शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

सरकारच्या संसाराची शंभरी


‘पंजा’बराव आणि ‘घड्याळ’बाईच्या संसाराला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला शंभर दिवस पूर्ण झाले. 7 नोव्हेंबर 2009 ला मंत्रालयाच्या उंबरठ्यावरचं शपथविधीचं माप ओलांडलं आणि संसाराला सुरूवात झाली, ‘पंजा’बराव आणि ‘घड्याळ’बाईंचं नातं तसं जुनंच... जुनं म्हणण्यापेक्षा नाजूक... नाजूक याचसाठी की घड्याळबाईंचं बहुतांश राजकीय शिक्षण पंजाबरावांच्याच गावी झालंय. पंजाबरावांच्या छत्रछायेखाली शिक्षण घेऊनही घड्याळबाईंनी परदेशी जन्माच्या मुद्द्यावरून सवतासुभा उभा केला... वेगळं घर बांधून काही दिवस दंड थोपटले... पण सत्तेच्या मांडवाखाली येताना पुन्हा पंजाबरावांच्या हातात हात घातला... पुन्हा नव्या आणाभाका घेतल्या... केंद्रात आणि राज्यात आपल्यासह आपल्याबरोबर आलेल्या वऱ्हाडी मंडळींनाही मंत्रीपदाच्या मुंडावळ्या बांधल्या... झुंजुमुंजू संसार थाटला... अधूनमधून घटस्फोटाच्या वल्गना झाल्या... एकमेकांवर डोळे वटारण्याचे, दोन्हीकडच्या व्याह्यांनी एकमेकांना वेगळ्या चुली मांडण्याच्या धमक्या देऊन झाल्या, क्वचितप्रसंगी डोळे मारण्याचे प्रकारही झाले पण सलग अकरा वर्षांच्या संसाराच्या दुसऱ्या टर्मची शंभरी पार करण्यात ‘पंजा’बराव आणि ‘घड्याळ’बाईंना यश आलंय. मधल्या काळात पंजाबराव आणि घड्याळबाईत लुटूपुटूचे तंटे झाले... कधी टॅक्सी परवान्यांच्या मराठी बाण्यांवरून झापाझापी झाली तर कधी धान्यापासून दारूनिर्मितीची झिंग चढवून हमरीतुमरीही झाली... आयपीएलला करमणूक करात सूट देण्यावरून दातओठ खाण्याचे प्रकारही झाले... पंजाबराव कधी घड्याळबाईंवर महागाईचं खापर फोडतात तर कधी घड्याळबाई मला एकट्याला जबाबदार धरू नका म्हणून आवई ठोकते....पंजाबरावांच्या वऱ्हाडातल्या एका सदस्याने राजकुमाराचे जोडे उचलले आणि एकच गोंधळ उडाला....माय नेम इज खान वरून राज्यात नेम-ब्लेमचे गेम जोरात असतानाच घड्याळबाई आयपीएलचं ताट घेऊन धनुष्यरावांना भेटल्या आणि पंजाबरावांच्या गोटात कुजबुज सुरू झाली....पंजाबरावांच्यातल्या एकाने तर घड्याळबाईच्या भेटीनंच धनुष्यरावांना बळ मिळालं असा आवाज केला...पण घड्याळबाईंची मात्र अशावेळी नेहमीच्या कौशल्यानं गुपचिळी...घड्याळबाई धनुष्यरावांना नेमक्या कशासाठी भेटल्या याचं उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यातच...अशा गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात घड्याळबाईंची प्रचंड हातोटी....पण एक मात्र नक्की घड्याळबाईंनी गॅलरीतून वांद्र्याच्या धनुष्यरावांना डोळा मारल्यावर मात्र पंजाबरावांना विरहवेदना असह्य होतात.

का रे दुरावा, का रे अबोला...
अपराध माझा, असा काय झाला...
नीज येत नाहि, मला येकटीला...
कुणी न विचारि, धरि हनुवटीला...
मान का वळविशी तु, वेगळ्या दिशेला....
असे म्हणत दिल्लीच्या वरिष्ठ पाहुण्यांनाही मग घड्याळबाईची समजूत घालावी लागते...
मी कशाला आरशात पाहू गं ?
मी कशाला बंधनात राहू गं ?
मीच माझ्या रुपाची राणी गं...
वारा भारी खटयाळ, असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा गं बाई, आवरु तरी कशा

घड्याळबाईही मग असा सूर आळवत माझ्या मनात ‘तसे’ काही नव्हते म्हणत सारवासारव करते... पंजाबराव-घड्याळबाईंचा संसार हा असा चाललाय... पण संसार म्हटल्यावर भांड्याला-भांडं लागणारच... खटके उडणारच... तरीही ‘घर दोघांचं असतं.. ते दोघांनी सावरायचं असतं, एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं’ म्हणत पंजाबराव आणि घड्याळबाईंचा संसार चाललाय. पंजाबराव आणि घड्याळबाईच्या संसाराला योगायोगाने व्हॅलेंटाईन डेला शंभर दिवस पूर्ण झाले... पुढचा प्रवासही गोडी-गुलाबीनं व्हावा याच शुभेच्छा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा