गुरुवार, २१ मे, २०१५

हा कसला टाईमपास..?

गावात तिकडं निजानिज होत असताना काजव्यांच्या साक्षीनं काळ्याकभिन्न वाटेनं तो चालत राहतो...दिवसभर गुराढोरांच्या श्वासानं मोहरलेला तलाव का म्हणून कुणास ठावूक पण उताणा पहुडलेला असतो....गावाच्या शेजारी दहा-बारा शेता-वावराच्या पल्याड तलावात सुकुमार चंद्राचं प्रतिबिंब हेलकावत राहताना तो बघत राहतो…वाऱ्याच्या झुळुकीनं तालेवार हलणारं पाणी चंद्राला गोंजारत असल्याचं बघताना तो मात्र निश्चल, स्थितप्रज्ञ होऊन गेलेला असतो...तलावाच्या कडेला बांधलेल्या कट्ट्यावर एक पाय ठेवून गुडघ्यावर कोपर आणि हनुवटीला तळहात लावून पाण्यात पडलेल्या चंद्रावरून नजर हटत नाही त्याची अजिबात...

रात्र कुस बदलण्याच्या तयारीत असताना संक्रांतीला माहेरी आलेली ‘ती’ त्याच्या डोळ्यांसमोरून हटत नाही...लहानपणी शाळेत जाताना परकर-पोलक्यात दिसलेली ‘ती’, तिन्ही सांजेला तेलवात घालायला आईसोबत देवळात जाताना दिसलेली ‘ती’, जत्रेत तिच्याच वयाच्या पोरींसोबत पाळण्यात बसून निरागसपणे खिदळताना दिसलेली ‘ती’, शाळेतल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसल्यावर दोन वेण्या आणि त्यांना बांधलेल्या रिबिनींच्या आडून अर्धीमूर्धी दिसणारी ‘ती’, दिवाळीला वासाचं तेल लावून, नवी कपडे घालून भल्या पहाटे घरासमोर चाफ्याच्या झाडाखाली लवंगी फटाक्यांचा सर पेटवून कानाला हात लावत घाबरून पळत जाताना दिसलेली ‘ती’, संध्याकाळच्या वेळी अंगणातल्या ओट्यावर तांदूळ निवडताना दिसलेली ‘ती’, चालताना दिसलेली ‘ती’...हसताना दिसलेली ‘ती’,...बसलेली ‘ती’, जाताना, येताना, धावताना दिसलेली ‘ती’...

सारं सारं आठवत तो जुन्या दिवसांच्या कुशीतली ऊब अनुभूवत राहतो...माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस असं बोलण्याचं धाडस कधीच केलेलं नसतं त्यानं...मनातल्या मनात चेतवलेल्या प्रेमाचा दिवा त्यानं निष्ठेनं जपलेला असतोच...आपल्यासाठी भावनांची वात करून कुठंतरी दिवा तेवत राहिलाय याची तिला कल्पना होती की नाही कुणास ठाऊक? पण तिच्या लग्नातल्या जेवणावळींच्या पंगतीतही तो हसऱ्या चेहऱ्याने वाढप्याचं काम करत राहतो...तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांना हे वाढू का?, ते वाढू का म्हणून आपुलकीने आग्रह करत राहतो...मंगलाष्टकांच्या गदारोळात अक्षदा टाकताना थरथरणाऱ्या हातांचा कंप मात्र त्याच्या हाताला आज होताच...तिच्या लग्नानंतर एव्हाना चार-पाच वर्ष लोटलेली असतानाही लग्नानंतर गाडीत बसून सासरी जाताना तिचा दिसलेला चेहरा आठवल्यासरशी तो विजेच्या वेगाने माघारी फिरून झपाझप पावलं टाकत राहतो...परड्यातल्या फाटक्या वाकळेवर अंग टाकून देत झोपून जातो...सकाळी उगवणारा सूर्य त्याच्या पदरात कसला दिवस देणार आहे देव जाणे...

परवा एक सहकारी सांगत होती, “प्रेमा-बिमाचं काय असतं? हल्ली आयुष्यभर टिकावं असं प्रेम असतंच कुठं आणि ते असावं तरी कशासाठी? काळ बदलेल तसे विचार बदलतात, विचार बदलले की काही गोष्टी नकोशा वाटतात, मग प्रेम कालबाह्य वाटतं, त्यातला चार्म संपतो....हे एकदा समजलं की दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...पुन्हा कुणी कुणाच्या वाटेत यायचं नाही...” ती बोलत होती पण मला टोटल लागत नव्हती...हे सर्व सांगताना ती वारंवार ब्रेकअप नावाची गोंडस व्याख्या सांगत होती...मनात आज असलेली व्यक्ती उद्या नकोशी वाटू शकते हेच मला अघोरी वाटतंय...आपल्याला हवा तसा समोरच्यात बदल करायचा, त्याने तो बदल केला तरच त्याच्यावर प्रेम करायचं, नाहीच बदल होऊ शकला तर दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...मला वाटतं यात समर्पण नावाची गोष्ट वजा शून्य आहे...आपल्याला हवा तसा बदल करायचा आणि मग आपलं म्हणायचं हे स्वत:वर प्रेम करण्यासारखं नाही का?

मागे एकजण सांगत होते, त्याच्या नातेवाईकाची कुणी मुलगी मोबाईलवर चॅट करताना सापडली, घरच्यांनी बदड बदड बदडली...पण धक्कादायक गोष्ट ही की ती मुलगी एकाचवेळी दोन मुलांशी चॅटिंग करत होती...एकाचवेळी दोन्ही मुलांशी प्रेमाच्या आणाभाका घेत होती...काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये दोन मुलं बोलत होती...”अरे उद्या अमूकला पिक्चरला घेऊन जायचंय, परवा तमूकला रिसॉर्टला घेऊन जायचंय, दोन-दोन लफडी सांभाळायची म्हणजे घायकुतीला यायला होतंय यार, एका कुणालातरी ब्रेक करावं लागेल” हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हिमालय जिंकल्याचा अविर्भाव होता...

हा कसला काळ आलाय, काहीच समजेना...त्यांचं बरोबर असेलही पण हा नवपोपटवर्ग निर्मळ प्रेमभावनेचा, निरागसपणे जीव जडण्याच्या युगाचा गळा तर घोटत नाही ना? चंगळवाद, उपभोगवाद बोकाळलाय का? ज्याला जसं जगायचंय त्याच्या अधिकाराला बोट लावण्याचा आपणास अधिकार नाही; पण मग हे सर्व करताना ते प्रेमाच्या पावित्र्याला नख का लावत असावेत? भिल्लासारखं प्रेम करत आभाळाला पोहोचण्याची स्वप्न मातीमोल करताना जीव पिळवटून कसा निघत नाही यांचा? देवदत्त मिळालेली रक्ताची नाती आपण हवी तेव्हा नाकारू शकत नाही मग ही मनाने निर्माण झालेली नाती झुगारण्याची हिम्मत येते कुठून?

आधुनिकीकरणाच्या धबडग्यात घड्याळाचे काटे, कॅलेंडरचे आकडे तोकडे पडू लागलेत, वेळच पुरत नसल्याची ओरड जिथंतिथं कानावर येतेय, म्हणून प्रेमाबिमाला टाईमच नाही म्हणतायत लोक, कामाचं, करिअरचं, संसाराचं टेन्शन मानगुटीवर असताना प्रेमाचं नसतं झेंगाट कशाला असाही सूर हल्ली एेकायला मिळतोय, पण मग असं असलं तरी टाईमपाससाठी प्रेमाची नौटंकी करणाऱ्यांचीही संख्या बोकाळतीय...मित्रहो, प्रेम ही टाईमपासची गोष्ट नाही, प्रेमाला नैतिकतेचं आणि पावित्र्याचं अधिष्ठान दिलं तर पास टेन्स संपन्न होऊन जाईल, मग ते प्रेम मिळो अगर न मिळो...ते प्रेम व्यक्त होवो अगर जिंदगीभर अव्यक्त राहो..! पण त्यासाठी जीव जडल्यावर आतून दाटलेल्या व्याकूळतेची भाषा समजून घेण्यासाठी, एखाद्याच्या निर्व्याज प्रेमाची गाज ऐकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवायला नकोत का?

मित्रहो, वर सांगितलेल्या अव्यक्त आणि तितक्याच निर्मळ प्रेमकहाण्या आपल्याला गावोगावी दिसतील...प्रेम आहे पण तिला कधी सांगितलं नाही अशी अव्यक्त नाती गावोगावी जन्मली पण प्रेमानं बाळसं काही धरलं नाही...तिच्या नावाच्या पहिल्या अक्षरांनी प्रत्येक वहीच्या शेवटच्या पानावर गर्दी केलेली असेल...अभ्यासाला गेल्यावर चपट्या दगडाने तिच्या नावांनी अख्ख्या शिवारातील झाडांची खोडं गिरवली असतील...नदीच्या खडकावर, डोंगरातल्या देवळाच्या दगडांवर, हाताच्या तळहातावर बॉलपेनने तिच्या नावाचं रोजच्यारोज गोंदण करणं हे त्यांचं व्यक्त होणं...त्याकाळी प्रेम करायची अशी तऱ्हा जोपासणाऱ्या अनेक पिढ्या गावागावात अाजही वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दिसतील...त्यांच्या मनातलं प्रेम स्वत:पुरतं का होईना अजूनही जिवंत आहे...कारण काय असेल त्या प्रेमाच्या जिवंतपणाचं? मित्रहो, तुम्हाला काय वाटतं..?

अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत...जन्माला येतील पण वाढत नाहीत...आणि वाढत नाहीत म्हणून संपत नाहीत...बस्स इतकंच!

शुक्रवार, १५ मे, २०१५

ही व्याकूळता येते कुठून?

उनाड वारा वाहायला लागला किंवा पाऊस टपोरीगिरी करायला लागला की वाड्याशेजारच्या बोळात जाऊन झोपलेल्या राजाला छातीशी कवटाळावं वाटायचं...जुना असला तरी चिरेबंदी असलेल्या वाड्यातील घरात उबदार वाकळेत शिरूनही दाराच्या फटीतून चोरपावलांनी घुसणारा वारा अंगाला झोंबायचा, वाकळेत मुस्कटून घ्यावं वाटायचं, मग बोळात झोपलेल्या राजाची काय अवस्था होत असेल? अशा विचारांनी काहूर दाटायचं मनात...पण भल्या पहाटे उठून कसं जायचं बाहेर? आणि धाडस करून गेलोच बाहेर तर बोळात गुपचूप लपवून ठेवलेला जीव सगळ्यांना सापडेल या भीतीनं तसंच धुमसत राहायचो वाकळेत...

वाड्याशेजारचं बोळ म्हणजे आम्हा पोरांसाठी भुताचं घर...दिवसाही कुणी पोरगं तिथं फिरकायचं नाही...रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालताना बोळाकडे न बघताच पावलं धावत सुटायची...बोळासमोर आलं की छातीतली धडधड दुप्पट वेगाने बोकाळायची...दूध न पिणाऱ्या बारक्या पोरांना ‘दूध नाय पिलास तर बोळातली भांबड येईल’ असं म्हणून दरडावलेलं कधीतरी ऐकलेलं असायचं...त्यामुळे बोळ म्हंटलं की उरात धडकी भरायची...तसं बोळात पोक्त बाप्यांचं येणं-जाणं असायचं, पण केवळ विधी उरकण्यासाठी...अशा पोक्त बाप्यांच्या धाडसाबद्दल आम्हा पोराटोरांना जाम कौतुक वाटायचं...

जरा फटाटायला लागलं की मुतायला म्हणून बोळात जायचं आणि राजाच्या अंगावर टाकलेलं पोतं ओढायचं...निपचित पहुडलेला राजा कान फडफडवत उभा राहायचा...पोत्यामुळं आलेली ऊब त्याच्या अंगाला

आमच्या घरातले म्हणायचे ‘कुत्रं पाळायचं आपल्या घराला धार्जिन नाही...कुत्रं पाळलं की मरतं’ त्यामुळे कुत्रं सांभाळायची इच्छा असूनही पाळता येत नव्हतं...वर्गातल्या इतर पोरांच्या घरी गेल्यावर कुत्रं दिसलं की त्यांचा हेवा वाटायचा...दोस्ताच्या पायात घुटमळणारं, त्याचे धूळभरले पाय चाटणारं कुत्र्याचं पिल्लू मनात भरायचं...पण घरातल्यांच्या धाकापोटी कुत्र सांभाळायची हिम्मत नाही व्हायची...पण गावात कुत्र्याची पिल्लं बघितली की मनाला आवर घालता नाही यायचा...एकदा पांदीशेजारून जाताना कानावर कसलासा आवाज पडला...पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहिलं तर कुत्री व्यालेली...निरागसपणे धडपडणारी पिल्लं पाहून राहावलंच नाही...अबदार हाताने एक कुत्र उचललं आणि पळत्या चालीनं घराजवळ आलो...पण घरात न्यायचं कसं? घरात घेऊन जावं तर फटके पडणारच...काय करावं बरं या पिल्लाचं? विचार करत-करत बोळासमोर आलो आणि ट्यूब पेटली...कुत्र्याचा सांभाळ करायचा...कुणालाही कळून द्यायचं नाही...

ठरलं, घाबरत घाबरत बोळात शिरलो, बोळाच्या मध्यभागी एका झुडुपामागे भुई चोखाळली...साफसफाई केली, प्रल्हाद दादांच्या घरामागे बोळात पिल्लाचा मुक्काम सुरू...प्रल्हाद दादांच्या घराच्या कौलावर हाताला येईल असं एक जुनं गोणपाट लोंबत होतं....ते घेतलं आणि पिल्लाला त्याच्या घडीत अलगद बसवलं...डोळे लुकलुकवत पिल्लू पोत्यात धडपडून शांत पहुडलं...पांडू नानाच्या केस कापायच्या रविवारीच चालू असणाऱ्या दुकानातून जुनाट वाटी चोरली आणि गल करून पिल्लाशेजारी रोवून ठेवली...त्यात पाणी ठेवलं...पिल्लानं जीभेनं चाटत फस्त केलं...

घामेजल्या चेहऱ्याने घरात पाऊल ठेवलं तर अंघोळीच्या पाण्याची बादली वाफ फेकत दारात...कशीबशी अंघोळ उरकतोय तोच आईनं दुधाचा ग्लास समोर धरला...रोज नको-नको म्हणणारा मी त्यादिवशी दुधाचा ग्लास ओढताना पाहून आईनं आश्चर्यानं बघत डोक्यावरून हात फिरवला...अर्धा ग्लास गटकन घशाखाली उतरवला, अर्ध्या ग्लासातल्या दुधाचा भला मोठा घोट तोंडात धरून न गिळताच बोळाकडे धूम ठोकली...तोंडातला दुधाचा घोट वाटीत रिकामा केला...पुन्हा पळत जाऊन राहिलेल्या दुधाचा घोट तोंडात साठवून पुन्हा वाटीत रिता केला...दोन्ही वेळेचं दूध पिल्लानं पटापट घशाखाली उतरवलं...नाव कधी ठेवलं ते नीटसं आठवत नाही पण नंतर नंतर त्याला राजा म्हणून हाक मारू लागलो...दुपारी शाळा सुटली की उनाडक्या करत फिरणारा मी पळत घरी येऊन जेवणाच्या ताटावर बसायचो...अर्धी भाकरी खाऊन उरलेली भाकरी हळूच खिशात कोंबून राजाच्या पुढं टाकूनच शाळेत जायला लागलो...संध्याकाळी शाळेतून आल्यावरही तोच उपक्रम...तोंडात साठवलेला दुधाचा घोट राजापुढच्या वाटीत ओतायचा आणि मगच खेळायला जायचं...

अंधार पडल्यावर बोळाच्या आसपासही न फिरकणारा मी रात्रीच्या जेवणातली भाकरी लपवत राजाला देऊन यायचो...राजा अंधारातही माझ्या पावलांचा आवाज ओळखून किवकिव करायचा...शेपूट हलवायचा...बोळातली भांबड, भूत या सगळ्याची भीती कुठच्याकुठं पळून गेलेली...जणू इवल्याशा राजाने त्यांना बोळातून पिटाळून लावलं होतं...सणावाराला पोळ्याबिळ्यांच्या गोडधोड जेवणातला घास राजाल्या दिल्याशिवाय घशाखाली नाय उतरायचा...अचानक पावसाचे ढग दाटायला लागले आणि कुणाच्यातरी रानातनं सलिद्याचा तुकडा चोरलेलीही मला आठवतोय...राजाच्या अंगावच्या पोत्यावर सलिद्याचं झाकण टाकून राजाला पावसापासून वाचवायचो...राजा थोडाबहूत भिजायचा पण अंग फडफडवत पाणी झाडायचा अन् पायाशी घुटमळत, पायाला

चार-पाच महिने झाले...राजा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेला...जीवाचा सखाच बनला होता म्हणा ना..!

मला अजून आठवतंय, रंगपंचमीचा दिवस होता...तांब्यात कुंकू मिसळून पोरांना रंगवण्यात मी गर्क होतो...सकाळी तोंडभरल्या दुधाच्या घोटाने राजाला रतीब दिला होताच...दुपारी थेट जेवणच देऊ म्हणत रंग खेळण्यात दंगलो होतो...डोक्यावर सूर्य तळपू लागल्यावर घराकडे आलो...हातपाय धुवून जेवायला बसलो...जेवणातली अर्धी भाकरी हळूच खिशात कोंबून बोळात आलो तर राजाची झोप लागलेली...नुसत्या पावलांच्या आवाजानंही उठून बसणारा राजा शांत निवांत पहुडला होता...उठल्यावर खाईल असा विचार करत भाकरी टाकून निघून आलो...संध्याकाळी दुधाचा घोट तोंडात धरून फुगवलेले गाल घेऊन राजासमोर गेलो तर राजा दुपारच्याच अवस्थेत...काळजात चर्रर्र झालं...अंगावरचं पोतं झटकलं तर राजाची हालचाल नाही...डोळे उघडे होते पण कोरडलेले...राजानं जीव सोडला होता...काय झालं होतं काय माहित पण राजानं जगाचा निरोप घेतला होता...राजाचं जग म्हणजे केवढं हो..? जगानं वाळीत टाकलेलं बोळं आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ फिरकणारा मी...एवढ्याशा जगात राजा गुदमरला होता की काय? देव जाणे...पण चार-पाच महिने समृद्ध करत, मला पालकत्वाचा अनुभव बहाल करून राजानं जगातून काढता पाय घेतला होता...पोत्यात गुंडाळून राजाला उचलून गावंदरीतल्या कुठल्याशा रानात पुरून टाकला होता...मेलेल्या माणसाला कोणत्या धर्मात जाळतात, कोणत्या धर्मात पुरतात हे कळण्याची अक्कल नव्हतीच मग कुत्र्याचा अंत्यविधी कसा करायचा हे कसं कळणार? राजाला माती देऊन घराकडे येताना डाव्या पायाच्या अंगठ्यात कळकाची पाचर घुसली...नख उपडं झालं...कळ मस्तकात गेली...दहा-पंधरा दिवस अंगठा ठसठत राहायचा...राजाच्या आठवणीची ठसठस त्याहून कितीतरी मोठी असायची...

गेल्या रविवारी कोरेगावहून पळशीकडे जाताना जळगावच्या आसपास चिंधवलीचा मेहुणा आणि मी रस्त्याकडेला वडाच्या सावलीत उभं होतो...कासराभर अंतरावर चारदोन बाया, पाचसहा पोरं जमलेली...काय झालं होतं काय माहित? आमच्या गप्पा सुरू असतानाच लहानगी पोरगी आली आणि ‘आमच्या आईनं तुमाला बोलवलंय’ असं रडत सागून गेली...मेव्हण्याला म्हटलं ‘अमोलराव इथापे-पाटील, चला बघूया, नेमकं काय झालंय’ झपाझप पावलं टाकत घोळक्यातून वाट काढत आत गेलो...पोत्यात काहीतरी झाकून त्याच्या शेजारी पस्तीस-चाळीशीतली बाई धाय मोकलून रडत होती...पोत्यातून रक्ताचा लहानगा पाट ओघळला होताच...पोरगं-बिरगं गाडीखाली सापडून मेलंय की काय म्हणून बाईला विचारणार तोच बाईनं ‘तुमच्याकडे मोबाईल असला तर एक फोन लावून देता का? ’ असं विचारलं...सांगितलेला नंबर फिरवला आणि बाईकडं दिला...बाई रडत रडत नवऱ्याला सांगत होती...’अहो लवकर घरी या, आपला राजा गाडीखाली सापडलाय, लय लागलंय’ फोनवरून बोलता-बोलता तिनं पोतं बाजूला काढलं आणि जखमी असलेलं कुत्र्याचं पिल्लू मेलेलं पाहून तिनं अक्षरश: आक्रोश सुरू केला....हातातला फोन गळून पडला...मी फोन उचलून कानाला लावला तर समोरच्या माणसाच्याही तोंडातून शब्द फुटेना...नुसतेच हुंदके...इकडं ही बाई छाती बडबडवून रडत होती आणि फोनवर तिचा नवरा रडत रडत ‘आलोच, त्याला दवाखान्यात ने लवकर’ म्हणत होता...

पुढं काय झालं काय माहित, पण मेहुणा आणि मी एकमेकांकडे बघत राहिलो होतो, पाणावल्या डोळ्यांनी...रक्ताच्या थारोळ्यातला राजा आणि चेंदा झालेलं राजाचं तोंड मांडीवर घेऊन धाय मोकलून रडणारी ती माऊली अजून डोळ्यांसमोरून जात नाही, ह्रदयात कळ उठली आणि लहानपणी दुखावलेला डाव्या पायाचा अंगठा का म्हणून काय माहित पण ठसठसायला लागला.
चाटत राहायचा...
स्पर्श केल्यावर जाणवायची...पांढऱ्या शुभ्र राजाच्या मस्तकावरचा चहाच्या रंगाचा गोलाकार ठिपका राजाचं देखणेपण अजून खुलवायचा...थंडीमुळे राजा थरथरत्या पायाने डोळे मिचकावत राहायचा...कुडकुडणाऱ्या राजाच्या अंगावर हात फिरवायचा आणि कुणी बघायच्या आत घराकडे धूम ठोकायची...

ताजा कलम- सलमान खानच्या शिक्षा-जामीन या झोंबाझोंबीच्या तीन-चार दिवसांत गायक अभिजीत भट्टाचार्य बोलला की "फुटपाथवर झोपणारे कुत्र्यासारखेच मरणार..."

माणसाला कुत्रं म्हणण्याचा माज येतो कुठून आणि कुत्र्याला माणसासारखा किंबहुना पोटच्या गोळ्यासारखा जीव लावण्याची व्याकूळता येते कुठून..?







शेवटी मामाचीच केली..!

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया

हे गाणं म्हणत चड्डीतली पोरं पँटित आली, फ्रॉक किंवा परकर पोलक्यातल्या पोरी पंजाबी ड्रेस किंवा साड्यात आल्या...पण मामाच्या गावाची भुरळ काही जाता जात नाही...पोरींना लग्नानंतर माहेरच्या अबदार मायेची सोय असते, पुरुषांना मात्र माहेर नसतं...लग्नानंतर पुरुषांचं सासरी कोडकौतुक होतं पण आजोळच्या लाडाची सर त्याला नाही...सासू-सासरे-मेव्हणे कुठं ठेऊ आणि कुठं नको करत असले तरी त्या लाडात अवघडल्यासारखं होतं एवढं नक्की...मामाच्या गावी कितीही लाड झाला तरी कसं मोकळं ढाकळं वाटतं...म्हणूनच मामाचं गाव हे पुरुषांचं माहेरच म्हणा की जणू...सुट्टीला मामाच्या गावी जायचं, चिरेबंदी वाडे आता राहिलेत की नाही काय माहित पण कुडाचं किंवा अजून कसलंही असलं तरी मामाचं घर अवघ्या जगातलं सर्व सुखसुविधांनी भरगच्च असल्यागत वाटतं...सकाळी मनाला येईल तेव्हा उठायचं, मामीनं अंगणात पेटवलेल्या चुलीत काटकानं टोकरत राहायचं, धुराच्या लोळांनी डोळ्यात पाणी दाटलं की मामीचा पदर हजर...पहाटे कधीतरी उठून सुरू केलेला स्वयंपाक उरकत, पदर कमरेला खोचत मामी चुलीवरचं काळवंडलेलं भगुलं बादलीत उपडं करते आणि वाफाळलेलं पाणी अंघोळीसाठी साद घालत राहतं...कपडे काढून नागडेपणानं अंघोळ करताना संकोच वाटत नाही...मामी खरबड्या टावेलनं अंग पुसते पण त्याची बोच लागत नाही...अंगालाही आणि मनालाही..!

मंडळी, मला मामाच्या गावाबद्दल आज जरा वेगळं सांगायचंय...प्रत्येकाच्या मनातला एक अव्यक्त कोपरा...मनाच्या कुपीत साचून राहिलेली गोड वेदना...

आपल्याकडे मामाच्या मुलाबरोबर किंवा मामाच्या मुलीबरोबर लग्न करतात...त्यामुळे लग्न म्हणजे काय?, बायको किंवा नवरा म्हणजे काय ? हे कळण्याच्या आधीच चिडवाचिडवी सुरू होते...लहानपणी आजोळी गेल्यावर भांडीकुंडी किंवा भातुकलीचा खेळ खेळताना मामाच्या पोरीला बायको बनवल्यावर पोक्त झाल्यागत वाटत राहातं...शेजारच्या आयाबाया मामाच्या पोरीच्या किंवा पोराच्या नावानं डिवचतात तेव्हा ते लाजणंही हवंहवंस वाटत राहातं...माझी पोरगी तुझ्या पोराला किंवा तुझी पोरगी माझ्या पोराला करून घेईन अशी वचनं पूर्वी बाळ पाळण्यात असतानाच दिली-घेतली जायची...आणि ती पाळलीही जायची...असो...

जसजसं वय वाढत जातं तसतसं मामाच्या पोरीबद्दल किंवा मामाच्या पोराबद्दल निर्मळ, पवित्र प्रेमाचा उमाळा फुटत राहतो...भातुकलीच्या खेळात खेळलेल्या खोट्या-खोट्या संसाराचं स्वप्न मोठं झाल्यावर पडू लागतं...घरात तिनं जेवायला वाढावं, कामावरून किंवा शेतातून नांगरट करून आल्यावर ती दाराट वाट पाहात बसलेली दिसावी असं मनोमन वाटतं राहातं...प्रेमाची भावना उत्तरोत्तर दाटत राहते...

मोठं झाल्यावर जत्रेखेत्रेला किंवा कुणाच्या लग्नात दिसल्यावर मामाच्या पोरीबद्दल किंवा पोराबद्दल जीव दाटत राहायचा...पण पुढं होऊन बोलण्याची हिम्मत मात्र नसायची...जगात ‘काम खतम, आदमी खतम’ अशा स्वार्थी आणि संकुचित प्रवृत्तीने जरी बाळसं धरलेलं असलं तरी इथं मात्र एकमेकांच्या पावित्र्याची जीवापाड काळजी वाहिली जाते...हल्ली जरी प्रपोज वगैरे करून प्रेमाची किंवा लग्नाची मागणी केली जात असली तरी मामाच्या पोरीला किंवा पोराला प्रपोज करायचं धाडसच होत नाही...घरात कधीतरी विषय निघाला तर मूक संमती देत गुदगुल्या करून घ्यायच्या, तेवढ्यावरच काही झालं तर झालं, नाहीतर प्रेमाची भावना मनातल्या मनात जपायची...देव्हाऱ्यात नाही का बाप्पाच्या मूर्तीला उजळवून टाकण्यासाठी पणती रात्रभर मूकपणे तेवत राहते तशी...

शाळा कॉलेजातनं घरी परतताना मामाच्या पोरीबद्दल कुणी बोललं किंवा नुसतं बघितलं तरी तळपायाचा जाळ मस्तक पेटवत राहायचा, मामा गरीब असला तरी तुझी पोरगी निव्वळ नारळावर करून घेईन असं आई मामाला कधीतरी बोललेली असायची किंवा बहिणीचा संसार रडत-खडत चाललेला असला तरी तुझ्या मुलाला जावई करून घेईन बरं का...असं तुलनेने पैकापाणीवाला मामा आनंदाने बोललेला असायचा...त्यामुळे मामाच्या पोराबद्दल किंवा पोरीबद्दल प्रेमासोबतच मायेचा कंठ दाटायचा...कधीमधी मामाच्या गावी गेलं की तिथलं स्वयंपाकघर, दाराची चौकट, देव्हारा, अंगण, दारातलं सदाफुलीचं झुडूप त्याच्या शेजारी आभाळाला शिवणारं



सकाळी उठल्यावर अंगणात उभं राहून मामाच्या गावाशेजारचा डोंगर पाहताना तिची आठवण दाटत राहते...हा डोंगर तीसुद्धा बघत असेल का? डोंगराची काळीशार कडा पाहून तिची मला आठवण येतेय, तिलाही येत असेल का?, दिवसभर कठोरपणे कोसळणाऱ्या उन्हाच्या उकाड्यात, रात्री अलवार वाऱ्याच्या साक्षीनं अंगणात झोपल्यावर, माळेचा दोरा तुटून पसरलेल्या मण्यांसारख्या आभाळातल्या चांदण्या बघताना त्याला माझी आठवण येत असेल का? संपूर्ण अंग वाकळेत झाकलेलं असताना उघड्या चेहऱ्याला झोंबणारा वारा त्याच्याही अंगाला शिवून आला असेल का? या आणि अशा अनेक कपोलकल्पित विचारांनी अंग शहारून जातं...

आणि एक दिवस अचानक लग्नाची पत्रिका घेऊन साक्षात मामाच दारात उभा राहतो...मामा आईला लग्नाचं सांगत असताना पोटात गोळा उभा राहतो...मामा येण्याआधी बाहेर जाण्यासाठी आसुसलेली पावलं उगाच घरातल्या घरात घुटमळत राहतात...लहानपणीच कधीतरी मनात जन्मलेलं स्वप्न तंतोतंत जीव सोडत असल्यागत वाटत राहतं...मामा चहापाणी, जेवण-खाणं उरकून निघताना तोंडा-डोक्यावरून हात फिरवत ‘लग्नाआधी आठवडाभर यायचं बरं का’ असं सांगून निघून जातो...खाटेवर पडलेल्या पत्रिकेकडे बघायचंही धाडस होत नाही...शरीर खचून जिथल्यातिथं थबकतं, पण मनाची गाडी जुन्या आठवणींकडे, जुन्या प्रसंगांकडे उलट्या दिशेनं सैरावैरा धावत राहते...रानात, कॉलेजात, एसटीत, पारावर किंवा कुठंही असलं तरी मनाचं वितळणं, ओघळणं थांबत नाही...

पण अशातच मनात येऊन जातं, असो...लग्न नाही झालं ना? वांदा नाय...प्रकाश नाही मिळाला तरी मनातली पणती विझू दिली नाही ना आपण अजिबात? शांतपणे, अव्यक्तपणे तेवत राहताना भडका उडू दिला नाही ना आपण? तिच्या तेवण्याचा कुणाला चटका नाही ना बसू दिला आपण? नात्यागोत्याची आणि दोन्ही कुटुंबाच्या प्रतिमेची होरपळ नाही ना केली आपण? मग कशाला चिंता करायची..?

लग्नापर्यंतचे दिवस हिशेब लागू न देता मागे पळून गेलेले असतात...लग्नाचा दिवस उजाडतो तोच मुळी रात्रभर झोपू न शकल्यानं आलेल्या तरवटलेपणात...सगळी धावपळ...सगळे नटून थटून हजर...अत्तरं, हार, गजरे, बँडबाजा, घोडा, भरजरी साड्या, खाटेवरचा रुखवत सारं सारं ओसंडत राहतं...ओसंडणाऱ्या उत्साहात वावरताना चहूबाजूने वेढलेल्या पण एकाकी असलेल्या बेटासारखी अवस्था होते...अक्षदांचा वर्षाव होताना वर गेलेले हात थरथरत खाली येतात...सुखी राहा असा आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याने हात कृतार्थ होत असावेत बिचारे...

भलंमोठं निलगिरीचं झाड आणि अंगणाच्या मधोमध असलेलं बियांचा घस लगडलेलं तुळशीचं झाड बघत पुढची स्वप्न मनोमन रंगवली जायची, याच घरात मी सून म्हणून किंवा जावई म्हणून वावरणार कसं याचं चित्र मनातल्या मनात रंगवलं जायचं...मामाची पोरगी किंवा मामाच्या पोरग्याच्या मनात अशा झिम्मा-फुगड्या चालू राहतात...
मंडळी, मामाला सासरा बनवू न शकलेले पुढं कुणाबरोबर तरी लग्न करतात, झालेल्या सासऱ्याला मामा म्हणत ‘शेवटी मामाचीच केली’ अशी स्वत:ची समजूत काढत राहतात...सुखाचा संसार करतात...मामाला सासरा बनवू शकलो नसल्याचं दु:ख मनात दाबून अनेकजण आयुष्य चालत राहतात...पण या अव्यक्त, निस्वार्थी प्रेमाचा रंग उपसा सुरू असलेल्या विहिरीतील पाण्यासारखा निर्मळ राहतो...आयुष्यभर..! या प्रेमाची जागतिक बाजारात किंमत होऊ शकत नाही, कारण अल्लडपणात पाहिलेलं स्वप्न पूर्ण न करण्याचा ‘विनोद’ नियतीने आपल्याबरोबर केलेला असतो आणि म्हणून निरागसपणे नैतिकतेची कास धरत जोपासलेल्या अव्यक्त प्रेमाचा बाजारदर ‘अमोल’ असतो...आणि सर्वात मह्त्वाचं म्हणजे हे समजायला व्यक्त होण्याची किंवा स्पर्शाची काय गरज आहे?

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

मातीत रुजलेला आप्पा


शहराच्या पायथ्याशी वसलेली वस्ती गारठून पहाटेच्या समयी अतोनात शांत पहुडलेली असताना, रात्रभर क्याव-क्याव करत कोकलणारी कुत्री थकून एव्हाना आडोशाला तंतोतंत पसरलेली असतात...भल्या पहाटे एका छोट्या घरातून भांड्याकुंड्यांचा आवाज येत राहतो...रात्रभर कुरतडण्याचा खानदानी आणि जन्मजात व्यवसाय करणाऱ्या उंदीर, घुशींच्या कामकाजात आवाजानं खंड पडलेला असतोच...रात्रीचं जेवन-खाणं उरकून सामसूम झालेल्या घरात झोपाझोपी झाल्यावर लागलीच कामाला लागून सकाळी उजाडेपर्यंत अव्याहत उकीर काढणारी घुशी-उंदीर मंडळी आज जरा कावरी-बावरी होतात...पहाटेच घरात हालचाल सुरू झाल्याने घर सोडून पळ काढत कुठंतरी बनवलेल्या बिळात विसावतात...आप्पा सुट्टीवर आला की दररोज सूर्य उगवल्यावर जागं होणारं घर पहाटेच अंग झडझडून उभं राहतं...

मिलिटरीत सेवा करणारा आप्पा सुट्टीवर आला की पहाटेच्या कोवळ्या अंधारातच बायको-पोरांच्या दिवसाला सुरुवात होते...आप्पा सोडून बाकी सगळे चारच्या ठोक्याला उठून बसतात...त्याआधीच उठून अंघोळ वगैरे उरकून आप्पाची पोरांना उठवण्याची लगबग सुरू झालेली असते...दोन पोरींची अंघोळ झालेली असतेच...इवलासा पोरगा अंथरुनात लोळत पडलेला असतो...आप्पा त्याला तसा उचलून थेट बाथरुममध्ये पोहोचवतो...गार पाण्याची बादली अंगावर उपडी केल्यावर पोरगं भोकाड पसरतं...अंग पुसून कपडे घालण्याची बायकोची घाई उडते...थरथरत्या अंगानं पोरगं आईच्या कुशीत शिरतं...तोपर्यंत इकडं आप्पानं किचनचा ताबा घेतलेला असतो...गरमागरम पोह्याची डिश बायको-पोरांच्या पुढ्यात येऊन विसावते...पोहे संपत आल्यावर चमचांचा डिशला थडकण्याचा आवाज वाढत असतानाच आप्पा बायकोसाठी वाफाळलेला चहा आणि पोरांना ग्लासातून दूध आणून ठेवतो...भल्या पहाटे शहर झोपलेलं असताना आप्पाच्या घरात धांदल उडालेली असते...दोन मोठ्या पोरींना पुढं बसवून, छोट्या पोराला मांडीवर घेऊन बायकोला मागे बसवून आप्पानं दुचाकीची कीक मारलेली असते...पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून आप्पाची सहकुटुंब सहल सुरू झालेली असते...फटाटायला लागण्याच्या सुमारास आप्पा कुटुंबकबिल्याला घेऊन जवळच्या डोंगरावर डेरेदाखल झालेला असतो...डोंगराच्या एका कड्यावर बसून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारी दहाबारा गावं बघताना पोरं हरखून गेलेली असतात...गावांतील घरांच्या अंगणात शिलगावलेल्या चुलींतून आकाशाकडे झेपावणाऱ्या धुरांड्या आप्पाची बायको न्याहाळत राहते...

काय हा वेडेपणा, इतक्या सकाळी असं कुणी डोंगरावर येतं का?’ बायकोच्या रागभऱ्या अल्लड प्रश्नावर आप्पा फक्त गालातल्या गालात मिश्किलपणे हसत राहतो...अगं, गावात उभं राहून डोंगर तर आपण रोजच बघतो, पण डोंगरावरनं गावाकडे बघायचा आनंद वेगळाच, या पोरांना शाळेतल्या पुस्तकात गाव दिसेल, डोंगर दिसेल पण सकाळच्यापारी कूस बदलणारी गावं डोंगरावरून कशी दिसतात हे पोरांना
कोण दाखवणार?’ पिशवीतल्या चिवड्या-फरसाणाच्या पिशव्या काढत आप्पानं बायकोच्या प्रश्नाला प्रश्नानंच उत्तर दिलेलं असतं...निरुत्तर होत आप्पाची बायको आप्पाच्या मांडीवर विसावत डोंगरावर उभारलेल्या पवनचक्क्यांच्या फिरणाऱ्या पंख्याकडे पाहात राहते...कानात जबरदस्तीनं घुसू पाहणारा पवनचक्कीचा आवाज आक्रमक होऊन गेलेला असतो...रात्रीच्या थंडीत कुठंतरी वस्तीला गेलेले पक्षी एकेक करत डोंगरावर जमू लागतात...पक्षांसाठी ज्वारी-बाजरीचे दाणे भिरकावताना आप्पाच्या डोळ्यांतून समाधान पाझरत राहतं...

अवली म्हणून गावात अन् गावाबाहेर आप्पाची ओळख...15-16 वर्षांपूर्वी मिलिटरीत भरती झालेला आप्पा सुट्टीला गावी आला की त्याचे उद्योग जोमाने सुरू होतात...गावात कुठंही साप निघाला की आप्पाला बोलावणं ठरलेलंच...आप्पा थेट अडगळीत हात घालून सापाला अलगद बाहेर काढून लांब रानात सोडून देतो...नागासारखे अट्टल विखारी पसाप पकडून आप्पानं लोकांची भीती घालवलेली असते...कौटुंबिक वादात आप्पाच्या वाट्याला शेतीचा तुकडाही आलेला नसताना आप्पा असा रानावनात रमत राहतो...मित्राच्या शेतीत मित्रापेक्षा उत्साहानं कष्ट करत राहतो...प्राण्यांवर तर आप्पाचं जीवापाड प्रेम...गावात राहायचा तेव्हा मांजर, कुत्री आप्पाच्या अवतीभवती घुटमळत राहायची...रात्री अंगणात झोपताना आप्पाच्या डाव्या-उजव्या बाजूंना कुत्री-मांजरांची मुरकंड पडलेली असायची...जेवायला बसल्यावर आप्पा स्वत:च्या तोंडात घास घालण्याआधी ताटातला एकेक तुकडा कुत्र्या-मांजरांना टाकत राहायचा...आप्पा सुट्टीवर आला की त्यांची चंगळच व्हायची...कुणाबुनाच्यातनं आप्पासाठी आणलेलं दूध आप्पा सढळहस्ते मांजरांना वाटी-वाटीनं दिवसभर पाजत राहायचा...घराच्या अंगणात आप्पानं लावलेली वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांची झाडं अजून डोलारत उभी आहेत...एकदा सुट्टीवरनं आल्यावर हाडकेली कुत्री-मांजरं बघून आप्पा व्याकूळ झाला...कुत्र्या-मांजराला अलगद उचलून लांबवर सोडून आला...आता आप्पा कुत्री मांजरं सांभाळत नाही, पण गावातल्या कुणाच्याही कुत्र्यांना जाताजाता बिस्किटं टाकत राहतो...

आप्पाचं एव्हाना लग्न झालंय...दोन पोरी, एक पोरगा जन्माला आला....आता आप्पानं संसारात मनापासून रमावं असं घरच्यांना वाटू लागलं, पण आप्पाचा छंद काही थांबेना...आप्पाच्या उचापती पाहून त्याच्या घरच्यांनी भलतंच टेन्शन घेतलं आणि आप्पाची रवानगी थेट साताऱ्यात केली...आप्पा आता बायको-पोरांसह साताऱ्यात राहतो...पंधरा-वीस दिवसांच्या सुट्टीवर आलाच तर एखाद्या दिवशीच गावाकडे फिरकण्याची परवानगी...पण मिळालेल्या एखाद्या दिवसातही आप्पानं दारात लावलेल्या झाडांची छाटणी, खुरपणी केलेली असतेच...झाडांच्या बुंध्याशी साचलेला पालापाचोळा काढून त्यांना पाणी घालूनच आप्पा संध्याकाळी साताऱ्याकडे निघतो...साताऱ्यात पोहोचल्यावरही शांत बसेल तो आप्पा कसला...आप्पा सुट्टीवर आला की त्याच्या बायकोला किचनमध्ये नो एन्ट्री, नाष्टा, जेवण बनवण्यापासून भांडीकुंडी घासण्यापर्यंतची सारी कामं आप्पा एकहाती करत राहतो...आप्पाची सुट्टी संपेपर्यंत त्याच्या बायकोला सारं काही जागेवर मिळतं...मागे एकदोनदा त्याच्याकडे जाणं झालं तेव्हा त्यानेच बनवलेलं जेवण चाखायला मिळालं...झाडा-झुडपांची-प्राण्यांची सेवा करणाऱ्या हातांना वेगळीच चव बहाल झालेली जाणवलं...

गेल्या उन्हाळ्यात गावी गेलो तेव्हा आप्पा सुट्टीवर होता....भेटायला आप्पाच्या घरी गेलो तर आप्पानं सकाळीच घर सोडलेलं...दोन-तीन दिवसापासून आप्पा सकाळी बाहेर पडून रात्री उशिरा घरी येत असल्याचं समजलं...आप्पाला फोन केला तर आप्पा म्हणे मी खटावला आलोय...कशासाठी गेलास असं विचारलं तर म्हणाला दुष्काळ पाहायला...आप्पाचं उत्तर ऐकलं अन् डोकं भनकलं...लोकं पाण्यासाठी वणवण करत असताना, हाडकलेली गुरं-ढोरं चाऱ्या-पाण्याविना तडफडत चाराछावणीत धापा टाकत असताना पर्यटनाला म्हणून आप्पा तिकडं कसं जाऊ शकतो?, मित्राला सोबत घेऊन आप्पाचा माग काढला तर एका धूळभरल्या माळरानातल्या छावणीत आप्पा कसलीशी गवताची ओझी वाहताना दिसला...वासरांच्या, गायींच्या अंगावरून हात फिरवत आप्पा गवताचा एकेक घास भरवताना दिसला...आतल्याआत गलबलून गेलो...एसी ऑफिसमध्ये बसून दुष्काळाच्या कर्मकहाण्याच्या बातम्या लोकांना दाखवून मनावर जमलेली समाधानाची तथाकथित कवचकुंडलं गळून पडली...आप्पाला आम्ही दिसलो पण आप्पा गुराढोरांच्या सेवेत इतका रमला होता की आमच्याशी बोलायचीही उसंत त्याच्याकडे नव्हती...आप्पाच्या खांद्याला कायम अडकवलेली बॅग धुळीनं माखून अनाथासारखी पडली होती...बॅग उघडून पाहिली तर त्यात घोटीव लाकडाची लगोरी, गोट्या, छोट्या-छोट्या पिशव्यात गुंडाळलेल्या कसल्या-कसल्या झाडांच्या बिया, छोटी-छोटी रोपं आणि कलम करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या झाडांच्या फांद्या सापडल्या...

ज्या मातीत शेतकरी राबतो त्या मातीतच आप्पाची मूळं रोवलेली दिसली...कातावलेल्या शेतकऱ्याचे सुरकुतलेले चेहरे आम्हा शहरातल्या कोरड्या लोकांना फोटोजेनिक वाटतात...पण हळूवार वाऱ्याची झुळूक टाकून त्या सुरकुत्या फुलवणारा आप्पा शेतकऱ्याचा खरा दोस्त वाटला...रणरणत्या उन्हात सावली पाहून वस्तीला आलेल्या पक्षांचा चिवचिवाट सुरूच होता...

आता बिनरंगांचा टीव्ही येणार?



सीता राम चरित पति पावन, मधुर सरस...रविवारी सकाळी रामायणाचं गाणं लागलं की घरात, वाड्यापुढं, परड्यात, पांदीत कुठंही असलं की सगळं सोडून कोंडीराम बापूंच्या घराकडं पावलं पळत सुटायची...रामायणाचं गाणं कानावर पडलं की आठवड्यात शेशंभर गोट्यांचे डाव खेळून जमवलेल्या गोट्या डावात तशाच सोडून टीव्हीकडं पळत जाऊ वाटायचं...सूरपारंब्या खेळताना झाडावरून धपाधप उड्या पडायच्या, रामायण बघायला जाण्यासाठी घाई करताना परड्यात शेण काढणाऱ्या बायांना हात धुण्याचंही भान राहायचं नाही, तशाच शेणभरल्या हातांनी अख्खं रामायण पाहिलं जायचं...

रविवारी सकाळी पांदीशेजारच्या पांडू न्हाव्याकडे केस-दाढी करायला गर्दी जमायची, पण रामायण सुरू झालं की पांडू न्हावी गुडघ्यावर हात ठेऊन बसायचे...कपाळाच्या वरच्या भागात चार बोटांएवढ्या जागेत केस ठेऊन बाकी चकोट केलेली पोरं वस्तारा बाजूला सारत कोंडीराम बापूंच्या घराकडे धावायची...खाक्या चड्डीला लाल, पिवळ्या, काळ्या, निळ्या, जांभळ्या किंवा ओळखता येणार नाहीत अशा रंगाची ठिगळं लावलेली असायची...ठिगळ नसेलच तर पोठीमागे दोन डोबळे असलेल्या चड्ड्या करगुट्याला आवळलेल्या असायच्या...करगुटा ढिला असल्याने कुणीकुणी गळणारी चड्डी सांभाळत कोंडीराम बापूंच्या घराच्या पायऱ्या चढायचा...नाकातून गळणारा हिरवट-पिवळाधमक शेंबूड पुसल्याने ढोपरांवर पांढरट चट्टे उमटलेले असायचे...दर रविवारी कोंडीराम बापूंच्या घरात जत्रा भरायची नुसती...कोंडीराम बापूंच्या घरातलेही आढेवेढे न घेता पोरांना रामायण बघू द्यायचे...आजही गावात रामायणाचे संस्कार झालेले अनेकजण कोंडीराम बापूंच्या घरात बघितलेलं रामायण विसरू शकत नाहीत...कारण गावात त्याकाळी एकच टीव्ही...

नंतर नंतर टीव्हीवरच्या इतरही कार्यक्रमांची गोडी वाढू लागली...छायागीत, चित्रहार, गोट्या, चंद्रकांता, महाभारत, शक्तिमान असे एक ना अनेक कार्यक्रम बघायला झुंबड उडू लागली...बसायला जागा मिळावी म्हणून काहीजण आधीच कोंडीराम बापूंच्या घराजवळ घुटमळत राहायचे...शाळेसमोरच्या पडवीवर, समोरच्या विहिरीच्या कट्ट्यावर पोरं-बाप्ये घिरट्या घालू लागायचे...कार्यक्रम लागला रे लागला की पोरंटोरं मोठ्या माणसांवानी अन् मोठी माणसं पोराटोरांवानी धावत सुटायचे...जात-धर्म-लहान-थोर अशा सगळ्या भेदांपलिकडे जाऊन टीव्ही बघण्याचा सोहळा कोंडीराम बापूंच्या घरात
रंगायचा...कामंधामं सोडून लोकं तासभर रामायणात घुसायचे...त्यात कधी खंड नाही पडायचा...अगदीच रविवार गाठून एखादा पुचाकला तरच लोकं रामायण सोडून माती द्यायला जायचे...टीव्हीत राम  झालेले अरुण गोविल आणि सीता झालेली दीपिका एव्हाना घराघरातल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाले होते...श्रीकृष्ण झालेले नितीश भारद्वाज पोरांच्या वह्यांवर, कंपासपेटीवर सुदर्शनचक्र फिरवत राहिलेले असायचे...हनुमान झालेले दारासिंग तर पेनावर डोंगर करंगळीने उचलून उडत राहायचे...

टीव्हीचा काळ तोपर्यंत यायचा बाकी होता...देशात टीव्ही आला होता पण खेडोपाडी टीव्ही म्हणजे मिरवणूक काढून आणायची गोष्ट असायची...एखाद्याच्यात टीव्ही आणलाच तर शेजारपाजारच्या किंवा भावकीतल्या सुवासिनींना बोलवून पूजा-अर्चा केली जायची...हळद-कुंकू लावलेल्या टीव्हीपुढे उदबत्तीचा दरवळ पसरत राहायचा...टीव्ही आणि रामायणाची ओळख एकाचवेळी झालेली आमची पिढी टीव्ही म्हटलं की अजूनही रामायणाचीच आठवण काढते...ज्या घरात टीव्ही आणलाय त्या घरातल्या पोराला वेगळीच इज्जत मिळायची...वर्गात सर्वात पुढे बसायला जागा देण्यापासून ते गोट्या खेळतानाही त्याला विशेष सवलत असायची...लपाछपी खेळताना त्याच्यावर राज्य आलं तरी त्याला सन्मानानं पोरं आपणहून सापडून घ्यायची...लपल्याचं केवळ नाटक करत तो शोधायला आला की त्याच्या स्वाधीन व्हायची...

आ बलमा नदिया किनारे..किंवा तू मुझे कुबुल, मै तुझे कुबुल, खुदा गवाहवगैरे गाणी लोकांच्या ओठावर यायला लागली...कपिल देव, संदीप पाटीलसारख्या खेळाडू मंडळींची खेळी फक्त रेडिओवरून ऐकलेले लोक त्यांना याचि देही-याचि डोळा पाहू लागले...निरमा पावडरच्या पुड्यावरील पोरीचं झुबकेदार फ्रॉक घालायची स्वप्न पोरसवदा पोरी पाहू लागायच्या...पारले-जीच्या पुड्यावरच्या पोराचं बाळसं, त्याचा गुटगुटीतपणा आपल्या पोराला यावा म्हणून आया पोटच्या बाळांना डबल रतीब घालू लागल्या...बातम्या सांगणारे प्रदीप भिडे तर लोकांच्या प्रतीक्षेचा केंद्रबिंदू झाले...बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हे गाणं लोक सायकलवरून फिरताना किंवा बैलगाडीतून शेतात जातानाही गुणगुणत राहायचे...मिले सूर मेरा तुम्हाराची धून लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवायचा आग्रह धरायचे...ऐन लग्नाची तारीख गाठून कुणी देवाघरी गेलं तर पोस्टपॉंड झालेल्या लग्नाची तुलना लोक टीव्हीवरच्या व्यत्यय आल्यावर दिसणाऱ्या उभ्या रंगीत पट्ट्यांशी करायचे...आधी ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर टीव्ही लोकांच्या मनात घर करत राहिला...आवडीच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली की लोकं वीज बोर्डाच्या नावानं बोटं मोडायचे...लाईट येईपर्यंत बंद टीव्हीकडे बघत राहायचे...बंद टीव्ही बघताना आपलं कुणीतरी कामाधंद्याला शहरात जाताना होणारं दु:ख लोकांच्या डोळ्यांत दिसायचं...

आता जसा टीव्ही शोकेसमध्ये किंवा भिंतीवर टांगलेला दिसतो तसा तेव्हा नसायचा...जुना बॅलर, पाण्याची मोठी टाकी किंवा अगदीच पुढारलेलं घर असेल तर लाकडी टेबल असला की टीव्ही त्यावर सुखाने नांदायची...घरात गणपती आले की गणपतीएवढंच टीव्हीपुढे लोक बसायचे...टीव्हीनं जग हे असं लोकांच्या घरात आणि मनात आणून ठेवलं...अमेरिकेत क्षेपणास्त्राच्या घेतलेल्या चाचणीचा धूर सरळ लोकांच्या घरात दिसू लागला...क्राऊनचा लाकडी सेटरवाला टीव्ही अजूनही अनेकांच्या मनात रुंजी घालतो...चॅनल एकच तोही दूरदर्शन, तरीही चॅनल बदलण्यासाठी टीव्हीवर असलेल्या गोल खटक्यासदृष बटनाकडे लोक कौतुकाने बघायचे...

आता आता तर घराघरात टीव्ही आलेत...रेडिओनं गावतल्या नाटकांचा, तमाशांचा, पार्ट्यांचा आणि पंचमीला वगैरे होणाऱ्या झिम्मा फुगड्यांचा गळा आवळला, नंतर टीव्हीनं रेडिओच्या गळ्याला नख लावलं...आता एलसीडी किंवा एलईडीनं टीव्हीचं शरीर मानेवेगळं केलं...

गेल्या आठवड्यात घरातली लाईट टीव्ही चालू असताना गेली...परत लाईट आली पण टीव्ही काही चालू होईना...दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला पण ट्यूब गेल्याचं कळल्यावर नाद सोडून दिला...दोन-चार दिवसावर अक्षय्य तृतीया आहे, तेव्हाच टीव्ही आणू असं ठरवलं...बंद टीव्ही कपाटात तसाच पडून होता...मृतदेहासारखा...कुणी त्याच्याकडे बघत नव्हतं की कुणाचं काही बिघडत नव्हतं...लहानपणी लाईट गेल्यावरही टीव्हीकडं बघत बसतानाची हूरहूर जाणवलीच नाही अजिबात...बायको-पोरांना आणि मलाही..!

अक्षय्य तृतीयेला एलईडी स्मार्ट घेऊन कंपनीचा माणूस आला...त्यानं एलईडी सेट केला, चहा घेतला आणि गेला...चेक करायचं म्हणून चालू केला...पण लहानपणी लाईट आल्यावर सुखावणारं मन ढिम्मच...थोड्या वेळानं पोरं शाळेतनं आली...त्यांना सरप्राईजच्या सुरात म्हटलं, बाळांनो आपल्या घरात एलईडी आणलाय...पोरांनी कपडे बदलत फक्त कटाक्ष टाकला...आणि आम्ही खेळायला खाली जाऊ का? म्हणायला लागली...एक वाजता आलो की निक चॅनलवरचा मोटू-पतलू बघताना एलईडी बघू म्हणत बॅट उचलून खाली गेलीही...

टीव्हीबाबतचा चार्म संपलाय, मित्रहो...दुनिया गोल है...एक वह दौर था, आज यह दौर है...कल न जाने क्या होगा...रंगीत टीव्ही, एलईडी आले पण जीवनातला रंग भावनाशून्यतेने फिका पडलाय...जग जवळ आलंय पण शेजारी बसलेले जवळचे दूर गेलेत...टीव्ही दबक्या पावलाने घरात घुसला तेव्हा जीवनात रंगांची उधळण झाली...सात रंगांपेक्षा भलेथोरले रंग टीव्हीनं जीवनात भरले...आता पुढच्या काळात कोणते रंग दाखवणारा टीव्ही जन्माला येणार आहे कुणास ठावूक ?

सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

भुरी

आई-नाना गावी स्थायिक होऊन आता कुठं वर्ष-दीड वर्ष झालीत...गावी शिक्षण घेऊन नाना मुंबईत स्थायिक झाले अनं राना-वावरात काम करण्याची किंवा गावागाड्यात वावरण्याची सवयच हरवून बसली...नाही म्हणायला नाना चाळीस-बेचाळीस वर्ष मुंबईत राहिले पण जत्रा-दिवाळीला गावी जाण्याचा शिरस्ता होताच...आई मात्र बऱ्यापैकी गावी राहिली होती...आता-आताची पंधरा-वीस वर्ष सोडली तर आई गावीच राहिली होती...त्यामुळे आईला गावची सवय होतीच...पण अखंडपणे गावापासून दूर राहून दीड वर्षांपूर्वी दोघांनी मुंबई सोडून गावी रहायचा निर्णय घेतला...छोटं घर बांधायचं आणि वाटून आलेली शेती यथाशक्ती कसायची ठरवली...नानांचा कष्टाळू स्वभाव आणि आईची जिद्द यामुळे ते गावी सरावतील याची मला खात्री होतीच...

पण का कुणास ठावूक मला, माझ्या दोन पोरांना आणि घराच्या परंपरेत मनाने मिसळून गेलेल्या माझ्या बायकोला सोडून त्यांचं मन गावी रमेल असं मला वाटत नव्हतंच...पण कौटुंबिक घडामोडींनी त्यांना गावी रहावं असं वाटू लागलं...झालं, एके दिवशी भल्या सकाळी-सकाळीच नाना-आईने सामानाची बांधाबांध केली...इवले-इवले आराध्य, अध्याय झोपेत असतानाच त्यांनी घर सोडलं...झोपलेल्या आराध्य-अध्यायच्या तोंडावरून हात फिरवत आई-नानांनी घराचा निरोप घेतला...मी आता बऱ्यापैकी प्रौढ आणि कमावता झालो असलो तरी मी लहान असल्यापासून आईने जोपासलेल्या शंभराची नोट हातावर ठेवण्याच्या सवयीत यावेळीही खंड पडला नाही...बायकोला शंभर आणि मला शंभर...पोरांसाठी पन्नास-पन्नासच्या दोन नोटा आमच्याच हवाली करून आई-नाना गावी गेले... 

गावी जाऊन तात्पुरत्या स्वरुपात भावकीतल्याच एकाचं छोटं जुनं घर भाड्याने घेतलं...भाडं महिना अडीचशे...आई-नानांचा म्हातारपणातला स्वतंत्र संसार सुरू झाला...फोनवर संपर्क करून खुशालीची देवाण-घेवाण होत होतीच...नाना शेता-वावरात जाऊ लागले होते...चवळी-पावट्यासारख्या पिकांची लागण केल्याचं सांगू लागले होते...भांगलणी-खुरपणीसाठी आई आता गावातल्या बायकांशी वारंगुळा करू लागली होती...मुंबई सोडताना आई-नानांना प्रकृतीच्या थोड्या अडचणी होत्या पण गावच्या हवेत सगळ्या कुरबुरी पळून गेल्याचं ते सांगत असतात...नानांचा गुडघा दुखतो अजून कधीतरी पण मधुमेहाच्या तक्रारी बऱ्यापैकी कमी झाल्यात...ते सगळं सांगत असतानासुद्धा त्यांचं मन अजून म्हणावं तसं रमलं नसल्याचं जाणवायचं... 

एकदा फोनवर बोलताना म्हैस घेतल्याचं आईने सांगितलं...घरातल्याच एकाकडून म्हैस घेतल्याचं आई बोलली...भुरी तिचं नाव...स्वभावानं लय गरीब हाय, रानात चरायला नेताना शिस्तीत चालत राहते, लोकाच्या वावरातल्या गवताच्या काडीकडेही बघत नाही, दूध काढताना पाय झाडत नाही की हलतही नाही...नाना सकाळी उठून भुरीला घेऊन रोज रानात जाऊ लागले...भुरीला बांधावर सोडून निर्धास्त बसून राहतात...भुरी बांधावरचं गवत सोडून वावरातल्या पिकाला तोंडही लावत नाही...लक्ष्मी हाय भुरी...आई भरभरून सांगत राहायची...भुरीवर आई-नानांचा जीवच जडला होता जणू...रोज फोनवर बोलताना आई भुरीचा विषय आवर्जून काढायचीच...नाना कुठं गेलेत विचारलं तर भुरीला घेऊन रानात गेलेत असं आईचं उत्तर ठरलेलं...दिवसभर रानात न्यायचं, संध्याकाळी कडूसं पडताना घरी आणायचं, पडक्या वाड्यामागे बाभळीच्या झाडाखाली भुरीला बांधायचं, वैरण-काडी टाकायची, दूध काढायचं आणि मगच जेवायचं...मध्यरात्रीच कधीतरी उठून भुरीकडं उगाच चक्कर मारायची असा नानांचा कार्यक्रम बनत राहिला...

पोरांना दिवाळीची सुट्टी लागल्यावर कुटुंबकबिल्याला घेऊन गावी गेलो...ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी-सकाळीच गावात पोहोचलो तर आई सुपात कुंकवाचा करंडा, बाजरी घेऊन भुरीची पूजा करताना दिसली...तांब्यातलं पाणी पायावर पडल्यापडल्या भुरी शहारून गेलेली...पोरांचा कलकलाट ऐकल्याबरोबर आई कुंकवानं माखलेल्या हातानेच पोरांचे पापे घेऊ लागली...एव्हाना पोरांची तोंडं आईच्या हाताला लागलेल्या कुंकवाने लालेलाल होऊन गेलेली... पोरं म्हैस नावाचा प्राणी पहिल्यांदाच बघत होती, त्यामुळे की काय भुरीकडं घाबऱ्या नजरेनं बघत राहिलेली...घरातलं काम उरकत आई भुरीभोवती घुटमळत राहायची आणि पोरं आईभोवती...पोरं कधी भुरीच्या शेपटाला, कधी पोटाला हात लावत अंदाज घेत होती...भुरी शांत उभी राहतेय असं पाहून पोरं तिच्याभोवती रमायला लागली...गवत खाताना भुरीच्या तोंडातून उच्छवासाबरोबर गळणाऱ्या फेसाळ लाळेकडे बघताना पोरं हरखून जायची...भुरीच्या माणसाळलेपणांचा अंदाज आल्यावर मोठ्या पोरानं, आराध्यनं तिच्या पाठीवर बसण्यापर्यंत मजल मारली होती...आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला पाहून अध्याय चेकाळून जायचा...अध्याय आताआता भुरीच्या गळ्याला लोंबकळायला लागलायचा...रानात जाताना अध्याय भुरीच्या पुढं आणि आराध्य भुरीची दोरी हातात घेऊन मागे चालत राहायचा...गावाजवळच्या ओढ्यातल्या डबक्यात भुरी डुंबत राहायची...पोरं तिच्या अंगावर इवल्या-इवल्या हातांनी पाणी उडवत राहायचे... 

बायको-पोरांना गावी सोडून मी मुंबईला येऊन पोहोचलो...दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत त्यांना गावीच ठेवलं होतं...गावी फोन केला तर पोरं भुरीजवळच असायची...बायकोला फोन घेऊन त्यांच्याजवळच जावं लागायचं...पोरं फोनवर बोलताना भुरीबद्दलच बोलत राहायची...पोरांचे बोबडे बोल ऐकताना भुरीच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज येत राहायचा...आईसोबत आता पोरंही भुरीपुराण सांगयला लागली होती...सकाळी उठून भुरीचं नीरसं दूध मटकावून पोरं ओठाला लागलेला दुधाचा फेस पुसत भुरीभोवतीच जमायची...रात्री जेवायला आणि झोपायला पोरांना अक्षरश: फरफटतच न्यावं लागायचं...झोपताना पोरं भुरी कुठं झोपणार, भुरीला चोर पकडून नेतील असं भाबडं बोलायची... पोरांना भुरीचा लळा लागला होता...आणि भुरीला पोरांचा...दिवाळीला नेलेले फटाके वाजवायचं पोरं विसरूनच गेली...भुरीभोवतीच रेंगाळत राहायची...पोरं दिसेनासी झाली की भुरीही अस्वस्थ होत पाय झाडायची, इकडे तिकडे बघत हंबरत राहायची...पोरांना दिवाळीचा फराळ दिला तर कानवला, काटुकुडुबळं पोरं भुरीला चारत राहायची...फटाक्यांची पिशवी अजून गावच्या घरात पडून आहे, जशीच्या तशी... 

दिवाळीची सुट्टी संपल्यावर पोरांना आणायला गावी गेलो तर अध्याय भुरीच्या दावणीत झोपलेला आणि आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला...भुरी मात्र आराध्य पडू नये याची काळजी घेत उभी असल्याचं भासलं...भुरीच्या श्वासातून वात्सल्य आणि पोरांच्या डोळ्यांत भुरीवरचा विश्वास पाझरताना दिसला...दोन-तीन दिवस पोरांचं आणि भुरीचं मैत्र न्याहाळताना अप्रुप वाटायचं...शहरात राहणारी पोरं गावच्या वातावरणाला मुकतील अशी जी भीती कायम वाटायची ती कुठच्याकुठं पळून गेली होती...मुंबईला जाण्याच्या तयारीची धांदल घरात उडालेली असताना पोरं तिकडं भुरीजवळच रेंगाळलेली...नेहमी भुरीभोवती बागडणारे आराध्य, अध्याय मुंबईला जाण्याची चाहूल लागल्यावर तापलेल्या उन्हात भुरीपासून लांबवर असलेल्या दगडावर बसून भुरीकडं बघत राहिलेली...त्यांच्याजवळ गेलो तर भुरीला मुंबईला नेऊया का ? असा आराध्यचा खडा सवाल... 

तिला मुंबईत सोसायटीच्या पार्किंगमध्ये बांधू, सकाळी शाळेत जाताना आम्ही तिला शाळेत नेऊ, शाळेच्या मैदानातलं गवत भुरी खात बसेल, शाळा सुटली की तिला आम्ही घरी आणू....बोलताना पोरांच्या डोळ्यातली विरहवेदना लपत नव्हती...कसंबसं पोरांना समजावलं...भुरीच्या शेणानं भरलेली कपडे बदलली, अंघोळ घालून निघायची तयारी केली...घर सोडताना पोरं भुरीकडे वळून-वळून बघायची...सडकेवर आलो, खांद्यावरच्या बॅगा खाली ठेवल्या, बायको एसटीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली...आई-नाना मुंबईला नेण्यासाठी आणलेल्या भाजीच्या पिशव्या सांभाळत उभे...आजूबाजूला पाहिलं तर पोरं दिसेनातच...घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून धावत घराकडे गेलो...पोरं दिसली नाहीतच...घराला लावलेली कडी तशीच होती...सहज भुरीच्या गोठ्याकडे पाहिलं तर उतरणीला लागलेल्या दिवसाच्या झुंजूमुंजू काळोखात अध्याय म्हशीच्या गळ्यात पडून रडत बसलेल...घरातला पावडरचा डबा गुपचुप आणून भुरीच्या तोंडाला पावडर थापायचं आराध्यचं काम चालू होतं...पोरांना धपकवत जवळजवळ ओरबडून बाजूला काढलं...मुंबईला आणलं...आईने बाटलीत भरून दिलेलं भुरीचं दूध दोन-तीन दिवसांनी संपल्यावर पिशवीतलं दूध दिलं तर पोरांनी बरोब्बर ओळखलं... 


आता मागच्या रविवारी गावी गेलो तर भुरीच्या कासेला लगटलेलं इवलं-इवलं पिल्लू पाहिलं...भुरी व्याली होती...प्राणीभेदाच्या भिंती तोडून भुरी माझ्यासारख्या मानवाच्या पिल्लांना इतका जीव लावू शकली होती तर ती स्वत:च्या पिल्लाला किती जीव लावत असेलबाळ, मग ते भुरीचं असो की माझं, जीव लागायला, प्रेम वाटायला भाषा कशाला हवी...श्वासाश्वासातून बांधलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला भाषेच्या गाठी हव्यातच कशाला?

सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

अखेर सविता लोखंडे मॅडम सापडल्या

हा लेख साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या झुंबर पुरवणीत 7 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाला, सुमारे तीन-चार वर्षांची शोधमोहीम ऐक्यमुळे थांबली...त्याचदिवशी रात्री 10 च्या सुमारास मॅडमशी फोनवरून बोलणं झालं...थँक्स ऐक्य..!

त्याचप्रमाणे सविता लोखंडे मॅडमना शोधण्यासाठी माझ्या मोहिमेत मला मदत करणारे शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, पवार सर, नलगे सर आणि इतरही सर्वांचा ऋणी आहे...

तो लेख जसाच्या तसा....




सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

त्या दिवसांत गावची शाळा लक्ष्मीआईच्या देवळात भरायची...शाळेचा वर्ग चालू असताना एखादा आगंतूक भक्त मध्येच देवळात येऊन घंटा वाजवून, देवीच्या पाया पडून जायचा तेव्हा शिक्षकांसह पोरंही सवयीप्रमाणे आपापलं काम करत राहायची...आता आहे तशी शाळेची इमारत गावाबाहेर किंवा सर्व वर्ग एकाच इमारतीत नव्हते...त्याकाळी गावच्या शाळेची दुमजली इमारत होती पण जागा कमी पडत असल्याने काही वर्ग लक्ष्मीआईच्या देवळात आणि कुणाच्यातरी भल्यामोठ्या घरात भरायचे...त्यामुळे पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि डोक्यावर टोपी घातलेल्या पोरांचे अन् पांढऱ्या-निळ्या कपड्यातल्या आणि डोक्यावर लाल रिबिनने दोन वेण्या बांधलेल्या पोरींचे थवे गावभर इथे-तिथे दिसायचे...त्यानिमित्ताने सर-मॅडमचीही गावभर रपेट व्हायची...तास सुरू होताना किंवा संपल्यावर खडूच्या रंगाने माखलेल्या हातात डस्टर आणि पुस्तक घेऊन सर-मॅडम गावातील रस्त्यांवर चालताना दिसत राहायचे...गायी-गुरं, बैलगाडी घेऊन किंवा डोक्यावर ओझं घेऊन रानात चाललेले पालक आपल्या पोरांची प्रगती सर-मॅडमला रस्त्यातच अडवून विचारत बसायचे...हल्ली चालतात तशा पालकसभा त्याकाळात अशा भररस्त्यातच चालायच्या...पोरगा बाकी विषयांत बरा आहे पण गणितात जरा कच्चा आहे असं शिक्षकांनी सांगताच ‘दणकवा त्याला, चांगला फटकवा’ हा एकमेव उपाय पालकांना तेव्हा माहित असायचा...पालक-शिक्षकांचा समन्वय आणि सुसंवाद असा भररस्त्यात लाईव्ह घडायचा...त्या सुसंवादाला हातातल्या कासऱ्याला ओढ देणाऱ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटेचं बॅकग्राऊंड म्युझिक असायचं...वर्गातल्या पोरा-पोरींचं फक्त संपूर्ण नावच नाही तर त्यांच्या घरच्या परिस्थितीचा, वातावरणाचा अंदाज शिक्षकांना असायचा...त्यामुळे विद्यार्थ्यांशी बोलताना, एखादी गोष्ट त्याला समजावून सांगताना शिक्षक बरोब्बर सांगड घालायचे...गावातून टापटिप साडीतल्या मॅडम जाताना बायका कौतुकाने बघत राहायच्या...

जिल्हा परिषदेच्या चौथीपर्यंतच्या शाळेतील सर्व विषयांना एकच गुरुजी किंवा बाई या सरकारकृत बहुउद्देशीय तत्वाला सरावलेल्या आम्हाला तेव्हा विषयागणिक वेगवेगळ्या शिक्षकांचं कोण कौतुक...पाचवीत गेल्यावर प्रत्येक तासाला वेगळा विषय, वेगळ्या विषयाला वेगळे सर किंवा मॅडम बघून आम्ही पोरं हरखून जायचो...शाळा पंचक्रोशीने स्थापन केलेली असल्यामुळे एखाददुसरा शिक्षक वगळता बहुतांश शिक्षक गावातलेच असायचे...त्यामुळे शाळेत शिकवणारे शिक्षक सुट्टीच्या दिवशी रानात बैलगाडी घेऊन जाताना दिसायचे...बाहेरगावातून शिकवायला आलेल्या सर आणि मॅडमबद्दल आम्हाला आदरमिश्रित दरारा आणि कुतुहल असायचं...त्या दिवसांतला चार्म काही वेगळाच होता...त्याच झापटलेल्या दिवसांत आम्हाला गणित शिकवायला लोखंडे मॅडम होत्या ते अजून तंतोतंत आठवतंय...माहेरची साडी पिक्चरची हवा असलेले ते दिवस...अलका कुबलनं महिला वर्गावर केलेलं गारूड अजून स्पष्ट आठवतंय...लोखंडे मॅडम दिसल्या की आम्हाला अलका कुबलची आठवण यायची...त्यांची देहबोली, चालण्याची ढब अलका कुबलसारखी हुबेहूब असायची...पहिल्या दिवशी मराठी आणि हिंदीचा तास संपल्यावर सविता लोखंडे मॅडमनी वर्गात पाय ठेवला आणि माहेरची साडी यांनीच नेसली की काय असं वाटायला लागलं...आजूबाजूच्या गावात साधं जत्रेलाही जाण्याची परवानगी नसलेल्या वयात आम्ही पोरांनी माहेरची साडी पिक्चर बघितला असण्याचा प्रश्नच नव्हता...पण माहेरची साडी पिक्चर बघितलेल्या थोरा-मोठ्या बाया-बापड्या बोलताना ऐकल्याने आमच्या काही कल्पना आम्ही मनाशीच बांधून ठेवलेल्या...लोखंडे मॅडम का कुणास ठावूक पण त्या पिक्चरशी संबंधित असतील असं आम्हा बापुड्या पोरांना वाटत राहायचं...

वर्गात आल्याआल्या सविता लोखंडे मॅडमनी रांगेत मांडी घालून बसलेल्या प्रत्येक पोराला उठवून ओळख करून घेतली आणि मग स्वत:ची ओळख करून दिली...मी सविता लोखंडे...मी साताऱ्याजवळच्या कृष्णा नगरची...आजपासून मी तुम्हाला गणित विषय शिकवणार...आयुष्यात गणिताचं मोठं महत्त्व आहे...त्यामुळे गणित शिकायलाच हवं...दुकानात गोळ्या-बिस्कीटांना किती रुपये लागतात किंवा गोळ्या-बिस्कीटं घेतल्यावर किती रुपये शिल्लक राहणार हे आपल्या माहित असायला हवं की नाही? असं सांगताना पोरं माना
हलवायचे...गणितासारखा त्या काळी अवघड वाटणारा आकडेमोडीचा विषय मॅडमनी आमच्यासमोर असा उभा केला...शिकण्याआधीच गणिताबद्दलची भीती घालवण्याचा मॅडमचा प्रयत्न होता हे नंतर-नंतर समजायला लागलं...गणितासारखा मुलांना कडू वाटणारा व्यवहारिक औषधाचा खुराक मॅडम रंजकतेच्या आणि कल्पकतेच्या मधूर मधात मिसळून पोरांना रोज देऊ लागल्या...परिणामी फक्त मराठी, चित्रकला किंवा पीटीच्या तासाला खुलणारी पोरं गणिताच्या तासालाही फुललेल्या चेहऱ्यांनी बसू लागली...शाळेतून घरी जाताना पोरं हाताच्या बोटांनी हिशेब करू लागली...लायटीच्या तारेवर बसलेल्या पक्षांची मोजदाद करू लागले...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उंडारणारी पोरं उजेड असेपर्यंत घराच्या अंगणात पोतं टाकून गणिताचा अभ्यास करायला बसू लागली...लोखंडे मॅडमनी इवल्या-इवल्या पोरांवर जादू करून टाकली होती...

हा-हा म्हणता घटक चाचणीची धामधूम सुरू झाली...हायस्कूलला आल्यावरची पहिली परीक्षा...अभ्यासावर पोरांची मुरकंड पडायची...पोरांना सर्वात जास्त काळजी गणिताची...इंग्रजीची भीती होती, पण पाचवीला फक्त एबीसीडीपर्यंतचीच तयारी असल्याने पोरांना इंग्रजीपेक्षा गणिताने छळलं होतं...पोरांच्या चेहऱ्यावरच्या तणावाच्या रेषा मॅडमनी अचूक ओळखल्या...प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून मॅडमनी पोरांची भीती कुठच्या कुठं पळवून लावली... ...पाचवीच्या वर्गातील पोरांचा निकाल भन्नाट लागला...मराठीपेक्षा गणिताच्या मार्कांचे आकडे मोठे दिसू लागले...इतर शिक्षकांसह पालकांनीही तोंडात बोटं घातली...घरच्या मंडळींनी घरातले छोटे-मोठे हिशेब छोटुकल्या पोरांच्या हाती स्वाधीन करून टाकले...दुधाचं, लाईटचं बिल बघत पोरं हाताच्या बोटांनी लिलया टोटल मारू लागायची...मॅडमच्या मार्गदर्शनाने पोरांना गणितातले आकडे दोस्त वाटू लागले आणि मॅडम सखी

पोरांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मॅडमनी पदरचे पैसे घालून चकमकी कागदात गुंडाळलेली भारी चॉकलेट वर्गातल्या पोरांना वाटली...चारआण्यात दोन मिळणारी लालचुटूक किस्मी चॉकलेट अवसंपुनवंला बघायला मिळायची...त्यात अशी भारी-भारी चॉकलेट बघून पोरांच्या आनंदाला पारावर राहायचा नाही...गणितात पडलेली मार्क बघताना पोरांच्या आनंदी चेहऱ्यांकडे मॅडम कौतुकानं बघत राहायच्या...निकाल हातात आल्यावर मॅडमनी पोरांची वर्गवारी केली...कुठल्या विद्यार्थ्याची कोणती तयारी करून घ्यायची हे निश्चित केलं...आम्ही सातवीला आलो तेव्हा माझ्यासह काही मुलांना मॅडमनी स्कॉलरशीपच्या परीक्षेला बसवायची तयारी केली...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत मॅडम सराव करून घेऊ लागल्या...त्याकाळी वाहतुकीची तुलनेनं आताइतकी साधनं नव्हती, तरीही मॅडम रात्री साडेआठच्या शेवट्या एसटीने सातारला जायच्या...सकाळी पुन्हा आठ वाजता मॅडम शाळेत हजर...स्कालरशीपच्या परीक्षेला कोरेगावला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं...परीक्षेच्या दिवशी माझ्यासह दोन-तीन मुलांकडे पैसे नसल्याचं कळल्यावर मॅडमनी पर्समधून वीस-वीस रुपयांच्या नोटा आमच्या हातात ठेवलेल्या स्पष्ट आठवतायत...सातवीला माझा वर्गात पहिला नंबर आला...मॅडमनी डोक्यावरून हात फिरवला...प्रगतीपुस्तकावर मिळालेल्या मार्कांवर मॅडमच्या परिश्रमाचं तोरण होतं...होणारं कौतुक आधी गणंग म्हणून हिणवल्या गेलेल्या माझ्यासारख्याला  आवरता येत नव्हतं...डोळ्यातल्या अश्रूंचा एक थेंब मॅडमच्या हातावर पडला आणि मॅडमनी लगबगीनं मला जवळ घेत डोळे पुसून काढले...मॅडमनी पर्समधून एक पेन काढून हातात ठेवला तसा मी विजेच्या वेगाने वाकून मॅडमच्या पायाला हात लावला...

उन्हाळ्याची सुट्टी लागली...शाळा भकास वाटू लागली...रोज दिसणाऱ्या मॅडमची ताटातूट झाल्यासारखं पोरांना वाटायला लागलं...गणिताचे आकडे निराधार दिसू लागले...शाळा सुरू व्हायला आठवडा उरला असतानाच मला शिक्षणासाठी मुंबईला नेण्याचं ठरलं...माझा विरोध मोडून काढत घरच्यांनी जवळजवळ फरफटतच मुंबईला नेलं...गावची शाळा सुटली...मॅडमच्या शिकवण्याची संस्काराच्या नाजूक फुलांची पखरण माझ्यापुरती थांबली...पुढं कधीतरी उन्हाळी-दिवाळीच्या सुट्टीला गावी आल्यावर मॅडमची बदली झाल्याचं कळलं...बालपणाच्या नाजूक शेतातल्या निरागस तळ्यात प्रतिबिंब उमटवणारा ध्रुव तारा निखळल्यासारखं वाटलं...माझ्या आभाळातून निखळलेला तो तारा आता कुणाच्यातरी डोक्यावरच्या आकाशात नक्कीच तळपत असेल याची पक्की खात्रीय मला...मॅडम पोरांच्या आयुष्यात एक दंतकथा बनू राहिल्या...माझ्यासकट...

आता त्या दंतकथेला तब्बल पंचवीसएक वर्ष झाली...मागच्या वर्षी शाळेतल्या रिटायर्ड झालेल्या इतर शिक्षकांशी चर्चा करून मॅडमला शोधण्याचा प्रयत्न केला...मॅडमचे वडील साताऱ्यातल्या पाटबंधारे खात्यात नोकरीला होते...पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी वसाहतीत चौकशी केली...धो-धो पावसात चौकशीची मोहीम चालू असताना मॅडमचा तपास काही लागलाच नाही...दिवसभर भर पावसात वणव्यासारखा फिरत राहिलो...मॅडमचा मागमूस काही लागलाच नाही...पावसात पूर्ण अंग भिजलेलं असताना कोरड्या मनाने हताशपणे माघारी फिरलो...बॉम्बे रेस्टॉरंटजवळच्या पुलाखालून दुचाकी वळवताना गाडी स्लीप झाली...हाताचं हाड मोडलं, दोन-चार टाके पडले...हात बरा झालाय आता, पण एव्हाना आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय...मॅडमला अजून शोधू शकलेलो नाही...कुणी सांगेल का, माननीय सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?