शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

जेव्हा नव्हते चराचर...तेव्हा होते पंढरपूर...!


ज्याच्या भेटीची आस बाळगून वारकरी पंढरपूरच्या दिशेने कुणी पायी, कुणी वाहनाने तर कुणी मिळेल त्या सोयींनी पंढरपूर गाठतात त्या श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तींविषयी...
देशभरात विठ्ठल रखुमाईची मंदिरं अनेक ठिकाणी आढळतात. परदेशातही काही ठिकाणी विठ्ठल-रखुमाईची मंदिरं उभारली आहेत. मात्र या सर्व ठिकाणी विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीशेजारी-शेजारीच प्रतिष्ठापित केलेल्या आढळतात. पंढरपुरात मात्र विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली आहेत. याची एक आख्यायिका आहे. राधा आणि कृष्ण यांना एकत्र बसलेले पाहून रखुमाई नाराज झाल्या आणि रुसून दिंडिरवनात (आत्ताच्या पंढरपुरात) येऊन बसल्या. त्यांची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्णही दिंडिरवनात दाखल झाले. रखुमाईची समजूत काढून ते पुढे आई-वडिलांच्या सेवेत असणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीसाठी निघाले. मात्र माता-पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने शेजारीच पडलेली वीट भिरकावली आणि श्रीकृष्णाला सांगितले की माझी मातृ-पितृ सेवा झाल्याशिवाय मी तुला भेटू शकत नाही. माझी सेवा होईपर्यंत तू विटेवरच उभा राहा. श्रीकृष्णही मग पुंडलिकासारख्या भक्तासाठी विटेवर उभे ठाकले ते आजपर्यंत. म्हणून तर युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा असं श्रीविठ्ठलाच्या आरतीत म्हंटलय.
त्यानंतर विठ्ठलाचा शोध घेत आलेली रखुमाईही कृतककोपाने एका बाजुला उभी राहिली. भगवान विठ्ठल आणि रखुमाई जिथे उभे राहिले तिथेच त्यांची मंदिरे उभारली गेली. त्यामुळे इतर ठिकाणची मंदिरे आणि घरातील देव्हाऱ्यांत जरी विठ्ठल-रखुमाई शेजारी-शेजारी उभे राहिलेले असले तरी पंढरपुरात मात्र दोघांच्या मध्ये एक भिंत आहे.


पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे प्रांगण पूर्व-पश्चिम 300 फूट तर दक्षिणोत्तर 170 फूट लांब आहे. मंदिराच्या द्वाराला 12 पायऱ्या असून यातील पहिल्या पायरीवर नामदेव महाराजांनी समाधी घेतल्यानं या पायरीला नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते. नामदेव पायरीसमोरच संत चोखामेळा यांची समाधी आहे. या पायऱ्यांच्या पुढे 120 फूट लांब आणि 60 फूट रुंदीचा सभामंडप आहे. याच सभामंडपातून तीन मार्गांनी सोळखांबी मंडपात प्रवेश करता येतो. सोळखांबी मंडपात असलेल्या गरूड खांबास आलिंगन देण्याची परंपरा आहे. पुढे चौखांबी मंडप आणि कमान ओलांडली की आपण गाभाऱ्यात पोहोचतो. तेथेच हा सावळा विठ्ठल भक्तांची वाट पाहात उभा असलेला दिसतो.
तीन फुटांच्या नक्षीकाम केलेल्या व्यासपीठावर तीन फूट उंचीची श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. कमरेवर हात ठेवलेल्या मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ असून पाच फणे असलेल्या नागाची भव्य प्रतिमाही आहे. श्रीविठ्ठलाच्या व्यासपीठाचे छत चांदीने मढवले असून श्रीविठ्ठलमूर्ती स्वयंभू, वाळुकामय शिळेतून साकारली आहे.

पंढरपूर हे क्षेत्र पंढरी, फागनीपूर, पंडुरंगे, आणि पांडुरंगपल्ली अशा नावांनी वेगवेगळ्या कालखंडात परिचित होते. काही प्राचीन ग्रंथांमध्ये पंढरपूरचा उल्लेख पौंडरिक क्षेत्र, पंढरीपूर असाही आढळतो. चंद्रभागेने अर्धचंद्राकृती आकार धारण केलेल्या ठिकाणी पंढरपूर वसले आहे. पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र असल्याचे दाखले अनेक प्राचीन ग्रंथातही आढळतात. जेव्हा नव्हते चराचर...तेव्हा होते पंढरपूर असे संत नामदेव महाराजांनी म्हणून ठेवलंय ते याचसाठी. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारत काळाच्याही आधीपासून आस्तित्वात आहे. भागा (आता चंद्रभागा) नदीचा उल्लेख श्रीमभागवत आणि महाभारतातही आहे. पंढरपूर आर्यकाळात दिंडीरवन अशा नावाने ओळखले जायचे असेही काही ग्रंथांमध्ये म्हंटले आहे. मालूतारण ग्रंथातील माहितीनुसार पूर्वी दिंडीरवन नावाचे जंगल होते. त्या जंगलात दींडिरव या राक्षसाचे वास्तव्य होते. त्याचा वध मल्लिकार्जुनाने केल्यावर पुढे शालिवहन राजवटीत या जंगलाची साफसफाई केली गेली आणि चंद्रभागेच्या (पूर्वीची भागा) पाण्याच्या आसऱ्याने तीन योजन (आताची एक पंचक्रोशी) अंतरात लोकवस्ती वसवली गेली. शालिवहन राजाने वसवलेल्या लोकवस्तीत धार्मिक अधिष्ठानाच्या स्थापनेसाठी मल्लिकार्जुन आणि पांडुरंगाचे मंदिर उभारले. त्यानंतर या वस्तीला पांडुरंगनगरी असे नाव दिले. इ.स. 516 मधील एका शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतो. इ.स. 732 ते 788 या कालावधीत केरळच्या कालंटी परिसरात होऊन गेलेल्या श्रीआद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या श्री पांडुरंगाष्टकम् या काव्यामध्येही पंढरपूरचा उल्लेख आढळतो. इ.स.1226 मधील सोळखांबी शिलालेखातही चंद्रभागा आणि पंढरपूरचा उल्लेख आहे. इ.स.1270 मध्ये झालेल्या एका महायज्ञाचा तपशील देणाऱ्या एका शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगनगरी असा आजही पाहायला मिळतो. यादवकाळातील 1260 ते 1309 या कालावधीत यादवसत्तेतील हेमाद्री या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढरपूर व पांडुरंगाचा उल्लेख केल्याचंही पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे चौंडरस या कवीच्या 1303 साली लिहलेल्या अभिनव दसकुमारचरित या ग्रंथातही पंढरी आणि श्री विठलाचे महात्म्य सांगितले आहे. 1490-1508 या कालावधीत निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्याने लिहिलेल्या नृसिंहप्रसाद या ग्रंथातील तीर्थसार भागात भागा नदीच्या काठावर श्रीकृष्ण पांडुरंगाचे रूप घेऊन वास्तव्य करत असल्याचं म्हंटलंय. अशा तऱ्हेने पुरातन काळापासून आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारे पंढरपूर आणि पांडुरंग त्या-त्या काळात विविध नावांनी ओळखले जात असले तरी आज शासन दरबारी या पुण्यनगरीचा उल्लेख पंढरपूर असाच केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा