गंज लावण्यासाठी वारंगुळा केला जातो...गंज लावण्याचा वारंगुळा म्हणजे एकप्रकारची धम्माल असते...दोन-तीन घरच्या लोकांनी एकमेकांच्या गंजी लावायच्या...ज्याची गंज लावायची त्याच्याच घरी त्यादिवशीचं जेवण...या गंजीच्या निमित्ताने मटणा-बिटणाच्या पार्ट्या झोडल्या जातात...हल्ली रोजंदारीनं माणसं आणून गंजी लावल्या जातात...वारंगुळा हा प्रकार तर नावापुरताच शिल्लक राहिलाय...उसा-बिसाच्या पिकानं शेतकऱ्याच्या हातात पैसा खुळखुळू लागलाय...त्या पैशांच्या जीवावर माणसं लावून गंजी लावल्या जातायत...

सकाळी भावाशी फोनवर बोलून झाल्यावर गंज आठवली आणि गंजीची कहानीही...पण दुष्काळामुळं जमिनीच्या भेगा वाढल्यात अन् शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही...गुरांना चारायला गवतही उगवत नसलेल्या शेतात आता ज्वारी कशी उगवणार...आणि ज्वारीविना हुरड्याची लज्जत कशी चाखायला मिळणार...शेतकऱ्याच्या आयुष्याची गंज विस्कटत चाललीय...आणि कडब्याची गंज उभी कशी राहणार...?

1 टिप्पणी:

  1. दादा खूपच सुखद आठवणी ताज्या करून दिल्यास ………।आज ह्या सुखाला आपण पोरके झालोय असं नाही का तुला वाटत ??? त्यात दुष्काळाचा कोप खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली

    उत्तर द्याहटवा