रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

आयुष्याची गंज...


सकाळी मित्रासारखा असणाऱ्या भावाला फोन केला...म्हंटलं राजे कुठं आहात...? तर म्हणे गावी आलोय सकाळीच...गंज लावायच्या कामगिरीवर चाललोय...

गंज शब्द ऐकला आणि कडब्याच्या पेंड्यांची भलीमोठी गंज डोळ्यासमोर उभी राहिली...एकमेंकींना बिलगून झोपलेल्या पेंड्यांची भलीमोठी गंज म्हणजे गुरा-ढोरांच्या वर्षभराच्या चाऱ्याची शिदोरी...ज्वारीची पेरणी झाल्यापासून ते गंज उभी राहण्यापर्यंतचा कडब्याचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला...

दिवाळीची धामधूम संपल्यावर गौरी-गणपतीचा सण संपला की बळीराजाची लगबग सुरू होते ती पेरण्यांसाठी...पाऊस पडून गेलेला असतोच...मातीच्या वरच्या थराचा ओलावा थोडा कमी होतो अन् मातीच्या गर्भात उबदार वापसा तयार होतो...हाच वापसा पेरणीसाठी पोषक ठरतो...मातीच्या पोटातल्या उबीमध्ये शेतकरी ज्वारीचं बियानं प्रेमानं घालतो...अन् कोंब फुटेपर्यंत शेत-शिवाराकडं डोळे लावून बसतो...मातीनं पोटात घेतलेलं बियाणं कोंब बनून थोड्याच दिवसांत मातीच्यावर डोकं काढू पाहतं...हिरवे-तांबडे कोंब मातीच्या रंगात मिसळून जातात...शेताच्या पृष्ठभागावर एकप्रकारचा लयदार रंग तयार होतो...पीकाजवळ उगवलेलं बिनकामाचं गवत काढून टाकण्यासाठी खुरपणी-भांगलणीचा सोहळा होतो...अन् शाळेतली पोरं एका रांगेत उभी राहिल्यावर दिसतात तशी ज्वारीच्या नाजूक कोंबांचीही रांग दिसू लागते...

नुकतंच जन्माला आलेल्या आणि बाळसं धरलेल्या ज्वारीच्या कोंबांना पक्षी-कोंबड्यांनी खाऊ नये म्हणून काळजी घेत पीक गुडघ्याएवढं कधी होतं कळतच नाही...पोटचं पोर शाळा शिकून नोकरी-धंद्याला लागल्यावर पहिला पगार हातात ठेवतं आणि पोरगं मोठं झाल्याचं बापाला वाटतं...अगदी तस्संच...

मग ज्वारीचं पीक वाढता वाढता वाढतच जातं...ज्वारीची कणसं फुलू लागतात...कणसांतून टपोऱ्या ज्वारीचे इवलेसे दाणे बाहेर डोकावू पाहतात...जग पाहण्याच्या आतुरतेनं नवजात बाळ डोळे उघडल्यावर जसं चहूबाजूला लूकलूक पाहतं तस कणसातले टपोरे दाणे नव्या नवरीनं पदराआडून पाहावं तसं आभाळाकडं पाहतात...वाऱ्याच्या झुळकीबरोबर अख्खं शिवार ताल धरतं...अख्खं शेत वाऱ्याशी लेझीम खेळतं...सबंध शिवार वाऱ्याच्या झुळकीनेही हेलकावू लागतं...

मग सुरू होतो पक्षांचा चिवचिवाट...उडत-उडत येऊन कणसातला दाणा अलगद टिपून पक्षी  कुठच्याकुठं पसारही होतात...चिमण्या-पक्षांनी पीकाचं नुकसान करू नये म्हणून मग शेतात वेगवेगळ्या प्रकारची बुजगावणं उभी केली जातात...काही भागात दिवाळीतले फटाके वाजवले जातात तर काही भागात मचान उभी करून पक्षांना हाकललं जातं...

एव्हाना थंडीचे दिवस सुरू झालेले असतात...कुठं-कुठं शेकोट्या पेटू लागलेल्या असतात...आणि याच थंडीच्या मोसमात हुरड्याच्या मेजवाण्या झडू लागतात...नगर जिल्ह्यातील काही भागांत तर चक्क हुरडा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं...रात्रीच्या वेळी रानात जाऊन कसदार कणसं घेऊन ती शेकोटीवर भाजायची...कणसातले भाजलेले दाणे वेगळे काढून शेकोटीशेजारीच बसून खायचे...गाण्यांच्या भेंड्या लावायच्या...गाणी म्हणायची....कवितावाचन...गोष्टी सांगायच्या...नकला करायच्या...व्वा मस्त..!

बापाला वयात आलेल्या पोरीचा अन् शेतकऱ्याला हातात आलेल्या पिकाचा घोर अशी एक म्हण गावाकडं प्रचलित आहे...ज्वारीची कणसं प्रमाणापेक्षा जास्त वाळून त्याचे दाणे गळून पडू नयेत म्हणून ज्वारीची काढणी वेळेत हाती घ्यावी लागते...शेतकऱ्याचं टाईम मॅनेजमेंट इथं कामी येतं...कोणत्या वेळी पिकाला पाणी दिलं पाहिजे...कोणत्या वेळी खुरपणी-भांगलणी केली पाहिजे...कोणत्या वेळी काढणी-मळणी केली पाहिजे हे शेतकऱ्यानं केलेलं एकप्रकारचं व्यवस्थापनच असतं...

मग उभ्या असलेल्या ज्वारीची कणसं वरच्यावर छाटून एका ठिकाणी गोळा करायची...मशीनच्या सहाय्यानं त्याची मळणी करायची...हल्ली मळणी करण्यासाठी मशीनची सोय आहे...पण पूर्वी शेतातच खळं असायचं...बैलांच्या सहाय्यानं कणसांचे दाणे वेगळे केले जायचे...वाऱ्यावर वाडवून त्यातला कचरा वेगळा केला जायचा...भावकी किंवा वाड्यात मिळून एक खळं असायचं...सर्वांनी सर्वांचं काम करायचं...आता तसं होत नाही...मशीन आल्यामुळे खळी मातीखाली गेली...अन् माणूसकीतल्या, नात्यातल्या ओलाव्यानंही अखेरचा श्वास सोडला....पूर्वी खळ्यांवर करावी लागायची तेवढी झगझग आता करावी लागत नाही... मशीनमुळे सर्व काही तासा-दोन तासांत..! कणसातले दाणे वेगळे आणि दाण्यातला कचरा क्षणात वेगळा...आपण फक्त दाण्याची पोती भरायची...गावभर गप्पांचे फड रंगतात तेव्हा अमूकला इतकी पोती ज्वारी झाली...तमूकला इतकी झाली अशी इर्षीरी सुरू होते...

त्यानंतर सुरू होते कणसाविना उभ्या असलेल्या कडब्याची उपटणी...हाताला फोड येईपर्यंत ताटं उपटायची...शेतातच आडवी करायची...त्यातल्याच किंचित ओल्या ताटाच्या सहाय्यानं पेंड्या बांधायच्या...आणि गुरं-ढोरं बांधायच्या ठिकाणी अर्थात परड्यात आणून टाकायच्या...मग सुरू होते गंज लावण्याची धांदल...गंज लावण्यासाठी वारंगुळा केला जातो...गंज लावण्याचा वारंगुळा म्हणजे एकप्रकारची धम्माल असते...दोन-तीन घरच्या लोकांनी एकमेकांच्या गंजी लावायच्या...ज्याची गंज लावायची त्याच्याच घरी त्यादिवशीचं जेवण...या गंजीच्या निमित्ताने मटणा-बिटणाच्या पार्ट्या झोडल्या जातात...हल्ली रोजंदारीनं माणसं आणून गंजी लावल्या जातात...वारंगुळा हा प्रकार तर नावापुरताच शिल्लक राहिलाय...उसा-बिसाच्या पिकानं शेतकऱ्याच्या हातात पैसा खुळखुळू लागलाय...त्या पैशांच्या जीवावर माणसं लावून गंजी लावल्या जातायत...

सकाळी भावाशी फोनवर बोलून झाल्यावर गंज आठवली आणि गंजीची कहानीही...पण दुष्काळामुळं जमिनीच्या भेगा वाढल्यात अन् शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही...गुरांना चारायला गवतही उगवत नसलेल्या शेतात आता ज्वारी कशी उगवणार...आणि ज्वारीविना हुरड्याची लज्जत कशी चाखायला मिळणार...शेतकऱ्याच्या आयुष्याची गंज विस्कटत चाललीय...आणि कडब्याची गंज उभी कशी राहणार...?

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

पांदीतली चिंच...


गावाची वेस संपते तिथं पांदीशेजारी भलमोठं चिंचेचं झाड दरवेळी गावी गेल्यावर नजरेत भरतं...झाडाच्या शेंड्याकडं बघितलं तर जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाची टोपी खाली पडावी...पण आम्ही मात्र चिंचेच्या शेंड्यावर सरासरा चढत असू...गाभुळलेल्या चिंचेचे आकडे ओळखण्यात आम्ही तरबेज...ढुंगणावर विविध रंगाची ठिगळं लावलेल्या खाक्या चड्डीच्या खिशात मावतील एवढ्या गाभुळलेल्या चिंचा गोळा करायच्या आणि शाळेत येऊन बसायचं...चिंचांनी भरलेले आणि फुगलेले खिसे घोलप गुरुजींच्या लगेच नजरेत यायचे...चिंचा जप्त केल्या जायच्या…शाळा सुटेपर्यंत शाळेचा वरांडा झाडून घेतला जायचा...जामीनावर सुटलेल्या एखाद्या गुन्हेगाराकडं पाहावं तसं वर्गातली पोरंपोरी बघायच्या तेव्हा लाज वाटायची...


शाळा सुटल्यावर वर्गाच्या दारात उभं केलं जायचं...सगळी पोरंपोरी बाहेर पडेपर्यंत हात वर करून उभं केलं जायचं...तोंडाला हात लावत खिदीखिदी करत पोरंपोरी घराकडं जायच्या...गावभर भभ्रा व्हायचा...मग संपूर्ण वर्ग झाडून घेतला जायचा...मग गुरुजींसमोर कान धरून 10-20 उठबशा काढायच्या...हातावर निरगुडीच्या फोकाच्या 10 छड्या खायच्या...मग कुठं सुटका...! एवढं करूनही जप्त केलेल्या चिंचा परत मिळायच्या नाहीतच... गुरूजी त्या चिंचा घेऊन जायचे...त्या चिंचांचं ते काय करायचे ते अजूनही समजलेलं नाही...वर्गातल्या कुणीतरी बातमी घरी पोहोचवलेली असायचीच...घरी पाऊल ठेवायच्या आधीच उद्धार ठरलेला...धपाटे, चापट्या, लाखोल्या सर्व काही मनसोक्त भोगायचं... अब्रूचा गड पण जायचा अन् चिंचाही...

पुढंपुढं चिंचांच्या सिझनमध्ये आम्ही गावभर प्रसिद्ध झालो...वर्गातल्या पोरीतर पाटीवरच्या पेन्सिलींच्या बदल्यात आमच्याकडून चिंचा विकत घेऊ लागल्या...गावातल्या कुणीकुणी बाया आमच्याकडून गुपचुप चिंचा घेऊ लागल्या...गावभर चिंचांच्या मामल्यात आमचा डंका झाला...

हल्ली गावी गेलो की चिंचांचा सिझन असो-नसो पांदीतल्या चिंचेखाली घटकाभर बसायला हमखास जावं वाटतं...पांदीतल्या चिंचेखाली बसल्यावर बालपणीचा काळ सर्रकन डोळ्यासमोरून जातो...ठिगळाची खाकी चड्डी, डोक्यावर मळलेली टोपी...कळकटलेली आणि बटनं तुटलेली पैरण, गाभुळल्यामुळे धुरकट झालेल्या चिंचा, इवल्याशा तळहातावर घेतलेल्या मिठात बुडवून चिंच चाटल्यावर सर्वांगाला जाणवणारा शहारा...सारं-सारं डोळ्यासमोर हेलकाऊ लागतं...बालपण देगा देवा असं कुणीतरी का म्हंटलंय याचा अर्थ उमगून जातो...


मागच्या आठवड्यात गावी गेलो...सहज पांदीतून जाताना नेहमी दिसणारी भलीमोठी चिंच दिसलीच नाही...काळजात चर्रचर्र झालं...जवळ जाऊन पाहिलं तर चिंच आडवी झालेली...पानं सुकलेली, फांद्या शरीरावेगळ्या झालेल्या...खोड उताणा पडलेला...फांद्या-खोडांवर कुठं-कुठं कुऱ्हाडीचे घाव...फांद्यांवरून हात फिरवला...चिंचेचा श्वास अजून चालू असल्याचा भास झाला...प्रत्येक वर्षी शाळेतल्या पोरांना अंगाखांद्यांवर खेळवणाऱ्या, कितीतरी पिढ्यांना आंबट-गोड चिंचांचा रतीब घालणारी पांदीतली चिंच शेवटचा श्वास मोजत होती...

खेळ संपला होता...पांदीतल्या चिंचेचाही आणि वय वाढल्यानं आमच्या बालपणाचाही..!

परवा पोरांनी मॉलमधून चिंचेची पेस्ट आणली...थोडी हातावर घेऊन चव चाखली...पांदीतल्या चिंचेची चव तिला नव्हती...पोराला म्हंटलं तूच खारे बाबा...तुझा बालपणीचा काळ नक्की आहे पण आमच्यासारखा सुखाचा नाही..!

असले लोकप्रबोधनकार काय कामाचे?


परवा सानपाड्याला हरिनाम सप्ताहाला जाणं झालं....सप्ताहाचं पहिलं पुष्प म्हणजे पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं. निवृत्ती महाराज देशमुखांची प्रवचनं त्याआधी कॅसेट, सीडींमधून पाहिली ऐकली होती...माणूस स्पष्ट बोलणारा...लोकांच्या भाषेत...गावरान उदाहरणं देत...लोकांचं मनोरंजन करत आणि हसवत खेळवत लोकांचं प्रबोधन करणारा...निवृत्ती महाराज देशमुखांची ही अशी ओळख महाराष्ट्राला झालेली...वेळेवर कार्यक्रम स्थळी न येणं किंवा आयत्यावेळी येत नाही म्हणून कुठं-कुठं महाराजांवर गुन्हेही दाखल झाल्याचं ऐकलं होतं. पण म्हंटलं आपल्याला काय? निवृत्ती महाराजांना याचि देही, याचि डोळा पाहता ऐकता येईल म्हणून जाऊया एकदा...महाराजांच्या प्रवचनाची वेळ रात्री आठ वाजताची...साडेआठ वाजले...नऊ वाजले...साडेनऊ वाजले...मंडपात प्रचंड गर्दी....निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांची कीर्तीच तेवढी मोठी ना? मंडपात जागा नाही म्हणून समोरच्या रस्त्यावर, झाडांवर, मैदानाच्या कम्पाऊंडच्या भींतींवर लोकांची तोबा गर्दी...स्वयंपाकाची वेळ असूनही आयाबायाही प्रवचनाला मोठ्या संख्येनं हजर...आणि बरोब्बर पावणेदहा वाजता अचानक आयोजक लाऊडस्पिकरवरून जाहीर करतात...निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर येऊ शकत नाहीत...दुसरे किर्तनकार किर्तन करतील...लोकांमध्ये चुळबूळ...अनेकजण उठून गेले....काठोकाठ भरलेलं मैदान क्षणार्धात अर्ध रिकामं झालं...वाईट वाटलं...एवढ्या नावाजलेल्या प्रवचनकाराने असं वागणं बरं नव्हं...म्हणून निवृत्ती महाराज देशमुखांना मोबाईलवर संपर्क केला...आधी किमान दहा एक वेळा महाराजांनी फोन उचललाच नाही...नंतर उचलला तेव्हा महाराज म्हणे...’मी तिथें आलो होतो, पण दुसराच किर्तनकार किर्तनाला उभा केल्याचं पाहून तसाच माघारी फिरलो...’म्हंटलं किती वाजता आला होतात...आणि आत्ता कुठं आहात... तर म्हणे ‘पावणे दहा वाजता आलो होतो...आता मी एक्स्प्रेस वेला लागलोय..पुण्यापर्यंत पोहोचलोय’ एवढं बोलून महाराजांनी फोन कट केला...नंतर फोन स्वीच ऑफ ते रात्री 1 वाजेपर्यंत फोन स्वीच ऑफ...

मला प्रश्न पडले, आठ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम ठरला होता तर महाराज पावणे दहा वाजता कशाला आले...? की उशिरा येणं हे महाराजांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे ? पावणे दहा वाजता नवी मुंबईत सानपाड्याच्या कार्यक्रम स्थळी आलेले महाराज सव्वा दहा वाजता पुण्याला पोहोचले? सानपाड्यातून पुण्याजवळ महाराज फक्त अर्ध्या तासात पोहोचले...व्वा महाराज...विठ्ठलाची तुमच्यावर खुपच कृपा दिसतेय...कदाचित पुण्याला जायला तुम्हाला विठ्ठलानं पुष्पक विमान दिलं होतं वाटतं...महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी वारी करत आलेल्या वारकऱ्यांच्या भेटीला आसुसलेल्या विठ्ठलानं तुम्हाला नेमकं कोणतं वाहन दिलं की तुम्ही केवळ अर्ध्या तासात पुण्याला पोहोचला...?

बरं ते जाऊद्या...महाराज जर कार्यक्रमस्थळी आले होते..तर मग लोकांची दिलगिरी व्यक्त करायला किंवा माफी मागायला का थांबले नाहीत…? निवृत्ती महाराज देशमुख...वैष्णव धर्माचं पालन छान करत आहात...महाराष्ट्राची थोर संत परंपरा आपल्या कर्माने कृतार्थ होत असेल...नाही का ?

दिंडीची रचना


पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या सहभागी होत असतात. मात्र त्यातल्या केवळ दोनशेच्या आसपास दिंड्यांनाच क्रमांक दिलेले आहेत. इतर दिंड्या बिनक्रमांकाच्या आहेत. दिंडीचा क्रमांक मिळवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर संस्थानचे सदस्य अर्ज केलेली दिंडी सलग पाच वर्षे सर्व नियमांचे पालन करून संपन्न होते का याची पाहणी करून दिंडीला क्रमांक देतात.
दिंडीच्या सर्वात पुढे भगव्या पताका असतात, त्याच्या मागे टाळकरी, मध्यभागी मृदुंगमणी सर्वात मागे विणेकरी अशी दिंडीची रचना असते. कुणी कोणते भजन म्हणायचे याच्या सुचना विणेकरी करत असतात तर चापदोर दिंडीभर फिरत शिस्तपालनावर लक्ष ठेवत असतात. दिंडीचे नियम आणि शिस्त मोडणाऱ्यांना दिंडीतून बाहेर काढण्याचे अधिकार चोपदारांना असतात. अर्थात असे प्रकार फार अपवादानेच घडतात.

न्याय- पालखी सोहळ्यात लाखो वारकरी चालत असले तरी त्यांच्या अत्यंत कमी वेळावाद उद्भवतात. किरकोळ वाद झालेच तर त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी चोपदारांवर असते. चोपदारच त्याचा न्यायनिवाडा करतात. दररोज संध्याकाळी दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी समाज आरती करण्याची परंपरा जोपासली जाते. आरतीच्या ठिकाणी मोठा चौरंग मांडून त्यावर पालखी ठेवली जाते. सर्व दिंड्याचे विणेकरी गोलाकार उभे राहतात. त्यांच्या मागे दिंड्या दिंडीतील वारकरी उभे राहतात. मग समाज आरती होते. त्यानंतर मायबाप विठ्ठलाची आरती होते. ज्ञानोबा-तुकोबाच्या नामघोषाने अवघे वातारवरण दुमदुमुन जाते. त्यानंतर सर्व दिंड्या जमा झाल्याची खात्री करून चोपदार आपल्या हातात असलेला दंड म्हणजे काठी उंचावून मोठ्याने आरोळी देतात. चोपदारांचा दंडक वर जाताक्षणीच सर्व वारकऱ्यांचे टाळ बंद होतात. मात्र ज्यांची काही तक्रार असते त्यांचे टाळ वाजायचे थांबत नाहीत. अशा वारकऱ्यांची तक्रार ऐकून चोपदार त्यावर न्याय देतात. चोपदारांनी दिलेला न्याय अंतिम असतो. तो सर्वजण आनंदाने स्वीकारतात.

संपर्क यंत्रणा- रोज रात्री मुक्कामाच्या ठिकाणी दिवसभरातल्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करून हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंची घोषणा केली जाते. वस्तू ज्यांची असेल त्यांनी जुजबी ओळख पटवली की त्यांना ती दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला वर्दी असं म्हणतात. वारीला गेलेल्या वारकऱ्यांशी त्याच्या घरच्या लोकांना संपर्क करायचा असेल तर आता मोबाईलसारखी सुविधा उपलब्ध आहे. मात्र मोबाईल वैगरे नव्हते तेव्हा घरचे लोक पत्र पाठवत असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पत्रावर व्यक्तीचं नाव आणि दिंडी क्रमांक लिहला तरी आपल्या व्यक्तीला त्याचं पत्र मिळायचं.

भोजन व्यवस्था- वारकरी दिंडीत भजन-किर्तनात रमलेले असतात. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी काही लोकांवर दिलेली असते. भोजन व्यवस्थेची जबाबदारी असणारे लोक दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी अगोदर पोहोचून जेवन बनवण्याचे काम करत असतात. तंबू ठोकणे, शेगड्या मांडणे अशी कामे करून ही मंडळी दिंडी पोहोचण्याअगोदरच वारकऱ्यांच्या जेवनाची व्यवस्था करत असतात. दिंडी पोहोचलीय. आणि जेवन तयार नाही. असे कधीही घडत नाही.

जेव्हा नव्हते चराचर...तेव्हा होते पंढरपूर...!


ज्याच्या भेटीची आस बाळगून वारकरी पंढरपूरच्या दिशेने कुणी पायी, कुणी वाहनाने तर कुणी मिळेल त्या सोयींनी पंढरपूर गाठतात त्या श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तींविषयी...
देशभरात विठ्ठल रखुमाईची मंदिरं अनेक ठिकाणी आढळतात. परदेशातही काही ठिकाणी विठ्ठल-रखुमाईची मंदिरं उभारली आहेत. मात्र या सर्व ठिकाणी विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीशेजारी-शेजारीच प्रतिष्ठापित केलेल्या आढळतात. पंढरपुरात मात्र विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली आहेत. याची एक आख्यायिका आहे. राधा आणि कृष्ण यांना एकत्र बसलेले पाहून रखुमाई नाराज झाल्या आणि रुसून दिंडिरवनात (आत्ताच्या पंढरपुरात) येऊन बसल्या. त्यांची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्णही दिंडिरवनात दाखल झाले. रखुमाईची समजूत काढून ते पुढे आई-वडिलांच्या सेवेत असणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीसाठी निघाले. मात्र माता-पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने शेजारीच पडलेली वीट भिरकावली आणि श्रीकृष्णाला सांगितले की माझी मातृ-पितृ सेवा झाल्याशिवाय मी तुला भेटू शकत नाही. माझी सेवा होईपर्यंत तू विटेवरच उभा राहा. श्रीकृष्णही मग पुंडलिकासारख्या भक्तासाठी विटेवर उभे ठाकले ते आजपर्यंत. म्हणून तर युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा असं श्रीविठ्ठलाच्या आरतीत म्हंटलय.
त्यानंतर विठ्ठलाचा शोध घेत आलेली रखुमाईही कृतककोपाने एका बाजुला उभी राहिली. भगवान विठ्ठल आणि रखुमाई जिथे उभे राहिले तिथेच त्यांची मंदिरे उभारली गेली. त्यामुळे इतर ठिकाणची मंदिरे आणि घरातील देव्हाऱ्यांत जरी विठ्ठल-रखुमाई शेजारी-शेजारी उभे राहिलेले असले तरी पंढरपुरात मात्र दोघांच्या मध्ये एक भिंत आहे.


पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे प्रांगण पूर्व-पश्चिम 300 फूट तर दक्षिणोत्तर 170 फूट लांब आहे. मंदिराच्या द्वाराला 12 पायऱ्या असून यातील पहिल्या पायरीवर नामदेव महाराजांनी समाधी घेतल्यानं या पायरीला नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते. नामदेव पायरीसमोरच संत चोखामेळा यांची समाधी आहे. या पायऱ्यांच्या पुढे 120 फूट लांब आणि 60 फूट रुंदीचा सभामंडप आहे. याच सभामंडपातून तीन मार्गांनी सोळखांबी मंडपात प्रवेश करता येतो. सोळखांबी मंडपात असलेल्या गरूड खांबास आलिंगन देण्याची परंपरा आहे. पुढे चौखांबी मंडप आणि कमान ओलांडली की आपण गाभाऱ्यात पोहोचतो. तेथेच हा सावळा विठ्ठल भक्तांची वाट पाहात उभा असलेला दिसतो.
तीन फुटांच्या नक्षीकाम केलेल्या व्यासपीठावर तीन फूट उंचीची श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. कमरेवर हात ठेवलेल्या मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ असून पाच फणे असलेल्या नागाची भव्य प्रतिमाही आहे. श्रीविठ्ठलाच्या व्यासपीठाचे छत चांदीने मढवले असून श्रीविठ्ठलमूर्ती स्वयंभू, वाळुकामय शिळेतून साकारली आहे.

पंढरपूर हे क्षेत्र पंढरी, फागनीपूर, पंडुरंगे, आणि पांडुरंगपल्ली अशा नावांनी वेगवेगळ्या कालखंडात परिचित होते. काही प्राचीन ग्रंथांमध्ये पंढरपूरचा उल्लेख पौंडरिक क्षेत्र, पंढरीपूर असाही आढळतो. चंद्रभागेने अर्धचंद्राकृती आकार धारण केलेल्या ठिकाणी पंढरपूर वसले आहे. पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र असल्याचे दाखले अनेक प्राचीन ग्रंथातही आढळतात. जेव्हा नव्हते चराचर...तेव्हा होते पंढरपूर असे संत नामदेव महाराजांनी म्हणून ठेवलंय ते याचसाठी. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारत काळाच्याही आधीपासून आस्तित्वात आहे. भागा (आता चंद्रभागा) नदीचा उल्लेख श्रीमभागवत आणि महाभारतातही आहे. पंढरपूर आर्यकाळात दिंडीरवन अशा नावाने ओळखले जायचे असेही काही ग्रंथांमध्ये म्हंटले आहे. मालूतारण ग्रंथातील माहितीनुसार पूर्वी दिंडीरवन नावाचे जंगल होते. त्या जंगलात दींडिरव या राक्षसाचे वास्तव्य होते. त्याचा वध मल्लिकार्जुनाने केल्यावर पुढे शालिवहन राजवटीत या जंगलाची साफसफाई केली गेली आणि चंद्रभागेच्या (पूर्वीची भागा) पाण्याच्या आसऱ्याने तीन योजन (आताची एक पंचक्रोशी) अंतरात लोकवस्ती वसवली गेली. शालिवहन राजाने वसवलेल्या लोकवस्तीत धार्मिक अधिष्ठानाच्या स्थापनेसाठी मल्लिकार्जुन आणि पांडुरंगाचे मंदिर उभारले. त्यानंतर या वस्तीला पांडुरंगनगरी असे नाव दिले. इ.स. 516 मधील एका शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतो. इ.स. 732 ते 788 या कालावधीत केरळच्या कालंटी परिसरात होऊन गेलेल्या श्रीआद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या श्री पांडुरंगाष्टकम् या काव्यामध्येही पंढरपूरचा उल्लेख आढळतो. इ.स.1226 मधील सोळखांबी शिलालेखातही चंद्रभागा आणि पंढरपूरचा उल्लेख आहे. इ.स.1270 मध्ये झालेल्या एका महायज्ञाचा तपशील देणाऱ्या एका शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगनगरी असा आजही पाहायला मिळतो. यादवकाळातील 1260 ते 1309 या कालावधीत यादवसत्तेतील हेमाद्री या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढरपूर व पांडुरंगाचा उल्लेख केल्याचंही पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे चौंडरस या कवीच्या 1303 साली लिहलेल्या अभिनव दसकुमारचरित या ग्रंथातही पंढरी आणि श्री विठलाचे महात्म्य सांगितले आहे. 1490-1508 या कालावधीत निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्याने लिहिलेल्या नृसिंहप्रसाद या ग्रंथातील तीर्थसार भागात भागा नदीच्या काठावर श्रीकृष्ण पांडुरंगाचे रूप घेऊन वास्तव्य करत असल्याचं म्हंटलंय. अशा तऱ्हेने पुरातन काळापासून आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारे पंढरपूर आणि पांडुरंग त्या-त्या काळात विविध नावांनी ओळखले जात असले तरी आज शासन दरबारी या पुण्यनगरीचा उल्लेख पंढरपूर असाच केला आहे.

कामगार आहे...तळपती तलवार आहे..!


गिरणीच्या भोंग्यावर टांगलेलं आणि अठराविश्व दारिद्र्य भाळी लिहिलेल्या गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणी कामगाराने नारायण नावाच्या सापडलेल्या मुलाला बाप म्हणून आपलं नाव दिलं. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असतानाही नारायणला सातवीपर्यंत शिक्षण दिलं. पोटाला चिमटे देत ताटातला घास नारायणला दिला. नारायणनेही सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर गिरणीतली नोकरी पत्करली. कळायला लागण्याच्या वयातच जॉबरच्या हाताखाली गिरणीतल्या लूमवर काम केलं. पुढे गिरणीतली नोकरी सुटल्यावर कधी हमाली, कधी शिपायाचे काम केले. भाकरीचा चंद्र मिळविण्यासाठी ते कधी घरगडी, हॉटेलात कपबशा धुणारा पोऱ्या, कुत्रे- मूलं सांभाळणारा घरगडी, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीत वाढले. कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, ऑइल मिलमध्ये हमाली केली. शाळेत पडेल ते काम करत नारायणने पुढचे शिक्षण पूर्ण केले आणि प्राथमिक शिक्षक बनले. खस्ता खात शिक्षण घेतले आणि हाच नारायण पुढे तळपत्या तलवारीच्या धारेचा, सारस्वतांच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिम्मत ठेवणारा कामगार कवी झाला.... नारायण सुर्वे नावाचा श्रीमंतांची मुजोरी झुगारणारा नव्या दमाचा समर्थ कवी मराठी साहित्याला मिळाला.

कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे

संकटांच्या खाचखळग्यांनी भरलेली आयुष्याची वादळवाट चालूनही नारायण सुर्वेंच्या कवीमनात कटुता आणि बहिष्कृतपणाची भावना नाही. उलट त्यांच्या अनेक कवितांतून समाजातील कामगार वर्गाची, कष्टप्रद जीवन जगणाऱ्यांची वेदना आणि असाह्यता भेदक आणि आक्रमकपणे व्यक्त होत जाते. एका बाजूला गरीब गरीब होत जातोय आणि श्रीमंतांच्या श्रीमंतीचे इमले वरवरच चढताहेत ही अर्थव्यवस्थेची अवस्था नारायण सुर्वेंची कविता ठळकपणे पण अतिशय गहिऱ्या भावनांसह सांगते. साध्या भाषेत सांगायचं तर नारायण सुर्वेंची कविता आहे रे वर्गाची मग्रुरी झुगारते आणि त्याच वेळी नाही रे वर्गाचं प्रतिनिधीत्व करते.
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीभाकारीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिलेकधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकलेदोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

नारायण सुर्वेंच्या कवितेतले कष्टांमुळे शेकलेले हात आणि गरिबीमुळे शेकलेल्या आयुष्याची झोळी पोटापुरत्याच अन्नाची आस बाळगते. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या घटकांची व्यथा मांडताना नारायण सुर्वेंची कविता भस्मासुरी मागणी करीत नाही तर जेवढी अवश्यकता आहे तेवढेच मिळावे अशी व्यवहारिक आणि नैतिक बूजही राखते. कारण एका वेळी गरजा पदरात पडाव्यात म्हणून पसरलेली झोळी दुबळी असल्याचीही सत्यता नारायण सुर्वेंची कविता प्रामाणिकपणे सांगते.


पोटापुरता पैसा पाहिजे
नको पिकाया पोळी 
देणार्‍याचे हात हजारो 
दुबळी माझी झोळी
एक वितीच्या वितेस पुरते 
तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी

नारायण सुर्वेंवर कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा होता. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड मिरजकर हे नारायण सुर्वेंचे आदर्श. त्यामुळे सुर्वेंच्या कवितांमधून सामाजिक क्रांतीचा जयघोष निनादत राहिला. कामगार क्रांतीची आस हेसुद्धा त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य ठरलं. घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांना सुर्वेंची कविता नेहमीच आपुलकीचं अलिंगन देत राहिली. कामगार जीवनाची बाराखडी कधी नव्हे ती नारायण सुर्वेंनी मराठी कवितेत आणली...रुजवली आणि जतन केली. कामगार, कष्टकऱ्यांच्या बोलीभाषेशी नाळ जोडतच सुर्वेंची कविता प्रवास करत राहिली. खानदानी साहित्यिक पार्शभूमी नसताना, उच्च शिक्षणाच्या डिग्र्या नसताना केवळ मनातल्या संवेदना आणि जाणिवांच्या बळावर सुर्वेंनी आपल्या कवितेतून कष्टकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू टिपले. पण त्यांना नाउमेदही केले नाही. रोजच्या दमगिरीने तेवढी उसंतच दिली नाही, पण पुढचे जग तुझेच आहे... असं म्हणत उद्याच्या जगण्याचा आशावादही नारायण सुर्वे देतात.
नारायण सुर्वेंची कविता गोरगरीब कामगार वर्गाच्या एश्रूंनी भिजलेली आणि त्यांच्या कवितेला कष्टकऱ्यांच्या घामासा वास जरी येत असला तरी अनेक कवितेंतून त्यांनी हेच कामगार जीवन मिश्कील पद्धतीनं मांडलेय.

कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर,
संशय माझा आला तुम्हा तर, 
नाही जाणार बाहेर,
पानी आणायला जाऊ का नको - काय ते पत्रात लिवा
शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले, 
लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले,दुधवाल्याचे पंचवीस दिले. 
त्यांना देऊ का नको, काय ते पत्रात लिवा

परदेशात नोकरीला असलेल्या नवऱ्याला पाठवण्यासाठी पत्र लिहून घेणारी त्याची अशिक्षित बायको या कवितेतून कामगार, कष्टकऱ्यांचं जीवन तर सांगते. शहनाज शेख व गीता महाजन यांच्या मूळ हिंदी कवितेचा स्वैर अनुवादही नारायण सुर्वेंनी मोठ्या ताकदीने केलाय. मूळ हिंदी कविता मराठीत आणताना मराठीच्या बालीभाषेचा बाज नारायण सुर्वेंनी मोठ्या कौश्यल्याने ओतप्रोतप्रमाणात या कवितेत ओतलाय.
कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील कामगारांच्या अवस्थेवरून दिसत असते असं म्हणतात. याच कामगारवर्गाच्या जगण्यातली भेदकता नारायण सुर्वेंनी ताकदीने मांडली. मात्र याच कामगार असलेल्या आणि कामगारांचा असलेल्या कवीला शेवटपर्यंत घरासाठी झगडावे लागले. पण त्यांना घर मिळालेच नाही. अनास्था पाचवीलाच पुजलेल्या सरकारकडून काय अपेक्षा करणार? नारायण सुर्वेंना घर देऊन सरकारला किंवा कोणत्या पक्षाला फायदा(राजकीय) मिळणार होता म्हणा... नारायण सुर्वेंच्या निधनानंतर दु:ख झाल्याची पत्रक काढून प्रेसला पाठवणाऱ्यांपैकी कितीजणांनी नारायण सुर्वेंना घर मिळावे म्हणून प्रयत्न केले? ज्यांनी पत्रक काढलीयत त्यांनी स्वत:लाच विचारावं...पण एक मात्र खरं... सुर्वे सर, तुम्हाला घर देण्याइतके सरकारचेच काय कुणाचेच हात मोठे नाहीत.. त्यामुळे या सर्वांना तुम्ही मोठ्या मनाने माफ करालच... पोरके असणाऱ्यांचा हुंकार तुमच्या कवितेतून नेहमीच जाणवत राहिला...तुम्ही मात्र आम्हा सर्वांच्या काळजात घर करून आम्हाला पोरके करून निघून गेलात...!

वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.
जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते; मरताना तेही बापडे दडतीलस्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

सरकारच्या संसाराची शंभरी


‘पंजा’बराव आणि ‘घड्याळ’बाईच्या संसाराला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला शंभर दिवस पूर्ण झाले. 7 नोव्हेंबर 2009 ला मंत्रालयाच्या उंबरठ्यावरचं शपथविधीचं माप ओलांडलं आणि संसाराला सुरूवात झाली, ‘पंजा’बराव आणि ‘घड्याळ’बाईंचं नातं तसं जुनंच... जुनं म्हणण्यापेक्षा नाजूक... नाजूक याचसाठी की घड्याळबाईंचं बहुतांश राजकीय शिक्षण पंजाबरावांच्याच गावी झालंय. पंजाबरावांच्या छत्रछायेखाली शिक्षण घेऊनही घड्याळबाईंनी परदेशी जन्माच्या मुद्द्यावरून सवतासुभा उभा केला... वेगळं घर बांधून काही दिवस दंड थोपटले... पण सत्तेच्या मांडवाखाली येताना पुन्हा पंजाबरावांच्या हातात हात घातला... पुन्हा नव्या आणाभाका घेतल्या... केंद्रात आणि राज्यात आपल्यासह आपल्याबरोबर आलेल्या वऱ्हाडी मंडळींनाही मंत्रीपदाच्या मुंडावळ्या बांधल्या... झुंजुमुंजू संसार थाटला... अधूनमधून घटस्फोटाच्या वल्गना झाल्या... एकमेकांवर डोळे वटारण्याचे, दोन्हीकडच्या व्याह्यांनी एकमेकांना वेगळ्या चुली मांडण्याच्या धमक्या देऊन झाल्या, क्वचितप्रसंगी डोळे मारण्याचे प्रकारही झाले पण सलग अकरा वर्षांच्या संसाराच्या दुसऱ्या टर्मची शंभरी पार करण्यात ‘पंजा’बराव आणि ‘घड्याळ’बाईंना यश आलंय. मधल्या काळात पंजाबराव आणि घड्याळबाईत लुटूपुटूचे तंटे झाले... कधी टॅक्सी परवान्यांच्या मराठी बाण्यांवरून झापाझापी झाली तर कधी धान्यापासून दारूनिर्मितीची झिंग चढवून हमरीतुमरीही झाली... आयपीएलला करमणूक करात सूट देण्यावरून दातओठ खाण्याचे प्रकारही झाले... पंजाबराव कधी घड्याळबाईंवर महागाईचं खापर फोडतात तर कधी घड्याळबाई मला एकट्याला जबाबदार धरू नका म्हणून आवई ठोकते....पंजाबरावांच्या वऱ्हाडातल्या एका सदस्याने राजकुमाराचे जोडे उचलले आणि एकच गोंधळ उडाला....माय नेम इज खान वरून राज्यात नेम-ब्लेमचे गेम जोरात असतानाच घड्याळबाई आयपीएलचं ताट घेऊन धनुष्यरावांना भेटल्या आणि पंजाबरावांच्या गोटात कुजबुज सुरू झाली....पंजाबरावांच्यातल्या एकाने तर घड्याळबाईच्या भेटीनंच धनुष्यरावांना बळ मिळालं असा आवाज केला...पण घड्याळबाईंची मात्र अशावेळी नेहमीच्या कौशल्यानं गुपचिळी...घड्याळबाई धनुष्यरावांना नेमक्या कशासाठी भेटल्या याचं उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यातच...अशा गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात घड्याळबाईंची प्रचंड हातोटी....पण एक मात्र नक्की घड्याळबाईंनी गॅलरीतून वांद्र्याच्या धनुष्यरावांना डोळा मारल्यावर मात्र पंजाबरावांना विरहवेदना असह्य होतात.

का रे दुरावा, का रे अबोला...
अपराध माझा, असा काय झाला...
नीज येत नाहि, मला येकटीला...
कुणी न विचारि, धरि हनुवटीला...
मान का वळविशी तु, वेगळ्या दिशेला....
असे म्हणत दिल्लीच्या वरिष्ठ पाहुण्यांनाही मग घड्याळबाईची समजूत घालावी लागते...
मी कशाला आरशात पाहू गं ?
मी कशाला बंधनात राहू गं ?
मीच माझ्या रुपाची राणी गं...
वारा भारी खटयाळ, असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा गं बाई, आवरु तरी कशा

घड्याळबाईही मग असा सूर आळवत माझ्या मनात ‘तसे’ काही नव्हते म्हणत सारवासारव करते... पंजाबराव-घड्याळबाईंचा संसार हा असा चाललाय... पण संसार म्हटल्यावर भांड्याला-भांडं लागणारच... खटके उडणारच... तरीही ‘घर दोघांचं असतं.. ते दोघांनी सावरायचं असतं, एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं’ म्हणत पंजाबराव आणि घड्याळबाईंचा संसार चाललाय. पंजाबराव आणि घड्याळबाईच्या संसाराला योगायोगाने व्हॅलेंटाईन डेला शंभर दिवस पूर्ण झाले... पुढचा प्रवासही गोडी-गुलाबीनं व्हावा याच शुभेच्छा...

गोष्ट उध्वस्त झालेल्या आटपाट नगरीची....


एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल आणि ती मिळवण्याची इच्छा आपण अव्यक्तपणे आकांडतांडव न करता वर्षानुवर्ष मनोमन जपली असेल...नवस सायास केले असतील आणि ती आपल्याला मिळाली नसेल किंबहुना कधीच मिळणार नसेल तर ती गोष्ट दिसली तरी मनाचा थयथयाट होतो. मनाची घालमेल असह्य होते. म्हणून ती गोष्ट आपल्याला दिसू नये किंवा या ना त्या कारणाने त्या गोष्टीचा साधा संपर्कही होऊ नये म्हणून तजवीज केली तर बिघडलं कुठं? कुणाला वाटेल हा मानसिक रूग्ण आहे...कुणाला प्रश्न पडेल हा असा का वागला किंवा वागतो? कुणी म्हणेल हा मुडी आहे...मुड असेल तेव्हा बोलतो...नसेल तेव्हा भांडण करतो....पण ज्याचे दु:ख त्याला कळे...जावे त्याच्या जन्मा तेव्हा कळे...ज्या गावात घर नाही...गावात जाण्याच्या रस्त्याला भेगा पडल्यायत त्या गावी कशाला जायचं ? बस्स...या विषयावर फार काही लिहता येत नाही...

समाधान मिळाल्याचं समाधान...


श्रीमंताघरचा नोकर होणं आवडेल की गरीब घरचा मालक…? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर त्याचं उत्तर असेल गरीब घराचा मालक...हो ना ? असं उत्तर देताना स्वाभिमान...आभिमान वैगेरेचा विचार करूनच कुणीही उत्तर देईल पण घरात पाऊल ठेवल्यावर आशाळभूतपणे वाट पाहणारी आपली मुलं-बाळं आपल्या चेहऱ्याकडे पाहून हसतील आणि नंतर आपल्या चेहऱ्यावरून त्यांची नंजर हळूहळू खाली सरकत आपल्या मोकळ्या हातांकडे वळेल तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे सामर्थ्य आपल्या त्या (मोकळ्या) हातात असेल का..?
शेवटी काय....तर एका मर्यादेनंतर पैशांची गरज असतेच...आपण नेहमी मंदिरात जातो तसेच पुन्हा एकदा जा..? अगदी नेहमीप्रमाणे पहाटे अंघोळ वैगरे करून मंदिराच्या रांगेत जाऊन ऊभे राहा....हार-फुले, नारळ यापैकी काहीही न घेता तास-दोन तासांच्या रांगेतील प्रतिक्षेनंतर मंदिरात पोहोचा...मनोभावे दर्शन घ्या...आरती वैगरे म्हणा...आणि बाहेर पडा...मंदिराबाहेर पडून नेहमीप्रमाणे मागे वळून मंदिराच्या कळसाकडे पाहून नमस्कार करा...आणि हे सर्व करून समाधान किती मिळालं याचा विचार करा....त्यानंतर विचार करा की नेहमी हार फुले-नारळ वाहून मिळणारं समाधान जास्त असतं की आजच्या (कोरड्या) देवदर्शनानं मिळालेलं समाधान जास्त....आपसुकच हार-फुले-वाहून केलेल्या देवदर्शनातून मिळणारं समाधान मोठं असतं असं आपल्यासला वाटेल...शेवटी देवदर्शन कशासाठी....आपल्या मनाच्या समाधानासाठीच ना..?नदीच्या पात्रात उभं राहून सूर्याला अर्ध्वयू कलेलं आपण सिनेमांमधनं नेहमी पाहतोच ना...पण मला सांगा...सूर्याला अंघोळ घालण्याच्या या विधीतून सूर्यापर्यंत पाण्याचा एक थेंब तरी पोहोचतो का..? पण त्यानं आपल्या मनाची मात्र अंघोळ होते...नाही का..? आणि मग समाधानासाठी हार-फुले-नारळ घ्यायला हवीत हे मग मनोमन पटतं....पण मग मनाच्या समाधानाची गाडी पुन्हा येऊन थाबंते ती (हार-फुले-नारळ घेण्यासाठी लागणाऱ्या) पैशांच्याच स्टेशनवर...नाही का..?

कोणी घर देईल का घर ?


सामान्य मुंबईकरांना हक्काचं घर मिळावं म्हणून सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करतं. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मंजूर केलेलं घर विलास नरसाळेंसारख्या “भारत श्री” शरीरसौष्टवपट्टूला 21 वर्षांच्या संघर्षानंतर मिळत नसेल तर ही सरकारी अनास्था म्हणायची की सरकारनं केलेली क्रूर थट्टा.... एक नाही दोन नाही तब्बल 21 वर्षांचा संघर्ष पण पदरी पडली निराशा...विलास नरसाळे...शरीरसौष्ठवात महाराष्ट्राला नावलौकिक मिळवून देणारं व्यक्तिमत्त्व...पण हक्काच्या घराच्या संघर्षानं त्यांना पार थकवलंय. शरीरसौष्ठव क्षेत्रातल्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री कोट्यातून त्यांना घर मंजूर केलं. घर मंजूरीची तारीख होती 27 मार्च 1989...2009 उजाडलं तरी घर मिळालं नाही..खुद्द मुख्यमंत्र्यांनी घर मंजूर करूनही विलास नरसाळे आज एका भाड्याच्या गळक्या घरात राहताहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं घर बिल्डरनं परस्पर दुस-याला विकलं.

मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं घर मिळावं म्हणून नरसाळेंनी मंत्रालयाच्या पाय-या झिजवल्या...सरकार बदलली...मुख्यमंत्री बदलले...पण विलास नरसाळेंची व्यथा आणि कथा काही बदलली नाही. विलास नरसाळेंना मध्यंतरी हृदयविकाराचा झटकाही येऊन गेलाय. आर्थिक संकटामुळे त्यांच्या दोन मुलांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शरीरसौष्ठवाचा खर्चिक छंद विलास नरसाळेंनी जीवापाड जपला. कामगार श्री ते जव्हार श्री असा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पार पाडला. अनेक चित्रपट आणि जाहिरातीतूनही काम केलंय. एका बाजूला खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून घरं मंजूर करायची आणि दूसऱ्या बाजूला खेळाडूला घरं मिळू द्यायचं नाही ही सरकारनं केलेली क्रूर थट्टाच नाही का..?

देवही खळखळून हसत असतील....


पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात महाराष्ट्राचे लाडके पु.ल., अभिजात विनोदाची परिसीमा म्हणजे पु.ल....हास्याचे आराध्य म्हणजे पु.ल....पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राला तब्बल पाच दशकांहुन अधिक काळ खळखळून हसवलं. पुलंचे लेखक, कवी, पटकथाकार, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक असे एक ना अनेक पैलू रसिकांनी याचि देही याची डोळा पाहिले आहेत......अनुभवले आहेत.... गुळाचा गणपती या सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते. कथा, कादंबरी, कविता, नाटक, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून पुलंनी महाराष्ट्राच्या गालावर हास्याचे मळे फुलवले, 8 नोव्हेंबर 1919 रोजी पु.देशपांडेंचा जन्म मुंबईत झाला, शिक्षण पुणे- सांगलीत घेऊन पु.ल.पण्यातूनच महाराष्ट्राला हसवित राहिले, फुलवत राहिले, पुलंनी आपल्या कलाकृतीच्या शिंपणातून रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. पुलंनी मराठी माणसाला काय दिलं ? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवलं. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी अशा अनेक पुस्तकांमधून पुलंनी रसिकांना दोन्ही करांनी हास्याचं दान दिलंय. पुलंनी रसिकाला एवढे काही दिले आहे की अनंत हस्ते पुरषोत्तमाने.....किती घेशील दो कराने अशी त्यांची अवस्था झाली आहे. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी हे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. पुलंनी साहित्याच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू केले आणि ते रूजविलेही, सर्वस्पर्शी प्रतिभेचा बहूरूपी अविष्कार पुलंनी महाराष्ट्राला भरभरून वाटला. पण अखेर 12 जून 2000 रोजी पुलंनी या भौतिक जगताचा निरोप घेतला. भौतिक याचसाठी की पुलं रसिकांच्या मनातून कधीही जाऊ शकत नाहीत....महाराष्ट्राच्या गालावर पुलंनी उठवलेली हास्याची लकेर पुलकित आणि चिरकाळ राहील यात शंकाच नाही...आणि म्हणूनच आजच्या पुलंच्या आठव्या स्मृतीदिनी एवढंच म्हणावसं वाटतं....आता स्वर्गलोकातील देवही खळखळून हसत असतील, कारण आमचे पुलं आता त्यांच्यात आसतील....साहित्याच्या या स्वयंभू सारस्वताला आदरांजली...!

महिला स्पेशल....



संध्याकाळचे सहा वाजले असतील.... मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनचा प्लॅ़टफॉर्म क्रमांक एक.... मी ऑफीसवरुन आज जरा लवकरच घरी चाललो होतो.... असो, प्रत्येकजण येणारी लोकल पकडायचीच असा विचार करतोय.... आणि.... अचानक अनाऊन्समेंट(महिलेच्याच आवाजातली) “प्लॅ़टफॉर्म क्रमांक एक पर आनेवाली धीमी लोकल महिला विशेष है, पुरूष यात्रियों से निवेदन है की वह इस लोकल से यात्रा न करे...” प्लॅ़टफॉर्मवरच्या महिला वर्गाने एक पाऊल पुढे टाकलं.... पुरुषांनीही मग बॅकफूट केलं. अनाऊन्समेंट संपते न संपते तोच महिला विशेष लोकल स्टेशनात दाखलही झाली. पहिल्या डब्यापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत फक्त महिलाच! खरंच..... महिला स्पेशल लोकल पाहून मला सावित्रीबाई फुलेंची शाळेत शिकलेली कथा आठवली. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला म्हणून शंभर वर्षापूर्वीं सावित्रीबाईंच्या अंगावर उडालेलं शेण अभिषेक म्हणून आजच्या महिला जगतावर होताना दिसत होतं.

वर्षानुवर्षे पुरूषी परंपरेनं “स्त्री ”ला माजघराच्या अंधार कोठडीत कोंडून ठेवलं होतं. केवळ स्त्रीलाच नाही तर तिच्यातल्या अस्मितेला, प्रगतीच्या दिशेनं झेपावण्याच्या क्षमतेलाही पर्यायानं मर्यादा घातल्या गेल्या. पण माजघराच्या अंधार कोठडीच्या कवडशातून पडणारा जगातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा प्रकाशझोत “ती ”ला खुणावत होता. आणि अशातच ज्योतिबा-सावित्रीबाई डॉ.आंबेडकर, शाहू महाराज यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या तीव्र विरोधाला न जुमानता स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे रेटलीच. पूर्वीपासूनच स्त्री ने घर सांभाळायचे आणि पुरूषाने नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडायचे असा “रिवाज ”जोपासला जात होता. आता ते चित्र बदलू लागलंय. पुरूषी परंपरेनं घट्ट पाय रोवलेल्या चिरेबंदी वाड्याचा उंबरठा स्त्रीनं ओलांडला आणि जगाच्या प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी ती सज्ज झाली. ती आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू लागल्या आहेत. ती मुख्यमंत्री ... पंतप्रधान... राष्ट्रपती तर झालीच पण पायलट, शास्त्रज्ञ आणि पत्रकारही झली.

मात्र ही तेजस्विनी आपल्या कर्तृत्वाने जगाच्या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण करत असली तरी पुरूषी साम्राज्यात अजूनही स्त्रीला समान संधी देण्याबाबत मत मतांतरे आजही चालूच आहेत. स्त्रीने विविध क्षेत्रात आपले सामर्थ्य सिध्द करूनही आपण तिला समान संधी देण्यास धजावत नाही. ही बाब दुर्देवी आहे. प्रगतीच्या दिशेने स्त्रीचं पडणारं प्रत्येक पाऊल हे ऊजळून निघत असताना अशा प्रकारच्या वादविवादात काय अर्थ आहे. या संदर्भात सर्वश्रुत असलेली ससा-कासवाची कथा आठवल्यावाचून राहत नाही. अंगभूत वेगाचे वरदान लाभलेल्या सश्याला आळसामुळे कशी हार पत्करावी लागली हे आपण सर्वजण जाणतोच. पण ही कथा इथेच संपत नाही... वेगाने धावण्याचे सामर्थ्य असूनही आपण हरलो कसे ? असे चिंतन सश्याने केले आणि पुन्हा कासवापाशी पोहोचला... पाठीमागच्या शर्यतीत ससा कशामुळे हरला होता ? याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या कासवाने पुन्हा शर्यतीस होकार दिला... झाले, ससा आळस न करता धावला आणि जिंकलाही. आता चिंतन करण्याची पाळी कासवाची होती. कासवानेही मग सश्याला पुन:श्च शर्यतीसाठी गळ घातली. आळस सोडला तर आपण जिंकू शकतो हा मंत्र सापडलेला ससा लगेच तयारही झाला... पण कासवाने अट घातली... शर्यतीचा रस्ता मी निवडणार...! आगोदरच्या विजयाने स्फुरलेला ससा मात्र तयार झाला आणि शर्यत सुरूही झाली. ससा सुसाट वेगाने धावत सुटला आणि अचानक एका ठिकाणी थांबला... समोर होती पाण्याने काठोकाठ भरलेली विस्तीर्ण नदी... झाले, पोहता येत नसल्यामुळे ससा थबकला आणि जागेवरच बसून राहिला. कासव मात्र पाठीमागून आले आणि पाण्यात डूबकी मारून हा-हा म्हणता नदी पलीकडचा काठही गाठला. तो शर्यत जिंकलाही होता. आता मात्र ससा भानावर आला त्याने पुनेहा चिंतन केलं आणि कासवाकडे गेला... पण शर्यत लावण्यासाठी नाही तर कासवाला आवाहन करण्यासाठी... इथून पुढे आपण धावण्याची शर्यत लावायची नाही, जिथं नदी आडवी येईल तिथं तू मला पाठीवर घ्यायचं आणि जिथं जमीन आडवी येईल तिथं मी तुला पाठीवर घेईन. असं केलं तर जगाच्या पुढं फक्त आपणच असू. या गोष्टीतलं तात्पर्य आता स्त्री आणि पुरूष दोघांनीही घेण्याची आवश्यकता आहे. परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले दोन्ही बाजूंनी उचलली गेली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशीराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे.एकुणच शिक्षणाची गंगा येण्यास उशीर नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.

कर्जमाफी झाली....पुढे काय....?



शेतक-यांच्या आत्महत्या कुठल्याही देशाला भुषणावह नाहीत आणि ज्या देशाचा उल्लेख शेतीप्रधान असा परंपरेने केला जात आहे त्या देशाला तर ही बाब नक्कीच लांच्छनास्पद आहे. शेतकरी आत्महत्येचा रोग महाराष्ट्रासह देशभरात एखाद्या विषाणूसारखा भिनत चालला असतानाच केंद्र सरकारने तब्बल साठ हजार कोटींचा बोजा स्वीकारत शेतक-यांना कर्ज माफी दिली. खरे पाहाता कर्जमाफी मिळण्याबाबत अनेकांनी अनेक मार्गांनी चाबूक ओढून रणकंदन माजविलं असतानाही कित्येक शेतक-यांना जीवानीशी जावं लागलं तेव्हा कुठं सरकारला नाईलाजास्तव कर्जमाफीचा निर्णय अर्थसंकल्पातून जाहीर करावा लागला. कर्जमाफीचा निर्णय झाल्यावर हा “ विजय ” आपलाच असल्याचा कांगावा करत अनेकांनी या “ विजया ” चा गुलाल आपल्याच अंगाला आपल्याच हातांनी फासून घेत श्रेय लाटण्याचे प्रकार केले. श्रेय लाटण्याच्या या स्पर्धेतली मश्गुलता इतक्या पराकोटीची होती की, शेतक-याला कर्ज काढण्याशिवाय आणि ते थकविण्याशिवाय पर्यायच नसावेत अशी परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत असणा-या प्रश्नांकडे लक्ष देण्याचं कोणालाही काहीही पडलं नसल्याचं दिसत आहे.

आत्महत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या थांबवण्यासाठी युध्दपातळीवर एकसंघ प्रयत्न होणं आवश्यक असताना केवळ पॅकेजेस् जाहीर करुन वरवरची मलमपट्टी करण्यात आली. एका दशकानंतर का होईना केंद्र सरकारला जाग आली हे बरे झाले मात्र आज केलेली मलमपट्टी ही आजचीच जखम बरी करु शकते पण उद्या पुन्हा जखम होणार नाही याची शाश्वती ती देत नाही किंबहुना पुन्हा कधीच जखम होऊ नये यासाठी आजची मलमपट्टी भविष्यासाठीचा उपाययोजना ठरु शकत नाही. यावर्षी दिलेली कर्जमाफी कोणत्याही सरकारला दरवर्षी देणं परवडणारं नाही असं खुद्द देशाचे कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनीच नमूद केलं आहे. त्यामुळे शेतक-यावरही पुन्हा कर्जमाफी मागण्याची वेळ येऊ नये यासाठी दूरदृष्टीने दूरगामी ठरु शकतील असे ठोस उपाय योजन्याची जबाबदारी कर्जमाफी देणा-या सरकारचीच आहे आणि सरकार ती पार पाडत नसेल तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला या मुद्दयाबाबत जागं करण्याची आवश्यकता आहे. पण कर्जमाफी दिली याचे कौतुक सोहळे करण्यात सरकार आणि सरकारला कर्जमाफी देण्यास भाग पाडल्याच्या बढाया मारण्यात विरोधी पक्ष गुंग झाले आहेत. जनतेच्या प्रश्नांवर झोपी गेलेल्या सत्ताधा-यांना जागं करणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे पण तेही या प्रश्नांवर झोपी गेल्यावर सरकारला कोण आणि कधी जाब विचारणार ?वास्तविक पाहाता शेतक-याला कर्ज काढण्याची आवश्यकताच भासू नये आणि भासलीच तर ते न थकविता पूर्ण परतफेड करण्याइतकं सामर्थ्य शेतक-याकडं यावं यासाठी म्हणून काहीतरी होणं आवश्यक आहे.आधुनिक शेती आणि शेतक-याची शेतीकडं बघण्याची मानसिकता या प्रमुख बाबीं या संदर्भात लक्षात घेण्यासारख्या आहेत.

आधुनिक शेतीच्या प्रयोगांचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत, नाही असे नाही पण ते प्रयत्न प्रसारमाध्यमांमधील जाहिरातींच्या नाहीतर कृषीमहाविद्यालयाच्या नोटीस बोर्डाच्या आणि पोस्टर्सच्या किंवा राजकीय भाषणबाजीच्या पलीकडे फार जाऊ शकलेले नाहीत.
शेतक-याच्या शेतशिवारापर्यंत आणि शेताच्या बांधापर्यंत ते कधी पोहोचलेच नाहीत. ते तसे पोहोचविण्याबाबतची उदासिनता या ओढवलेल्या परिस्थितीला जबाबदार आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. शेतक-याची शेतीकडं बघण्याची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे असाही एक मतप्रवाह आहेच पण आपल्या देशातील शेतकरी हा मुख्यत्वेकरुन अशिक्षीत असल्याने जगाच्या वेगाबरोबर धावताना त्याची दमछाक होणं नाकारता येणार नाही. ज्याचं शिक्षण नोकरी मिळविण्याएवढं झालं नाही, ज्याला शोधुनही नोकरी मिळत नाही किंवा जो नोकरीतून निवृत्त झाला आहे अशांनीच शेतीच्या “ भानगडीत ” पडायचं असा एक अलिखीत रिवाज आपल्याकडं वर्षानुवर्ष जोपासला जात आहे. आणि जे शेती करत आहेत तेही केवळ पोटभरणासाठी शेती करत आहेत. उदरनिर्वाहासाठी शेती करणारा व्यावसायाभिमुख शेतीकडं वळण्याचं धाडस करत नाही, असं धाडस करणारे कर्जबाजारी बनत आहेत कारण हल्ली बाजारात सहा रुपयांना मिळणारी कोथींबीरीची जुडी किरकोळ विक्रेत्याला दोन रुपये, होलसेल अडतदाराला तीन रुपये मिळवून देते मात्र त्या जुडीच्या वाढवणुकीसाठी आणि जपणुकीसाठी राबणा-या बळीराजाच्या हातात केवळ एकच रुपया पडतोय ही बाजाराची वास्तविकता दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही.

वाढत्या शहरीकरणामुळे, कारखानदारीमुळे व नागरिकरणामुळे गावकुसाशेजारच्या व शहराशेजारच्या शेतीयोग्य जमिनींचा गळा घोटला जात आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कौटुंबिक भावबंदकीच्या विघटनातून शेतजमिनींच्या झालेल्या वाटपांमुळे मशागत क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कमी मशागत क्षेत्रात जास्त उत्पादन मिळावे म्हणून केला जाणारा रासायनिक खतांचा अतिरेक उत्तरोत्तर जमिनींचा पोत कमी करत आहे. या आणि अशा अनेक समस्यांमधुन शेती क्षेत्र जात आहे.
आपल्या डोक्यात आणि शेतात काय पिकतंय याहीपेक्षा बाजारात काय विकतंय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पण शेतक-याची अशी मानसिकता तयार होण्यासाठी सामूदाईक शेती, ग्लोबलाझ्ड फार्मींग, शेतकरी शिक्षणासारखे प्रयोग राबविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हानिहाय अथवा तालुकानिहाय “ शेतकरी प्रशिक्षण केंद्रां ” ची उभारणी करुन त्याद्वारे शेतक-यांच्या कार्यशाळांचं आयोजन होऊ शकतं. अशा कार्यशाळांमधून कोणत्या प्रकारचं शिक्षण शेतक-यांना देता येईल याचा अभ्यास शासन पातळीवर कोणीतरी केला पाहिजे. कारण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून का प्रवेश करता येत नाही ? याचा अभ्यास या देशात होऊ शकतो तर शेतीप्रधान देशाचा शेतीतला चाललेला जीव वाचविण्यासाठी हे का होऊ शकत नाही ? असो..

शेतक-यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर चित्रपट निर्मिती होऊ शकते (असा चित्रपट बनवून फ्लॉप झाल्याने अरुण कचरे नावाच्या एका निर्मात्यालाही कर्जबाजारी होऊन पुन्हा कर्जमाफीसाठी चपला झिजवाव्या लागल्या हा भाग वेगळा) अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी सारख्यांनाही शेती विकत घ्यावीशी वाटत असेल (हे सर्व कशासाठी शेती विकत घेत असतील हा या लेखाचा विषय नाही) आणि नवनिर्माणाची आस बाळगणारे जिन्स आणि टी-शर्ट घालून ट्रँक्टरवर बसलेला शेतकरी बघण्याची स्वप्न बघत असतील त्याचप्रमाणं विद्यमान केंद्रीय कृषीमंत्र्यानाही पश्चिम महाराष्ट्रात कृत्रीम पाऊस पाडण्याचे प्रयोग करण्याचा मोह अवरता येत नसेल तर शेतीबाबतचं ग्लँमर आजही कमी निश्चितच कमी झालेलं नाही. पण हे ग्लॅमर अन्नदात्या बळीराजापर्यंत कधी पोहोचणार ? की निसर्गाच्या अविश्वासीपणामुळं शेतजमिनीवर पडणा-या भेगांचे पडसाद शेतक-यांच्याही चेह-यावर उमटतच राहाणार ?

अखंड देशात औद्योगिक क्रांती झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर्स झाले पाहिजेत, ग्लोबल सिटीज् उभ्या राहिल्या पाहिजेत हे खरं आहे, पण या सर्व स्थित्यंतरांमधल्या पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची मुलभूत गरज अन्न हीच आहे आणि अन्न हे केवळ आणि केवळ शेतीच देऊ शकते. म्हणून शेती टिकली पाहिजे.... टिकण्यासाठी तिला जगविलं पाहिजे. नाहीतर भविष्यात अन्न आयात करून खाण्याची वेळ येण्याचं भाळी लिहीलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

शेतीपुढील प्रश्नांमुळं “ बळी “ जाणारा हा “ राजा “ असाच तडफडत राहाणार असेल तर “ यथा राजा तथा प्रजा “ होण्यास वेळ लागेल का ? लालबहाद्दूर शास्त्रींनी ज्या मंत्रात देशाच्या सर्वांगीन विकासाचं तंत्र जाणलं त्या “ जय जवान जय किसान “ ची आरोळी आपल्या कानापर्यंत कधी पोहोचणार आहे की नाही ? शेतीपुढील प्रश्नांचं हे चक्रव्युह भेदून धन-धान्य देणा-या या काळ्या आईला पाना-फुलांचा हिरवा शालू नेसविलेला आपणाला बघायचा आहे की नाही ?