सोमवार, २७ एप्रिल, २०१५

मातीत रुजलेला आप्पा


शहराच्या पायथ्याशी वसलेली वस्ती गारठून पहाटेच्या समयी अतोनात शांत पहुडलेली असताना, रात्रभर क्याव-क्याव करत कोकलणारी कुत्री थकून एव्हाना आडोशाला तंतोतंत पसरलेली असतात...भल्या पहाटे एका छोट्या घरातून भांड्याकुंड्यांचा आवाज येत राहतो...रात्रभर कुरतडण्याचा खानदानी आणि जन्मजात व्यवसाय करणाऱ्या उंदीर, घुशींच्या कामकाजात आवाजानं खंड पडलेला असतोच...रात्रीचं जेवन-खाणं उरकून सामसूम झालेल्या घरात झोपाझोपी झाल्यावर लागलीच कामाला लागून सकाळी उजाडेपर्यंत अव्याहत उकीर काढणारी घुशी-उंदीर मंडळी आज जरा कावरी-बावरी होतात...पहाटेच घरात हालचाल सुरू झाल्याने घर सोडून पळ काढत कुठंतरी बनवलेल्या बिळात विसावतात...आप्पा सुट्टीवर आला की दररोज सूर्य उगवल्यावर जागं होणारं घर पहाटेच अंग झडझडून उभं राहतं...

मिलिटरीत सेवा करणारा आप्पा सुट्टीवर आला की पहाटेच्या कोवळ्या अंधारातच बायको-पोरांच्या दिवसाला सुरुवात होते...आप्पा सोडून बाकी सगळे चारच्या ठोक्याला उठून बसतात...त्याआधीच उठून अंघोळ वगैरे उरकून आप्पाची पोरांना उठवण्याची लगबग सुरू झालेली असते...दोन पोरींची अंघोळ झालेली असतेच...इवलासा पोरगा अंथरुनात लोळत पडलेला असतो...आप्पा त्याला तसा उचलून थेट बाथरुममध्ये पोहोचवतो...गार पाण्याची बादली अंगावर उपडी केल्यावर पोरगं भोकाड पसरतं...अंग पुसून कपडे घालण्याची बायकोची घाई उडते...थरथरत्या अंगानं पोरगं आईच्या कुशीत शिरतं...तोपर्यंत इकडं आप्पानं किचनचा ताबा घेतलेला असतो...गरमागरम पोह्याची डिश बायको-पोरांच्या पुढ्यात येऊन विसावते...पोहे संपत आल्यावर चमचांचा डिशला थडकण्याचा आवाज वाढत असतानाच आप्पा बायकोसाठी वाफाळलेला चहा आणि पोरांना ग्लासातून दूध आणून ठेवतो...भल्या पहाटे शहर झोपलेलं असताना आप्पाच्या घरात धांदल उडालेली असते...दोन मोठ्या पोरींना पुढं बसवून, छोट्या पोराला मांडीवर घेऊन बायकोला मागे बसवून आप्पानं दुचाकीची कीक मारलेली असते...पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून आप्पाची सहकुटुंब सहल सुरू झालेली असते...फटाटायला लागण्याच्या सुमारास आप्पा कुटुंबकबिल्याला घेऊन जवळच्या डोंगरावर डेरेदाखल झालेला असतो...डोंगराच्या एका कड्यावर बसून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारी दहाबारा गावं बघताना पोरं हरखून गेलेली असतात...गावांतील घरांच्या अंगणात शिलगावलेल्या चुलींतून आकाशाकडे झेपावणाऱ्या धुरांड्या आप्पाची बायको न्याहाळत राहते...

काय हा वेडेपणा, इतक्या सकाळी असं कुणी डोंगरावर येतं का?’ बायकोच्या रागभऱ्या अल्लड प्रश्नावर आप्पा फक्त गालातल्या गालात मिश्किलपणे हसत राहतो...अगं, गावात उभं राहून डोंगर तर आपण रोजच बघतो, पण डोंगरावरनं गावाकडे बघायचा आनंद वेगळाच, या पोरांना शाळेतल्या पुस्तकात गाव दिसेल, डोंगर दिसेल पण सकाळच्यापारी कूस बदलणारी गावं डोंगरावरून कशी दिसतात हे पोरांना
कोण दाखवणार?’ पिशवीतल्या चिवड्या-फरसाणाच्या पिशव्या काढत आप्पानं बायकोच्या प्रश्नाला प्रश्नानंच उत्तर दिलेलं असतं...निरुत्तर होत आप्पाची बायको आप्पाच्या मांडीवर विसावत डोंगरावर उभारलेल्या पवनचक्क्यांच्या फिरणाऱ्या पंख्याकडे पाहात राहते...कानात जबरदस्तीनं घुसू पाहणारा पवनचक्कीचा आवाज आक्रमक होऊन गेलेला असतो...रात्रीच्या थंडीत कुठंतरी वस्तीला गेलेले पक्षी एकेक करत डोंगरावर जमू लागतात...पक्षांसाठी ज्वारी-बाजरीचे दाणे भिरकावताना आप्पाच्या डोळ्यांतून समाधान पाझरत राहतं...

अवली म्हणून गावात अन् गावाबाहेर आप्पाची ओळख...15-16 वर्षांपूर्वी मिलिटरीत भरती झालेला आप्पा सुट्टीला गावी आला की त्याचे उद्योग जोमाने सुरू होतात...गावात कुठंही साप निघाला की आप्पाला बोलावणं ठरलेलंच...आप्पा थेट अडगळीत हात घालून सापाला अलगद बाहेर काढून लांब रानात सोडून देतो...नागासारखे अट्टल विखारी पसाप पकडून आप्पानं लोकांची भीती घालवलेली असते...कौटुंबिक वादात आप्पाच्या वाट्याला शेतीचा तुकडाही आलेला नसताना आप्पा असा रानावनात रमत राहतो...मित्राच्या शेतीत मित्रापेक्षा उत्साहानं कष्ट करत राहतो...प्राण्यांवर तर आप्पाचं जीवापाड प्रेम...गावात राहायचा तेव्हा मांजर, कुत्री आप्पाच्या अवतीभवती घुटमळत राहायची...रात्री अंगणात झोपताना आप्पाच्या डाव्या-उजव्या बाजूंना कुत्री-मांजरांची मुरकंड पडलेली असायची...जेवायला बसल्यावर आप्पा स्वत:च्या तोंडात घास घालण्याआधी ताटातला एकेक तुकडा कुत्र्या-मांजरांना टाकत राहायचा...आप्पा सुट्टीवर आला की त्यांची चंगळच व्हायची...कुणाबुनाच्यातनं आप्पासाठी आणलेलं दूध आप्पा सढळहस्ते मांजरांना वाटी-वाटीनं दिवसभर पाजत राहायचा...घराच्या अंगणात आप्पानं लावलेली वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांची झाडं अजून डोलारत उभी आहेत...एकदा सुट्टीवरनं आल्यावर हाडकेली कुत्री-मांजरं बघून आप्पा व्याकूळ झाला...कुत्र्या-मांजराला अलगद उचलून लांबवर सोडून आला...आता आप्पा कुत्री मांजरं सांभाळत नाही, पण गावातल्या कुणाच्याही कुत्र्यांना जाताजाता बिस्किटं टाकत राहतो...

आप्पाचं एव्हाना लग्न झालंय...दोन पोरी, एक पोरगा जन्माला आला....आता आप्पानं संसारात मनापासून रमावं असं घरच्यांना वाटू लागलं, पण आप्पाचा छंद काही थांबेना...आप्पाच्या उचापती पाहून त्याच्या घरच्यांनी भलतंच टेन्शन घेतलं आणि आप्पाची रवानगी थेट साताऱ्यात केली...आप्पा आता बायको-पोरांसह साताऱ्यात राहतो...पंधरा-वीस दिवसांच्या सुट्टीवर आलाच तर एखाद्या दिवशीच गावाकडे फिरकण्याची परवानगी...पण मिळालेल्या एखाद्या दिवसातही आप्पानं दारात लावलेल्या झाडांची छाटणी, खुरपणी केलेली असतेच...झाडांच्या बुंध्याशी साचलेला पालापाचोळा काढून त्यांना पाणी घालूनच आप्पा संध्याकाळी साताऱ्याकडे निघतो...साताऱ्यात पोहोचल्यावरही शांत बसेल तो आप्पा कसला...आप्पा सुट्टीवर आला की त्याच्या बायकोला किचनमध्ये नो एन्ट्री, नाष्टा, जेवण बनवण्यापासून भांडीकुंडी घासण्यापर्यंतची सारी कामं आप्पा एकहाती करत राहतो...आप्पाची सुट्टी संपेपर्यंत त्याच्या बायकोला सारं काही जागेवर मिळतं...मागे एकदोनदा त्याच्याकडे जाणं झालं तेव्हा त्यानेच बनवलेलं जेवण चाखायला मिळालं...झाडा-झुडपांची-प्राण्यांची सेवा करणाऱ्या हातांना वेगळीच चव बहाल झालेली जाणवलं...

गेल्या उन्हाळ्यात गावी गेलो तेव्हा आप्पा सुट्टीवर होता....भेटायला आप्पाच्या घरी गेलो तर आप्पानं सकाळीच घर सोडलेलं...दोन-तीन दिवसापासून आप्पा सकाळी बाहेर पडून रात्री उशिरा घरी येत असल्याचं समजलं...आप्पाला फोन केला तर आप्पा म्हणे मी खटावला आलोय...कशासाठी गेलास असं विचारलं तर म्हणाला दुष्काळ पाहायला...आप्पाचं उत्तर ऐकलं अन् डोकं भनकलं...लोकं पाण्यासाठी वणवण करत असताना, हाडकलेली गुरं-ढोरं चाऱ्या-पाण्याविना तडफडत चाराछावणीत धापा टाकत असताना पर्यटनाला म्हणून आप्पा तिकडं कसं जाऊ शकतो?, मित्राला सोबत घेऊन आप्पाचा माग काढला तर एका धूळभरल्या माळरानातल्या छावणीत आप्पा कसलीशी गवताची ओझी वाहताना दिसला...वासरांच्या, गायींच्या अंगावरून हात फिरवत आप्पा गवताचा एकेक घास भरवताना दिसला...आतल्याआत गलबलून गेलो...एसी ऑफिसमध्ये बसून दुष्काळाच्या कर्मकहाण्याच्या बातम्या लोकांना दाखवून मनावर जमलेली समाधानाची तथाकथित कवचकुंडलं गळून पडली...आप्पाला आम्ही दिसलो पण आप्पा गुराढोरांच्या सेवेत इतका रमला होता की आमच्याशी बोलायचीही उसंत त्याच्याकडे नव्हती...आप्पाच्या खांद्याला कायम अडकवलेली बॅग धुळीनं माखून अनाथासारखी पडली होती...बॅग उघडून पाहिली तर त्यात घोटीव लाकडाची लगोरी, गोट्या, छोट्या-छोट्या पिशव्यात गुंडाळलेल्या कसल्या-कसल्या झाडांच्या बिया, छोटी-छोटी रोपं आणि कलम करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या झाडांच्या फांद्या सापडल्या...

ज्या मातीत शेतकरी राबतो त्या मातीतच आप्पाची मूळं रोवलेली दिसली...कातावलेल्या शेतकऱ्याचे सुरकुतलेले चेहरे आम्हा शहरातल्या कोरड्या लोकांना फोटोजेनिक वाटतात...पण हळूवार वाऱ्याची झुळूक टाकून त्या सुरकुत्या फुलवणारा आप्पा शेतकऱ्याचा खरा दोस्त वाटला...रणरणत्या उन्हात सावली पाहून वस्तीला आलेल्या पक्षांचा चिवचिवाट सुरूच होता...

आता बिनरंगांचा टीव्ही येणार?



सीता राम चरित पति पावन, मधुर सरस...रविवारी सकाळी रामायणाचं गाणं लागलं की घरात, वाड्यापुढं, परड्यात, पांदीत कुठंही असलं की सगळं सोडून कोंडीराम बापूंच्या घराकडं पावलं पळत सुटायची...रामायणाचं गाणं कानावर पडलं की आठवड्यात शेशंभर गोट्यांचे डाव खेळून जमवलेल्या गोट्या डावात तशाच सोडून टीव्हीकडं पळत जाऊ वाटायचं...सूरपारंब्या खेळताना झाडावरून धपाधप उड्या पडायच्या, रामायण बघायला जाण्यासाठी घाई करताना परड्यात शेण काढणाऱ्या बायांना हात धुण्याचंही भान राहायचं नाही, तशाच शेणभरल्या हातांनी अख्खं रामायण पाहिलं जायचं...

रविवारी सकाळी पांदीशेजारच्या पांडू न्हाव्याकडे केस-दाढी करायला गर्दी जमायची, पण रामायण सुरू झालं की पांडू न्हावी गुडघ्यावर हात ठेऊन बसायचे...कपाळाच्या वरच्या भागात चार बोटांएवढ्या जागेत केस ठेऊन बाकी चकोट केलेली पोरं वस्तारा बाजूला सारत कोंडीराम बापूंच्या घराकडे धावायची...खाक्या चड्डीला लाल, पिवळ्या, काळ्या, निळ्या, जांभळ्या किंवा ओळखता येणार नाहीत अशा रंगाची ठिगळं लावलेली असायची...ठिगळ नसेलच तर पोठीमागे दोन डोबळे असलेल्या चड्ड्या करगुट्याला आवळलेल्या असायच्या...करगुटा ढिला असल्याने कुणीकुणी गळणारी चड्डी सांभाळत कोंडीराम बापूंच्या घराच्या पायऱ्या चढायचा...नाकातून गळणारा हिरवट-पिवळाधमक शेंबूड पुसल्याने ढोपरांवर पांढरट चट्टे उमटलेले असायचे...दर रविवारी कोंडीराम बापूंच्या घरात जत्रा भरायची नुसती...कोंडीराम बापूंच्या घरातलेही आढेवेढे न घेता पोरांना रामायण बघू द्यायचे...आजही गावात रामायणाचे संस्कार झालेले अनेकजण कोंडीराम बापूंच्या घरात बघितलेलं रामायण विसरू शकत नाहीत...कारण गावात त्याकाळी एकच टीव्ही...

नंतर नंतर टीव्हीवरच्या इतरही कार्यक्रमांची गोडी वाढू लागली...छायागीत, चित्रहार, गोट्या, चंद्रकांता, महाभारत, शक्तिमान असे एक ना अनेक कार्यक्रम बघायला झुंबड उडू लागली...बसायला जागा मिळावी म्हणून काहीजण आधीच कोंडीराम बापूंच्या घराजवळ घुटमळत राहायचे...शाळेसमोरच्या पडवीवर, समोरच्या विहिरीच्या कट्ट्यावर पोरं-बाप्ये घिरट्या घालू लागायचे...कार्यक्रम लागला रे लागला की पोरंटोरं मोठ्या माणसांवानी अन् मोठी माणसं पोराटोरांवानी धावत सुटायचे...जात-धर्म-लहान-थोर अशा सगळ्या भेदांपलिकडे जाऊन टीव्ही बघण्याचा सोहळा कोंडीराम बापूंच्या घरात
रंगायचा...कामंधामं सोडून लोकं तासभर रामायणात घुसायचे...त्यात कधी खंड नाही पडायचा...अगदीच रविवार गाठून एखादा पुचाकला तरच लोकं रामायण सोडून माती द्यायला जायचे...टीव्हीत राम  झालेले अरुण गोविल आणि सीता झालेली दीपिका एव्हाना घराघरातल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाले होते...श्रीकृष्ण झालेले नितीश भारद्वाज पोरांच्या वह्यांवर, कंपासपेटीवर सुदर्शनचक्र फिरवत राहिलेले असायचे...हनुमान झालेले दारासिंग तर पेनावर डोंगर करंगळीने उचलून उडत राहायचे...

टीव्हीचा काळ तोपर्यंत यायचा बाकी होता...देशात टीव्ही आला होता पण खेडोपाडी टीव्ही म्हणजे मिरवणूक काढून आणायची गोष्ट असायची...एखाद्याच्यात टीव्ही आणलाच तर शेजारपाजारच्या किंवा भावकीतल्या सुवासिनींना बोलवून पूजा-अर्चा केली जायची...हळद-कुंकू लावलेल्या टीव्हीपुढे उदबत्तीचा दरवळ पसरत राहायचा...टीव्ही आणि रामायणाची ओळख एकाचवेळी झालेली आमची पिढी टीव्ही म्हटलं की अजूनही रामायणाचीच आठवण काढते...ज्या घरात टीव्ही आणलाय त्या घरातल्या पोराला वेगळीच इज्जत मिळायची...वर्गात सर्वात पुढे बसायला जागा देण्यापासून ते गोट्या खेळतानाही त्याला विशेष सवलत असायची...लपाछपी खेळताना त्याच्यावर राज्य आलं तरी त्याला सन्मानानं पोरं आपणहून सापडून घ्यायची...लपल्याचं केवळ नाटक करत तो शोधायला आला की त्याच्या स्वाधीन व्हायची...

आ बलमा नदिया किनारे..किंवा तू मुझे कुबुल, मै तुझे कुबुल, खुदा गवाहवगैरे गाणी लोकांच्या ओठावर यायला लागली...कपिल देव, संदीप पाटीलसारख्या खेळाडू मंडळींची खेळी फक्त रेडिओवरून ऐकलेले लोक त्यांना याचि देही-याचि डोळा पाहू लागले...निरमा पावडरच्या पुड्यावरील पोरीचं झुबकेदार फ्रॉक घालायची स्वप्न पोरसवदा पोरी पाहू लागायच्या...पारले-जीच्या पुड्यावरच्या पोराचं बाळसं, त्याचा गुटगुटीतपणा आपल्या पोराला यावा म्हणून आया पोटच्या बाळांना डबल रतीब घालू लागल्या...बातम्या सांगणारे प्रदीप भिडे तर लोकांच्या प्रतीक्षेचा केंद्रबिंदू झाले...बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हे गाणं लोक सायकलवरून फिरताना किंवा बैलगाडीतून शेतात जातानाही गुणगुणत राहायचे...मिले सूर मेरा तुम्हाराची धून लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवायचा आग्रह धरायचे...ऐन लग्नाची तारीख गाठून कुणी देवाघरी गेलं तर पोस्टपॉंड झालेल्या लग्नाची तुलना लोक टीव्हीवरच्या व्यत्यय आल्यावर दिसणाऱ्या उभ्या रंगीत पट्ट्यांशी करायचे...आधी ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर टीव्ही लोकांच्या मनात घर करत राहिला...आवडीच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली की लोकं वीज बोर्डाच्या नावानं बोटं मोडायचे...लाईट येईपर्यंत बंद टीव्हीकडे बघत राहायचे...बंद टीव्ही बघताना आपलं कुणीतरी कामाधंद्याला शहरात जाताना होणारं दु:ख लोकांच्या डोळ्यांत दिसायचं...

आता जसा टीव्ही शोकेसमध्ये किंवा भिंतीवर टांगलेला दिसतो तसा तेव्हा नसायचा...जुना बॅलर, पाण्याची मोठी टाकी किंवा अगदीच पुढारलेलं घर असेल तर लाकडी टेबल असला की टीव्ही त्यावर सुखाने नांदायची...घरात गणपती आले की गणपतीएवढंच टीव्हीपुढे लोक बसायचे...टीव्हीनं जग हे असं लोकांच्या घरात आणि मनात आणून ठेवलं...अमेरिकेत क्षेपणास्त्राच्या घेतलेल्या चाचणीचा धूर सरळ लोकांच्या घरात दिसू लागला...क्राऊनचा लाकडी सेटरवाला टीव्ही अजूनही अनेकांच्या मनात रुंजी घालतो...चॅनल एकच तोही दूरदर्शन, तरीही चॅनल बदलण्यासाठी टीव्हीवर असलेल्या गोल खटक्यासदृष बटनाकडे लोक कौतुकाने बघायचे...

आता आता तर घराघरात टीव्ही आलेत...रेडिओनं गावतल्या नाटकांचा, तमाशांचा, पार्ट्यांचा आणि पंचमीला वगैरे होणाऱ्या झिम्मा फुगड्यांचा गळा आवळला, नंतर टीव्हीनं रेडिओच्या गळ्याला नख लावलं...आता एलसीडी किंवा एलईडीनं टीव्हीचं शरीर मानेवेगळं केलं...

गेल्या आठवड्यात घरातली लाईट टीव्ही चालू असताना गेली...परत लाईट आली पण टीव्ही काही चालू होईना...दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला पण ट्यूब गेल्याचं कळल्यावर नाद सोडून दिला...दोन-चार दिवसावर अक्षय्य तृतीया आहे, तेव्हाच टीव्ही आणू असं ठरवलं...बंद टीव्ही कपाटात तसाच पडून होता...मृतदेहासारखा...कुणी त्याच्याकडे बघत नव्हतं की कुणाचं काही बिघडत नव्हतं...लहानपणी लाईट गेल्यावरही टीव्हीकडं बघत बसतानाची हूरहूर जाणवलीच नाही अजिबात...बायको-पोरांना आणि मलाही..!

अक्षय्य तृतीयेला एलईडी स्मार्ट घेऊन कंपनीचा माणूस आला...त्यानं एलईडी सेट केला, चहा घेतला आणि गेला...चेक करायचं म्हणून चालू केला...पण लहानपणी लाईट आल्यावर सुखावणारं मन ढिम्मच...थोड्या वेळानं पोरं शाळेतनं आली...त्यांना सरप्राईजच्या सुरात म्हटलं, बाळांनो आपल्या घरात एलईडी आणलाय...पोरांनी कपडे बदलत फक्त कटाक्ष टाकला...आणि आम्ही खेळायला खाली जाऊ का? म्हणायला लागली...एक वाजता आलो की निक चॅनलवरचा मोटू-पतलू बघताना एलईडी बघू म्हणत बॅट उचलून खाली गेलीही...

टीव्हीबाबतचा चार्म संपलाय, मित्रहो...दुनिया गोल है...एक वह दौर था, आज यह दौर है...कल न जाने क्या होगा...रंगीत टीव्ही, एलईडी आले पण जीवनातला रंग भावनाशून्यतेने फिका पडलाय...जग जवळ आलंय पण शेजारी बसलेले जवळचे दूर गेलेत...टीव्ही दबक्या पावलाने घरात घुसला तेव्हा जीवनात रंगांची उधळण झाली...सात रंगांपेक्षा भलेथोरले रंग टीव्हीनं जीवनात भरले...आता पुढच्या काळात कोणते रंग दाखवणारा टीव्ही जन्माला येणार आहे कुणास ठावूक ?

सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

भुरी

आई-नाना गावी स्थायिक होऊन आता कुठं वर्ष-दीड वर्ष झालीत...गावी शिक्षण घेऊन नाना मुंबईत स्थायिक झाले अनं राना-वावरात काम करण्याची किंवा गावागाड्यात वावरण्याची सवयच हरवून बसली...नाही म्हणायला नाना चाळीस-बेचाळीस वर्ष मुंबईत राहिले पण जत्रा-दिवाळीला गावी जाण्याचा शिरस्ता होताच...आई मात्र बऱ्यापैकी गावी राहिली होती...आता-आताची पंधरा-वीस वर्ष सोडली तर आई गावीच राहिली होती...त्यामुळे आईला गावची सवय होतीच...पण अखंडपणे गावापासून दूर राहून दीड वर्षांपूर्वी दोघांनी मुंबई सोडून गावी रहायचा निर्णय घेतला...छोटं घर बांधायचं आणि वाटून आलेली शेती यथाशक्ती कसायची ठरवली...नानांचा कष्टाळू स्वभाव आणि आईची जिद्द यामुळे ते गावी सरावतील याची मला खात्री होतीच...

पण का कुणास ठावूक मला, माझ्या दोन पोरांना आणि घराच्या परंपरेत मनाने मिसळून गेलेल्या माझ्या बायकोला सोडून त्यांचं मन गावी रमेल असं मला वाटत नव्हतंच...पण कौटुंबिक घडामोडींनी त्यांना गावी रहावं असं वाटू लागलं...झालं, एके दिवशी भल्या सकाळी-सकाळीच नाना-आईने सामानाची बांधाबांध केली...इवले-इवले आराध्य, अध्याय झोपेत असतानाच त्यांनी घर सोडलं...झोपलेल्या आराध्य-अध्यायच्या तोंडावरून हात फिरवत आई-नानांनी घराचा निरोप घेतला...मी आता बऱ्यापैकी प्रौढ आणि कमावता झालो असलो तरी मी लहान असल्यापासून आईने जोपासलेल्या शंभराची नोट हातावर ठेवण्याच्या सवयीत यावेळीही खंड पडला नाही...बायकोला शंभर आणि मला शंभर...पोरांसाठी पन्नास-पन्नासच्या दोन नोटा आमच्याच हवाली करून आई-नाना गावी गेले... 

गावी जाऊन तात्पुरत्या स्वरुपात भावकीतल्याच एकाचं छोटं जुनं घर भाड्याने घेतलं...भाडं महिना अडीचशे...आई-नानांचा म्हातारपणातला स्वतंत्र संसार सुरू झाला...फोनवर संपर्क करून खुशालीची देवाण-घेवाण होत होतीच...नाना शेता-वावरात जाऊ लागले होते...चवळी-पावट्यासारख्या पिकांची लागण केल्याचं सांगू लागले होते...भांगलणी-खुरपणीसाठी आई आता गावातल्या बायकांशी वारंगुळा करू लागली होती...मुंबई सोडताना आई-नानांना प्रकृतीच्या थोड्या अडचणी होत्या पण गावच्या हवेत सगळ्या कुरबुरी पळून गेल्याचं ते सांगत असतात...नानांचा गुडघा दुखतो अजून कधीतरी पण मधुमेहाच्या तक्रारी बऱ्यापैकी कमी झाल्यात...ते सगळं सांगत असतानासुद्धा त्यांचं मन अजून म्हणावं तसं रमलं नसल्याचं जाणवायचं... 

एकदा फोनवर बोलताना म्हैस घेतल्याचं आईने सांगितलं...घरातल्याच एकाकडून म्हैस घेतल्याचं आई बोलली...भुरी तिचं नाव...स्वभावानं लय गरीब हाय, रानात चरायला नेताना शिस्तीत चालत राहते, लोकाच्या वावरातल्या गवताच्या काडीकडेही बघत नाही, दूध काढताना पाय झाडत नाही की हलतही नाही...नाना सकाळी उठून भुरीला घेऊन रोज रानात जाऊ लागले...भुरीला बांधावर सोडून निर्धास्त बसून राहतात...भुरी बांधावरचं गवत सोडून वावरातल्या पिकाला तोंडही लावत नाही...लक्ष्मी हाय भुरी...आई भरभरून सांगत राहायची...भुरीवर आई-नानांचा जीवच जडला होता जणू...रोज फोनवर बोलताना आई भुरीचा विषय आवर्जून काढायचीच...नाना कुठं गेलेत विचारलं तर भुरीला घेऊन रानात गेलेत असं आईचं उत्तर ठरलेलं...दिवसभर रानात न्यायचं, संध्याकाळी कडूसं पडताना घरी आणायचं, पडक्या वाड्यामागे बाभळीच्या झाडाखाली भुरीला बांधायचं, वैरण-काडी टाकायची, दूध काढायचं आणि मगच जेवायचं...मध्यरात्रीच कधीतरी उठून भुरीकडं उगाच चक्कर मारायची असा नानांचा कार्यक्रम बनत राहिला...

पोरांना दिवाळीची सुट्टी लागल्यावर कुटुंबकबिल्याला घेऊन गावी गेलो...ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी-सकाळीच गावात पोहोचलो तर आई सुपात कुंकवाचा करंडा, बाजरी घेऊन भुरीची पूजा करताना दिसली...तांब्यातलं पाणी पायावर पडल्यापडल्या भुरी शहारून गेलेली...पोरांचा कलकलाट ऐकल्याबरोबर आई कुंकवानं माखलेल्या हातानेच पोरांचे पापे घेऊ लागली...एव्हाना पोरांची तोंडं आईच्या हाताला लागलेल्या कुंकवाने लालेलाल होऊन गेलेली... पोरं म्हैस नावाचा प्राणी पहिल्यांदाच बघत होती, त्यामुळे की काय भुरीकडं घाबऱ्या नजरेनं बघत राहिलेली...घरातलं काम उरकत आई भुरीभोवती घुटमळत राहायची आणि पोरं आईभोवती...पोरं कधी भुरीच्या शेपटाला, कधी पोटाला हात लावत अंदाज घेत होती...भुरी शांत उभी राहतेय असं पाहून पोरं तिच्याभोवती रमायला लागली...गवत खाताना भुरीच्या तोंडातून उच्छवासाबरोबर गळणाऱ्या फेसाळ लाळेकडे बघताना पोरं हरखून जायची...भुरीच्या माणसाळलेपणांचा अंदाज आल्यावर मोठ्या पोरानं, आराध्यनं तिच्या पाठीवर बसण्यापर्यंत मजल मारली होती...आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला पाहून अध्याय चेकाळून जायचा...अध्याय आताआता भुरीच्या गळ्याला लोंबकळायला लागलायचा...रानात जाताना अध्याय भुरीच्या पुढं आणि आराध्य भुरीची दोरी हातात घेऊन मागे चालत राहायचा...गावाजवळच्या ओढ्यातल्या डबक्यात भुरी डुंबत राहायची...पोरं तिच्या अंगावर इवल्या-इवल्या हातांनी पाणी उडवत राहायचे... 

बायको-पोरांना गावी सोडून मी मुंबईला येऊन पोहोचलो...दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत त्यांना गावीच ठेवलं होतं...गावी फोन केला तर पोरं भुरीजवळच असायची...बायकोला फोन घेऊन त्यांच्याजवळच जावं लागायचं...पोरं फोनवर बोलताना भुरीबद्दलच बोलत राहायची...पोरांचे बोबडे बोल ऐकताना भुरीच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज येत राहायचा...आईसोबत आता पोरंही भुरीपुराण सांगयला लागली होती...सकाळी उठून भुरीचं नीरसं दूध मटकावून पोरं ओठाला लागलेला दुधाचा फेस पुसत भुरीभोवतीच जमायची...रात्री जेवायला आणि झोपायला पोरांना अक्षरश: फरफटतच न्यावं लागायचं...झोपताना पोरं भुरी कुठं झोपणार, भुरीला चोर पकडून नेतील असं भाबडं बोलायची... पोरांना भुरीचा लळा लागला होता...आणि भुरीला पोरांचा...दिवाळीला नेलेले फटाके वाजवायचं पोरं विसरूनच गेली...भुरीभोवतीच रेंगाळत राहायची...पोरं दिसेनासी झाली की भुरीही अस्वस्थ होत पाय झाडायची, इकडे तिकडे बघत हंबरत राहायची...पोरांना दिवाळीचा फराळ दिला तर कानवला, काटुकुडुबळं पोरं भुरीला चारत राहायची...फटाक्यांची पिशवी अजून गावच्या घरात पडून आहे, जशीच्या तशी... 

दिवाळीची सुट्टी संपल्यावर पोरांना आणायला गावी गेलो तर अध्याय भुरीच्या दावणीत झोपलेला आणि आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला...भुरी मात्र आराध्य पडू नये याची काळजी घेत उभी असल्याचं भासलं...भुरीच्या श्वासातून वात्सल्य आणि पोरांच्या डोळ्यांत भुरीवरचा विश्वास पाझरताना दिसला...दोन-तीन दिवस पोरांचं आणि भुरीचं मैत्र न्याहाळताना अप्रुप वाटायचं...शहरात राहणारी पोरं गावच्या वातावरणाला मुकतील अशी जी भीती कायम वाटायची ती कुठच्याकुठं पळून गेली होती...मुंबईला जाण्याच्या तयारीची धांदल घरात उडालेली असताना पोरं तिकडं भुरीजवळच रेंगाळलेली...नेहमी भुरीभोवती बागडणारे आराध्य, अध्याय मुंबईला जाण्याची चाहूल लागल्यावर तापलेल्या उन्हात भुरीपासून लांबवर असलेल्या दगडावर बसून भुरीकडं बघत राहिलेली...त्यांच्याजवळ गेलो तर भुरीला मुंबईला नेऊया का ? असा आराध्यचा खडा सवाल... 

तिला मुंबईत सोसायटीच्या पार्किंगमध्ये बांधू, सकाळी शाळेत जाताना आम्ही तिला शाळेत नेऊ, शाळेच्या मैदानातलं गवत भुरी खात बसेल, शाळा सुटली की तिला आम्ही घरी आणू....बोलताना पोरांच्या डोळ्यातली विरहवेदना लपत नव्हती...कसंबसं पोरांना समजावलं...भुरीच्या शेणानं भरलेली कपडे बदलली, अंघोळ घालून निघायची तयारी केली...घर सोडताना पोरं भुरीकडे वळून-वळून बघायची...सडकेवर आलो, खांद्यावरच्या बॅगा खाली ठेवल्या, बायको एसटीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली...आई-नाना मुंबईला नेण्यासाठी आणलेल्या भाजीच्या पिशव्या सांभाळत उभे...आजूबाजूला पाहिलं तर पोरं दिसेनातच...घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून धावत घराकडे गेलो...पोरं दिसली नाहीतच...घराला लावलेली कडी तशीच होती...सहज भुरीच्या गोठ्याकडे पाहिलं तर उतरणीला लागलेल्या दिवसाच्या झुंजूमुंजू काळोखात अध्याय म्हशीच्या गळ्यात पडून रडत बसलेल...घरातला पावडरचा डबा गुपचुप आणून भुरीच्या तोंडाला पावडर थापायचं आराध्यचं काम चालू होतं...पोरांना धपकवत जवळजवळ ओरबडून बाजूला काढलं...मुंबईला आणलं...आईने बाटलीत भरून दिलेलं भुरीचं दूध दोन-तीन दिवसांनी संपल्यावर पिशवीतलं दूध दिलं तर पोरांनी बरोब्बर ओळखलं... 


आता मागच्या रविवारी गावी गेलो तर भुरीच्या कासेला लगटलेलं इवलं-इवलं पिल्लू पाहिलं...भुरी व्याली होती...प्राणीभेदाच्या भिंती तोडून भुरी माझ्यासारख्या मानवाच्या पिल्लांना इतका जीव लावू शकली होती तर ती स्वत:च्या पिल्लाला किती जीव लावत असेलबाळ, मग ते भुरीचं असो की माझं, जीव लागायला, प्रेम वाटायला भाषा कशाला हवी...श्वासाश्वासातून बांधलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला भाषेच्या गाठी हव्यातच कशाला?

सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

अखेर सविता लोखंडे मॅडम सापडल्या

हा लेख साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या झुंबर पुरवणीत 7 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाला, सुमारे तीन-चार वर्षांची शोधमोहीम ऐक्यमुळे थांबली...त्याचदिवशी रात्री 10 च्या सुमारास मॅडमशी फोनवरून बोलणं झालं...थँक्स ऐक्य..!

त्याचप्रमाणे सविता लोखंडे मॅडमना शोधण्यासाठी माझ्या मोहिमेत मला मदत करणारे शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, पवार सर, नलगे सर आणि इतरही सर्वांचा ऋणी आहे...

तो लेख जसाच्या तसा....




सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

त्या दिवसांत गावची शाळा लक्ष्मीआईच्या देवळात भरायची...शाळेचा वर्ग चालू असताना एखादा आगंतूक भक्त मध्येच देवळात येऊन घंटा वाजवून, देवीच्या पाया पडून जायचा तेव्हा शिक्षकांसह पोरंही सवयीप्रमाणे आपापलं काम करत राहायची...आता आहे तशी शाळेची इमारत गावाबाहेर किंवा सर्व वर्ग एकाच इमारतीत नव्हते...त्याकाळी गावच्या शाळेची दुमजली इमारत होती पण जागा कमी पडत असल्याने काही वर्ग लक्ष्मीआईच्या देवळात आणि कुणाच्यातरी भल्यामोठ्या घरात भरायचे...त्यामुळे पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि डोक्यावर टोपी घातलेल्या पोरांचे अन् पांढऱ्या-निळ्या कपड्यातल्या आणि डोक्यावर लाल रिबिनने दोन वेण्या बांधलेल्या पोरींचे थवे गावभर इथे-तिथे दिसायचे...त्यानिमित्ताने सर-मॅडमचीही गावभर रपेट व्हायची...तास सुरू होताना किंवा संपल्यावर खडूच्या रंगाने माखलेल्या हातात डस्टर आणि पुस्तक घेऊन सर-मॅडम गावातील रस्त्यांवर चालताना दिसत राहायचे...गायी-गुरं, बैलगाडी घेऊन किंवा डोक्यावर ओझं घेऊन रानात चाललेले पालक आपल्या पोरांची प्रगती सर-मॅडमला रस्त्यातच अडवून विचारत बसायचे...हल्ली चालतात तशा पालकसभा त्याकाळात अशा भररस्त्यातच चालायच्या...पोरगा बाकी विषयांत बरा आहे पण गणितात जरा कच्चा आहे असं शिक्षकांनी सांगताच ‘दणकवा त्याला, चांगला फटकवा’ हा एकमेव उपाय पालकांना तेव्हा माहित असायचा...पालक-शिक्षकांचा समन्वय आणि सुसंवाद असा भररस्त्यात लाईव्ह घडायचा...त्या सुसंवादाला हातातल्या कासऱ्याला ओढ देणाऱ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटेचं बॅकग्राऊंड म्युझिक असायचं...वर्गातल्या पोरा-पोरींचं फक्त संपूर्ण नावच नाही तर त्यांच्या घरच्या परिस्थितीचा, वातावरणाचा अंदाज शिक्षकांना असायचा...त्यामुळे विद्यार्थ्यांशी बोलताना, एखादी गोष्ट त्याला समजावून सांगताना शिक्षक बरोब्बर सांगड घालायचे...गावातून टापटिप साडीतल्या मॅडम जाताना बायका कौतुकाने बघत राहायच्या...

जिल्हा परिषदेच्या चौथीपर्यंतच्या शाळेतील सर्व विषयांना एकच गुरुजी किंवा बाई या सरकारकृत बहुउद्देशीय तत्वाला सरावलेल्या आम्हाला तेव्हा विषयागणिक वेगवेगळ्या शिक्षकांचं कोण कौतुक...पाचवीत गेल्यावर प्रत्येक तासाला वेगळा विषय, वेगळ्या विषयाला वेगळे सर किंवा मॅडम बघून आम्ही पोरं हरखून जायचो...शाळा पंचक्रोशीने स्थापन केलेली असल्यामुळे एखाददुसरा शिक्षक वगळता बहुतांश शिक्षक गावातलेच असायचे...त्यामुळे शाळेत शिकवणारे शिक्षक सुट्टीच्या दिवशी रानात बैलगाडी घेऊन जाताना दिसायचे...बाहेरगावातून शिकवायला आलेल्या सर आणि मॅडमबद्दल आम्हाला आदरमिश्रित दरारा आणि कुतुहल असायचं...त्या दिवसांतला चार्म काही वेगळाच होता...त्याच झापटलेल्या दिवसांत आम्हाला गणित शिकवायला लोखंडे मॅडम होत्या ते अजून तंतोतंत आठवतंय...माहेरची साडी पिक्चरची हवा असलेले ते दिवस...अलका कुबलनं महिला वर्गावर केलेलं गारूड अजून स्पष्ट आठवतंय...लोखंडे मॅडम दिसल्या की आम्हाला अलका कुबलची आठवण यायची...त्यांची देहबोली, चालण्याची ढब अलका कुबलसारखी हुबेहूब असायची...पहिल्या दिवशी मराठी आणि हिंदीचा तास संपल्यावर सविता लोखंडे मॅडमनी वर्गात पाय ठेवला आणि माहेरची साडी यांनीच नेसली की काय असं वाटायला लागलं...आजूबाजूच्या गावात साधं जत्रेलाही जाण्याची परवानगी नसलेल्या वयात आम्ही पोरांनी माहेरची साडी पिक्चर बघितला असण्याचा प्रश्नच नव्हता...पण माहेरची साडी पिक्चर बघितलेल्या थोरा-मोठ्या बाया-बापड्या बोलताना ऐकल्याने आमच्या काही कल्पना आम्ही मनाशीच बांधून ठेवलेल्या...लोखंडे मॅडम का कुणास ठावूक पण त्या पिक्चरशी संबंधित असतील असं आम्हा बापुड्या पोरांना वाटत राहायचं...

वर्गात आल्याआल्या सविता लोखंडे मॅडमनी रांगेत मांडी घालून बसलेल्या प्रत्येक पोराला उठवून ओळख करून घेतली आणि मग स्वत:ची ओळख करून दिली...मी सविता लोखंडे...मी साताऱ्याजवळच्या कृष्णा नगरची...आजपासून मी तुम्हाला गणित विषय शिकवणार...आयुष्यात गणिताचं मोठं महत्त्व आहे...त्यामुळे गणित शिकायलाच हवं...दुकानात गोळ्या-बिस्कीटांना किती रुपये लागतात किंवा गोळ्या-बिस्कीटं घेतल्यावर किती रुपये शिल्लक राहणार हे आपल्या माहित असायला हवं की नाही? असं सांगताना पोरं माना
हलवायचे...गणितासारखा त्या काळी अवघड वाटणारा आकडेमोडीचा विषय मॅडमनी आमच्यासमोर असा उभा केला...शिकण्याआधीच गणिताबद्दलची भीती घालवण्याचा मॅडमचा प्रयत्न होता हे नंतर-नंतर समजायला लागलं...गणितासारखा मुलांना कडू वाटणारा व्यवहारिक औषधाचा खुराक मॅडम रंजकतेच्या आणि कल्पकतेच्या मधूर मधात मिसळून पोरांना रोज देऊ लागल्या...परिणामी फक्त मराठी, चित्रकला किंवा पीटीच्या तासाला खुलणारी पोरं गणिताच्या तासालाही फुललेल्या चेहऱ्यांनी बसू लागली...शाळेतून घरी जाताना पोरं हाताच्या बोटांनी हिशेब करू लागली...लायटीच्या तारेवर बसलेल्या पक्षांची मोजदाद करू लागले...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उंडारणारी पोरं उजेड असेपर्यंत घराच्या अंगणात पोतं टाकून गणिताचा अभ्यास करायला बसू लागली...लोखंडे मॅडमनी इवल्या-इवल्या पोरांवर जादू करून टाकली होती...

हा-हा म्हणता घटक चाचणीची धामधूम सुरू झाली...हायस्कूलला आल्यावरची पहिली परीक्षा...अभ्यासावर पोरांची मुरकंड पडायची...पोरांना सर्वात जास्त काळजी गणिताची...इंग्रजीची भीती होती, पण पाचवीला फक्त एबीसीडीपर्यंतचीच तयारी असल्याने पोरांना इंग्रजीपेक्षा गणिताने छळलं होतं...पोरांच्या चेहऱ्यावरच्या तणावाच्या रेषा मॅडमनी अचूक ओळखल्या...प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून मॅडमनी पोरांची भीती कुठच्या कुठं पळवून लावली... ...पाचवीच्या वर्गातील पोरांचा निकाल भन्नाट लागला...मराठीपेक्षा गणिताच्या मार्कांचे आकडे मोठे दिसू लागले...इतर शिक्षकांसह पालकांनीही तोंडात बोटं घातली...घरच्या मंडळींनी घरातले छोटे-मोठे हिशेब छोटुकल्या पोरांच्या हाती स्वाधीन करून टाकले...दुधाचं, लाईटचं बिल बघत पोरं हाताच्या बोटांनी लिलया टोटल मारू लागायची...मॅडमच्या मार्गदर्शनाने पोरांना गणितातले आकडे दोस्त वाटू लागले आणि मॅडम सखी

पोरांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मॅडमनी पदरचे पैसे घालून चकमकी कागदात गुंडाळलेली भारी चॉकलेट वर्गातल्या पोरांना वाटली...चारआण्यात दोन मिळणारी लालचुटूक किस्मी चॉकलेट अवसंपुनवंला बघायला मिळायची...त्यात अशी भारी-भारी चॉकलेट बघून पोरांच्या आनंदाला पारावर राहायचा नाही...गणितात पडलेली मार्क बघताना पोरांच्या आनंदी चेहऱ्यांकडे मॅडम कौतुकानं बघत राहायच्या...निकाल हातात आल्यावर मॅडमनी पोरांची वर्गवारी केली...कुठल्या विद्यार्थ्याची कोणती तयारी करून घ्यायची हे निश्चित केलं...आम्ही सातवीला आलो तेव्हा माझ्यासह काही मुलांना मॅडमनी स्कॉलरशीपच्या परीक्षेला बसवायची तयारी केली...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत मॅडम सराव करून घेऊ लागल्या...त्याकाळी वाहतुकीची तुलनेनं आताइतकी साधनं नव्हती, तरीही मॅडम रात्री साडेआठच्या शेवट्या एसटीने सातारला जायच्या...सकाळी पुन्हा आठ वाजता मॅडम शाळेत हजर...स्कालरशीपच्या परीक्षेला कोरेगावला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं...परीक्षेच्या दिवशी माझ्यासह दोन-तीन मुलांकडे पैसे नसल्याचं कळल्यावर मॅडमनी पर्समधून वीस-वीस रुपयांच्या नोटा आमच्या हातात ठेवलेल्या स्पष्ट आठवतायत...सातवीला माझा वर्गात पहिला नंबर आला...मॅडमनी डोक्यावरून हात फिरवला...प्रगतीपुस्तकावर मिळालेल्या मार्कांवर मॅडमच्या परिश्रमाचं तोरण होतं...होणारं कौतुक आधी गणंग म्हणून हिणवल्या गेलेल्या माझ्यासारख्याला  आवरता येत नव्हतं...डोळ्यातल्या अश्रूंचा एक थेंब मॅडमच्या हातावर पडला आणि मॅडमनी लगबगीनं मला जवळ घेत डोळे पुसून काढले...मॅडमनी पर्समधून एक पेन काढून हातात ठेवला तसा मी विजेच्या वेगाने वाकून मॅडमच्या पायाला हात लावला...

उन्हाळ्याची सुट्टी लागली...शाळा भकास वाटू लागली...रोज दिसणाऱ्या मॅडमची ताटातूट झाल्यासारखं पोरांना वाटायला लागलं...गणिताचे आकडे निराधार दिसू लागले...शाळा सुरू व्हायला आठवडा उरला असतानाच मला शिक्षणासाठी मुंबईला नेण्याचं ठरलं...माझा विरोध मोडून काढत घरच्यांनी जवळजवळ फरफटतच मुंबईला नेलं...गावची शाळा सुटली...मॅडमच्या शिकवण्याची संस्काराच्या नाजूक फुलांची पखरण माझ्यापुरती थांबली...पुढं कधीतरी उन्हाळी-दिवाळीच्या सुट्टीला गावी आल्यावर मॅडमची बदली झाल्याचं कळलं...बालपणाच्या नाजूक शेतातल्या निरागस तळ्यात प्रतिबिंब उमटवणारा ध्रुव तारा निखळल्यासारखं वाटलं...माझ्या आभाळातून निखळलेला तो तारा आता कुणाच्यातरी डोक्यावरच्या आकाशात नक्कीच तळपत असेल याची पक्की खात्रीय मला...मॅडम पोरांच्या आयुष्यात एक दंतकथा बनू राहिल्या...माझ्यासकट...

आता त्या दंतकथेला तब्बल पंचवीसएक वर्ष झाली...मागच्या वर्षी शाळेतल्या रिटायर्ड झालेल्या इतर शिक्षकांशी चर्चा करून मॅडमला शोधण्याचा प्रयत्न केला...मॅडमचे वडील साताऱ्यातल्या पाटबंधारे खात्यात नोकरीला होते...पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी वसाहतीत चौकशी केली...धो-धो पावसात चौकशीची मोहीम चालू असताना मॅडमचा तपास काही लागलाच नाही...दिवसभर भर पावसात वणव्यासारखा फिरत राहिलो...मॅडमचा मागमूस काही लागलाच नाही...पावसात पूर्ण अंग भिजलेलं असताना कोरड्या मनाने हताशपणे माघारी फिरलो...बॉम्बे रेस्टॉरंटजवळच्या पुलाखालून दुचाकी वळवताना गाडी स्लीप झाली...हाताचं हाड मोडलं, दोन-चार टाके पडले...हात बरा झालाय आता, पण एव्हाना आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय...मॅडमला अजून शोधू शकलेलो नाही...कुणी सांगेल का, माननीय सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

जिव्हाळा तितुका मेळवावा...शेजारधर्म वाढवावा...

इडा पिडा टळो, आजाराचा डोंगर जळो..ssss हाताची बोटं कडाकडा मोडत शेजारची बायजाबाई भाकरीचा घास पोराच्या तोंडासमोर खाली वर करत राहते...पातळाच्या पदराला गाठी मारून ठेवलेल्या दोनतीन वाळक्या लाल मिरच्या काढून भाकरीचा घास मुठीत धरून चुलीत फेकल्याबरोबर तडातडा आवाज आल्यासरशी बायजाबाईचा चेहरा खुलला...’कुणाची तरी नजर लागलीवती जणू पोराला, काजाळ लावत जा गं बाय रोज त्याला...’ असं पोराच्या आईला बजावत बायजाबाई पोराला मांडीवर घेऊन कुरवाळत राहिली...बायजाबाईच्या पदराखाली तोंड झाकलेल्या इवल्याशा पोराला तरतरी आल्यासारखं झालं...भाकरीचा घास, मिरच्यांनी असर केला नव्हताच...इतक्या मायेनं शेजारी राहणारी बायजाबाई आपल्यावर प्रेम करतेय या भावनेनंच पोराला बळ आलेलं...दहा-बारा वर्षाच्या पोराची जडणघडण जन्मदात्या आई-बापाच्या सावलीत झाली असली तरी शेजारी राहणाऱ्या बायजाबाईनं दिलेले सुखाचे क्षण पोरगं विसरू शकत नव्हतं...चाळीस-पन्नाशीचं वय गाठलेल्या बायजाबाईनं दिलेल्या मायेच्या संचितानं पोरगं भरून पावलेलं असतं...पोटच्या पोरासाठी बाजारातून काहीबाही आणताना आपल्यासाठीही बायजाबाईनं आणलेला खुळखुळा पोरगं विसरू शकत नसतं...शेजारच्या बायजाबाईनं घरात काही गोडधोड केलं तर त्याचा वास घरात येण्याआधी तामानात पदार्थ पुढ्यात आलेला पोराला आठवत राहतो...मागच्या जन्माचं काहीतरी नातं असल्यासारखं बायजाबाई शेजाऱ्याच्या पोराला जीव लावत राहते...

कधीतरी शाळेतून घरी येताना ठेच लागून रक्ताळलेला अंगठा वर धरत लंगडत आलेलं पोरगं पाहून धावत येणाऱ्या जन्मदात्या आईमागोमाग हळदीची वाटी घेऊन लगबगीनं धावलेली बायजाबाय डोळ्यांसमोर दिसत राहते जशीच्या तशी...रक्तावर माती चिकटून मळलेला अंगठा साफ करून त्यावर बायजाबाय मोठ्या मायेनं फुंकर घालत राहते....मोठ्या बहिणीच्या लग्नावेळी घरातल्यांबरोबर समरसून गेलेल्या बायजाबाईची धावपळ अजून आठवते...नांदायला जाताना लग्नात शेजारच्या बायजाबाईनं घेतलेली साडी पाहताना हरखून गेलेल्या मोठ्या बहिणीचा आनंद आयुष्यभर पुरेल असा असतो...बायजाबाईलाही एक पोरगं अन् एक पोरगी आहेच की...बायजाबाईचं पोरगं शिक्षण, लग्न होऊन एव्हाना शहरात स्थिरही झालेलं असतं...लग्न होऊन सासरी रमलेली पोरगी अन् बायकापोरांसोबत संसारात मिसळलेलं पोरगं सणासुदीला बायजाबाईला भेटायला येतं तेव्हा स्वत:च्या आईसाठी आणलेल्या थैल्यांपैकी एखादी थैली आपल्या हक्काची असणार याची सवय पोराला झालेली असतेच...आई मोठ्या बहिणीकडे शहराकडे जाताना रानातून आणलेली भाजी पिशवीत भरून देताना
बायजाबाई कृतार्थ होत राहते...शहरात राहणारी शेजाऱ्याची पोरगी बायजाबाईला परकी वाटत नसतेच...आईसुद्धा पोरीला भेटून येताना बायजाबाईसाठी काहीतरी नक्कीच न विसरता आणतेच...आई-बापाला लिहलेल्या पत्रात बहिण आमच्या घरातल्यांसोबत बायजाबाईची खुशाली हमखास विचारतेच...बायजाबाईचा मालक मुंबईवरून येताना घरातल्यांबरोबर शेजारच्या घरातील सर्वांसाठी काहीतरी आणतोच...पोराचा बापसुद्धा रानातून घरी येताना उगाच कोथिंबिरीची एखादी जुडी, मेथीची भाजी, भेंडी-गवारीची उपणी शेजाऱ्यांच्या दारात उभं राहून निगुतीनं देत राहतो...

पोरगं परीक्षेला जाताना आईनं हातावर दिलेली दही-साखर जशी आठवत राहते तशीच बायजाबाईनं डोक्यावर मायेचा हात ठेवून दिलेला आशीर्वादही पोरगं विसरू शकत नसतं...निकालादिवशी पास झाल्यावर प्रगतीपुस्तक घेऊन आल्याबरोबर दारात काहीबाही निवडत बसलेली बायजाबाई धावत येऊन मोठ्या आनंदानं पोराला कवटाळत राहते...

मित्रहो, वर लिहिलेला फक्त आणि फक्त कल्पनाविलास आहे...अशा बायजाबाई आता कुठं असतील की नाही माहित नाही, पण हे खोटं मात्र वाटत नाही...थोडी चौकशी करा, मग आपल्या घराशेजारी अशा बायजाबाई होऊन गेल्या असतील हे कळेल...आपल्या घरावर जीव लावणाऱ्या बायजाबाईच्या खाणाखुणा याच मातीत आपल्याला आढळतील...शेजारधर्माची स्थापना याच बायजाबाईंसारख्या शेजाऱ्यांनी केलेली आहे...तुमचा धर्म कुठचा का असेना, तुमची जात कुठची का असेना, पण या शेजारधर्माची उपासना आपल्याआधी कितीतरी पिढ्यांनी केलेली असते...अखंड मानवजातीच्या कल्याणाची धुरा आपण सांभाळू शकू की नाही माहीत नाही, पण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या आवाक्यातल्या माणसांना जीव लावण्याचं माणूसपण मात्र आपण नक्कीच जतन करू शकतो...हेच सूत्र कालातीत चालत आलेला शेजारधर्म सांगतो...

शेजार हा असा धर्म आहे, ज्याचा धर्मग्रंथ नाही, त्याचा कुठला विधी नाही की ना त्याचा उपास-तापास...एकमेकांच्या सुखदु:खात मिसळून जाण्याचा हा अविरत, अखंड सोहळा माणसाचं जीवन फुलवत राहतो...बायबल, गीता, कुराणाच्या पल्याड नेऊन ठेवणारा हा शेजारधर्म आता आटत चाललाय का? फोकनाड आत्मप्रौढीपणाच्या मृगजळी झालरी पांघरून माणूस आकसत चाललाय का? आता कोण कुणाच्या दारात जाताना कमीपणाची भावना उराशी का कवटाळत राहतोय? माणसाचं जगणं आतून बाहेरून ओलावणाऱ्या शेजाऱ्यांबद्दलच्या भावना कोरड्याठाक होऊ का पाहतायत? आनंद वाटल्यानं वाढतो, अगदी तसंच दु:ख वाटल्यानं कमी होतं हाच शेजारधर्माचा गाभा आहे...नोकरी-प्रपंचाच्या धावपळीत माणूस चोहोबाजूनं वेढला गेला आहेच, पण तो चारी बाजूनं वेढलेल्या पण एकाकी बेटासारखा होऊन बसलाय...जखमेवर फुंकर घालणारी घरातली मंडळीच दुरावत चालली असताना शेजाऱ्यांकडून मिळणारा धीर आता कुठल्या बाजारात किंवा कुठल्या मॉलमध्ये मिळणार? आयुष्य सुखकर बनवणारा रस्ता आपला आपण नक्कीच बनवू पण त्या रस्त्यावर चालताना होलपडल्यावर सावरायला किंवा धावण्याचा धीर द्यायला शेजाऱ्याचा हात खांद्यावर तर पडायला हवा की नाही?

म्हणूनच आता जिव्हाळा तितुका मेळवूया...शेजारधर्म वाढवूया...

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

ही नकारात्मकता येते कुठून?

मध्यरात्रीचे बारा-साडेबारा वाजले असतील, ऑफिसवरून घरी जाताना थकव्यानं डोळे मिटून गाडीत बसून होतो…सायलेंटवर ठेवलेला खिशातला मोबाईल थरथरू लागल्याने डोळे चोळत मोबाईल स्क्रीनवर पाहिलं तर संदीप लोहारचं नाव दिसलं...कराडजवळच्या खेड्यात राहणारा संदीप इतक्या रात्री जागा कसा, इतक्या रात्री कशासाठी फोन केला असेल? अशा प्रश्नांची सरबत्ती मेंदूतल्या मेंदूत घोंघावून गेली...डोक्यातल्या प्रश्नचिन्हांना तसंच सोडून चपळाईनं फोन उचलला...संदीपचा आवाज कातावला होता...थकला होता...नेहमी नमस्कार मित्रवर्य म्हणत उत्साहानं बोलणाऱ्या संदीपचा आवाज निराशाच्या गर्तेत अडकल्यासारखा वाटला...

‘मित्रा, तू जेव्हा गावी येशील तेव्हा माझ्या दुकानात ये...दुकानातील टेबलच्या एका कप्प्यात तुला माझं पत्र सापडेल, त्यात माझ्या आत्महत्येचं कारण सापडेल’ एका श्वासात भडाभडा बोलून संदीपन फोन ठेवून दिला...डोळ्यावर आलेली झोपेची झापडं खाडकन गळून पडली...संदीपला पुन्हा फोन लावला तर मोबाईल स्वीच ऑफ...पोटात कालवाकालव झाली...काय करावं काहीच कळेना...संदीप मुंबईला शाळेत असतानाचा माझा वर्गमित्र, नंतर कौटुंबिक कारणांनी कराडला स्थायिक झाला...नंतर मात्र संपर्क फक्त पोनवरून...तोही 15-20 दिवसांनी...कराडमध्ये कसलासा व्यवसाय करतो...व्यवसाय बरा चालल्याचंही माहित होतं...लग्न करून स्थिर झाल्याचंही ऐकून होतो...मग आज असं अचानक काय झालं...दहा-बारा वेळा फोन केला, मोबाईल स्वीच ऑफ...काय करावं काहीच कळेना...टापटिप कपड्यातला संदीप डोळ्यांसमोर तरळू लागला...कविता करून मनातली संवेदनशीलता व्यक्त करणारा संदीप मनात काहर माजवून गेला होता…आधी संदीप मस्करी करतोय असं वाटलं पण नंतर विचारचक्र थांबता थांबेना...मस्करी म्हणून दुर्लक्ष केलं आणि काही अघटित घडलं तर? संदीपची आत्महत्या रोखू न शकल्याची अपराधीपणाची भावना मनात आयुष्यभर कुजत राहिली असती...विचारागणिक श्वासाची गती वाढत होती...काहीतरी करायला हवं...मनानं उचलं खाल्ली...पण नेमकं करायचं काय? संदीपचा मोबाईल तर बंद, त्यात त्याचा आता न पता माहित...

सातारचे पोलीसप्रमुख अभिनव देशमुखांना फोन लावला...संदीपच्या फोनबाबत त्यांना माहिती दिली...त्यांनी संदीपचा मोबाईल नंबर आणि पत्ता मागितला मागितला...पत्ता मला माहित असण्याचं काहीच कारण नव्हतं...संदीपचा नंबर मेसेज करून हताशपणे डोळे मिटून गाडीत बसून राहिलो...एव्हाना माझ्या इमारतीसमोर येऊन गाडी थांबलेली...ड्रायव्हरने आवाज देऊन भानावर आणलं...गाडीतून उतरलो, पण घरी जाऊ वाटेना...तसाच गेटवर बसून राहिलो...सोडायला आलेली ऑफिसची गाडी कधीचीच निघून गेलेली...इमारतीच्या गेटच्या जाळ्यांमधून सिक्युरिटी गार्ड पाहात राहिला होता...रोज थेट आत शिरणारा आज
गेटवर का बसलाय? तो सुद्धा विचार करत खुर्चीतच पेंगू लागला...चिटपाखरू नसलेला रस्ता खायला उठत होता...रोज अख्खा परिसर लखलखून टाकणारे स्ट्रीट लाईटचे दिवे भगभगीत वाटत होते...कधी नव्हे ते आज अंगावर येत होते...संदीपच्या आयुष्यात अंधार दाटला असेल काय? काय झालं असेल? मनात प्रश्नांचं तांडव सुरू असतानाच अनसेव्ह नंबरवरून एक कॉल आला...काळीज आतल्याआत धुमसायला लागलं होतं...थरथरत्या हातांनी फोन उचलून कानावर लावला...’यार नवनाथ, मला पोलिसांनी पकडलंय, काहीतरी कर, मला ते घेऊन निघालेयत..’ संदीपचा रडका आवाज कापत मध्येच पोलिसी आवाज आल्याबरोबर संदीपकडून पोलिसांनी मोबाईल काढून घेतल्याचं लक्षात आलं...पोलिसांनी मोबाईलच्या नंबरवरून मध्यरात्रीच पत्ता शोधून संदीपला ताब्यात घेतलं होतं...तेही अवघ्या अर्धा-पाऊण तासांत...इकडे घोंघावणारा माझा जीव भांड्यात पडला होता...संदीप ठीकठाक असल्याचं समजल्यावर झोपून गेलो...सकाळी चौकशी केली तर संदीपला जिथून पकडलं होतं तिथं टोमॅटोवर मारायचं औषध सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं...संदीपला फोन करून बोललो, तर त्याने कौटुंबिक समस्यांचा डोंगर सांगायला सुरुवात केला...संदीपची बहीण, भाऊ रडरडून बोलत होते...स्वत:ला संपवून संकटं संपतात का? असं विचारत होते...

मित्रहो, संदीप हा एकटाच नाही, असे कीतीतरी जीव मृत्युच्या काळ्याशार मूर्तीला मिठी मारण्यासाठी धावताना दिसतायत...संकटांचा उभा राहिलेला डोंगर असह्य झाल्याने आयुष्याची दोरी कापून अनाकलनीय दरीत झोकून देऊ पाहतायत...असं करून समस्या सुटते का? नक्कीच नाही...आपल्या जाण्याने आपल्या लेखी आपली सुटका होते हे गैरसमजाचं केवळ तंतोतंत मृगजळ आहे, मात्र आपल्या जाण्यामुळे मागे राहिलेली आपली माणसं आयुष्यभर आपल्या आठवणी उराशी कवटाळून चाचपडत राहतात...त्यांना सावरायला मात्र आपण नसतो...आयुष्यात संकटं असतात...ती येतच राहतात...संकटं आपल्या सावलीसारखी असतात...संकटं नसती तर आयुष्य एकसुरी आणि एकाच रंगाचं बनलं असतं...रुग्णालयात हार्ट बिट मॉनिटर पाहिलंय का कधी? हृदयाची कंपनं चालू असतील तर त्यावरच्या रेषा डोंगराच्या कडांसारखं खालीवर करत चालत राहतात...हृदयानं काम थांबवलं की त्या रेषा सरळ रेषेत संथ चालत राहतात...खाटेवर झोपलेल्या माणसाचा खेळ संपल्याचं सांगत राहतात त्या सरळ रेषा...म्हणूनच आयुष्यसुद्धा हार्ट बिट मॉनिटरसारखंच असतं...संकटांची कंपनं संपली की आयुष्य संथ होऊन थांबू पाहतं...जगण्यातला चार्म संपून जातो...

आंधळी कोशिंबिरीचा खेळ माहित्येय तुम्हाला...? डोळ्यावरची पट्टी सोडल्यावर समजतं की कुठे होतो आपण आणि आलो कुठं..? मधल्या काळाचा हिशेब लागत नाही....अजिबात..! प्रवास करताना झाडे पळताना दिसतात तसा काळही चकवा देत निघून जातो...मग रस्ता सोडून नावेत बसतो आपण...लाटांवर स्वार होण्यासाठी,  एकटेच....पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला...कायमची चुकामूक...ही चुकामूक आपल्याला वेदनादायी असतेच पण ती आपण मैदान सोडून पळाल्याचं निदर्शक असते...आपण जिंकलो नाही याचा अर्थ आपली कायमची हार झाली असा होत नाही मित्रांनो, लढाई संपत नाही...तशी ती संपणारी असती तर तिला लढाई का बरं म्हटलं असतं...हार होणार असं वाटणारा खेळही शेवटपर्यंत खेळणारा शूर असतो...

कधी एखाद्या रुग्णालयात जा, शंभरीच्या आसपास वय असलेल्या एखाद्या म्हाताऱ्याकडे पाहा, अख्खं आयुष्य समरसून जगूनही जगण्याची आकांक्षा सुटत नाही...लावलेल्या सलाईनच्या नळीकडे म्हातारं मोठ्या आशेनं बघत राहतं...आयुष्याची तुटत आलेली दोरी ही सलाईनची नळी पुन्हा मजबूत करेल असा आशावाद त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसत राहतो...किंवा पाहा नुकतंच जन्माला आलेल्या पण काचेत ठेवलेल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे...जन्मताच काही त्रुटी असल्यानं इवल्या इवल्या बरगड्या धाप लागल्याने खाली-वर होत राहतात...जन्माला येताना वेदना घेऊन आलेलं बाळ किलकिल्या डोळ्यांची उघडझाप करत जगाला पाहण्यासाठी आतुरलेलं असतं...जग कसं आहे, इथली माती, इथली माणसं नेमकी कशी आहेत, आपण कसल्या घरात जन्माला आलोय, इथली माणसं आपल्याशी कशी वागणार आहेत या कशाहीबद्दल कसलीही माहिती नसताना बाळ जगाकडे पाहण्यासाठी आसुसलेलं असतं...नकारात्मक विचार डोक्यात घुमत असतील, आयुष्याचा कंटाळा आला असेल तर एकदा दवाखान्यात नक्की जा...आयुष्याची लढाई लढत राहिलेलं शंभरीचं म्हातारं तुम्हाला आयुष्याचं महत्त्व सांगेल...म्हाताऱ्याचं नाहीच पटलं तर नवजात बाळ मात्र तुम्हाला नक्कीच जीवाचं महत्त्व सांगेल...

संदीपचा कालच फोन आला होता...साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून...लहानग्या बाळानं, खितपत पडलेल्या म्हाताऱ्यानं त्याला जगण्याचं बळ दिलं होतं...आणि त्याच्या फोनमुळे मलाही..!

हे म्हातारे दिवे जपायला हवेत...

दिवस कलायला लागताना देवळात दिवा लावायची वेळ झालेली...गुरं-ढोरं पाय खुरडत धुरळा उडवत घराकडे निघत राहतात...रानातनं निघता-निघताच बांधावरच्या अर्धमेल्या गवताचा घाईने ओरबाडलेला घास रवंथ करत राहतात...चालताना तोंडातून गळणाऱ्या लाळेचे थेंब मळकटेल्या मण्यासारखा गोल आकार घेऊन मातीत घुसळू पाहतात...गुरांच्या मुताच्या आडव्या तिडव्या रेषा बघत मागे चालणारं कुत्रं कावऱ्या-बावऱ्या नजरेनं वाट चालत राहतं...तेवढ्यात गोविंदअण्णा गेल्याचं कुणीतरी सांगतं...अर्धमेल्या दिवसाची मावळू पाहणारी संध्याकाळ विजेच्या वेगाने अंगणात, बोळाबोळांत, खडबडीत रस्त्यांवर, गोठ्या-परड्यात, राना-शिवारात, झाडा-झुडपांवर, नदी-नाले-उकिरड्यांवर, घरांच्या कौलांवर नाहीतर तांबरलेल्या पत्र्यांवर आणि जमेल तिथे घनघोर अंधार पेरत राहते...गपगार झालेल्या गावात गोविंदअण्णाच्या म्हाताऱ्या बायकोचा, सावित्रीबाईचा आक्रोश घुमत राहतो...शेजारपाजारची, भावकीतली मंडळी गारठ्यातही डोक्याला फड्या बांधून अंत्यविधीच्या सामानाची जुळवाजुळव करत राहतात...कुणी कळक, कुणी लाकडं असलं काहीबीही गोळा करत राहतात...बरा शिकलेला एकजण गोविंदअण्णाच्या पोराचा नंबर हुडकून फोन लावून गोविंदअण्णा गेल्याचा सांगावा धाडतो....उमेदीतला पोरगा फटफटीला किक मारून गोविंदअण्णाच्या पोरीला आणायला लगबगीनं जातो...भिंतीला उशीचा टेकू लावून बसवलेल्या गोविंदअण्णाच्या पार्थिवाकडे म्हातारी सावित्रीबाई बघत राहिलेली असते...नव्वदी गाठलेल्या गोविंदअण्णाने अखेरचा श्वास घेतल्याने म्हातारीचा श्वास कधी थांबत तर कधी वेगाने धावत राहतो...गोविंदअण्णाच्या घरात, अंगणात, आजूबाजूच्या परिसरात दु:खमग्न सुन्नतेने शांततेचं कोलाहल चालू असताना म्हातारीच्या श्वासांचा लपंडावाचा खेळ मात्र ऐन रंगात आलेला असतो...

शेजारच्या आयबायनं निर्जीव होऊन निपचीत बसलेल्या गोविंदाअण्णापुढं पणती लावलेली असते...पणतीतला दिवा झोकांड्या खात राहतो...गोविंदअण्णानं वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपलेलं चेहऱ्यावरचं तेज झाकोळून गेलेलं असतं...अगदीच जवळची मंडळी भर थंडीत घराभोवती गुडघ्यावर बसून राहतात...भावकीतल्या बाया गोविंदअण्णाकडे बघत राहतात...गोविंदअण्णाचा निघून जाण्याचा प्रवास सुरू झालेला असताना वेळ थांबता थांबत नसते...किर्र अंधारात गावात लांबवर कुठंतरी कुत्र्याचं रडणं वाढत राहतं...डोळ्यावर झोपेच्या मुंडावळ्या
डोकावू लागल्याने जरा लांबची मंडळी आजूबाजूला बघत काढता पाय घेऊन घरात जाऊन झोपी जातात...चिल्ले-पिल्ले काय झालंय ?, माणूस मेलंय म्हणजे नेमकं काय ? हे न कळल्याने गारठून गुडूप होऊन गेलेली असतात…रात्र अशी गर्भात येत असताना गोविंदअण्णाचे पावणे-रावळे जमत राहतात...गोविंदअण्णाच्या लेकीचा बेभानपणे धावत येतानाचा आक्रोश चीरशांतता कापत जाते...पोक्त बाया बाप्ये तिला शांत करत राहतात...आता गोविंदअण्णाच्या पोराच्या वाटेकडे सर्वांचे डोळे...पहाटे-पहाटे कधीतरी गोविंदअण्णाचा पोरगा येऊन पोहोचतो...पोराच्या येण्याआधीच अंत्यविधीची सगळी तयारी झालेली असते...दिवस फटाटायला लागताना अंघोळ घालून तिरडीवर झोपवून गोविंदअण्णाला बनाऱ्यात नेऊन पोहोचवलेलं असतं...आगीचे लोळ उठलेले असताना वरच्या दिशेने झेपावणारा धूर गोविंदअण्णाला घेऊन आभाळात पोहोचलेला असतो...आणि अंत्यविधीला आलेल्या सर्वांनी घर गाठलेलं असतं...कुणीबुणी मध्येच लागणाऱ्या रस्त्यांवरून पसार होऊ पाहतात...जवळचे गोविंदअण्णाच्या आठवणींवर बोलत चालत राहिलेले असतात...

इकडे गोविंदअण्णाच्या घरात डोळे सुजवून बसलेल्या बाया शून्यात नजर लावून बसून राहिलेल्या असतात...गोविंदअण्णाला माती दिलेल्या बनाऱ्यातली स्मशानशांतता धावत येऊन सर्वांच्याआधी घरात पोहोचलेली असतेच...सावित्रीबाईचं वयाने जीर्ण झालेलं आयुष्य हेलकावे खात राहतं...जोडलेल्या पातळाच्या पदराचा बोळा तोंडात धरून सावित्रीबाई धुमसत राहिलेली असते...रेटत-रेमटवत दु:खाचे चार-पाच दिवस निघून गेलेले असतात...सावडण्याचा, दहाव्याचा विधी उरकून गोविंदअण्णाचा पोरगा, पोरगी आपापल्या वाटेनं निघून जातात...शे-दीडशेची नोट सावित्रीबाईच्या हातात टेकवून पोरगा-पोरगी वाट धरतात...

आता सावित्रीबाई घरात एकट्याच असतात...सकाळ-संध्याकाळ फुकणीनं फुंकत घरातल्या चुलीत जाळ घालत राहतात...घरातलं एकटेपण त्यांना खायला उठतंय. आधी दिवाळी-पंचमीला-जत्रेला मुलाबाळांनी घर भरून जायचं...दिवाळीचे दिवस कसे लख्ख असायचे...पण आता उजाडलेला प्रत्येक दिवस काळवंडलेल्या रात्रीशी स्पर्धा करत राहतोय...पोराला-पोरीला पोरं झाल्याचं कळल्यावर सावित्रीबाईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या उल्हासित होत राहतात...संसारात रमलेले पोरगा-पोरगी नातवंडांना घेऊन घरी येतच नाहीत...पण सावित्रीबाईचं वाट पाहणं संपत नाही...अंगणात खेळणाऱ्या इतरांच्या नातवंडांकडे आशाळभूत नजरेने बघत राहतात...सावित्रीबाई आजही बायाबापड्यांमध्ये नातवंडं पोतरूंडांबाबत भरभरून बोलतात...

सावित्रीबाई काय किंवा गोविंदअण्णा काय यांच्यासोबत जे घडतंय, ते काही निव्वळ त्यांच्याबाबतीतच घडलेलं नाहीय...पाच-पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेल्या प्रत्येक पिढीची ही शोकांतिका आहे...ऐन कर्त्या-सवरत्या वयात त्यांना याची कानकूनही नसेल की आयुष्याची संध्याकाळ अशी पोटच्या पोरांची, नात-नातीची वाट पाहण्यात घालवावी लागेल...आताची पिढी चार बुकं शिकून मोठी झाली...कामा-धंद्याला लागली आणि जिथं गेली
तिकडचीच झाली...नोकरी-धंद्याच्या ठिकाणी घरटी उभारली...त्यांच्याच गोविंअण्णांसारख्या बापजाद्यांनी कष्ट उपसून, सावित्रीबाईंसारख्यांनी चवली-पावली गोळा करून गावात ऐपतीप्रमाणे घरं बांधली...गुंठे-गुंठे जमिनी घेतल्या...त्यांच्या नावानं आंब्याची झाडं लावली...कधी तरी त्यांची पुढची पिढी गावात येईल, घरात बागडेल आणि आपण पाणी देऊन वाढवलेल्या आंब्याचा रस चाखेल...ते घडलं नाही असं नाही, पण आता ते फार दिसत नाही....गावाकडचे वाडे आता कोसळून गेलेत...उंदीर-घुशींनी उकीर काढलाय...घरं ओस पडलीत...हुंदाड्यासारखे उंडारणारे पोपट-कावळे आंबे कुरतडून नासधूस करतायत...दारा-अंगणात बसणाऱ्या अशा एकाकी पडलेल्या सावित्रीबाईंची संख्या वाढत राहतेय...

गावात कुणी तरूण राहतो की नाही, अशी शंका यावी इतकी उतारवयातली माणसं गावात झालीत...गावंच्या गावं म्हातारी झालीत जणू...आणि अशात गोविंदअण्णासारखं कुणी गेल्याचं कळलं की गावाची हालचाल अशी अचानक थिजल्यासारखी होते...सणावाराला गावातलं एकांतपण, सामसुमी भटक्या कुत्र्यासारखी अंगावर येते...सगळ्या अंगाला बधिरपण येतं...अशा एखाद्या घरात जावं तर घरात असतो अर्धा अंधार आणि अर्धा उजेड...कारण घरभरून दिवे लावावेत एवढी माणसंच असतातच कुठं घरात ?

सावित्रीबाईनं आता सत्तरीही ओलांडलीय...चालताना कमरेत वाकून चालावं लागतंय...आता-आता डोळे पाणेजत असल्याचंही त्या सांगतात...आवाजात कापरं तर आहेच...आयुष्याची कातरवेळ झालीय पण म्हणून काही भाकरीचा चंद्र आपोआप उगवत नाही...जन्मापासून पाचवीला पुजलेल्या मोलमजुरीचा सूर्यास्त लोंबकळत राहतोय...पण तरीही दुकानात गेल्या तर गावाकडे न फिरकणाऱ्या नातरूंडं-पोतरूंडांसाठी गोळ्या बिस्किटं आणायला त्या विसरत नाहीत...मी ज्या ज्या वेळी सावित्रीबाईला पाहतो त्यावेळेस वाटतं, स्वातंत्र्याची साठी झाली पण आपण अजूनही अशी व्यवस्था का निर्माण करू शकलो नाही ज्यात सावित्रीबाईंसारख्यांच्या वटलेल्या झाडांचं आयुष्य आनंदी नाही पण, सोपं झालं असतं...कातरवेळेतही संधीप्रकाश दिसत असताना डोळे मिणमिणले नसते...

परवा गावी गेलो तेव्हा सावित्रीबाई अंगणातच बसून होती...उजेडातल्या आयुष्याचा हिशेब अंधारात बसून लावण्याचा प्रयत्न करत होती...टोटल लागत होती...पण बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार करूनही हातात शून्यच लागत होतं...काय म्हातारे काय चाललंय? असं विचारलं पण सावित्रीबाईचं लक्षच नव्हतं...कुणीतरी वाटेनं जाणाऱ्यानं जोरात बोला, सावित्रीबाईला ऐकू येत नाही असं खुणावलं...हातवारे करत म्हातारीची मूक विचारपूस केली...म्हातारीनं कानाला हात लावत ऐकू येत नसल्याचा इशारा केला...आणि एवढंच म्हणाली...बाबा, ऐकू येत नाही तेच बरं, मनापासून ऐकण्यासारखं जगात आता कुणी बोलतंच नाही...काही बघायचीही इच्छा नाही, पण रांडचे डोळे अजून साथ सोडत नाहीत...

म्हातारीचे हे शब्द ऐकून पंधरवडा झाला...माझे कान, डोळे अजून बधिरलेत...